एक आगळी वेगळी पाऊस कविता

Submitted by फूल on 10 July, 2013 - 18:14

एक आगळी वेगळी पाऊस कविता

बऱ्याच दिवसात तुझ्यावर काही लिहिलं नाही
लिहावंसं वाटलं.
बऱ्याच दिवसात मनासारखं काही केलं नाही
करावंसं वाटलं.

तू पडतोच आहेस रे माझ्या लहानपणापासून
मीच खूप लांब आले तुला तिथेच सोडून
बऱ्याच दिवसात मनाची कवाडं उघडली नाहीत
उघडावीशी वाटली.

बाहेर सगळे चांगलेच आहेत पण माझे कुणीच नाहीत
खरंतर मी सुद्धा परकी झालेय माझी उरलेच नाही
बऱ्याच दिवसात आपलं कुणी भेटलं नाही
भेटावसं वाटलं.

मला वाटलं तू खोटा झालास माझा पैसा खरा केलास
पण तू अजूनी तसाच माझा पैसा खोटा केलास
बऱ्याच दिवसात बालपण जगलेच नाही
जगावसं वाटलं

आज तुला पाहिलं पूर्वीसारखंच निरखून
आज तुला पहिलं पूर्वीसारखंच हरखून
बऱ्याच दिवसात स्वत:ला विसरलेच नव्हते
विसरावंसं वाटलं

का येतोस अवेळी अन करतोस माझी धावपळ
माझ्याच मनी चलबिचल तू तसाच निश्चल
बऱ्याच दिवसात तुझ्यात कुणाला शोधलं नाही
शोधावसं वाटलं.

दाखवतो आहेस खरा की सगळ्यांसाठी पडतोयस
खरं खरं सांग तूही कुणाला तरी शोधतोयस
बऱ्याच दिवसात कुणाला छेडलं नाहीस?
छेडावसं वाटलं?

पुरे झाल्या गप्पा आता निघून जा बरं ढगात
मला बरीच कामं आहेत हे येतील घरात
बऱ्याच दिवसात खरंतर कधीच कुणाला टाळलं नाही
टाळावसं वाटलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!