भाव नाही

Submitted by निशिकांत on 26 July, 2013 - 01:06

शोषितांच्या आसवांना भाव नाही
भूक पोटी नांदते पण हाव नाही

झोपड्या गिळूनी उभ्या श्रीमंत वस्त्या
मूळचा तो आठवातिल गाव नाही

मी जसा आहे तसा लोकांस दिसतो
आणला मोठेपणाचा आव नाही

संसदेच्या परतलो दारातुनी मी
सज्जनांना, ऐकले, शिरकाव नाही

घर जळाले कालच्या दंग्यात माझे
जाळणार्‍यांना सजेचे नाव नाही

पूर सालाबाद येतो, तोंड देण्या
दूरगामी ठोस का प्रस्ताव नाही?

राज्यकर्त्यांची मला कळते न खेळी
खेळलेला मी कधी तो डाव नाही

कायद्यांच्या पुस्तकातुन चूक शिकलो
"न्याय दरबारी कुणीही राव नाही"

गाव माझे ओस पडले पण तरीही
घेतली शहराकडे मी धाव नाही

हो कलंदर आज तू "निशिकांत" थोडा
सभ्यतेला आज कोठे वाव नाही

निशिकां देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कायद्यांच्या पुस्तकातुन चूक शिकलो
"न्याय दरबारी कुणीही राव नाही"

हो कलंदर आज तू "निशिकांत" थोडा
सभ्यतेला आज कोठे वाव नाही >>> हे दोन शेर सर्वात विशेष वाटले.

निशिकांतजी, छान गझल !
आव, शिरकाव, राव हे शेर खूप आवडले.

गिळूनी हे 'गिळुनी' असं लिहायचं होतं बहुतेक आपणास.
मतला व काही सुटे मिसरेही आवडले.

गाव माझे ओस पडले पण तरीही
घेतली शहराकडे मी धाव नाही<<< आवडला.

दुसर्‍या शेरात 'गिळुनी' असे हवे आहे. Happy