खुळा

Submitted by रसप on 4 August, 2013 - 23:57

सुमन तिचे सुमनासम सुंदर स्वच्छ पवित्र सुगंध जसा
नितळ निळ्या नयनी नभरंग निरागस लोभस अल्लडसा
अधरकळी कमनीय जुळी मकरंदकुपी पुरती भरली
बघुन तिला मज ईश्वरदर्शनआस नसे दुसरी उरली

रुणझुण पैंजण नादत भासत मोहक चालत मोहविशी
अलगद शब्द अनाहुत येउन स्पर्श करे जणु मोरपिशी
कटिखटके लटके झटके बघता उडते मन होत खुळे
लय हलते हृदयात नि स्पंदन एक-दुज्यास कधी न जुळे

झुळुकहवा उडवून खट्याळ बटांस तिच्या लडिवाळपणे
बहरुन येउन बाग हसे भ्रमरासम हे मन बागडणे
जणु हरिवल्लभ व्यस्त झुले श्रवणाभरणे झुलतात तशी
नकळत मी झुललो उलटा, झुरलो पडलो नित तोंडघशी

लिहुन किती कविता जमल्या पण शब्द न एक कधी वदलो
कुणि सुकुमार तिचे मुख चुंबित पाहुन मीच खुळा ठरलो

....रसप....
४ ऑगस्ट २०१३
सत्यकथेवर आधारित
वृत्त श्रवणाभरण - ललललगा ललगा ललगा ललगा ललगा ललगा ललगा
http://www.ranjeetparadkar.com/2013/08/blog-post.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृत्त कठीण असूनही छान अभिव्यक्ती केलेय.

फक्त,
"सुमन तिचे सुमनासम ..... " या ओळीतील 'सुमन तिचे' याचा उलगडा झाला नाही.
(इथे 'वदन तिचे' असे हवे होते का असा विचार मनात डोकावून गेला.)

छान.

उ.काका,

सुमन = सु+मन = थोडक्यात 'मन'

------------------------

'हरिवल्लभ'चा उलगडा झाला का ?

हरिवल्लभ = जास्वंद !!!!!!
सुमन =चांगले मन !!!

कविता अप्रतिम आहे
दिल खुश झाले अगदी ............

अरे मी फेसबुकावरचा तू सोडवलेला पेपर (लिंक) पाहून ठेवला होता त्यावरूनच कॉपी केली होती हारिवल्लभची Wink Proud
सुमन साठी मात्र मला मार्क बरोबरय्त ते उत्तर मी मानाने सोडवलय

जमलीये पण अशी कविता कोणी प्रेयसीला ऐकवतं का?

<<असते आवड एकेकाच्या प्रेयसीला ...सगळ्याच पोरीना काय मुक्तछंद चारोळ्या असल्याच कविता आवडतात असे नव्हे ...खरीखुरी कविता म्हणजे काय हे कळणार्‍याही काही मुली ह्या जगात आहेत ह्यावर आम्ही विश्वास ठेवतो .............

Proud Proud Proud (मनातल्यामनात Angry = खुन्नस !!!)