तोंडलीभात ते तिरामिस्सु

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

"नऊ वाजत आलेत. पिझ्झा खाऊन पोरं निवांत आहेत. आता आपल्या जेवणाचं काय?" अचानक १५-२० माणसं एकत्र आली आणि वेळ छानच जात होता. फक्त स्वयंपाकघरात जाऊन खुडबुडायचा कंटाळा आला होता. आयत्या वेळचं पिठलं खिचडी, वरण भात, कॅनमधल्या राजम्याची करी-नान असं एरवी केलेलं आज अगदी नको वाटंत होतं. बरेचदा बाहेरचं खाणं पण नको वाटंत असतं. तरी आपल्या घरी चाललंय हे बघून पोटापाण्याची सोय करायला स्वयंपाकघरात जावं लागणार हे दिसंत असताना कधी नव्हे ते नवर्‍याला प्रेम उफाळून आलं.
"बस तु. आणु काही तरी बाहेरून". जीव कसा गारेग्गार झाला. Happy
आता ह्यापुढली १५-२० मिनिट 'काय आणायचं आणि कुठून' ह्यावर जाणार हे तर दिसतच होतं.
"थाई खाऊ यात?"
"ए नको गं, आमचं परवाच झालंय"
"बरं मग पिझ्झा हटचा पास्ता?"
"त्यात व्हेज ऑप्शन नसतं. मला नको. फार तर व्हेज पिझ्झा चालेल."
"हे तुला दोन तासांपूर्वी नव्हतं सांगता येत? मुलांसाठी आणला तेव्हा?"
आत्ता कुठे वादावादीला सुरवात झाली होती. अजून बरंच रण माजायचं.
"करी क्लबमधून आणायचं का? कोंबडी, मटण, भाज्या काय हवं ते आणता येईल."
"नको बाई, फार मसालेदार असतं जेवण." एकेक पर्याय हाणून पाडण्याचा महीला वर्गाचा सपाटा अवर्णनीय होता.
"माझं तर बाई चिप्स, भेळ आणि बफेलो विन्ग्ज खाऊन पोट भरलंय."
"ए बाकीच्यांचं राहु द्या गं बाजुला. अवनी, तुला काय खावसं वाटतंय?"
अवनी म्हणजे भारतातून महीन्याभरापूर्वी लग्न होऊन आलेली विहंगची बायको. बिचारी भांबावली होती सगळ्यांमधे. तीचा नवरा चिप्स चावत शांतपणे टीव्ही बघत बसलेला.
"अरे विहंग, विचार तरी तीला."
"ती खाते काय वाट्टेल ते." इती अवनीपती.
"गप रे तु. सांग अवनी. ह्या बायकांचं राहु दे. त्यांचे नवरे आणि त्या मिळून बघून घेतील. हा गोंधळ नेहमीचाच आहे. सवय कर. तुला काय आवडतं?"
"मला मेक्सिकनफूड आवडलं. तिजुआनातलं."
"तिहुआना!!!!!"
क्षणाचाही विलंब न लावता तीच्या नवर्‍याचं करेक्शन!
"राहु दे राहु दे. तु इथे आलास तेव्हा माहिती आहे जालापिनो पॉपर्स म्हणायचास ते! :)" नको नको म्हणंत असताना न राहवून मी बरळलेच!
ह्या असल्या गोंधळात शेवटी अर्ध्या तासात एक फायनल लिस्ट तयार झाली. सर्वानुमते नवरे मंडळींनी गिळायला आणण्याचं ठरलं. घरात ४-५ बायका उरल्या आणि टिव्हीच्या खोलीत गोंधळ घालणारी मुलं. मग तु काय मागवलंस मी काय मागवलंय ह्यावर बडबड सुरु झाली. अवनी जरा गप्प गप्प वाटली.
"अवनी, आर यु ओके?"
तीला कोपर्‍यात नेऊन विचारल्यावर डबडबून डोळे भरऊन आलेल्या अवनीनं मानेनच कसानुसा होकार भरला.
"खरं सांग. काय झालं?"
"विहंग सारखा माझ्या चुका काढतो. मी प्रयत्न करतेय अ‍ॅडजस्ट व्हायचा. पण हॉटेलात गेलं की 'तुला कटलरी वापरता येत नाही, ऑर्डर करता येत नाही, ह्याचा उच्चार असा, असं सारखं टोकत असतो."
"अगं दुर्लक्ष कर. नाही तर ठणकावून सांग त्याला. भारतातून आला तेव्हा त्याची स्थिती ह्यापेक्षा काssही वेगळी नव्हती. बघीतलंय आम्ही. आपण सगळेच शिकतो हळुहळू."
आणि नको नको म्हणताना बर्‍याच गोष्टी डोळ्यांसमोर तरळल्या.....
***

