मावशी

Submitted by फूल on 16 July, 2013 - 04:06

ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं. खरंतर एव्हड्या तीनच वाक्यात तिचं वर्णन माझ्यासाठी पुरेसं आहे. पण तरीही तिचं आणखी गुणवर्णन केल्याशिवाय रहावतच नाही म्हणून सांगते. कमनीय बांधा, काळेभोर केस, धूर्त लबाड फसवी पण तरीही आकर्षक नजर, तिची ती नाजूक आणि नजर खिळवून ठेवेल अशी दबकी चाल, काही हवं असलं की मात्र अगदी लाघवी लगट, सगळंच कसं मोहक... मांजर... म्हटलं की मला हीच आठवते. माझ्या मामाच्या घरातली माझ्या आजोळची काळी. माझ्या आयुष्यातलं पहिलं मांजर. तशा माझ्या आयुष्यात नंतर अनेक मांजरी आल्या अन गेल्या पण हीची सर नाही. अगदी सेंट परसेंट अस्सावं तस्सं मांजर...

मामाकडे मांजरांची नावं फार काही विचार करून ठेवली जात नसत. त्यामुळे काळी काळी होती म्हणून काळी. हीची मुलगी पिटी. ती अगदी पिठासारखी गोरी होती म्हणून पिटी. आता ह्या काळ्या मांजरीला हे गोरं बाळ कसं झालं? हा मला त्या वयात पडणाऱ्या अनेक तत्सम प्रश्नांपैकी एक प्रश्न. पण आता कळतंय पिटी वडिलांवर गेली असेल. काळीनेही पटवला असेल कोणी गोरापान बोका. पिटीला बिच्चारीला मात्र दोन मुलगेच झाले आणि इथे काळीच्या घराण्याचा अस्त झाला. बारीकसा निष्कर्षाचा भाग सांगून जाते. मांजरांमध्ये वंशावळ पुढे न्यायला मुलगी होणं गरजेचं असावं. सून घरी आणण्याची पद्धत नाही त्यांच्यात. ऐकलंय कधी कुण्या बोक्याने मांजरीला लग्न करून घरी आणल्याचं. आमच्या काळीला मात्र नाती काही बघता आल्याच नाहीत बिच्चारीला. हे तिचं गुज ती स्वयंपाक घरातल्या पिंपावर बसून मावशीला सांगते आहे असं कित्येकदा मला वाटायचं. मावशीचा स्वयंपाक चालू असताना ही मध्येच म्याव करायची. मावशीही तिच्याशी बोलायची. "काय बाई तुझं? आलीस फिरून?" मग ह्या बाईसाहेब बशीतलं दूध संपवून, जिभल्या चाटत, मिशा साफ करत पिंपावर बसायच्या आणि मनीचे हितगुज सांगायच्या. वाघाच्या मावशीबाई कितीही दु:खी असल्या तरी दूध आणि झोप काही सोडणार नाहीत. मांजरांच्या राज्यात अनेक रोग- आजार असतीलही पण इन्सोमेनिया काही कुणा मांजराला होणार नाही.

काळी... लहान असल्यापासून मामाच्या घरात वाढलेलं पिल्लू... मी तिच्याच बरोबर वाढले म्हणाना. एवढी मस्ती मी आयुष्यात कोणाबरोबर केली नसेल. मामाच्या घरातले उंदीर मारायला आणलेली ही. उंदीर कधीच गेले पण काळी राहिली. माझ्या हातावर कायम मांजरांची नखं उठलेली असायची. मावशी आणि आज्जीला, मला ओरडावं की काळीला तेच कळायचं नाही.

काळी वयात येऊन तिला पिटी झाली आणि मामाचं लग्न झालं आणि मंदार (मामाचा मुलगा) आला. मग तर काय मस्तीला ऊतच. घरातल्या शिवणयंत्राला एक लाकडी कव्हर होतं. पिटी झोपली की आम्ही तिच्यावर ते कव्हर झाकायचो. एका रात्री ते कव्हर तसंच राहीलं. मावशीच्या किंचाळीनेच जाग आली. कव्हर नुसतंच इकडून तिकडे हलत होतं. मधेच ते खुड खुड वाजायचं. मग मामानेच धीर करून ते कव्हर काढलं. आतमधल्या पिटीबाईंनी धूम ठोकली. आम्हाला मात्र ह्या सगळ्याचा चांगलाच ओरडा बसला.

