विडंबन

Submitted by मी मुक्ता.. on 26 July, 2013 - 10:33

हल्ली फेसबुक वर एक कविता फार फेमस होतेय... It was like every 5th person in my friend list was sharing this. Got irritated with this oversimplified romanticism in patriarchy..त्याचा हा परिपाक.. Lol

खाली मूळ कविता पण देतेय...

अवास्तववादी आणि gender biased कविता वाचून वैतागलेल्या सर्वांना सप्रेम...

तो तिला म्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे”
ती म्हणाली, "पोळ्या लाटतेय, तू पटपट भाजून घे"

तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?”
ती म्हणाली "मला चालेल बाहेरुन आणणार असशील तर"

“ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ”
"मुलांना शाळेतून कोण आणेल, त्यानुसार ठरवू वेळ"

“बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू”
"अचानक कसे प्लॅन करतोस, उद्या आहे प्रोजेक्ट रीव्हू"

“तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट”
"मदत कर कामात थोडी, करण्यापेक्षा कटकट"

आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
तरी मदत केलीच नाही, नुसती बोलायचीच हौस

सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
तिने मारली हाक त्याला बोलावण्यासाठी, वैतागून

इकडे ये, सिगरेटी कसल्या ओढतोस फुटकळ कारणाने,
मी बसले फुंकत कामं सोडून तर चालेल का, सांग मुकाट्याने

बोलाचीच कढी बोलाचाच भात, नुसतंच गोड बोलायचं
कामं बिलकूल करायची नाहीत, अशाने कसं चालायचं

मी ही जाते दिवसभर ऑफिसला, तूच एकटा दमत नाहीस
मलाही वाटतं ब्रेक घ्यावा, पण तू काही ऐकत नाहीस

अपेक्षांचं ओझं दोघे वाटून जरा घेऊ
मिळून मिसळून काम करु, प्रेम असं देऊ

असं झाल्यास कोणाला वाटेल यातून मोकळं व्हावसं
हेच होईल विश्व स्वप्नातलं, वाटेल इथेच रमावसं

तो म्हणाला " बोललीस तेव्हा आलं माझ्या ध्यानात सारं..
माझ्या लक्षात आलंच नाही, माझं थोडं चुकलंच खरं"

इथून पुढे कायमच करत जाईन घरात काम
म्हणजे तुलाही वेळ मिळून गप्पा आपल्या रंगतील जाम..

तिने त्याच्यात विरघळण्याइतकंच, त्यानेही तिच्यात विरघळून जावं..
तेच खरं नातं असेल, याचं दोघांनी भान ठेवावं..

**************************************************************

मूळ कविता, (त्या आधीच्या ओळींसह) Sad

नवर्या साठी न बायको साठी…

नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी सुंदर कविता काल वाचनात आली. दुर्दैवाने कवीचे नाव कळू शकले नाही पण त्याने कवितेची गोडी कमी होत नाही.

तो तिला म्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे”
ती म्हणाली “पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे”

तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?”
ती म्हणाली ” आई रागावतील, दूध उतू गेल तर?”

“ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ”
“पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ”

“बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू”
“नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू”

“तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट”
“बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट”

आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस

सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून

दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना

नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।

तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
“रागावलास न माझ्यावर?” आणि तो विरघळला।

“थोडासा…” त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली “बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग”

“माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल

अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस…

तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?”

“बोललास हेच पुरे झाल…एकच फ़क्त विसरलास…
माप ओलांडून आले होते, मी-तू पण तेव्हाच गळलं
माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं?”

-कवी अज्ञात

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users