झुंज

Submitted by UlhasBhide on 26 July, 2013 - 00:36

मूळ रचनेतील व्याकरणाची एक ढोबळ चूक, श्री. विजय पाटील (विदिपा) यांनी निदर्शनास आणल्याने
संपादित रचना प्रकाशित करत आहे. धन्यवाद विजय.
----------------------------------------------------------------------------------------------------------------
झुंज (संपादित रचना)

झुंजणे जमले न ते तगलेच ना
मर्म हे कळले तरी वळलेच ना

जाणती का आसवांचे मोल ते
हुंदके ज्यांनी कधी गिळलेच ना

गीत जागे, स्पंदने हेलावता
जे न गाती ते कधी जगलेच ना

दु:ख प्याले रिचवुनी जे धुंदले
जीवनाला ते कधी विटलेच ना

झुंजता दु:खासवे जे झिंगले
हारही झाली तरी हरलेच ना

.... उल्हास भिडे (१-८-२०१३)

-----------------------------------------------------------------------------
खालील शेरात अलामत भंगल्याने तो वेगळा लिहिला आहे.

नांदतो 'उल्हास' ज्यांच्या अंतरी
प्रौढ झाले; वृद्ध ते झालेच ना

.... उल्हास भिडे (१-८-२०१३)

------------------------------------------------------------------------------

झुंज (मूळ रचना)

झुंजणे जमले न ते, तगलेच नाही
मर्म हे कळले तरी वळलेच नाही

काय ठावे आसवांचे मोल त्यांना
हुंदके ज्यांनी कधी गिळलेच नाही

स्पंदनाचा ताल चुकता जागणारे
गीत जे गाती न ते, जगलेच नाही

प्राक्तनाने ओढलेल्या कोरड्यांचे
विस्मृतीने वळ कधी पुसलेच नाही

रिचवुनी फेसाळलेले दु:ख-प्याले
धुंदले जे, जीवना विटलेच नाही

दु:ख-द्वंद्वाच्या नशेने झिंगले जे
हारही झाली तरी हरलेच नाही

.... उल्हास भिडे (२६-७-२०१३)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय ठावे आसवांचे मोल त्यांना
हुंदके ज्यांनी कधी गिळलेच नाही....

जबरदस्त द्विपदी...

आवडली गझल.

क्या बात है !
जबरदस्त गझल !

झुंजणे जमले न ते , तगलेच नाही . . . . . .

यात स्वल्पविराम 'न' नंतर हवा असं वाटलं वाचताना .

संपूर्ण गजल सुंदरच..

प्राक्तनाने ओढलेल्या कोरड्यांचे
विस्मृतीने वळ कधी पुसलेच नाही

रिचवुनी फेसाळलेले दु:ख-प्याले
धुंदले जे, जीवना विटलेच नाही >>> हे दोन शेर विशेष आवडले..

काय ठावे आसवांचे मोल त्यांना
हुंदके ज्यांनी कधी गिळलेच नाही

व्वा. शेर फार आवडला. प्राक्तनाचा शेरही जमून आलाय.
धन्यवाद.

काय ठावे आसवांचे मोल त्यांना
हुंदके ज्यांनी कधी गिळलेच नाही << व्वा !>>>

प्राक्तनाने ओढलेल्या कोरड्यांचे
विस्मृतीने वळ कधी पुसलेच नाही << सुंदर शेर >>

---आवडली गझल

प्राक्तनाने ओढलेल्या कोरड्यांचे
विस्मृतीने वळ कधी पुसलेच नाही >>व्वा! व्वा ! अप्रतिम..

सुंदर गझल.

प्राक्तनाने ओढलेल्या कोरड्यांचे
विस्मृतीने वळ कधी पुसलेच नाही >>व्वा! व्वा ! अप्रतिम..

सुंदर गझल.

हारही झाली तरी हरलेच नाही......जबरदस्त आशावादी, जिगीषेने भरलेली कविता.