पण काळीपेक्षा पिटीचेच आम्ही खूप लाड केले. म्हणजे खरंतर त्रासच जास्त. माझ्या बाहुलीसाठी मावशीने अगदी लाडाकोडाने एक स्कर्ट ब्लाऊज शिवलं होतं. ते बाहुलीच्या अंगाला क्वचितच लागलं असेल पण पिटी मात्र त्यात खूप छान दिसायची. हा आता शेपटी त्या स्कर्ट मधून हलवताना तिला थोडा त्रास व्हायचा पण काय स्टायलिश म्हटलं की हे सगळं करावंच लागतं.

संध्याकाळी देवाकडे दिवा लागल्यावर आजी सांगायची, घरातल्या सगळ्या बायकांना कुंकू लाव. पिटीला कसं वगळायचं मग त्यातून? तिही बाईच की. कित्येकदा दुसऱ्यादिवशी सकाळपर्यंत तिचं कपाळ लाल असायचं.

मांजरीला म्हणाव्या तश्या भुवया नसतात. हा शोध आम्हाला त्याच दरम्यान लागला. एकदा आम्ही काजळाने तिला भुवयाही काढल्या होत्या. पण त्यातही भाऊबंदकी आडवी आल्याने एक भुवई मी आणि एक मंदार काढणार असं ठरलं. मी काढलेली भुवई तशी बरी आली पण मंदारने काढलेल्या भुवईमुळे पिटी बिचारी एकाबाजूने दिवसभर दु:खी दिसत होती. तिच्या भुवयामात्र तिला दुखू नये म्हणून तेल लावून सावकाश पुसल्या आम्ही. पण त्यानंतर नादच लागला, जशा भुवया तसा पिटीचा मुड असायचा. आम्ही नावं पण ठेवली; संशयी पिटी, ध्येयवादी पिटी, घाबरलेली पिटी, आश्चर्यचकित पिटी, रागीट पिटी आणि बरंच काही. बिचारी पिटी.. आता वाटतं फार छळलं नाही आम्ही तिला. पण तिच स्वत: मांडीत येऊन बसायची. आम्ही कधी बोलवायला गेलो नाही. पण तिने तिची पिल्लं मात्र आमच्यापासून दूर ठेवली. ते दोन्ही बोके कधीच माणसाळले नाहीत. दोघेही गोरे पान होते. पण त्यांचं दर्शनच आम्हाला महिन्याने झाले. तोवर ते चांगले इकडून तिकडे पळू लागले होते.

हे दोन्ही बोके निघून गेले आणि घर अगदी सुनं सुनं झालं. मग मंदारनेच कुठूनसं मांजराचं छोटुसं पिल्लू आणलं. हाही बोकाच होता. मामाच्या घराजवळंच हायवे होता. त्या हायवेला लागून बरीच हॉटेल्स होती. त्यातल्याच एका बारच्या मागच्या बाजूला मंदारला हे गोंडस पिल्लू मिळालं. ह्याचं नाव मन्या. मग मामाने त्याला दत्तक घेतलं. मी मे महिन्यात येणारच होते. मग काय मज्जाच.

हा बोका इतर कुठल्याही प्राण्याला बघून धूम ठोकायचा. अर्थात माणूस सोडून. त्याला टोमेटो आणि मटकी आवडायची. ह्यावरून आम्ही दारूची चव टोमेटो सारखी असावी असाही निष्कर्ष काढला होता. कारण मन्याला आणलंच होतं बार मधून. तिथे त्याला सवय असेल प्यायची. ते इथे मिळणार नाही म्हणून टोमेटो खातोय असं वाटायचं आम्हाला. त्याच्यावर गाणंही केलं होतं...

शूर मन्या सरदार बोक्यांचा
ह्याला दुसऱ्या बोक्यांची भिती

टोमेटो आणि मटकी साठी
प्राण घेतला पंजी...

खरंच वेडे दिवस होते ते. ही मांजरं आम्हाला आमच्यातलीच वाटायची, अगदी सख्ख्या भावंडांसारखी. त्यांच्यशिवाय खरंतर माझ्या बालपणाला काहीच अर्थ नाही असं म्हणावं लागेल.

