वियोगाचं प्रात्यक्षिक...!

Submitted by सुशांत खुरसाले on 11 July, 2013 - 07:00

या शहरावर भार.....
चिखलाचा तसाच सोन्याचाही ...., कुणाच्या नाजूक पावलांचा तर
कुणाच्या क्रूर हास्याचाही ! कुणाच्या दिलखेच अविर्भावाचा ,तर कुणाच्या
रांगडेपणाचाही !! द्वैताच्या कैक साखळदंडांचा तसाच अद्वैताच्या कैक घोषणांचाही...!

तसाच काहीसा भार ...मी अजून टाकून बसलो होतो या शहरावर--
माझ्या मनाचा ! ज्याचं शरीर असावं बेमुर्वतखोरपणाचं ,आत्मा असावा मनस्वितेचा
आणि रंग काही खुळ्या अस्मितांचा !!

या सगळ्याला स्विकारून या शहराने निर्माण केली , झेलली ,पेलली आणि बहरवली माझी अनेक
रुपे मलाही अपरिचित असणारी. तिच्या डोळ्यांत रमणारा , स्वतःला हरवून बसणारा , इथल्या हरएक
रस्त्यावरच्या गर्दीत रमणारा; तरीही एकांत शोधत फिरणारा , अनुकूल बोलून प्रतिकूल वागणारा ,
स्वसिध्दांताच्या निरर्थक परिक्रमा करणारा , कधी स्नेहार्द्र तर कधी पराकोटीचा स्नेहशून्य ठरणारा !!
अगदी आनंदाने..

आज आभारी आहे त्याच शहराचा कारण सहवासातून निर्माण झालेला जिव्हाळा आणि
जिव्हाळ्यातून फुललेल्या सहवासाचे सगळे मॄणाल बंध तोडून मला इथून निघून जाण्याची
परवानगी दिल्याबद्द्ल !!

प्रत्येक घटनेच्या साक्षीने साजरी केली या शहरात जीवनाची कैक प्रात्यक्षिके --
प्रेमाची तशी तिरस्काराची ,वंचनांची तशीच पुरस्काराची ,उस्फुर्ततेची तशीच अबोल्याची , जगाकडे कसं पहावं याची अन् स्वतःत कसं रमावं याचीही !
आणि आज हे शेवटाचं --
वियोगाचं प्रात्यक्षिक !!

आज ह्रदयाचा डोह आपोआप ढवळून निघाला आणि तरंगु लागल्या अमर्र्याद आठवणी , अश्रुंच्या सरींना अर्ज न करता त्याही भरपूर बरसून गेल्या --
हळूहळू उघडेल आता मनाचं आकाश पण त्याचबरोबर उघडेल एका नव्या शहराचं दारही !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाओ यार...
औरंगाबाद की याद बहोत सतायेगी..

त्यातच आपल्या कट्टयाची, उनाडक्यांची ...

तसेच 15 ऑगस्ट ,26 जानेवारी ला दौलताबाद, वेरूळ , म्हैसमाळ ला निघणार्या सहलींची...

एकुलत्या एक PROZONE MALL ची...

लहानपणापासून आवडते ठिकाण असलेल्या सिद्धार्थ गार्डन, सलीम अली सरोवर ची..

ददररोज नवीन नवीन छटा दाखवणार्या व घराबाहेर पडताच
दर्शन देणार्या सातारा डोंगराची...

गोगा बाबा टेकडी, साई टेकडी...

आणि सर्वात महत्वाचं श्रावणातल्या दर शनिवारी भद्रा मारूतीचे दर्शन !!!

प्रत्येक घटनेच्या साक्षीने साजरी केली या शहरात
जीवनाची कैक प्रात्यक्षिके --
प्रेमाची तशी तिरस्काराची ,वंचनांची तशीच
पुरस्काराची ,उस्फुर्ततेची तशीच अबोल्याची ,
जगाकडे कसं पहावं याची अन् स्वतःत कसं रमावं
याचीही !
आणि आज हे शेवटाचं --
वियोगाचं प्रात्यक्षिक !>>> खरंच डोळे पाणवले सुबाखु..!!

आज ह्रदयाचा डोह आपोआप ढवळून
निघाला आणि तरंगु लागल्या अमर्र्याद आठवणी ,
अश्रुंच्या सरींना अर्ज न करता त्याही भरपूर बरसून
गेल्या --
हळूहळू उघडेल आता मनाचं आकाश पण त्याचबरोबर
उघडेल एका नव्या शहराचं दारही !!!>>> Happy

क्या बात सुशांत !
अप्रतिम लिहिलेत, खूप आवडले.
अगदी असेच होत असले पाहिजे जडण घडणीचे शहर सोडताना.

जडण घडणीचे शहर <<< हो भारतीताई , अगदी नेमक्या शब्दांत सांगितलंत.
खूप खूप आभार ,भारतीताई ..

शिवम सहसंवेदना जाणवतेय..

'हा जिव्हाळा सहवासातून निर्माण होतो का?' असं बर्याच दिवसांपासून मनात घोळत होतं माझ्या.. त्यामुळेच लिहिलं हे..

Happy