जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण (?)

Submitted by आशयगुणे on 2 June, 2013 - 14:51

"जामिनाचे पैसे कोण भरतय?" पोलिसांनी मला विचारले.
"मी", मी उत्तर दिले.
पोलिसांनी माझ्याकडे निरखून बघितले. " कोण लागतो हा तुमचा?" मला प्रश्न विचारला गेला.
"मित्र ", मी उत्तरलो.
" जरा समजावा तुमच्या मित्राला", पोलिस ऑफिसर म्हणाले.
मी पैसे भरले, सही केली आणि जग्या बाहेर यायची वाट बघू लागलो.

तशी आमची ओळख शाळेपासून. अगदी एका बाकावर बसून आम्ही अनेक विषयांकडे दुर्लक्ष करायचो. जांभयांची जुगलबंदी सुरु असायची. गणिते आपण का सोडवतो, त्याने काय मिळते ह्या गहन विचारात मार्कांची मात्र वजाबाकीच झाली. इतिहास वगेरे विषय गोष्ट म्हणून ऐकले पण पेपरात मात्र गोष्टींना स्थान नसते हे आम्हाला शेवटपर्यंत नाही कळले.( ह्याचा उपयोग दहावीच्या परीक्षेत मात्र झाला! Wink ) हिंदी, मराठीतल्या कविता जेव्हा पाठ करण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा मात्र हे सारे कवी आमच्या द्वेषाच्या यादीत सर्वोच्च स्थानावर जाउन बसले. पण तेव्हाच तुकोबांची 'लहानपण देगा देवा' ही कविता आमच्या पुस्तकात आली आणि त्तुकोबा 'सारे कवी रटाळ असतात' ह्या आमच्या सिद्धांताला एक जबरदस्त अपवाद ठरले. तेव्हा जग्याच मला म्हणाला होता. " मला ही कविता आवडली. आणि खास करून ही ओळ:

जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण

पुढे आमची मैत्री वाढली आणि मी त्याच्या घरी देखील जाऊ लागलो. काका-काकुंशी ओळख झाली. त्याला एक मोठा भाऊ होता - विलास - त्याच्याशी अधून मधून गप्पा होऊ लागल्या. अधून मधून कारण ह्याच्यात आणि विलास मध्ये १० वर्षांचे अंतर होते! ह्याच्या पुस्तकांना कव्हर घालणारा, हा शाळेत का आला नाही हे 'कारण' दाखवणारी नोट ( ह्याच नोट ची concept पुढे कोर्टाने 'कारण दाखवा नोटीस' म्हणून उचलली असेल!) लिहिणारा, रोज ह्याचे दप्तर तपासणारा ह्याचा दादा आता माझ्या ओळखीचा झाला होता. घरी गेल्यावर साधं पाणी आणायचे काम सुद्धा तोच बिचारा करायचा. जग्या नुसता ऑर्डर सोडे. " दादा... पाssss णीssss" आतून आवाज येई. " तू घे रे.. मला वेळ नाही ... मी कामात आहे.."
तर जग्याच उलटा ओरडे. " आsss ईsss ... दादा बघ ना ... मला पाणी देत नाही!" आणि आतून ह्याची आई चक्क दादालाच ओरडे! आणि मग मात्र त्याला आम्हाला पाणी द्यावे लागे. बिचाऱ्याची फार कीव यायची तेव्हा.
असाच एक प्रसंग आठवतो. आम्ही अकरावीत होतो. सहज कॉलेज संपल्यावर मी जग्याकडे गेलो. गप्पा मारण्यात, कॉम्प्युटर समोर बसण्यात वगेरे बराच वेळ गेला. संध्याकाळी विलास दादा थकून भागून कामावरून आला. काकूंच्या एकदम लक्षात आले की इस्त्रीचे कपडे आणणे राहून गेले होते. त्या आत आल्या आणि जग्याला म्हणाल्या , " जगू .. बाळा ... इस्त्रीचे कपडे घेऊन ये रे..." आमची कॉम्प्युटर समोरची तंद्री मोडली आणि जग्या जोराने ओरडला. " आम्हाला का सांगते आहेस.. दादाला सांग ना..."
आणि हे ऐकून क्षणात काकू विलास कडे वळल्या आणि पुढे काय? बिचाऱ्या दादाला परत जाउन हे काम करावे लागले. आणि अचानक मला काही वर्षांपूर्वी शाळेत वाचलेली तुकोबांची कविता आठवली :

जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण

जग्याला नेमकी हीच ओळ आवडायची. शाळेत एकदा तो मला म्हणाला सुद्धा होता. "लहान मुलांचं सगळेच ऐकतात.. तुकाराम एकदम बरोबर बोलतो .." मी त्याच्या घरी जाऊ लागलो आणि त्याच्या असे बोलण्या मागचे नेमके कारण मला आता कळू लागले होते.
विलास हा घरचा आधार होता. घरात वडील ६४ वर्षांचे झाले होते. आई काही २ वर्षात साठीत प्रवेश करणार होती. त्यामुळे बऱ्याच वेळेस 'दादा म्हणेल तसे' अशी अवस्था निर्माण झाली होती. आणि जग्या तर शेंडेफळ! त्याच्याकडून कधी कसलीच अपेक्षा ठेवली गेली नाही. मात्र 'तो म्हणेल तसे' अशी मात्र एक विचित्र सवय त्या घराला लागली होती! ह्या पार्श्वभूमीवर आमची बारावी पार पडली. बारावीच्या आकड्याप्रमाणे अगदीच बारा नाही वाजले. पण जेमतेम फर्स्ट क्लास मिळाला आणि आम्ही 'पुढे काय' ह्या विद्यार्थी दशेतल्या सर्वात आवडत्या प्रश्नाकडे परत एकदा वळलो! माझा निर्णय ठाम होता. डिग्रीला जायचे! कारण मेडिकल आणि इंजीनियरिंग ह्या दोन्ही पैकी कुठेही मला जायचे नव्हते! लोकं माझा हा निर्णय मूर्खपणाचा आहे असा 'निर्णय' केव्हाच घेऊन बसले होते! जग्या मात्र आपण कुठले क्षेत्र निवडायचे ह्या निर्णयाला येऊ शकला नव्हता. आमच्या इथल्या एका कॉलेज मध्ये माझा प्रवेश पक्का झाला. कॉलेज सुरु होण्याच्या एक दिवस आधी मी त्याला भेटायला गेलो.
" मी कॉम्प्युटर इंजिनियरिंग साठी admission घेतो आहे. त्याला खूप स्कोप आहे रे. माझा दादा म्हणतो खूप चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आहेत पुढे. आय. टी ला खूप स्कोप आहे पुढे!" त्याने त्याचा निर्णय सांगितला होता.

महाराष्ट्रात त्यावेळेस राजकीय परिथिती चांगलीच तापत होती. मराठी बाणा मनी बाळगून ( निदान असं सांगून ..) एक राजकीय पक्ष राजकारणात आपली वाट धरत होता. पक्षाच्या नेत्यांनी तरुणांना लक्ष करायचे ठरवले होते. त्यामुळे त्यांच्या भाषणात बऱ्याच वेळेस शिव्यांचा वापर होत असे. 'आमच्या मध्ये कोण येईल त्याला फोडून काढू ...' असा सदैव पवित्रा असायचा. शिवाय 'आपल्यावर बाहेरून आलेल्या लोकांनी अंन्याय केला आहे' हे सदैव ठासवले जायचे. मराठी भाषा तशी 'आपण वळवू तशी' ह्या प्रकृतीची! परंतु ह्या भाषेच्या सौंदर्याचा उपयोग 'डबल मिनिंग' ची वाक्य भाषणात बोलून टाळ्या मिळविण्यासाठी होऊ लागला होता. मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होतो तेव्हा गल्लीबोळात ह्या पक्षाची लोकं टेबलं टाकून बसायची. टेबलांवर टी.व्ही आणि त्यावर ह्यांच्या तडफदार नेत्याची भाषणं! बरीच तरुण मंडळी ही भाषणं ऐकत आणि बहुतेक वेळेस 'डबल मिनिंग' वर हसत आपला वेळ सत्कारणी लावत असत! आणि जेव्हा शिक्षण संपल्यावर आम्ही नोकरीला लागलो तेव्हा ह्या पक्षाने चांगलाच जम बसवला होता.

