काही अस्पर्श्य भावना...!

Submitted by बागेश्री on 5 July, 2013 - 02:06

धुंदीत जगता जगता,
उरल्यात काही संवेदना,
अजूनही न अनुभवलेल्या... न स्पर्शिलेल्या!
वाटतंय आताशा घ्याव्यात जगून .... त्या
काही अस्पर्श्य भावना...!

असेलच ना नक्की काही-

आनंदाच्या पार पलिकडलं
दु:खाच्याही जरा अलिकडलं,
भितीच्या मग बरंच पुढचं
अन् उदासीच्याही आधीचं काही....?

पान्हा फुटण्या क्षणा भोवतालचं,
मायेच्या ओथंबत्या नजरे नंतरचं
कासावीस जीवाच्या आसपासचं,
बेपर्वा मिनीटांच्या पहिले काही....

असहाय्यतेच्या जरा आधीचं
हतबलतेच्या थोडं जवळचं
रुजणार्‍या आशेच्या सभोती
उणीवांच्या, भवताल काही...

जगताना जे जाणवलंच नाही,
निसटलेलं हे काही बाही,
उरलेल्या ह्या संवेदना,
अजूनही न अनुभवलेल्या...
वाटतंय आताशा घ्याव्यात जगून .... ह्या
काही अस्पर्श्य भावना...!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy chhaan

श्यामली ताई,
ह्या कवितेचा "वृत्तबद्ध भावानुवाद" केला आहे, स्वामीजींनी, त्यांनी तो प्रसिद्ध केला की त्यांच्या अनुमतीने येथे तो पोस्ट करेन...
तो अनुवाद अन्बिलेव्हबली सुंदर झालाय.... तू जे म्हणते आहेस, ते गहिरेपण त्यांनी वृत्तात उतरवलंय. वृत्ताचा अभ्यास असावा तर असा, असं म्हणशील तू ही....

नमस्कार बागेश्री ताई

आपली ही कविता मी वाचली. ही कविता मी वाचल्यानंतर असे वाटले कि आपण उत्तमोत्तम कविता लिहू शकेल. आपण कौठल्याही कारणाने कविता करणे सोडू नये. तुमच्या पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा !

शामलीशी सहमत.
तरल...काव्यात्मक. जास्त लिहीत नाही Happy

अस्पर्श हे बरोबर आहे का ?

शामली ताई... रिया..
हाच तो वृत्तबद्ध भावानुवाद, मूळ रचनेला कैकपटीने समृद्ध करणारा....कमालीच्या सहजतेने वृत्त हाताळले आहे..स्वामीजीं, _/\_
_____

आस उरे ही....

धुंद होउनी जगता जगता कशा निसटल्या कळले नाही
वरतुन क्षुल्लक तितक्या नाजुक अशा जाणिवा सुटल्या काही,
अलगद होती एक तरलता प्रत्येकीच्या असण्यामधली
स्पर्श करावा म्हणता चंचल पाऱ्यासम ती निसटत गेली..

अजुन मनाचे कुतुहल जागृत, अनाघ्रात पुष्पे हुंगावी
अस्पर्श्याचा स्पर्श हवासा, अनुभव करण्या संधि मिळावी,
पुन्हा एकदा जगून घ्यावे, भरुनी जागा जिथे रिकामी
संवेदन ते पिता मनाने रोमरोम हो पुलकित नामी...

असेल काही सुटले निश्चित आनन्दाच्या पार पलिकडे
नसे बघितले कातर विव्हळ दु:खाच्याही जरा अलिकडे,
भीतीच्याही बरेच पुढचे असेल सुटले भयाण काही
उदास होण्यापूर्वी क्षणभर किंचित मरगळ सुटून जाई...

पान्हा फुटण्या क्षणाभोवती वात्सल्याचा भाव अनावर
नजरेमधले अस्फुट काही मायेने थबथबल्यानंतर,
असह्य व्याकुळ घुसमट होता कासाविसल्या जिवापासचे
बेपर्वाईने जग सारे उडवुन देण्या क्षणापूर्विचे

असहाय्याने अगतिक होउन घुटमटळताना क्षण पूर्वीचे
हतबल आणिक निराश व्हावे अशा अवस्थे-आसपासचे
रुजणाऱ्या आशेच्या भवती जिजीविषेच्या वातावरणी
उणीव जाणुन आपल्यातली तिच्याभोवती थबकल्या क्षणी...

असेच काही आणिक अजुनी जगताना जे अनुभवले ना
निसटुन गेले सावध नसता, हवेहवेसे आज ते पुन्हा,
दिपून जावा कोनाकोना मनात जाणिव होता सगळी
संवेदन ते चिमटित घ्यावे, आस उरे ही सुप्त आगळी...

- स्वामीजी ६-७-१३
(बागेश्री देशमुखच्या प्रभावी मुक्त रचनेचा "वनहरिणी" वृत्तबद्ध भावानुवाद)
---------------------------------

__/\__ (दोघांनाही)

स्वामीजींच्या वेबसाईटवर वृत्तांची माहिती वाचली होती. ऑर्कुटवर त्यांनी अष्टाक्षरीचे अनेक प्रकार दाखवले होते. सॉनेट (सुनीत) अशा रचना लीलया हाताळण्यांचं त्यांचं कौशल्य याबद्दल आदर आहेच. शिकण्यासारखं व्यक्तीमत्व आहे.

जगताना जे जाणवलंच नाही,
निसटलेलं हे काही बाही,
उरलेल्या ह्या संवेदना,
अजूनही न अनुभवलेल्या...
वाटतंय आताशा घ्याव्यात जगून .... ह्या
काही अस्पर्श्य भावना...!

सर्वांगसुंदर ...............अनुवाद पण !!:)

अत्यंत वेगळा प्रयोग, बागेश्रीचा मुक्त:छंद अन स्वामीजींचं छंदोबद्ध खूप आवडले दोन्ही.