दिंड्या पताका...

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

आमच्याकडे पालखीचा काही खास नेम नाही, कोणतीही दिंडी येत नाही, पालखी, वारकरी, माळकरी कोणासाठीच आम्ही काही करत नाही. वेळ कोणाला हो? आम्ही लय बिझी माणसं बघा. मध्यमवर्गीय आम्ही. आमच्या नोकर्‍या, शिक्षणं, रोजच्या आयुष्यातले लहान मोठे प्रश्न.. काय कमी व्याप आहेत आमच्या मागे? ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय ! आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले! असो, असो.

खरं सांगायचं तर ही पालखीच आम्हांला सोडत नाही बघा! काय सांगायचं...

अगदी लहानपणापासून हो. वाडवडिलांची पुण्याई म्हणावी का, घरावरुनच पालख्या जातात, तुकामाऊली म्हणू नका, ज्ञानोबामाऊली म्हणू नका, इतर लहान मोठ्या पालख्या म्हणू नका.. आठवतं आहे तेह्वापासून जातात. वारी आणि पालखी अगदी माझ्या लहानपणापासून आयुष्याचा एक भाग व्यापून आहेत. वारी ह्या शब्दाशी निगडीत अश्या काही व्यक्तींच्या आठवणी आहेत. लहानपणी आमच्या इथे एक मावशी यायच्या भाजी विकायला आणि वर्षाची वारी करायच्या. आज्जीचं आणि त्यांचं गूळपीठ. आजी मग त्यांना विठ्ठलासाठी काहीबाही द्यायची, त्याही नेऊन पोचवायच्या, येताना बुक्का आणायच्या, थोड्या तुळशी, चुरमुर्‍याचा प्रसाद, एखादा चिकचिकलेला राजगिर्‍याचा लाडू. एकदा विठोबा- रखुमाईची पितळी छोटी मूर्त आणली. अगदी युगे अठ्ठावीस करत विठाई आजतागायत देव्हार्‍यात विराजमान आहेत. आमचे सकाम आणि क्वचित निष्काम नमस्कारसुद्धा आवर्जून आपेलेसे करुन घेतात.. त्यांना सवय आहे. तर अशी ह्स्ते परहस्ते वारी करायची आजीची पद्धत. अजून एक दूरच्या नात्यातल्या आजी वारी करायच्या, त्यांच्या मंडळासोबत, त्या वारीच्या दिवशी आल्या, की त्यांच्या पाया पडून त्यांच्या वारीच्या पुण्यसंचयावर आम्ही लहान मोठे डल्ला मारायचो आधीच. शांत मूर्ती, प्रेमळ चेहरा, मृदू बोलणं. वारी म्हटलं की त्यासोबत हे सारं आठवतं.

अजूनही आठवतं म्हणजे आजी आजोबांबरोबर घेतलेलं वारीचं दर्शन, ते उभे असेतोवर. कपाळावर लावून घेतलेलं गंध, टिळे, बुक्के. घरात तेह्वा वडिलधार्‍यांचे असलेले आणि श्रद्धापूर्व़क केले जाणारे उपवास. आता समजतं की शरीराने वारी चालू शकले नाहीत, तरी त्यांनी मन:पूर्वक वारी अनुभवली. रस्त्यावर आजी आजोबांसकट उभं रहायचं, दोघेही वारीची वाट पहात. जाणार्‍या वारकर्‍यांना नमस्कार करत. आम्ही चिल्ली पिल्ली बाजूलाच हुंदाङपणा करत. वेळ निघून जाई. बराच वेळ टाळ, मृदुंग, टाळ्या, माऊलीचे जयघोष कानी पडत. लोक शांतपणे उभे असत. पावसाची एखादी नाजूक भुरभुर सर येई, की आम्ही अधिकच हुंदाडगंपूपणा सुरु करत असू. आज्जीची आम्हांला आवरता त्रेधातिरपीट उडे. अचानक वातावरण जिवंत होई आणि आली, आली म्हणेपरेंत एकेक पालखी येऊन झपाटयाने निघूनही जाई. त्यातच लोकांमध्ये प्रसाद म्हणून फुलांच्या पाकळ्या,तुळशी, प्रसाद वगैरे वाटले जात. आजोबा पालख्यांच्या गर्दीमध्ये घुसून दर्शन घेत, आज्जी लांबूनच हात जोडी. आम्ही आपले प्रसादाचे धनी होण्यात समाधानी! अवघा आनंदकल्लोळ असे! काळा बुक्का आणि गंध लावलेला आजोबांचा चेहरा आणि नमस्कार करुन पालखीचं दर्शन घेतल्याने तृप्त समाधानी असा आज्जीचा चेहरा अजून डोळ्यांसमोरुन हलत नाही. आजही पालखीच्या अनाम गर्दीचा चेहरा ह्या दोन चेहर्‍यांना आठवून खूप ओळखीचा बनून जातो.