आमच्याच नात्यातल्या एकांकडे कोल्हापूरलाच काही मांजरं होती. ती जात कुठली होती माहित नाही पण त्या मांजरांच्या शेपट्या मात्र कायम फेंदारलेल्या असायच्या. ह्या आमच्या नातेवाईकांकडे एक तांबूस रंगाचं गुबगुबीत मांजर होतं. त्याचं नाव होतं देखणू. ह्या देखणूला इतर मांजरांना चांगलं म्हटलेलं आवडत नसे. आपल्या मांडिवर बसलं असेल आणि आपण म्हटलं की, लाजरी म्हणजे त्यांच्याच घरातली दुसरी मांजरं, "लाजरी छान आहे, चांगली आहे", की हे मांजर म्हणे चावायचं आणि उठून जायचं, मग २-३ दिवस घरी फिरकायचं नाही. आम्हाला गंमत वाटायची. देखणूही एक माझ्या कायम लक्षात राहील असं मांजर. खरंच देखणं होतं ते. भाऊबंदकी मांजरातही असते हे तेव्हा कळलं.

मांजरीची मज्जा कोल्हापूरला असली तरी एरवी घरीही मी मांजर शोधतच असायचे. तशी अचानक मला एकदा आमच्या बिल्डिंग खाली मांजर दिसली. एका उंदरावर दबा धरून बसली होती. शेपूट फेंदारलेले, कान टवकारलेले, एकाग्र चित्ताने ती त्या उंदारचे निरीक्षण करत होती आणि मी त्या मांजरीचं निरीक्षण करत होते. तिचा पवित्रा उंदरावर झेप घालण्याचा होता आणि माझा तिच्यावर. आईने स्वयंपाकघराच्या खिडकीत लाल भोपळ्याच्या बिया सुकत ठेवल्या होत्या. मी त्यातली एक बी नेम धरून मांजरावर मारली... तो लोकरीचा गोळा नखशिकांत घाबरून धूम पळाला. मी हसून हसून वेडी झाले.

त्याच रात्री मी स्वयंपाक घरात अभ्यास करत बसले होते. खिडकित बघितलं आणि किंचाळत उठले. आई-बाबांना वाटलं नेहमीप्रमाणे पाल नाहीतर झुरळ काहीतरी आलं असेल. मी ओरडले, "आई, मांजर आलंय". आई ओरडत आली, "काय पहिल्या मजल्यावर खिडकीत?" माझा सूड घ्यायला आलं असणार बहुतेक. आयुष्यात पहिल्यांदा ह्या मांजराने मला घाबरवलं. ही आठवण मी कधीच विसरू शकणार नाही. मला भेटलेले असेही हे एक मांजर.

आता मी आणि मंदार मोठे झालो. मांजरां"ना" किंवा मांजरां"ची" नावं ठेवायची जबाबदारी आमच्यावर आली आता. सध्या कोल्हापूरला दोन मांजरं आहेत. आम्ही त्यांची नावं ठेवली आहेत. एकाचं नाव दिग्विजय, शॉर्ट फॉर्म डिग्स. पण सांगायचा बारीकसा मुद्दा हाच की ही मांजर आहे बोका नाही. पण नाव ठेवल्यावर आम्हाला ते कळलं. त्यात आमचा दोष नाही आणि दुसरी मुग्धमानसी म्हणजेच मेग. ही पण मांजरच आहे. दोन्ही काळी आहेत. आम्ही एव्हढी छान नावं ठेवून सुध्दा त्या नावाने बोलावल्यावर एक जागेचं हालेल तर शपथ. पण मावशीने "काळू ये काळू" असं म्हटलं की निघाली शेपट्या उडवत. तिथे पोटाचा प्रश्न असतो ना. मांजरीना ट्रेन करण्याचे विडीओ पण यु ट्युब वर पाहिले. पण ह्या आजकालच्या मांजरी... त्यांनीच ट्रेन केलं आम्हाला. आम्हीच त्यांना त्यांच्या वेळेनुसार आणि चवीनुसार खाणंपिणं पुरवायला लागलो.

