मोड आलेल्या मुगाचे स्टफ्ड पराठे

Submitted by मंजूडी on 27 July, 2013 - 02:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सारणासाठी:

१. हिरवे मूग - दोन ते अडीच वाट्या
२. एक मध्यम बटाटा उकडून
३. आमचूर पावडर किंवा चाट मसाला - १ चमचा
४. बडिशेपेची पावडर - १ चमचा
५. गरम मसाला - १ चमचा
६. जिर्‍याची पूड- १ चमचा
७. आलं आणि मिरची वाटून - दोन चमचे
८. तिखट, मीठ, साखर - चवीनुसार
९. चिरलेली कोथिंबीर - १ वाटीभर

पारीसाठी: कणीक, मीठ, तेल, पाणी.

क्रमवार पाककृती: 

१. मूग भरपूर पाण्यात भिजत घालून, मग पाणी उपसून त्याला मोड येऊ द्यावेत. या प्रक्रियेला साधारण अठरा तास लागतात. तो वेळ पाककृतीच्या वेळेत गणलेला नाही.

२. मोड आलेले मूग कुकरच्या क्षमतेप्रमाणे एक किंवा दोन शिट्या देऊन शिजवून घ्यावेत. मी वरण भाताबरोबर शिजवून घेतले. मुगात अजिबात पाणी घातले नव्हते. अगदी मऊ लगदा होईपर्यंत मूग शिजवायचे नाहीत. दाणा किंचीत टसटशीत राहिला पाहिजे.

३. मूग थंड झाल्यावर मिक्सरमधे भरडसर वाटून घ्यावेत.

४. ते भरड वाटण एका भांड्यात घेऊन मग त्यात सारणासाठी असलेले सर्व घटक एकेक करून घालून पराठ्याचे सारण नीट तयार करून घ्यावे.

moong paratha 1.jpg

५. स्टफ्ड पराठ्यांसाठी नेहमी भिजवतो तशी कणीक भिजवून घ्यावी.

६. तयार केलेलं सारण कणकेच्या पारीत भरून नेहमीसारखे पराठे लाटून, तव्यावर तेल सोडून भाजून घ्यावेत.

७. लोणी/ दही/ सॉस/ चटणीबरोबर गरमागरम गट्टम करावेत.

moong paratha.jpg
वाढणी/प्रमाण: 
दोन ते अडीच वाट्या मुगाचे साधारण १२ पराठे होतात.
माहितीचा स्रोत: 
तेलकट खस्ता कचोरी आणि आलू पराठे यांतील पौष्टिक सुवर्णमध्य
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.

आज केले होते!! मस्त झाले!!! Happy फक्त मुगाच्याऐवजी मिक्स कडधान्यं घेतली, एवढाच बदल केला! बाकी सर्व सेम!!!

मंजु, आज सकाळी केले पराठे, खुपच छान झाले. थँक्यु गं!
थोडेफार बदल केले म्हणजे मुग रात्रभर भिजवून सकाळी शिजवले. मोड आणले नाहीत. बटाटाही घातला नाही. फक्त चाट मसाला, धणे-जीरे पूड, तिखट-मीठ, लसुण आणि कोथिंबीर घालून किंचीत मळून एकजीव केलं मिश्रण आणि पुरणासारखं भरलं पारीत. लेकाला वरुन अमुल बटर थापून दिले. टिपीकल पंजाबी पराठे दिसत होते.

तू सांगितलंयस खरंतर की मुग टसटशीत हवेत, पण मला दुपारपर्यंत ते खुप कोरडे होतील की काय अशी शंका होती, म्हणुन मी माझ्या समाधानासाठी अंगाबरोबर पाणी ठेऊन मऊ शिजवले.

पाणी ठेऊन मऊ शिजवले.>> ओके! पण लाटता आले ना?
मऊ शिजवले तर लाटायला नाजूक होतील असं वाटलं मला.. म्हणून मी टसटशीत ठेवले.

आजच करण्यात येईल ही पाकृ. फ्रिजमधे मोड आलेले मूग नेहमीच असतात. आज कुकर बरोबर ते ही लावून सारण करते. कणीक भिजवून गरम गरम पराठे आणि वरण्-भात असा रात्रीचा बेत. Happy

काल रात्री केले होते हे पराठे. मस्त झाले होते आणि करायला तसे बर्‍यापैकी सोपे आहेत. सुनिधीमुळे मी तिखट आय्टम्स वगळले होते. तरी चवीला छान झाले होते.

मी मूग पाणी घालून शिजवले आणि नंतर त्या पाण्याचं काढण केलं. Happy

एकदम हटके रेसिपी !!!

धन्स
भन्नाट कल्पकता ...अगदी एखाद्या शेरात पुढेमागे मी वापरीन की काय अशी

आज केलाय हा पराठा. खरंच खस्ता कचोरी आणि आलूपराठा ह्या दोन्हींतील सुवर्णमध्य. अतिशय सुंदर चव आणि थोडासा बटाटा + भरडलेले मूग ह्याचे मिश्रण इतके मस्त मिळून आलेय. ना चिकट, ना भरभरीत. इतक्या गुणी रेसिपीकडे माझे दुर्लक्ष झाले. आता ह्या पुढे नियमित करणार. धन्यवाद Happy

Mung stuffed paratha.jpg

Pages