भारतात राहून मध्यमवर्गीय घरातल्या स्वयंपाकावर, मुख्यत: घरच्या अन्नावर वाढलेला माझा पिंडं! वेगवेगळ्या हंगामी भाज्या, कडधान्याच्या आमट्या, बिरडी, मसालेभात, पोळ्या हा आठवड्याचा स्वयंपाक असे घरात. रवीवारी इडली सांबार चटणी. दोसे, उत्तपे हा जेवणातला बदल. मराठमोळे पोहे, उपमा, उकडपेंडी, सांजा असं नाष्त्याला मिळायचं. त्यात बदल म्हणून कधीतरी वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठं, पौष्टीक ढोकळे Happy असा प्रकार असायचा. कचोर्‍या, समोसे, आलुबोंडे, ताज्या मटारकचोर्‍या, भरलेले पराठे, दहीवडा, सांबारवडा म्हणजे पर्वणीच होती. मांसाहारी घरात वाढल्यामुळे मटण, चिकन चे रस्से, सुकं, त्यांच्या बिर्याण्या, अंड्याचे प्रकार, माश्याची आणि सोडे-सुकटाची कालवणं व्हायची.
गोडात तरी काय पुरणपोळी, श्रीखंड, खिरी, कानोले, निनावं असं असायचं. आयत्यावेळी आलेल्या पाहुण्यांसाठी भजी आणि शिरा व्हायचा. बाहेरचं खाणं तर फारच क्वचित. आणलंच तर गोडात मिठाया, जिलबी, इमरती असं काहीबाही. दिवाळीचा फराळाही तोच शेव, चिवडा, लाडू, शंकरपाळे, चकल्या, अनारसे आनि कडबोळी!
कॉलेजमधे असताना बाहेर खाण्याची चटक लागलेली पण तेही काय चाट, इडली-दोसे, समोसे असल्या प्रकारांपलीकडे नाही. फारफार तर देसी चायनीज आणि 'इटालियन'च्या नावाखाली मिळणारा तथाकथित पास्ता, एकदाच चाखलेलं फ्रेंच अनियन सूप.
अश्या खादाडीच्या पार्श्वभूमीवर मग अमेरिकेत आगमन झालं!! आणि मग काय विचारता......
***

