प्रवास वेगळाच घडला…

Submitted by manishh on 22 July, 2013 - 08:01

तुझा हात सोडला अन् प्रवास वेगळाच घडला
मी मृगजळाचा नाद सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला.

तुझीच शक्ती, तुझीच भक्ती; हिच इथली वहिवाट
मी हा शिरस्ता मोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला.

आपलं ओझं आपल्याच खांद्यावर अन् रखरखीत पाऊलवाट,
मी धोपटमार्ग सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला.

माझे प्राक्तन, माझीच दृष्टी अन् माझेच हे दोन हात
मी अट्टहास फळाचा सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला.

फाटलेले शीड, वादळाची साथ अन् संकटांची लाट
पण हा कणा नाही मोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला.

अविरत कष्टांची लांबलचक रात्र अन् मग स्वप्नांची पहाट
मी प्रयत्न नाही सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला.

मुक्कामही विसरलो, अशी सापडली ही माझी वाट
मी मार्ग माझा शोधला, अन् मग प्रवास वेगळाच घडला.

~ मनिष
(1 May 2013 –> 6 April 2012)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपलं ओझं आपल्याच खांद्यावर अन् रखरखीत पाऊलवाट,
मी धोपटमार्ग सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला.

ह्या ओळी आवडल्या.
शुभेच्छा.

छान.

आपलं ओझं आपल्याच खांद्यावर अन् रखरखीत पाऊलवाट,
मी धोपटमार्ग सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला.

मलाही या दोन ओळी विशेषकरुन आवडल्या. लिहिता राहा.
पुलेशु.

-दिलीप बिरुटे

मला स्वतःला आता काही ओळी ओढून-ताणून आणल्यासारख्या वाटतात..खूप दिवसांनी लिहिलंय त्यामुळे मनासारखी लय नाही सापडली. तरीही आवर्जुन प्रतिसाद देणार्‍या सर्वांनाच धन्यवाद!

अविरत कष्टांची लांबलचक रात्र अन् मग स्वप्नांची पहाट
मी प्रयत्न नाही सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला.
.
आपलं ओझं आपल्याच खांद्यावर अन् रखरखीत पाऊलवाट,
मी धोपटमार्ग सोडला, अन् मग प्रवास वेगळाच घडला.

आवडल्यात.