हास्य क्लब--

Submitted by निशिकांत on 10 June, 2013 - 09:08

मी सायंकाळी तयार होऊन घराशेजारील पार्क मधे फिरायला निघाले.अशात मी फिरण सुरू केलय. फिरता फिरता अनेक चांगले वाईट विचार मनात घोळत असतात. कधीकधी जीवनाचा आलेख डोळ्यासमोरून सरकत असतो.
किती विचित्र प्रवास होता माक्ष्या जीवनाचा! खळखळतं बालपण, उम्मेदीचं आनंददायी तारुण्य आणि आता ही उतरण. तारुण्यापर्यंतचं आयुष्य कसं भुर्रर्रकन उडालं कळलच नाही. बघता बघता मावळतीमुळे सावल्या लांबायला लागल्या.घरात माझं असणं नसणं याचं महत्व कमी झालं. एकलकोंडेपणा, जुनं आठवून डोळे ओलावणं हे प्रकार सुरू झाले. एक गोष्ट आता प्रकर्षानं जाणवतीय. आसवांचे दिवस कासवांचे असतात. जाता जात नाहीत.

घरात काय नव्हतं? अर्थिक सुबत्ता, टीव्ही, म्युझिक सिस्टीम, प्रशस्त घर. नव्हता तो फक्त संवाद, दिलखुला गप्पा. मुलगा सूनबाई दोघेही नोकरीला. दोन गोंडस नाती शाळेतून आल्या की मला बिलगतात. मग मी त्यांना कांहीतरी खायला देते. त्या दोघींची खाता खाता किलबिल चालूच असते ; तीच माझी एकमेव हिरवळ! खाणं झालं की त्या टीव्ही समोर. पुन्हा मी एकटी.

आज पार्कमधे १५/२० वृध्द स्त्री पुरुष रिंगण करून उभे होते.मला त्यांच्यात एकदम मिसाळायला अवघड वाटलं म्हणून जवळच एका झाडाखाळी बाकावर बसले. त्यांच्यातील बोलणं मला ऐकू येत होतं. पाच मिनिटात ध्यानात आल की हास्य क्लबची स्थापना होते आहे. एक गृहस्थ, हास्याचं महत्व पटवण्यासाठी सर्वांना विचारत होते; "नीट आठवून सांगा गेल्या तीन महिन्यात कोण कोण आणी किती वेळा हसला आहात?" हाच प्रश्न मी मला विचारला आणी लक्षात आलं, मी केत्येक दिवसात हसलेच नव्हते. लागलीच ठरवलं हास्य क्लब जॉईन करायचं. दुसर्‍याच दिवशी अर्ज भरला आणी रोज एक तास व्यायाम, प्राणायाम, हसणे याची तालीम सुरू झाली. बघता बघता लोकांशी परिचय, थोड्या गप्पा सुरू झाल्या. क्रत्रीम का होईना पण हास्याची नव्याने ओळख व्हायला लागली.

एकेदिवशी गंमतच झाली.हास्य क्लबमधील सर्व कार्यक्रम झाल्यावर घरी निघायच्या आधी सर्व सदस्यांनी मला मध्यभागी उभं केलं आणी सारे जण माझ्याभोवती कोंडाळे करून उभे राहिले. मला कळेचना हा काय प्रकार आहे! सदस्यांमधील दोघीजणी माझ्या जवळ आल्या. एकीने केक कापल्याचा अभिनय केला आणी दुसरीने केकचा एक तुकडा माझ्या तोंडात घातल्याचा.आणी सात मजली हास्याच्या गजरात सर्वजण जोरात म्हणाले "हॅपी बर्थ डे टू यू, हॅपी बर्थ डे टू यू". आता कुठं माझ्या मेलीच्या लक्षात आलं की आज माझा जन्म दिवस आहे. स्दस्यत्वाचा फॉर्म भरताना जन्म तारीख नोंदली होती ना! केक जरी बोलाचाच भात बोलाचीच कढी होता तरी मी तो खाऊन तृप्त झाले. घराबाहेरच मला माझे मिळाले होते. गलबलून आलं मला.दगाबाज आसवांनी शेवटी करायचं तेच केलं. ओघळले गालावरून ! खडकात आज अंकूर फुटला होता. चेहर्‍यावरील सुरकुत्या आज आनंदाश्रूंनी सजल्या होत्या.वाळलेल्या गवताच्या पात्यावर अस्रूचे दव थरथरत होते, चमकत होते. विरलेल्या जीवनाच्या वस्त्रावर दु:खाचे बुट्टे तर होतेच; पण हास्य क्लबने त्या वस्त्राला एक अनामिक सुखाची किनार लावली होती.

माझा पिंड कवयित्रीचा होता. कत्येक दिवसात मी माझी रोजिनिशी लिहिली नव्हती; कारण लिहिण्यासारखे कांही घडतच नव्हते. काल कांही घडले होते.खालच्या चार ओळी झोपता झोपता रोजीनिशीत लिहिल्या:

अर्थ जाहला प्राप्त जीवना हसता हसता
एकाकीपण उडून गेले बघता बघता
बारा महिने श्रावण रिमझिम मस्त अंगणी
मोहरते मी मनी उमलते भिजता भिजता

चैतन्य हास्य क्लबच्या एका महिला सदस्याने संगितलेलल्या अनुभवावरून.

लेखक-- निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विरलेल्या जीवनाच्या वस्त्रावर दु:खाचे बुट्टे तर होतेच; पण हास्य क्लबने त्या वस्त्राला एक अनामिक सुखाची किनार लावली होती.

हृद्य लेख.