"आज काय खायला जायचं?"
"तुम्हीच सांगा ईटालियन, चायनीज, जॅपनीज, थाई, मेक्सिकन की देसी."
"मिडल इस्टर्न ट्राय करायचं? डियरपार्कला उघडलंय बघ नवीन."
"त्यापेक्षा ग्रीक खाऊ यात का?"
एग प्लांट पार्मेजाँ, सूशी, बरिटो, यीरो आणि डम्प्लिंग्जवर देह पोसल्यागत संभाषणं सुरु झाली.
"जाऊ देत. त्यापेक्षा घरीच तोंडलीभात करते. पटेल ब्रदर्समधे छान ताजी तोंडली मिळालीत. कंटाळला जीव बाहेरचं 'तेच ते' खाऊन!"
"भाता बरोबर कैरी-कांदा लोणचं आणि मठ्ठा करते."
"हो हो. आम्ही मदत करतो चिराचिरीत."
उत्साहात मंडळी स्वयंपाकघरात आली आणि फोन वाजला.
"अवनी बोलतेय. शनीवारी संध्याकाळी तुम्ही लोक चक्क घरी सापडलात!"
"बोल बोल. अगं बाहेर पडणार होतो. पण घरीच जेवायचं ठरलंय. तेव्हा स्वयंपाक आणि बोर्ड गेम्स असा प्लॅन आहे."
"सुरु नाही ना केला स्वयंपाक."
"नाही. जातच होते."
"मग असं करा, इकडेच जेवायला या."
"चालेल. काय करून आणू?"
"छे छे. अगदी काही करायचं नाही. माझा स्वयंपाक तयार आहे."
"लग्नाच्या पहील्या वाढदिवसाला तुम्ही बाहेरगावी जाणार होता ना? मग हे काय?"
"जाऊ पुढल्या आठवड्यात. या तर तुम्ही."
आमचं लुटखुट दाराला कुलुप घालून अर्ध्या तासात विहंग-अवनीकडे पोचलं. जेवणाचा थाट बघतंच राहीले मी.
मिनस्त्रोन (?), कालामारी-क्रॅब केक, सिझर सॅलड विथ क्रोसिनी आणि ग्रिल्ड चिकन, मॉझ्झरेलाच्या तुकड्यांवर टोमॅटोचे काप, तुळस, लाल ढोबळी मिरचीचे काप ऑलिव्ह तेल वगैरे घालून कायकाय केलेलं. १-२ प्रकारचे पास्ते आणि वाईन. प्रत्येक पदार्थाचं नाव घेऊन ओळख झाली. पोटभर गप्पा आणि भरपेट जेवण झाल्यावर फक्त आडवं व्हायचं बाकी होतं.
"आज फ्रेंच करायचं ठरवलं होतं. पण आयत्यावेळी इटालियन केलं."
"पोटात जागा ठेवा बरं का. अवनीनं कातील तिरामिस्सु केलंय." विहंगनी माहिती पुरवली.
पोटात इंचभर जागा नव्हती पण तिरामिस्सु म्हंटलं की "नाही" म्हणू नये. पाप लागतं म्हणून तेही हाणायचं ठरवलं. एका नाजुकश्या "डिझर्ट प्लेट" मधे भरल्यापोटी लाळ गाळायला लावणारा तिरामिस्सुचा तुकडा आला. पहील्याच घासात अगदी तोंडात विरघळला!
"काय काय घातलंस गं. अप्रतीम लागतोय." मी विचारताच अवनीपती बोलले,
"एकेक इन्ग्रेडियन्ट पारखून आणलाय. त्यातल्या मास्कापोन चीझसाठी तर दोन दुकानं हिंडलोय!"
"विही, 'मॅस्कारपोने' " अवनी त्याच्या कानात हलकेच कुजबुजली!
*****************

विषय: 
प्रकार: 

अवनी जिंदाबाद! Happy

Happy पॉईंट आहे. पॉईंट आहे मृ.
सगळ्या पदार्थांची नावं वाचून गार गार वाटतय. Happy मस्तच.
देशाबाहेर पहिल्यांदा लांबच लांब शेवयांची गुंडाळी काट्यावर तोलून धरतांनाची फरफट आठवली.
आमच्या आज्जीचे सुगरणपणाचे निकष येणेप्रमाणे. ते बरेचसे भौगोलिक होते.
- उत्तम हातावरच्या शेवया करता आल्या पाहिजेत
- उत्तम जिलब्या करता आल्या पाहिजेत
पुढच्या पिढीत निकष स्थलकाल आणि नोकरी सापेक्ष झाले. तरी दाक्षिणात्य पदार्थांनी स्वयंपाकघरात शिरकाव केलाच होता.
आमच्या/आपल्या पिढीत स्वयंपाकघरात तू म्हणतेस तसे सर्व क्युझिन्स कधी चोरपावलांनी दाखल झाले समजलच नाही.
पुढच्या पिढीचे कोण जाणे काय ते..