आणखी म्हणजे त्यादिवशी रस्ता वाहतुकीला बंद असायचा, आजही असतो, सकाळपासूनच अगदी तुरळक वाहतूक असते, बरं वाटतं खरं सांगायचं तर. नेहमीच्या वाहतूकीचा अव्याहत वाहणारा गदारोळ लईच काव आणतो जिवाला रोज. तेह्वापण असायचा. मात्र आताच्याइतकी वाहतूक नसायची म्हणा. कधी नव्हे ते सकाळची उन्हं रस्त्यावर पडलेली दिसतात, पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात... दिवस शांतपणे उजाडल्यासारखा वाटतो. आम्हांला तर शाळेला सुट्टी पण असायची, खरी मज्जा हीच बरं, वारीच्या दर्शनाच्या निमित्ताने अभ्यासाला रीतसर दांडी. काय दिवस होते..

वयपरत्वे पुढे दोघांचं हे वारी दर्शन बंद झालं. आम्ही गर्दीत घुसून दर्शन घ्यायला शिकलो. माऊलीच्या पादुकांना हात लावून दर्शन घ्यायला मिळालं की एकदम विजय मिळवल्यासारखा वाटायचा! सोसायटीमधलीधली मुलं, आमच्यावर लक्ष ठेवायला म्हणून तरुण दादा, काका पब्लिक वगैरे आम्ही एकत्र मिळून वारीमध्ये जरासं चार पावलं टाकायचो, अगदी फुगड्या वगैरे खेळल्याचंही आठवतय. बाबा, काका आणि तत्सम पब्लिक घरापाशीच उभं असायचं. पालखी आली की आमच्यासोबत दर्शनाला यायचं. पालखी पूर्वीसारखीच, अंगाखांद्यावर गर्दी खेळवत टाळ चिपळ्या मृदुंगांच्या तालावर नाचत, अलगद निघून जायची... काही क्षणांसाठीचा पाहिलेला सोहोळा दर वेळी पुढल्या वर्षीपरेंत पुरत गेला. चक्र सुरुच राहिलेलं आहे.

पुढे काही वर्षं नोकरी धंद्या निमतानं वारी जराशी दुरावली. आठवण येत राहिली.

