माझा बाप आणिक माझ्या बापाचा मुलगा (आषाढस्य प्रथम दिवसे)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

परवा माझा बाप गेला. आणि मग माझ्या बापाचा मुलगा खुप खुप रडला. डोळे फुटे पर्यंत रडला. अजूनही रडतोय. आयुष्यभर रडेल. रडतच राहील अगदी त्याच्यासाठी कुणीतरी रडे पर्‍यंत रडेल. बाहेर पाऊस पण रडतोय. कूणीतरी म्हणाल आषाढ लागलाय. मग माझ्या बापाच्या मुलाला आठवल कालीदासाने 'आषाढस्य प्रथम दिवसे' अस काहीस काव्य लिहीलय. त्यात आषाढातल्या मेघा बद्दल काहीस लिहीलय अस ऐकलय माझ्या बापाच्या मुलाने. तो मेघ आता माझ्या बापाच्या मुलाच्या डोळ्यात राहतो. आषाढ महिना फार वाईटय. आषाढ लागताना तो माझ्या बापाला घेऊन गेला आणिक संपताना माझ्या आईला. नंतर कधीतरी माझ्या बापाच्या मुलालाही घेऊन जाईल अलगद.

मागे कधीशी पित्रू-दिन येऊन गेला. माझ्या मायबोलीने त्या बद्दल लेखनाचा एक सुंदर उपक्रम सुरू केलेला. मला लिहायच होत पण माझ्या बापाचा मुलगा फारच व्यस्त होता. इतका व्यस्त की त्याला स्वत: च्या बापाकडे बघायला सुद्धा वेळ नव्हता. लिहायच तर सोडाच त्याला बापाशी बोलायला सुद्धा वेळ नव्हता. सदा कदा बापावर डाफरत असायचा. बाप आतून दुखायचा पण बोलून दाखवायचा नाही फक्त गप पडून रहायचा. आणि मग असाच तो आषाढातला पहिला ढग आला आणिक बापाला घेऊन गेला. बापाचा मुलगा बघतच राहीला त्या ढगाकडे हताश निशब्द.

बापाचा मुलगा बेवारश्या सारखा भतकत राहीला. बापाचे मित्र सांगत राहीले बाप किती मोठ्या मनाचा होता तो. बापाचा मुलगा ऐकत राहीला. बाप म्हणे डायलीसीसच्या आजारपणात पार्ल्यावरून मिरा रोडला एकटा जायचा ट्रेनने. का तर मित्राला पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून. आणि मग ती पुस्तके परत आणायला , नवीन पुस्तके द्यायला. माझ्या बापाचा मुलगा तर एका खोलीतल वर्तमानपत्र सुद्धा बापाला दुसर्‍या खोलीत बापाला आणून द्यायचा नाय. फक्त ओरडायचा त्याच्यावर. बापाला खाण्या-पिण्याची फार आवड होती. पण एकटा कधी खायचा नाही. सर्वांसाठी खायला आणायचा. बापाचा मुलग मग त्याच्यावर चिडायचा वायफळ खर्च करतो म्हणून पण स्वतः कधी बापसाठी खायला आणायचा नाही. बापाला नाटक-सिनेमाची भारी आवड पण बापसाठी कधी चुकून कधी तिकीट घेऊन आला नाही. बाप तिकीट काढून आणायचा एक कधीच नाही दोन आकडी. सर्व नातेवाईकांना बोलावयचा फोन करुन बोलावायचा नाटकाला. घरी जाऊन तिकीट पोचती करायचा. नातेवाईक आपापसात हसायचे 'नाटकाचे वेड' म्हणून. मग माझ्या बापाचा मुलगा चिडायचा नातेवाईक हसतात म्हणून. पण माझा बाप ऐकून न ऐकल्यासारख करायचा आणि पुढच चांगल नाटक लागल की पहाटे उठून तिकीट काढायला जायचा रांगेत उभ रहायला म्हणून.

माझा बाप एकदा बापाचा मुलगा परीक्षेला जाताना घड्याळ घालायला विसरला म्हणून आंघोळ अर्धवट टाकून फक्त टोवेल गुंडाळून सोसायटीच्या गेटपर्यंत धावत आला फक्त घड्याळ द्यालला म्हणून. लोक बापाला हसले. बापाच्या मुलाला माझ्या बापाची खुप लाज वाटली. स्वतः ची वाटायला हवी होती खर तर.