धन्यवाद मंडळी.

हो तर! मी स्वतः आणि माझ्यासारखी बरीच मंडळी अश्या स्थित्यंतरातून जाताना बघीतलीत. म्हणुन मग अभारतीय (तसं बघता बर्‍याच भारतीय) पदार्थांवर (कधीतरी नको त्या फाजील) आत्मविश्वासानं बोलता लिहीताना 'आपला पिंड वरण-भाताचा' ह्याचं भान ठेवावं लागतं! Happy

मस्तच लिहिलंयस गं. जालापिनो, फजिटा वगैरेमधून कोणाचीच सुटका नसते Happy
माझी एक मैत्रीण टेक्सासमधे आठ दहा वर्षे राहिल्यानंतर चिली रेलेनो म्हणाली होती तेंव्हा मात्र बाकीच्या सगळ्यांनी डोळे 'रोल' केले होते...

बदल मस्तच Happy
मिनस्त्रोन (?), >> मिनस्ट्रोनी Happy

म्रुण्मयी ताई, छान लिहीलय.
इथ ब्राझिलला कुणी १०० मैलावर मसाला कुटला तर वास येईल. आणि ५० मैलावर फोडणी टाकली तरी ठसका लागेल अशी परिस्थिती. त्यामुळे आपल्या पदार्थांची नुसती नाव वाचली तरी पाणी सुटत. तोंडात आणि कधी कधी डोळ्यात.
आमची ही तशी सुग्रण आहे म्हणा. (लग्ना नंतर एक वर्षानी, तुमच्या अवनी सारखी)

मृ, मस्तच. खरं आहे सगळेच ह्या बदलांतून जात असतात.

मस्त गं मृ..

एकदा इथे भारतात पिझ्झा ऑर्डर करताना मी हालापिनो म्हणाल्यावर ऑर्डर घेणार्‍याला कळले नव्हते आणि मग मेनूकार्डवर बोट ठेवून दाखवल्यावर त्याने जोरात मला 'जालापिनो' असे सांगितले होते. 'काय गावंढळ बाई आहे!' असा चेहरा करून.. Happy

तर दुसर्‍या एका ठिकाणी टॉर्टिया म्हणल्यावर मला टॉर्टिल्ला असे सांगण्यात आले होते वेटरकडूनच. आणि टॉर्टिल्ला म्हणून त्यांनी जे दिले तो खाकरा फॅमिलीतला पदार्थ जास्त वाटत होता तेव्हा मी त्या मॅनेजरला ते सांगितले आणि वस्तू योग्य देत नाहीच आहात पण निदान योग्य ते बोलायला तरी शिका असा शहाणपणा शिकवून आले होते.. Wink
बादवे या दुसर्‍या प्रसंगात मी माबोवरच्या जुन्या मृ बरोबर होते..