आणि मग आता पुन्हा एकदा गेली काही ३-४ वर्षं वारीच्या दर्शनाचा लाभ होतो आहे. खूप बदलही जाणवतात. ह्या वेळी आमच्या इथे टीव्ही व्हॅन्स होत्या, साम आणि अजून एक कोणतं तरी चॅनेल. हे इतके फोटोग्राफर्स! बँकेचे बूथ, महानगरपालिकेचा, दिंड्यांचा सत्कार करण्यासाठी बांधलेला मंच! तिथे दाटीवाटीने जमलेले सगळे माननीय! तिथे धावती कॉमेंट्री करणारा एक जण. पांडुरंग भगवान की जय म्हणे! मज्जाच, म्हटलं मनात. खुद्द पांडुरंग हे संबोधन ऐकून दचकला असणार. त्या माणसाला गालातल्या गालात हसणारे वारकरी, जाऊद्या, तितकंच द्येवाचं नाव येतया तेच्याबी तोंडात, चालायचंच, अशी समजूत काढणारे अनुभवी, मुरलेले वारकरी. त्यांच्यासोबत सहभागी झालेले हौशी, नवशे,पोटार्थी, चोर, लबाड, सज्जन, साव सगळे सगळे. खर्‍या अर्थाने जनसमुदाय. नाचणार्‍या दिंड्या, पताका. डोईवरली तुळशी वृंदावनं. गाठुडी. सामानाचे ट्रक. वारकर्‍यांच्या चेहर्‍यावरचा भक्तीभाव, विश्वास.

आणि कितीही बदल झाले तरीही मूळ भक्ती आणि विश्वासाचा जो गाभा अणि पाया आहे तो शाबूत ठेवून वाटचाल करणारी वारी.

वारीची वाट बघत ह्यावेळी उभे होतो. खूप वेळ वाट बघायला लावून पालख्या दृष्टीपथात आल्या. पुन्हा एकदा तोच परिचित आनंदकल्लोळ उसळला. ह्यावेळी दूर उभं राहून हात जोडले. उगाच आपले अचानक डोळे भरुन आले.. एक म्हातारे वारकरीबुवा आणि आज्जींशी त्याच वेळी माझी नजरानजर झाली दोघेही खूप समजूतीचं असं हसले. आजी आजोबा पुढे वाट चालू लागले.

तीनही लोक आनंदाने भरुन टाकत वारीही मार्गस्थ झाली.

विषय: 
प्रकार: 

कवे , शामली, पुढ्च्या वर्षी आपणही ईन... डन... किमान दिवे घाट करुया... माय्बोलीची दिंडी घेउन .... नो ववै संयोजनाची गडबड नेक्स्ट इयर

निष्काम नमस्कार आणि पांडुरंग भगवान, पुण्य-संचयावरचा डल्ला वाचून लै हसले Happy
आज्जी-आजोबांचं वाचून मस्त वाटलं.. खूप गोड लिहिलयं.

मस्तच लिहिलय गं!

या लेखामुळे लहानपणी आमच्या एच ए एल कॉलनीत गजानन महाराजांची पालखी यायची ते दिवस आठवले! कम्युनिटी हॉलमध्ये त्या पालखीचा आणि वारकर्‍यांचा मुक्काम असायचा २-३ दिवस. शेगांव संस्थानाचा हत्ती आणि घोडा पण असायचा. एका संध्याकाळी कॉलनीतुन पालखी फिरवली जायची! आम्ही त्यात भाग घ्यायचो. रस्त्यांवर रांगोळ्या काढणे, रस्ते सजवणे या सगळ्याची खुप मजा यायची! वेगवेगळ्या भजनी मंडळांची भजनं, किर्तनं अशी धमाल असायची. घोडा पण त्या मिरवणुकीत नाचायचा.

दोन वर्षांपूर्वी भारतात गेले होते तेव्हा शेगांवला जाण्याचा योग आला. तिथल्या हत्तीणीला बघुन 'अरे हिच की ती!' असं झालं. आमच्या मुली तर पूर्ण वेळ हत्तीणीच्या घराजवळच असायच्या.

एकदा मायबोलीकरांनी ठरवुन वारीत थोडा वेळ तरी सहभागी व्हायला हवे!

डोळ्यांत पाणी येतं म्हणुन वारीच्या बातम्याही पहायच्या टाळल्या होत्या ते तुझं लिखाण वाचुन आलंच. मस्तच लिहिलंयस.

छानच लिहिल आहे. कविता महाजनांच्या 'भिन्न'मधे मात्र वारीचे वेगळेच दर्शन घडते.

Pages