क्षण-क्षण ...

Submitted by सुप्रिया जाधव. on 15 July, 2013 - 01:24

क्षण-क्षण अनवट पकडावा
आठवणींनी जखडावा
गुंफाव्या माळेत स्मॄतीं
अलगद जिवलग अडकावा !

क्षण मिलनातूर रूजवावा
नि:श्वासांनी सजवावा
तलखी मिटवावी गात्रांची
स्वप्नातून साजण बरसावा

एक असा क्षण गाठावा
ठिणगीतून वणवा पेटावा
अस्तित्वाची व्हावी होळी
राखेतुन जिवलग प्रगटावा !

क्षण एक असाही गोठावा
त्याक्षणी प्राण हा निसटावा
अर्थ नुरावा इंद्रीयांना
आत्मा-आत्म्याला भेटावा !

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्थ नुरावा इंद्रीयांना
आत्मा-आत्म्याला भेटावा <<<

चांगल्या ओळी!

===========================

सुप्रिया, अलीकडे तुमच्या काव्यात 'विरहाचे दु:ख' अधिक वारंवार प्रकट होत असल्याने काही वेळा वेगऴ्या अभिव्यक्तीत तोच खयाल वाचल्यासारखे वाटते. हे फक्त मलाच वाटत असल्यास क्षमस्व! पण इतरांनाही वाटत असल्यास, माझ्यामते, काही काळ तुम्ही मनातील इतर सुप्त अनुभुतींना शब्दबद्ध करण्यात व्यतीत करावात. अन्यथा शिक्का मारायला अनेकजण टपलेले असतात. उणे अधिक बोललो असल्यास क्षमस्व!

-'बेफिकीर'!

बेफिकीरांशी पूर्ण सहमत आहे.

अलिकडे हे तुम्हाला सांगावेच असा विचार माझ्याही मनात घोळत होताच!

इतर हजारो विषय तुम्हाला खुणावत नाहीत का?

विदिपा तुम्ही हे ब-याचदा सांगितलय या आधीही Happy

लांबून खुणावणे आणी त्यातून जाणे यातील जवळीक ज्या विषयाशी असेल तो जास्त प्रमाणात व्यक्त होणे नैसर्गिक असावे

असो ! तुमच्या या ही मौल्यवान सुचनांचा नक्कीच विचार करेन नेहमीप्रमाणे ! Happy

धन्यवाद!

-सुप्रिया.

क्षण एक असाही गोठावा
त्याक्षणी प्राण हा निसटावा
अर्थ नुरावा इंद्रीयांना
आत्मा-आत्म्याला भेटावा ! >>>> क्या बात है ...

कविता आवडली, निदान ही फक्त विरहभावनेवर नाही. त्यापलिकडे जाते.
एकूणच प्रेमकवितेवर एक आशयाची मर्यादा येत असते, चांगली प्रेमकविता लिहिता येणे सोपे नाही जे तुला जमते .
"त्यातून जाणे" या प्रक्रियेमुळे ती जिवंत रसरशीत असते, ''त्यातून मुक्त होणे'' जमल्यास तिचे अधिक मोठ्या आशयपटावर अधिक वेगळे चित्रण करता येईलसे वाटते.ले.शु. Happy

''त्यातून मुक्त होणे'' जमल्यास तिचे अधिक मोठ्या आशयपटावर अधिक वेगळे चित्रण करता येईलसे वाटते.ले.शु. स्मित<<<< +१

"त्यातून जाणे" या प्रक्रियेमुळे ती जिवंत रसरशीत असते, ''त्यातून मुक्त होणे'' जमल्यास तिचे अधिक मोठ्या आशयपटावर अधिक वेगळे चित्रण करता येईलसे वाटते.ले.शु.

धन्स भारती...प्रयत्न तर करेनच करेन Happy

धन्स ऑल !!!

-सुप्रिया.