पावसाळी 'कल्ला' !

Submitted by Yo.Rocks on 10 July, 2013 - 12:53

दिवसभरात पावसाने मस्तपैंकी धुमाकूळ घातलेला... वार्‍याच्या तालावर डोंगरांच्या या शिखरावरुन त्या शिखरावर करत आतापर्यंत नाचणारे ढग आता सांजवेळेची चाहूल लागताच आपापली जागा पकडून स्थानबद्ध झालेले.. पाउस जरी पडून गेला असला तरी त्याने आपल्या पाउलखुणा सभोवताली उमटवल्या होत्या.. मग ते चिखलपाणी असो, डोंगरावरच्या धबधब्यांचे नक्षीकाम असो वा खळखळाट करत वाहणारा शेतातला वा ओढयाचा जलप्रवाह असो.. ! शिवाय सभोवतालचा 'हिरवा' निसर्ग मनाला अधिका अधिक प्रफुल्लित करु पाहत होता...

- -

इतिरुपी निसर्गाने भरभरुन दिलेल्या प्रेमामुळे मनातील 'खंत' कधीच विस्मृतीच्या गुहेत सरकलेली.. ट्रेक संपुर्णम न झाल्याची ती खंत.. खरेतर दिवसाची सुरवातच अगदी उशीरा उठण्यापासून ते ठरलेली ट्रेन चुकेपर्यंत अशा घटनाक्रमांनी सजलेली होती.. त्यात ट्रेकची सुरवातदेखील सोप्प्या वाटेला बगल देउन दुसरीच वाट पकडून केली.. चूक लवकरच लक्षात आली पण त्या वाटेचे गुढ उकलण्यासाठी माग घेत गेलो.. क्षणभर मूळ उद्दीष्टाचा विसर पडलेला.. 'पेब' च्या किल्ल्यावर जाण्यासाठी आलोय की फक्त यथेच्छ भटकण्यासाठी !! त्या वाटेच्या नादात पायाखालची चिखलवाट तुडवली.. रक्तपिपासू डासांना न जुमानता काटयाकुटांच्या जंगलाला आव्हान दिले... वाटेत वरतून वाहत येणार्‍या झर्‍याचे ते पवित्र पाणी तोंडावर फवारुन समाधान पावलो... अगदी निसर्गाशी आलिंगन देण्याचा आटापिटा चालू होता..

- -

--

भानावर येइपर्यंत पावसाने मात्र सोसाट वार्‍यासंगे चांगलेच रिंगण घातलेले.. झोडपून काढायला सुरवात केलेली.. तर एकीकडे ट्रेक आटपून नेरळहून संध्याकाळी साडेचारच्या ट्रेनने मुंबईकडे रवाना होण्यास आम्ही आधीच बांधील झालेलो...त्यामुळे मुळ वाटेवर येउन 'पेब'च्या किल्ल्याचा माथा गाठायचाच हे उद्दीष्ट कधीच गळून पडलेले.. तरीसुद्धा जाउ तितके जाउ म्हणत पुनश्च सुरवात.. इथे 'क्षणभर विश्रांती क्षणभर दंगामस्ती' हा पावसाचा रुबाब सुरुच.. आधीच ठरल्या वेळेत माथा गाठणार की नाही म्हणून आम्ही साशंक... त्यात 'ही वाट नव्हे' म्हणत वाटेतून परत फिरणारे भेटलेले दोन हाफचड्डीकर्स.. त्यांच्यावर असा सहज विश्वास ठेवलाच नसता.. पण आमचाही ट्रेकपुर्ण जोश ओसरलेला... परिणामी आम्ही सहज म्हणून अजुन दुसरी वाट पकडलेली... दोन्ही बाजूस गर्द झाडी तरी पाउलवाटही तितकीच ठळक.. सरळमार्गाने शांततेत जाणार्‍या ह्या वाटेची एकाग्रता भंग करण्यासाठी एक छोटेखानी धबधबा आडवा आलाच ! हा धबधबा ओलांडून ती वाट पुन्हा सरळमार्गाने पुढील जंगल-कल्लोळात नाहिशी होत गेलेली...

म्हटले आता निसर्गाच्या स्वाधीन झालेच पाहीजे ! साहाजिकच थंडगार पाण्याचा झोत मनसोक्त अंगावर झेलला... जणु डुंबण्यासाठी जन्म आपुला म्हणत त्या जलप्रवाहात लोळून घेतले.. आता वेळ झाली खादाडीची.. त्याच वाटेने माघारी परतून हिरव्यागार पठारावर मोक्याची जागा निवडली.. ! मखमली हिरवळीवर बसून समोरच्या पहाडावरुन ओघळणार्‍या धबधब्यांच्या विविध रेषा पहायला मिळत असतील तर यापेक्षा निखळ आनंद कुठला..

- -

अशाच आनंदाचा आस्वाद 'पेब' चा माथा गाठून घ्यावा असे मात्र राहून राहून वाटत होते... पण दरवेळीच माथाच कशाला.. डोंगराच्या कुशीत बसूनही आस्वाद घ्यावा कधीतरी.. आज तीच वेळ होती... मनाने मनाचीच समजुत काढून दिलासा दिला होता.. अधुनमधून थैमान घालणार्‍या पावसात मुक्तपणे भिजायचे... सभोवतालच्या शिखरांना धडकणार्‍या ढगांच्या लाटांचे रौद्र रुप पहायचे.. दर्‍याखोर्‍यांत दुमदुमणारा धबधब्यांचा साद देणारा आवाज ऐकायचा.. हेच मग तासन तास अनुभवले.. वेळ कधी सरला कळलेच नाही...

