हमिदाबाईची कोठी

Submitted by गोंयकार on 29 July, 2013 - 01:59

सुमारे पस्तीस वर्षापूर्वी अनिल बर्वे लिखित हमिदाबाईची कोठी हे नाटक रंगमंचावर आलं. बर्वेंची संहिता, विजया मेहतांचं दिग्दर्शन व नाना पाटेकर, अशोक सराफ़, नीना कुलकर्णी, भारती आचरेकर आणि स्वत: विजयाबाई ह्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यांचा अभिनय ह्या त्रिवेणी संगमामुळं हे नाटक चिरंतन रसिकांच्या स्मृतीत राहिलं. सुनील बर्वेंच्या “हर्बेरियम” प्रकल्पांतर्गत हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि आमच्यासारख्या (विजयाबाईंच्या शब्दातच सांगायचं झालं तर) “द लेट बॉर्न जनरेशन” ते बघायाल मिळालं हे आमचं भाग्य. त्यासाठी “सुबक”चे शतश: आभार!

१९४०-५०च्या शतकात जेव्हा फ़ोनो रेकॉर्डस प्रचलित होऊ लागल्या होत्या त्यावेळी त्याची झळ कोठीवर नाचगाणी करणाऱ्या तवाईफ़ांच्या आयुष्याला बसली होती. दर्दी आणि कानसेनांनी कोठीकडे पाठ फ़िरवली. कोठ्या ओस पडू लागल्या आणि त्यांचं रुपांतर हळूहळू वेश्यावस्तींत होऊ लागलं होतं. नाच-गाण्य़ांच्या अदा हरकतीपेक्षा बाईच्या शरिराला जास्त किंमत मिळू लागली होती. कोठ्य़ांचा सुवर्णकाळ संपत आला होता. हमिदाबाई हि त्याच सुवर्णकाळाची साक्षीदार आहे. एकेकाळी जिच्या गाण्यावर सारेच रसिक फ़िदा व्हायचे तिच्या कोठीवर आता कोणीच फ़िरकत नाही. कोठीवरची बत्ती पेटत नाही कि रात्रभर मैफ़ल रंगत नाही. उधारी वाढली, अन्नाची मारामार पण म्हणून हमिदाबाईंनी तवाईफ़गिरिच्या तत्व आणि धर्माला कधी मुरड घातली नाही. पैश्याच्या मोहापायी इतर कोठीसारखं तिथे गाणं बजावण्याच्या ऐवजी फ़िल्मी रेकॉर्डसवर नाच-गाणी होत नव्हती, किंबहुना हमिदाबाईंनी ति होऊ दिली नाही. तिच्या आयुष्यात गल्लाभरु, बाजारु गोष्टींना स्थानच नव्हतं. बलीबाबाच्या दर्ग्यावर चादर चढवताना तिने मन्नत मागितली होती तीसुध्दा पैसेवाल्या सेठची नव्हे तर आपलं गाणं ऐकून दिलखुलास दाद देणाऱ्या रसिकांची. बदलत्या काळापुढे आपला बळी न देता त्याच्याशी एकाकी झुंजणाऱ्या हमिदाबाईच्या कोठीची हि कथा आहे.

तसं पाहायला गेलो तर नाटकाची नायिका हि हमिदाबाई नसून तिची “कोठी” आहे. तीन अंकांच्या कालखंडात ह्या कोठीशी निगडीत असलेली सर्व माणसं काळानं चालवलेल्या खेळात सपशेल नांगी टाकत जातात. हमिदाबाईचा झालेला मृत्यू, सईदाच्या आयुष्याची झालेली वाताहात, सत्तारची झालेली फ़सगत आणि शब्बोची आत्महत्या ह्या सर्व घटनांना हि कोठी साक्षी आहे. हा धागा दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींनी बरोबर पकडलाय. कथनसरणीत उत्तरोत्तर वाढत जाणारी अस्वस्थता, कोठीला आलेला भकासपणा नेपथ्य व प्रकाशयोजनेच्या मदतीने खुप चांगल्या रितीने साकारला आहे.

ह्या नाटकात सर्वात जास्त भावली ति नाटकाची संहिता. कुठेच मेलोड्रामॅटीक संवाद नाहीत, पात्रं आणि त्यांच्या पार्श्वभूमीची अचूक मांडणी ह्या संहितेत केलेली आहे. कथनामधे प्रत्येक पात्राला स्वत:ची पुरेशी स्पेस दिलेली आहे. कुठलंच पात्र कमीजास्त वाटत नाही. प्रदीप मुळ्येंचं नेपथ्य हि एक आणखी जमेची बाजू. नेपथ्याची मांडणी आणि अंकागणिक त्यात होणारे सूचक बदल खुप काही सांगून जाणारे होते.

अभिनयातसुध्दा नावं ठेवायला कोणी जागा ठेवलेली नाही. नीना कुलकर्णी (हमिदाबाई), संजय नार्वेकर (लुख्खा दादा) ह्यांनी नेहमीच्या सहजतेने आपल्या भूमिका बजावल्या. जितेंद्र जोशीने सत्तारची भूमिका छान चितारली आहे. पण सगळ्यात जास्त भाव खाऊन गेले ते विकास पाटील (बाहरवाला) आणि स्मिता तांबे (सईदा). काळानुरुप व्यक्तिरेखेत होणारे बदल ह्या दोन्ही कलाकारांनी सहजरित्या भुमिकेत दाखवले आहे. ह्या तुलनेत मन्वा नाईक (शब्बो) जरा कमी वाटली

नाटक सुन्न तर करतंच तसंच समाजव्यवस्थेवर, आपल्या पांढरपेशी नीतीमत्ता आणि प्रेमाच्या संकल्पनांवर प्रश्नही उभे करतं. ३५ वर्षापूर्वीची संहिता तरी संदर्भ अजूनही ताजे वाटतात. “ईमान स्वस्त आणि राशन महाग” हि परिस्थिती तेव्हा होती तशी आत्ताही आहे. आपण समाज म्हणून आणखी कोडगे बनलो आहोत एवढंच. आता त्या इमानासकट आपल्याला विकत घेणाऱ्या प्रलोभनांना आपण बळी पडायचं का हमिदाबाईसारखं मान न झुकवता जगायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म्म.. चांगलं लिहिलंयस.
प्रयोगाबद्दल मत थोडे वेगळे आहे. Happy

अरे प्रयोग अजिबातच आवडला नव्हता मला. पण मी काही समीक्षक नाही आपल्याच लोकांबद्दल जाहीर बोलायला Happy