यत्न करतो आजही

Submitted by निशिकांत on 28 June, 2013 - 02:30

मी तुला विसरावयाचा यत्न करतो आजही
शक्य नाही ते कराया युध्द लढतो आजही

तू जशी गेलीस सखये, ग्रिष्म आहे सोबती
मी ऋतू गंधाळण्याची वाट बघतो आजही

सागराला का असावी ओढ चंद्राची अशी?
पौर्णिमेला भेट घडणे योग नसतो आजही

दार केले बंद माझ्या मी मनाचे पण तरी
आठवांचा झोत तुझिया आत घुसतो आजही

कृष्ण नाही, फक्त दिसतो कौरवांचा राबता
काय व्हावे द्रौपदींचे? प्रश्न उरतो आजही

अंधश्रध्दा एवढी की संकटे येता क्षणी
सामना करतो न आम्ही, देव पुजतो आजही

कलियुगातिल मयसभेची आखणी केली कुणी?
दुष्ट हसतो, सत्त्यवादी आत पडतो आजही

का दिल्या गरिबांस फसव्या योजना, अश्वासने ?
मोकळ्या पोटी भुकेचा डोंब जळतो आजही

सोसल्या "निशिकांत" का तू भाववाढीच्या झळा?
भाव नसतो माणसाला, स्वस्त विकतो आजही

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख गझल.

(मात्र आज महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांनी ज्या तर्‍हेची अंधश्रद्धेची व्याख्या करून ठेवली आहे त्या व्याख्येशीच मी असहमत असल्याने अंधश्रद्धेच्या शेराशी असहमत.)