एकदा असंच एका सकाळी दाराची बेल वाजली. रविवारी सकाळी कोण आलंय ह्या विचारात मी दार उघडलं तर समोर जग्या उभा! बऱ्याच दिवसांनी भेटलो त्यामुळे आम्ही एकमेकांना मिठी मारली! त्याने नंतर 'त्या' पक्षाचे नाव घेतले, आपल्या साहेबांचे नाव घेतले आणि मागे उभे असलेल्या लोकांकडून 'जय' म्हणवून घेऊन माझ्या पुढे पावतीपुस्तक ठेवले! आणि सारा प्रकार माझ्या लक्षात आला. मी निमुटपणे दहीहंडीची वर्गणी दिली. 'गणपतीची वर्गणी पण द्यायची…. ह्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट' असे बजावण्याच्या सूरात सांगत मंडळी पुढच्या घराकडे वळली! मी जग्याला त्या दिवशी संध्याकाळी नाक्यावर चहाला बोलावले.

" च्यायला… ह्या बाहेरच्या लोकांमुळे आपल्याला नोकऱ्या मिळत नाहीत! साले बघू तिथे हेच लोक घुसलेले असतात! एकेकाला पकडून, भर चौकात चाबकाने फोडून परत त्यांच्या राज्यात पाठवले पाहिजे!" जग्या पेटला होता.
" अरे! आपल्याला नोकऱ्या मिळत नाहीत तर आपण स्वतः प्रयत्न करून शोधाव्या नोकऱ्या. मिळतील रे शोधल्या तर", चहाचा घोट घेत मी म्हणालो.
" घंटा! ह्या लोकांनी नोकऱ्या दिल्या तर ना! ह्या लोकांना आपण नको असतो!"
" अरे, असं नसतं रे जग्या! आता मी सेल्स कॉल म्हणून बऱ्याच कंपन्यांमध्ये जातो… असतात की आपली माणसं. आणि हो, मोठ्या पदावर पण असतात", मी म्हणालो.
" ते साले त्यांच्यात मिसळलेले असतात! मला सांग, ह्या लोकांसमोर उद्या जर एक मराठी मुलगा आणि एक अमराठी मुलगा नोकरीसाठी आले तर? देतील रे मराठी मुलाला नोकरी?"
मी निमुटपणे चहाचे पैसे काढले आणि ह्या पुढे आपल्याकडून कसलीच चर्चा होऊ शकत नाही ह्याची कबुली स्वतःला दिली! आणि आम्ही त्या चहावाल्या 'भैय्या' च्या दुकानातून बाहेर पडलो.
पुढे चालत जाताना मी त्याला अजून बोलतं केलं. हा इंजिनियरिंग बऱ्यापैकी रखडत पास झाला होता हे ऐकण्यात आले होते. पण बरीच वर्ष बोलणं झालं नव्हतं.
" अरे इंजिनियरिंग मध्ये लै बोर व्हायचं… पण मग म्हटलं शेवटी नोकरी मिळेल. पण कॉलेज प्लेसमेंट मध्ये मला सिलेक्ट केलंच नाय. सगळी पोलिटीक्स! अमराठी लोक नेमके निवडले गेले … सिलेक्ट करणारी होती कुलकर्णी … पण उपयोग काय?
ती पण त्यांच्यात मिसळलेली … "
" मग?" मी विचारले.
" मग काय? एकदा डिग्री मिळाल्यावर नोकरी मिळणे कठीण झाले होते…"
एकंदर काय तर नोकरी मिळणे कठीण होऊन बसले होते. मध्ये ह्याने एक नोकरी केली होती. परंतु तोपर्यंत साहेबांचा पगडा ह्याच्या डोक्यावर इतका बसला होता की तिथल्या 'अमराठी' बॉस बरोबर ह्याचे जमणे कठीणच! ह्याने नोकरी सोडली आणि इकडची तिकडची कामं करत पक्ष-कार्यात गुंतला!
दरम्यान ह्यांच्या साहेबांनी निवडणुकांच्या वर्षभर आधी राज्याच्या गृहमंत्र्यांशी वैर ओढून घेतले होते. साहेबांच्या प्रत्येक भाषणात ' डबल मिनिंग' चे विनोद असायचे. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापत चालले होते. आणि ह्या दोन पक्षातील कार्यकर्ते एकमेकांशे मारामारी करतील का अशी परिस्थिती निर्माण झाली. नंतर अमरावती जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात चायनीजच्या गाडी जवळ एका शुल्लक कारणामुळे ह्या दोन पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. मोठा राडा झाला. शिवाय गृहमंत्री एक वक्तव्य करून बसले ज्यात त्यांनी आपल्या लोकांच समर्थन केलं. आणि राज्यात तणाव निर्माण झाला.

