शेत लाचार झाले

Submitted by अभय आर्वीकर on 19 June, 2013 - 15:26

शेत लाचार झाले

आळस-तणाव-चिंता वाहून नेत आहे
हृदयात चेतनेचा बघ पूर येत आहे

पडताच वीज लखलख थरकापता भयाने
निर्जन शिवार मजला पदरात घेत आहे

कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे

छाटून पंख आधी केलेय जायबंदी
आता पुन्हा शुभेच्छा उडण्यास देत आहे

अस्फ़ूट जाणिवेला मी शेंदले तरीही
थोडी सचेत झाली, थोडी अचेत आहे

नसतोस सोबतीला तू व्यूह भेदताना
पुसतोस मग कशाला की काय बेत आहे?

दावा मला कुणीही कुठलाय एक मंत्री
निर्मोह-त्याग-करुणा ज्याच्या कथेत आहे

घे `अभय` दांडगाई सोसून लांडग्यांची
झोपून वाघ असली जोवर गुहेत आहे

                                 - गंगाधर मुटे
---------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान...

सुन्दर गझल.
<<अस्फ़ूट जाणिवेला मी शेंदले तरीही
थोडी सचेत झाली, थोडी अचेत आहे>>
खूप आवडला.

नसतोस सोबतीला तू व्यूह भेदताना
पुसतोस मग कशाला की काय बेत आहे?<<< व्वा व्वा, सुंदर!

पडताच वीज लखलख थरकापता भयाने
निर्जन शिवार मजला पदरात घेत आहे

कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे

छाटून पंख आधी केलेय जायबंदी
आता पुन्हा शुभेच्छा उडण्यास देत आहे

अस्फ़ूट जाणिवेला मी शेंदले तरीही
थोडी सचेत झाली, थोडी अचेत आहे<<< सुंदर शेर!

पूर्ण गझल आवडली.

अभिनंदन मुटे!

अस्फ़ूट जाणिवेला मी शेंदले तरीही
थोडी सचेत झाली, थोडी अचेत आहे

नसतोस सोबतीला तू व्यूह भेदताना
पुसतोस मग कशाला की काय बेत आहे?>>
व्वा!

"कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे

अस्फ़ूट जाणिवेला मी शेंदले तरीही
थोडी सचेत झाली, थोडी अचेत आहे" >>>> हे शेर सर्वात विशेष वाटले..