बाबा माझे एकदा कोल्हापूरच्या घरात कपालभाती करत होते आणि त्यांच्या प्रत्येक श्वासागणिक दिग्विजय चमकून इकडे तिकडे पहात होती. श्श्श... दिग्विजय कान टवकारून आणि हिरवे हिरवे डोळे वटारून इकडे तिकडे पहायची, पुन्हा श्श्श... पुन्हा तेच. आमची मात्र हसून हसून मुरकुंडी वळली होती. दिग्विजयला कदाचित ते सापाचं किंवा तत्सम प्राण्याचं फुत्कारणं वाटलं असावं. "दिग्विजय... दिग्विजय... कश्शी ग तू अशी..." असं म्हणावसं वाटलं. गेल्याच महिन्यात दिग्विजयला बाळ झालं. तिच्यासारखंच आहे करडं आणि तुडं तुडं.

फेसबुकच्या जमान्यात मांजरी काही मागे नाहीत हं. आम्ही दिग्विजय चं अकाऊंटही उघडलं फेसबुकवर आणि १४२ फ्रेंड्स आहेत तिचे. आहात कुठे? मुग्धमानसी थोडी बुजरी आहे अजून. तिचा डिस्प्ले पिक तेव्हडा छान आला नाही. थांबेचना एका जागेवर ती... दिग्विजयने मात्र सगळं करून घेतलं कौतुकाने. आता फॅमिली मधे छोट्या बाळाला पण टॅग करायचंय.

ती बिचारी मुकी जनावरं... आपणच आपल्या कल्पनांच्या चेतनगुणोक्त्या त्यांच्यावर साकारायच्या आणि स्वत:च खूष व्ह्यायचं. इथे आल्यावर मात्र त्या मऊ मऊ गोळ्याच्या आठवणीने ऊर भरून येतो. फेसबुक वरचा मांजराचा फोटो पुन्हा भूतकाळात घेऊन जातो. माणसाला काय किंवा जनावराला काय शेवटी कुणीतरी मायेचं लागतच. ती पिटी काय, काळी काय, मन्या काय, दिग्विजय काय त्यांची प्रेमाची गरज कदाचित आम्ही पुरवत असू आणि आमची गरज ती मांजरं पुरवत असतील. तेव्हा वळलं नाही पण आता कळलं. आमची भाषा मराठी होती आणि तिची भाषा म्याव म्याव. पण प्रेमाच्या भाषेला शब्द कुठे असतात? इथे सगळंच हक्काचं. आम्ही तिचे होतो आणि ती आमची होती. हक्काची... आता तर सगळंच होतं झालंय. उरलेत ते फक्त त्या त्या मांजरींचे आठवणीतले किस्से.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!!!!!!!!!!!!!!!!!!

शेवटचा परिच्छेद तर अप्रतिमच. Happy

काही काही पन्चेस मस्तच...
मांजर पाळण्याची हौस होती. पुरेपुर भागलेली आहे.
त्यामुळे रिलेट झालं.

आवडलंय!!

संध्याकाळी देवाकडे दिवा लागल्यावर आजी सांगायची, घरातल्या सगळ्या बायकांना कुंकू लाव. पिटीला कसं वगळायचं मग त्यातून? तिही बाईच की.
>>
हे मी देखील पाहिलेय. एका मित्राकडे हळदी-कुंकवाला मांजरीलापण हळदी-कुंकू लावलेले असायचे. Happy

खूपच मस्त लिहिलंय .... लेखनशैली अप्रतिम .....

आमच्याकडेही सध्या दोन मांजरी आहेत - एक मोठी व दुसरी छोटी .... मोठी गेले वर्षभर आहे तर छोटी चार महिन्यांपूर्वी आलेली. सहाजिकच मोठी माऊ छोटीवर ताईगिरी करीत असते. कुटुंबात जर नवीन मूल आले तर मोठ्या मुलाला (३-४ वर्षाच्या) कशी एक अढी बसते त्या नव्या बाळाबद्दल तसे मोठीचे झाले आहे.

मोठीला खूपच समज आहे तर छोटी अजून माणसाळत आहे ...

छोटी जेव्हा घरी आली तेव्हा अगदीच छोटी व अशक्त होती - इतकी आजारी झाली की जगते का नाही असे वाटत होते - तेव्हा माझी बायको (अंजू) तिला मांडीवर घेऊन रामरक्षा म्हणत असे - इतकी मांजरे प्रिय आहेत माझ्या बायकोला व दोन्ही मुलींनाही ... तुमच्या या लेखाचीही आता पारायणे होतील आमच्या घरी - सगळे मार्जार प्रेमी ना ....