आमच्या शहरी देखील ह्यांच्या पक्षाचा मोर्चा होता. नुसता मोर्चा नव्हता तर त्यात पुतळे जाळण्याचा कार्यक्रम सुद्धा होता. शहरातील अध्यक्ष नेतृत्व करणार होते. मुख्य चौकात मोर्चा सुरु झाला. घोषणा सुरु झाल्या,

आज दूध कडवा है,
गृहमंत्री भडवा है!

मराठी बाणा बाळगणारा पक्ष घोषणा मात्र हिंदीत देत होता हे बघायला मजा वाटत होती. अध्यक्षांनी इशारा दिला. पुतळा जाळल्यावर कार्यकर्ते तोडफोड करू लागले. त्यात हा देखील होता. पोलिसांनी लाठीमार केला आणि सर्वांना आत टाकले. आणि सर्वांना भरपूर बदडले. अध्यक्ष मात्र सुखरूप बाहेर पडले. त्यांना तारणारे कुणीतरी होतेच.

जग्या तुरुंगातून बाहेर आला. धड चालता पण येत नव्हते. माझ्याकडे बघून हसला आणि मी जामीनाचे पैसे दिले म्हणून मला धन्यवाद दिले. सगळे कार्यकर्ते अडकले होते. अध्यक्ष मात्र सुटला होता. मला जग्याची आवडती ओळ आठवली -
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण
आणि काळानुसार बदललेल्या तुकोबांचे दर्शन मला तेव्हा झाले! आज महापूर आला की झाडे मात्र वाचतात आणि लव्हाळ मात्र वाहून जातात!

- आशय गुणे Happy

माझे इतर लेख: http://relatingtheunrelated.blogspot.in/

माझे फेसबुक पान : http://www.facebook.com/pages/Aashay-Gunes-Blog/180236325384645

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं.

लहानपणी या ओळींचा अर्थ मी, ज्याच्या अंगात खुप मोठेपणा असतो म्हणजे तो तसं दाखवायला जातो त्याला त्यामुळे खुप यातना भोगाव्या लागतात. Wink

आशय गुणे, आजून एका सुरेख व्यक्तिचित्रणाबद्दल आभार! थोडं आखूड आहे, पण आहे ते पोहोचतं. Happy
आ.न.,
-गा.पै.