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

छान लिहिलय. आवडलं ............ Happy

~~~~~~~~~~~~~~
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही

सगळ वाचून 'वदनी कवळ घेता' म्हणावसं वाटतय. Happy
*************************************************
जे जे आपणासी ठावे.

मस्त लिहिलय.

छान लिहीलय. बहुतेक सगळ्याजणी यातुन जात असतील सुरवातीला नन्तर आहेच तिरामिस्सु, टॉर्टिया !!!

मस्त गं मृ Happy अवनी योग्य गोष्टी शिकली वेळेत ! Proud

आमची मुले, विशेषतः मुलगी आवर्जून आमच्या चुका दुरुस्त करते. शेवटी मी तिला सांगितले की तू जन्मायच्या आधीपासून आम्ही इथे रहातो आहे, आम्ही आलो तेंव्हा याचा उच्चार असाच होता! आता तुम्हीच चुकीचा उच्चार करत आहात!!

मृ, तोंडली भात कसला करता? चांगला वडा भात करा. नि हो, पुडाच्या वड्या विसरू नका.

काही पार्ले बा. फ. वर लिहीणारे लोक इथे दिसत आहेत त्यांच्या साठी: परवा गुलाबजाम, खीर व काल तिरामस्सू, श्रीखंड, शिरा, जिलेबी, मुगाचा शिरा, खोबर्‍याच्या वड्या, व आईस क्रिम हे सर्व पदार्थ खाल्ले. आज आता फक्त मधुमेहाच्या गोळ्या!!:) Light 1

झक्की, कशाबद्दल पंचपक्वान्नं? काल वाढदिवस वगैरे होता की काय तुमचा?

नाही हो, कुणितरी 'बकरा कापला'. म्हणजे कुणा मुलीने एक मुलगा पकडून आणला नि त्याच्याशी लग्न ठरवले. तिच्या केळवणाला (म्हणजे मराठीत ज्याला 'बनाना फॉरेस्ट' म्हणू) गेलो होतो.
Happy Light 1

मस्त गं मृ! Happy
दोन्ही टोक म्हणजे तोंडलीभात नि तिरामिस्सू (हे ऑलिव्ह गार्डन मध्ये खाल्लय!) प्रचंड आवडतातच आणि तुझ्या प्रवासातले टप्पे ही.. नावाचा गोंधळ ठरलेलाच पण दरदिशी काहीतरी नविन शिकायला मिळतच Happy

मृण, मस्त लिहिलयस. अवनी आवडली.

अवनीने चांगलीच प्रगति केली आहे. अशाने ती हळू हळू मराठी पण बोलू लागेल.
Happy Light 1

मस्तं जमलाय अख्खा लेख, मृण्मयी. हे उच्चारांचं मला अजूनही बरचसं जमत नाही. आमच्या मराठेतर भाषा सुधारण्यात लेकाचा आणि त्याची मराठी आणि हिन्दी सुधारण्यात आमचा छान वेळ जातो.
आमच्या एका भारतवारीत लेकाला माझ्या मावसबहिणीने अगदी मारे एकटा गाठून विचारलं... जेवायला येतोयस.. कोणती भाजी आवडत नाही ते मला सांग रे...
त्याला काही केल्या परवाच खाल्लेल्या भयंकर भाजीचं नाव आठवेना.. त्याने सांगितलं ते असं - 'नाक्-कान घसा का काय ते असलं नाव असलेली, चायनीज आडनावाची भाजी....'
"तोंड ली"!

मृण्मयी, मस्त लिहिलयं. जवळ जवळ सगळ्यांचीच हिच कथा. आवडलं. Happy

छान लिहिलय मृण्मयी!
दाद, तुझ्या लेकाची स्मरणशक्ती वाखाणण्याजोगी आहे!!!
--------------
नंदिनी
--------------

पण तिरामिस्सु म्हंटलं की "नाही" म्हणू नये. पाप लागतं >> हे एकदम बरोबर बाकि Lol

आमच्या मराठेतर भाषा सुधारण्यात लेकाचा आणि त्याची मराठी आणि हिन्दी सुधारण्यात आमचा छान वेळ जातो. >> Happy

धन्यवाद!

"तोंड ली"! Lol

अजुनही मेलं Gruyere चीज मागताना फॅ फॅ उडते! Proud

छान लिहिलंय मृण्मयी.... सगळ्या पदार्थांची नुसती नावं वाचूनच तोंडाला पाणी सुटलं.. Happy

मृ,
हा लेख उपाशी पोटी वाचू नये अशी सुचना द्यायला हवीस खरतरं Proud

मस्त भट्टी जमलीये लेखाची. सगळेच जण थोड्या फार फरकाने अशाच परीस्थितीतुन जात असावेत. Happy

तोंड ली Rofl

खुप छान लिहीलय मृण्मयी!!

अजुनही मेलं Gruyere चीज मागताना फॅ फॅ उडते!<<
हा हा मृ आणि GYRO! त्याचा मेला उच्चार अजून कळला नाही. यीकडून गी कडे जाताना होईल तसा काहीतरी उच्चार आहे म्हणे.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

Pages