आता सांजवेळी परतीची वाट स्विकारली तेव्हा मात्र किल्ला काही सर झाला नाही अशी खंत मनात डोकावू लागली.. पण पुन्हा एकदा नजर सभोवतालच्या निसर्गावर गेली... नि खंत नाहिशी होउ लागली.. त्यातच आजुबाजूच्या शेतारानामध्ये शेतकर्‍यांची लगबग दिसून आली.. कोणी अजुनही नांगरतोय.. तर कोणी खत फवारतोय.. बरेचजण मात्र शेतीच्या 'लावणी महोत्सवात' सहभागी झाले होते.. त्यांच्याशी गुजगोष्टी करत पुढे सरकलो.. खत फवारणार्‍या काकांचा फोटो काढतोय म्हणताच ते हसत म्हणाले ' माझा नको.. तिथे शेतात माझ्या सुना काम करताहेत त्यांचा फोटो काढा.. मात्र मुलीचा नका काढू.. कारण जावई पण इथंच आहे.. रागावेल' !!' त्यांचे संपुर्ण कुटूंब त्या शेतमळ्यात अगदी हसतखेळत काम करताना दिसले..! वरुणराजा प्रसन्न आहे म्हटल्यावर बळीराजा सुखावणारच ! वरुणराजाची अशीच कृपा राहूदे हीच इश्वरचरणी प्रार्थना !

- -

त्या कुटूंबाचा निरोप घेउन पुढे गेलो तर एका छोटया टेकाडावर गंमतीदार दृश्य सुरु होते.... त्या टेकाडावर गावातल्या लहान पोरांचा नुस्ता धुमाकूळ सुरु होता... घसरगुंडीचा खेळ मांडला होता... त्यासाठी बागबगीच्यात वा शाळेत दिसणारी लोखंडी घसरगुंडी नव्हतीच.. तर टेकाडावरुन सरळ खाली येणार्‍या एका चिखलवाटेला त्यांनी घसरगुंडी करुन ठेवले होते.. दोन्ही बाजूस हिरवळीमधून घसरत येणारी चिखलमातीची नैसर्गिक घसरगुंडी ! अगदी नेहमीच्या घसरगुंडीला लाजवेल इतकी घसरी.. अन त्या घसरगुंडीवरुन एका मागून एक घसरत येणारी ती पोरं.. चिखलात माखलेल्या काटकुळ्या शरीरयष्टीवर फक्त अर्धीचड्डी असा प्रत्येकांचा वेष होता.. बालपणाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत होते.. आम्ही फोटो काढतोय म्हटल्यावर त्यांचा कल्ला दुपटीने वाढला.. खरच त्यांनी आपल्या परीने करमणुकीसाठी शोधलेला हा धमाल फंडा कौतुकास्पद होता.. आम्हीसुद्धा बराच वेळ त्यांचा खेळ दंग होउन बघतच बसलो...

- -

- -

काही सेकंदाची ही चित्रफीत पाहिली तर नक्कीच कल्पना येइल..
https://www.youtube.com/watch?v=dexm8wq-ciA

एव्हाना परतीच्या वाटेवर आता मनात खंत वगैरे असे काही वाटूनच राहीले नाही.. किल्ला काय नंतरही बघता येइल.. उलट आज फुल्लटू पावसाळी 'कल्ला' अनुभवला तेच खूप होते.. किल्ल्यासाठी पुन्हा येणे ठरवलेच ! 'पेब' डोंगराच्या कुशीत फिरलो.. आता 'पेब' चा माथा ल व क र च !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>डोँगराचा माथा नाहितर कुशीतच आनंद<<.छान .उडी शोधत होतो पण त्यापेक्षाही छान घसरगुंडी आहे .१०++ .आज तुम्ही खरा जिवंत डोंगर पाहिलात नी आम्हाला दाखवलात . हिमायलातली दहा ८०००मि+ शिखरे एकट्यानेच फिरणारा रिनोल्ड मेसनर म्हणतो "मी डोँगरयात्री नाही डोंगरवासी आहे"( a mountainman not a mountaineer ).माथ्यापेक्षा कुशीच छान .

क्या बात है!!!
अफाट वर्णन आणि अफाट फोटोज Happy सगळेच आवडले.
रच्याकने, त्या फूटबॉल एव्हढ्या दगडाचे वर्णन नाही का? Wink Proud

ह्या यो रॉक्स आणी जिप्सीचे नक्की काय करावे?:राग::अरेरे::फिदी:

फोटो काढुन उगाच जल्ला जल्ला म्हणत आमचे जीव जळवायची कामे करत रहातात्.:खोखो:

भन्नाट फोटो! धबबबे, डोंगर, धुके ,हिरवळ्, नद्या ...काय करावे काय करावे ( डोके खाजवत केस उपटणारी बाहुली) ..अयाया!

मुलांचे फोटु मस्त, लय हेवा वाटला.:स्मित:

यो! यू रॉक!! म............स्स्स्स्स्त फोटू Happy

त्या घसगुंडीसाठी परत एकदा लहान व्हावेसे वाटले.. मस्तच Happy

ते सुंदर फोटो पाहून कळून चुकले की, तू पावसाळ्यातील भटकंतीचा मनमुराद आनंद घेतलेला आहेस.

Pages