दोन्ही माऊंना मासे अति प्रिय - जर एखादा दिवस आणले गेले नाही तर मोठी नुस्ता नको जीव करते ओरडून ओरडून ...

http://www.maayboli.com/node/37862 हे पहा एक मांजरांचे घर ...

भारी लिहिलंय!

मांजरीवर भुवया काढण्याचा अख्खा पॅरा आणि त्यातही 'संशयी पिटी, ध्येयवादी पिटी, घाबरलेली पिटी, आश्चर्यचकित पिटी, रागीट पिटी आणि बरंच काही. बिचारी पिटी..' महान आहे. Biggrin भुवयांमधले विनोदी चेहरे अगदी डोळ्यांसमोर आले. Proud

फारच गोड लिहिलं आहे. शैली आवडली.
'ध्येयवादी' पिटी.. दारूची चव टोमेटो सारखी.. आणि इतर काही फारच भारी.
आमच्या पार्किंगमध्ये एक करडा बोका आहे. धड मग्रूर नाही, धड इमोशनल नाही, धड गरीब नाही. त्याच्या चेहर्‍यावरचा भाव कशासारखा आहे, असं सारखं तो दिसल्यावर वाटायचं. आता सापडलं. ध्येयवादी! (खांडेकरांच्या घरातला किंवा अनुयायी किंवा डायहार्ड वाचक किंवा फारच जीवनवादी वगैरे असेल.)

मस्त Happy
माझ्या आईला ही मांजर आवड्ते.. आमच्याकडे पण एक काळी मांजर यायची , तिच नावं 'काळीबाई' ठेवलं.. काका शेतातुन दुधाचा कॅन घेवुन यायचे संध्याकाळी ६ ला... अगदी न चुकता वाट बघायची ही दारात बसुन.. नंतर माझे काका गेले तेव्हा पण ती बसुन राहायची ७ पर्यंत Sad
आता सारखी येत नाही काळीबाई.. पण मधेच दर्शन देते

आमच्या पार्किंगमध्ये एक करडा बोका आहे. धड मग्रूर नाही, धड इमोशनल नाही, धड गरीब नाही. त्याच्या चेहर्‍यावरचा भाव कशासारखा आहे, असं सारखं तो दिसल्यावर वाटायचं. आता सापडलं. ध्येयवादी! (खांडेकरांच्या घरातला किंवा अनुयायी किंवा डायहार्ड वाचक किंवा फारच जीवनवादी वगैरे असेल.)<<<

हा हा! हे फार भारी वाटलं! माफ करा, मूळ लेख वाचून व्हायचा आहे, आधीच प्रतिसाद वाचले.

अप्रतिम लिहिलंय.

(त्याला टोमेटो आणि मटकी आवडायची. ह्यावरून आम्ही दारूची चव टोमेटो सारखी असावी असाही निष्कर्ष काढला होता. कारण मन्याला आणलंच होतं बार मधून... Lol

पाळलेली मांजरं असले सगळे 'अत्याचार' बहुतेक वेळा सहन करतं, केश्विनी Happy त्यांना माहित असतं की घरातली लोकं मुद्दामहून इजा करणार नाहीत

ह्म्म. तुझ्याकडेही आहे ना मांजर परिवार? Happy माझ्या डोळ्यासमोर येतंय... मांजर निमूट डोळे मिटून, किंचीत मान वर करुन, स्तब्ध राहून मेकअप करुन घेतंय.

मस्त लिहिलंय Happy
आमच्याकडच्या मांजरीला चुरमुरे आवडायचे. चुरमुरे पॉलिथिन पिशवीत ठेवलेले असायचे. कुठल्याही पॉलिथिन पिशवीचा आवाज केला की ओरडुन जीव नकोसा करायची.
तसेच कुत्री आणि मांजरीच्या पिल्लाला सर्दी झाली असेल म्हणुन व्हिक्सचा प्रयोग ही केलेला आहे. biggrin.gif
तिच्या एका पिल्लाचे डोळे अगदी सेम आमच्या घरासमोर रहाणार्‍या एका मुला सारखे होते म्हणुन आम्ही त्याला तेच नाव ठेवले होते ..सौरभ Lol

Pages