अनेक खयाल चंगले
शेर व्यक्तिशः मला अपेक्षा होती तितके भिडले नाहीत त्याची काही कारणे शोधतो आहे काही समजली आहेतही पण त्यावर चर्चा करणे फारसे महत्त्वाचेही नाहीच तसेही ...तूर्तास तुम्ही जी गझल उपलब्ध करून दिलीत तिचा जास्तित जास्त आस्वाद घेण्याच्या प्रयत्नात आहे

अर्थात तुम्ही अनेक दिवसान्नी गझल सादर करत आहात याचा खूप आनंद झाला उकाका
धन्स Happy

झुंजणे जमले न ते, तगलेच नाही
मर्म हे कळले तरी वळलेच नाही

काय ठावे आसवांचे मोल त्यांना
हुंदके ज्यांनी कधी गिळलेच नाही

दु:ख-द्वंद्वाच्या नशेने झिंगले जे
हारही झाली तरी हरलेच नाही

सुंदर

झुंजणे जमले न ते, तगलेच नाही
मर्म हे कळले तरी वळलेच नाही
.
काय ठावे आसवांचे मोल त्यांना
हुंदके ज्यांनी कधी गिळलेच नाही

अहाहा! क्या बात!!

प्राक्तनाने ओढलेल्या कोरड्यांचे
विस्मृतीने वळ कधी पुसलेच नाही

>> सुं द र

काका, गॅप ने गझल लिहीत आहात, पण प्रवास छान सुरू आहे.

इथे अनेक जाणकारांची मते न आलेली पाहून जरा आश्चर्यही वाटलंय...

सर्वांना धन्यवाद.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
"काका, गॅप ने गझल लिहीत आहात," >>> स्फुरलं तरच लिहितो. कधी स्फुरावं हे आपल्या हातात नसतं.

"इथे अनेक जाणकारांची मते न आलेली पाहून जरा आश्चर्यही वाटलंय..." >>> ही रचना दखल घेण्यालायक नसेल / त्यांचं इथे लक्ष गेलं नसेल / वेळ मिळाला नसेल / .... / ..... / ..... n

असो.... अनुल्लेख हाही अभिप्राय असतो हे माझं वैम. Happy

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांना धन्यवाद.

मूळ रचनेतील व्याकरणाची एक ढोबळ चूक,
श्री. विजय पाटील (विदिपा) यांनी निदर्शनास आणल्याने
संपादित रचना प्रकाशित करत आहे. धन्यवाद विजय.

संपादित रचना याच धाग्यावर मूळ रचनेच्या वर पोस्ट केली आहे.

काका आता अजून एक लफडा झालाय .....

कळलेच ना !!! तगलेच ना !!! अश्या बांधणीमुळे तगलेच कि नै ? कळलेच कि नै ? असाही अर्थ लावता येणार Happy

तगलेचि ना अशी संतसाहित्य स्टाईल शब्दरचना करून जरा योग्य वाटेल बहुधा (च चे चि केल्याने अर्थ बदलत नाही इफेक्ट बदलतो ...चि ना म्हणताना च नाही असाच फील येतो कारण जुन्या भाषेत लोक चि ना त्यासाठीच वापरत हे आपल्याला समजते आपोआप

सबसे बेस्ट उपाय काका जगलेच ना...वळलेच ना मधून च & ना काढूनच टाका जगले कधी वळले कधी अशी काफिया-रदीफ जोडी घ्या ...बिनदिक्कत करून बघा Happy

झुंजणे जमले न ते तगले कधी
मर्म हे कळले तरी वळले कधी

गीत जागे, स्पंदने हेलावता
जे न गाती ते कुठे जगले कधी

जाणती ना आसवांचे मोल ते
हुंदके त्यांनी कुठे गिळले कधी

कुठे ऐवजी काही जास्त चपखल सुचते का पाहू शकता Happy

नमस्कार वैवकु,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

".....वळलेच ना", ".....गिळलेच ना" ही विधाने(स्टेमेंट्स) आहेत.
त्यांच्यापुढे कुठलेच चिन्ह नाही म्हणजे (बाय डिफॉल्ट) विधानार्थी वाक्य.
त्यामुळे ’ना’ चा अर्थ नाही असाच होतो.
उद्गार सूचित करायचा असता तर
".....वळलेच ना !", ".....गिळलेच ना !"
अशी उद्गारचिन्हे वापरली असती.
(ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या प्रतिसादात वापरली आहेत)
किंवा
प्रश्न सूचित करायचा असता तर
".....वळलेच ना ?", ".....गिळलेच ना ?"
अशी प्रश्नचिन्हे वापरली असती.

तुम्ही म्हणताय त्यानुसार
"हुंदके त्यांनी कुठे गिळले कधी"
यातील ’कुठे’ आणि ’कधी’
हे अनुक्रमे स्थलवाचक आणि कालवाचक आहेत असे कुणाला वाटल्यास ..... ????
असो....

