’बाय’ असणे...

Submitted by मुग्धमानसी on 25 June, 2013 - 07:07

आज पुन्हा मी जरा वैतागले आहे
रात्रभर गस्तीत माझ्या जागले आहे...

उर पाहून आठवावे दूध आईचे
ते निरागसपण ढळाया लागले आहे...

भूक त्यांची कोणती जी हाय भागेना
भाकरीचे चंद्र सगळे भागले आहे...

माय म्हणते झाक बाळा आबरू सगळी
मी तिच्या डोळ्यांत तरळू लागले आहे...

कुणीतरी सांगा मला हे नीट समजवूनी
नेमके का ’बाय’ असणे चांगले आहे...?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रात्रभर गस्तीत माझ्या जागले आहे...<<<< खूप चांगला मिसरा
>>>>आजही मी केवढी वैतागले आहे<<<< अशी वृत्तात बसणारी सुरुवात असती तर एक उत्तम मतला झाला असता !!!

र पाहुन आठवावे दूध आईचे (ऊ , हु ~ वृत्तासाठी)
ते निरागसपण ढळाया लागले आहे...<<<<<< बहुत बढिया शेर

भूक त्यांची कोणती जी हाय भागेना<<< अजून एक उत्तम मिसरा !! दुसर्‍या ओळीतून अर्थ दुसरीकडे जातो व जो आपण ह्या हाती लागलेल्या ओळीतून काढू पाहत आहात तोही नीट लागत नाही आहे

माय म्हणते झाक बाळा आबरू सगळी
मी तिच्या डोळ्यांत तरळू लागले आहे...<<< चटका !!! Sad

नेमके का ’बाय’ असणे चांगले आहे...?<<<< बाय हा शब्द योजण्याची काही आवश्यकता नव्हती एकंदर कवितेचा मूड कसनुश्या फिनिशिंगने एंड होतो त्यामुळे !!! ह शब्द मिस् -फिट आहे बदलता आलात तर अवश्य पहावे

असो गझल लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा Happy

छान! आवडली Happy
वैवकुंशी सहमत!
आबारू म्हणजे काय?

निरागसपणाचा शेर तर अप्रतिमच Happy

पुढील गझलेसाठी शुभेच्छा!

ही कविता 'उदय' च्या 'चित्रमय कविता स्पर्धेसाठी दिली होती. एका वैतागलेल्या, थकलेल्या लहान मुलीचा फोटो होता आणि त्यावर कविता करायची होती. मी ही कविता केली आणि का कोण जाणे.. ती मलाच फार आवडली. ही गज़ल होऊ शकते याची त्यावेळी कल्पना नव्हती. (आताही नव्हतीच म्हणा...)

वैवकू, तुम्ही केलेल्या सखोल समिक्षणासाठी आभार. 'आज पुन्हा मी जरा वैतागले आहे' या वाक्यातून मला वारंवार स्वतःलाच जपत, राखण करत जगण्याचा आलेला कंटाळा, वैताग दर्शवायचा होता. आधीच म्हटल्याप्रमाणे गज़ल करावी हे डोक्यात नसल्याने वृत्तात बसवणे वगैरे केले नाही आणि जमलेही नसतेच कदाचित.

उर... ऊर... बदल करते. धन्यवाद!

भूक वालं कडवं/ शेर> यातून मला सुचवायचे होते की त्या लहान मुलीला फक्त भाकरीची... पोटाची भूक ठाऊक आहे! आणि भाकरीचा तो चंद्रच भागून तिच्यावर रुसला असताना तिला समजत नाही 'त्यांची' ही अशी कोणती भूक आहे जी भाकरीही शांत करू शकत नाही? - हे पोचवण्यात माझे शब्द थोडे कमी पडलेत बहुदा.

'बाय' या शब्दाला अजून कुठला प्रतिशब्द... वरील पार्श्वभुमीवर... तुम्हाला सुचत असेल तर जरूर कळवा. आणि हो... तुमचे प्रतिसाद असेच माझे मनोबल उंचावत राहोत! खूप खूप आभार.

रिया>>> नेहमीप्रमाणेच खूप खूप धन्यवाद!!! Happy (अगं आबारू नाही आबरू. म्हणजे अब्रू, लाज.)

हे मला सांगा कुणीही नीट समजावुन
का तरीही स्त्रीच असणे चांगले आहे ??

असे करता येईल का यावर विचार करून पहावा ..यापेक्षाही चपखल सुचल्यास तेही पहावे Happy