माझा बाप स्वतः फारसा शिकला नाही पण त्याने माझ्या बापाच्या मुलाला खुप शिकवल. म्हणायचा माझी नौकरी आहे तो पर्यंत वाटेल तेवढा शिक घरी बसून. घरची काळजी करू नकोस. लोक बापाला सांगायचे बापाच्या मुलाला नोकरी करायला सांग म्हणून पण बाप काही बधायचा नाही. मग बापाचा मुलगा खुप शिकला, बापाला एकटा टाकून परदेशी गेला. बापालाच शिकवून गेला. बाप आतून खुप हादरला पण व्यक्त झाला नाही.

मग आता आषाढात बाप एकदम गेला. बापाचा मुलगा बापाला जाऊन अग्नी देऊन आला. अग्नी संस्काराला अगदी मोजकी माणस होती फार तर ८-१० असतील. माझ्या बापाच्या मुलालाही मग माझ्या बरोबरीने खुप वाईट वाटल. अरे रस्त्यावरचा कुणी फाटका माणूस अगदी मार्केटातला भाजीवाला जरी गेला तरी ह्यापेक्षा अधिक माणस जमतील आणि माझ्या बापाचा लोकसंग्रह तर खुप मोठा होता. मग माझ्या बापाचा मुलगा खुप खुप रडला. पश्चातापाने कदाचित पित्रु हत्येच्या पापाच्या भितीने. तिकडे माझा बाप लाकड आणिक आगीज जळून गेला. इकडे माझ्या बापाच्या मुलाची शरीराची लाकड आणिक मनाची आग झाली पण तरीही तो जळून गेला नाही. होरपळत राहीलाय. माझ्या बापाच्या मुलाने आजकाल आयुष्य 'आंगातला शर्ट काढून जमीनीवर भिरकावा' तस भिरकावून दिलय. तो ही असाच कधीतरी मरुन जाईल पटकन.

मला कधी कालीदास भेटला तर मी त्याला सांगणारै 'आषाढस्य प्रथम दिवसे ' चा अर्थ माझ्या कडून समजून घे म्हणून.

मी (दिनांक १२/०७/२०१३)

प्रकार: 

वाचताना डोळ्यात कधी पाणी आले ते कळलेच नाही....जे झाले ते तर बदलू शकत नाही....तरी पण काय चुकले याची जाणीव झाली हे ही काही थोडे नाही....पण आयुष्यभर त्याचे ओझे न बाळ्गता वेगळ्या पध्द्तीने भरपाई कर्.....जगात किती तरी असे लोक आहेत की त्याना गरज आहे...त्याना वडीलान्च्या नावे मदत कर्......तुला नक्की समाधान वाटेल.....त्या त्या वयात माणूस वागत असतो ते त्याला बरोबर वाटत असते....पण कालानतराने त्याला चूक उमगते...पण तो पर्यत वेळ गेलेली असते....यातून लवकर बाहेर पड.....

मुला, सावर रे... सावर...
बाप बघतोय, त्याला कळतय तुला कळलय ते, म्हणून तर सांत्वनासाठी केव्हाचा कोसळतोय...
तुझे अश्रू पुसायला धाव धावून येतोय लाहनपणि जसा आला होता तसा...
त्या आषाढमेघाबरोबर, धाडतोय तोच तुलाच निरोप, की आता पुरे, सावर रे
त्याच्या कष्टलेल्या मनालाही थोडा आराम दे... सावर रे... मुला....

जबरदस्त.

<< बापाला एकटा टाकून परदेशी गेला. बापालाच शिकवून गेला. बाप आतून खुप हादरला पण व्यक्त झाला नाही.>>

अशीच एक घटणा बघून एक जवळचा मित्र उसगावातल्या नोकरीला लाथ मारून कायमचं भारतात परत आला आहे. त्याच्याकडे आता सेकंड होम, ब्या़क ब्ल्यालन्स नाही, पण आई-वडीलांबरोबर सुखी आहे.

केदार Sad
खूपच आतून लिहिलंत. वाचताना ते जाणवतं. अक्षरशः डोळ्यातलं पाणी आवरत आवरत पुढे वाचत गेले.
आपल्या ही जगण्याच्या, करीअर च्या संघर्षात आई वडिलांना वेळ देता येत नाही. मनात खूप असतं हे करू ते करू पण त्या त्या वेळी ते तसं घडत नाही. पण आपण असं काही मुद्दाम दुष्ट्पणाने वागत नाही ना , त्या त्या वेळी गोष्टी तशा घडून जातात.

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हे दु:ख सोसण्याचे बळ मिळो.

Too much.... Me Speechless ...

Every man's death DIminishes me .......
Because I am involved in mankind........

Pages