इतक्या आत्मीयतेने तुम्ही माझ्या क्षुल्लक रचनेवर विचार करताय हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे.
आता जे झालंय त्यात बदलाबदली करण्यापेक्षा मला काही नवीन स्फुरावे ही इच्छा आणि विठ्ठलचरणी प्रार्थना.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
धन्यवाद सानी,
बर्याच दिवसांनी !

हे अनुक्रमे स्थलवाचक आणि कालवाचक आहेत असे कुणाला वाटल्यास ..... ????

<<<<वाटल्यास बरोबरच आहे की ....आहेच ते स्थलकाल् वाचक !!!
आपण म्हणतोच की .."मी कुठे काय तसे म्हणालो" .."मी कुठे कधी तसे केले"... इत्यादी ...तशी वाक्ये आहेत ती (ओळी आहेत त्या) Happy

त्यांच्यापुढे कुठलेच चिन्ह नाही म्हणजे (बाय डिफॉल्ट) विधानार्थी वाक्य.

<<<< ही कविता म्हणून लिहिलीत की कथा कादंबरी म्हणून?? कवितेत विरामचिन्हे सहसा वापरत नाहीत म्हणे
आणि जर समजले की विरामचिन्ह नसेल तर हवा तो इम्पॅ़क्ट नेमका पडणर नाही वगैरे तर लिहिणारे कवितेतेही विरामचिन्हे देतातच की ...तुम्ही ही द्या ...हरकत कोण घेणारय हो कि नै !!!!,,,पण बाय डिफोल्ट समजायला अपेक्षित आहे तेच लोकानी समजावे असाही नियम वगैरे नाही काळजी लिहिणार्‍याने घ्यायची असते .

(ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या प्रतिसादात वापरली आहेत)
<<<<< ते प्रतिसाद आहेत कविता नाहीये ना !!!!
तसे मीही कवितेतही मला गरज वाटलीच तर विरामचिन्हे देतोच काका

उल्हासजी:
राहवत नाही म्हणून सांगतोय.
इस्लाहमुळे मूळ गझलेची पुरती वाट लागलीय.
मूळ आसवांचा शेर बढिया झालाय.
आपण विचार करालच.

सर्वांना,

गैरसमज होऊ नये म्हणून सांगत आहे, मी ह्या गझलेची इस्लाह केलेली नाहीये. उकाकांच्या विपूत मी लिहीलेला प्रतिसाद आता द्यावासा वाटत आहे म्हणून देत आहे,

नमस्कार उकाका,

मी जाणकार नाही परंतू माझी काही मते ह्या गझलेबद्दल,

झुंजणे जमले न ते, तगलेच नाही
मर्म हे कळले तरी वळलेच नाही>>> पहिल्या ओळीत 'नाही(त)' अशी रदीफ योग्य वाटली असती ना?

काय ठावे आसवांचे मोल त्यांना
हुंदके ज्यांनी कधी गिळलेच नाही>>> हा शेर चांगला आहे, नाही(त) चा मुद्दा आहेच

स्पंदनाचा ताल चुकता जागणारे
गीत जे गाती न ते, जगलेच नाही>>> नाही(त), शेर वाटत नाही हा!

प्राक्तनाने ओढलेल्या कोरड्यांचे
विस्मृतीने वळ कधी पुसलेच नाही>>> नाही(त)

रिचवुनी फेसाळलेले दु:ख-प्याले
धुंदले जे, जीवना विटलेच नाही>>> नाही(त)

दु:ख-द्वंद्वाच्या नशेने झिंगले जे
हारही झाली तरी हरलेच नाही>>> नाही(त)

प्रतिसाद न देण्यामागे आपल्याला डिस्करेज केल्यासारखे वाटू नये हे कारण होते.

आसवांचा आधीचाच शेर चांगला होता ह्याबद्दल समीरशी सहमत. तो वगळता ह्यातली(मूळ गझलेतली) कुठलीही द्विपदी शेर वाटत नाही मला तरी

धन्यवाद!

मुक्तेश्वरजी धन्यवाद.
----------------------------------------------------------------------------------------------

धन्यवाद समीरजी,
श्री. विदिपा यांनी विपूद्वारे फक्त चूक निदर्शनास आणून दिली होती. (गैरसमज नसावा)

तुमच्या वरील प्रतिसादाबाबत वैयक्तिक संपर्कातून चर्चा करतो.
तुम्ही ज्या तळमळीने वरील प्रतिसाद दिला आहेत त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.

Pages