पार्टनर

Submitted by कौतुक शिरोडकर on 1 June, 2009 - 15:36

मेहतांची आणि माझी ओळख हॉटेलच्या बारमध्ये झाली. झालं असं की सगळेच टेबल्स खचखचून भरलेले. फक्त एका कोपर्‍यात मेहता एकटेच बसले होते. मी शक्य तेव्हढा नम्रपणा आवाजात आणून त्यांना विचारलं.
"कोणी येणार आहे का ?" सीप घेता घेता थांबले मेहता. नाव नंतर कळल म्हणा. त्यानी मानेनेच नकार देत ग्लास संपवला. मी बसल्यासरशी ऑर्डर दिली. ब्रॅंड सेम होता आमचा. तेही स्मिरनॉफ घेऊन बसलेले. एकदा दारूचा ब्रँड जुळल्यावर मैत्री जुळायला वेळ लागत नाही. तशी आमच्या वयात बरीच तफावत होती. मी ३२ चा आणि ते मागच्याच महिन्यात ५५ पुर्ण करून पुढच्या वाटचालीस लागलेले.

मेहता म्हणजे सुरतवरून आलेली मोठी आसामी. त्यांचा डायमंडचा बिजनेस. इथे त्यांची बिजनेस टूर. टिपीकल गुज्जु. सुट्टीवर असले तरी ते बिजनेसशिवाय दुसरं काही बोलतच नाही. दोन गुज्जु एकत्र आले की त्यांच्या गप्पांचा शेवट नेहमी दलाल स्ट्रीटवर येऊन स्थिरावतो. हे ही त्यातलेच. हा विषय माझ्यासाठी बोरींग. मला त्यातलं ओ की ठो कळत नाही. मी रजेवर होतो. हवापालट नावाचा प्रकार करण्यासाठी इथे आलो होतो. मुंबईतही दिनक्रम काही वेगळा नसता म्हणा. जागा वेगळी फक्त. बाकी सगळं जसच्या तसं. रुटीन.

गेले चार दिवस मेहतांची संध्याकाळ सुरू होत होती तीच मुळी एकाद्या छोट्याश्या पेगसोबत आणि संपायचीही तशीच. सोबत नसल्याने. आज त्यांना मनापासून वाटत होतं की कोणीतरी साथ द्यावी. गुजरात मध्ये दारुबंदी असली तरी स्वत:ची सोय करण्यात असे पट्टीचे नेहमीच सफल होतात. कर्मधर्मसंयोगाने मी पोहोचलो आणि त्यांना एक तात्पुरता 'ड्रिन्कीग पार्टनर’ मिळाला.

बारमधली आमची दोस्ती आता त्यांच्या रुमपर्यंत पोहोचली होती. माझा बिजनेस सेन्स कळल्याने गप्पा फक्त इतर विषयांवरच व्हाव्या हा आता दोघांचा प्रयत्न. ’मग काय करता तुम्ही ?’ या त्यांच्या प्रश्नाला ’मी पोलिस खात्यात आहे’ हे माझं उत्तर ऐकल्यावर दचकलेच ते. पोलिसांशी कोण मैत्री करणार ? ह्या प्रोफेशनला मान हा नाहीच. कितीही दुधाने धुतलेला असला तरी तो काळाच. हे आमच्या खात्याचं दुर्देव. पण ’मी खरोखरच रजेवर आहे’ हे कळल्यावर मात्र ते थोडे सावरले. मग मात्र त्यांनी सुरूवात झाली.
"अंतरकर, तुमचा लाईफ म्हणजे एकदम एडवेंचर्स. गन, गुंडा, एनकाऊंटर वगैरे.. वगैरे.. आमचा आपला एकच. सेल्स टॅक्स, सर्विस टॅक्स, इनकम टॅक्स. आमा लोकांच्या सगळ्या एक्टीव्हिटीजला टॅक्स. सालं, टॅक्स फ्री लाईफच नाय." मेहतांचे दोन पेग नीटनेटके तळघरात गेलेले.
"लाईन चेंज करा मेहताजी." मी दुसरा पेग संपवण्याच्या मागे.
"आत्ता... ५५ कम्प्लिट केला अंतरकर, आत्ता काय लाईन चेंज करणार ? " मेहतांनी बर्फाचे तुकडे ढकलले ग्लासात.
"तेही बरोबर म्हणा. लक्षातच नाही आलं माझ्या." मी रिकामा ग्लास टिपॉयवर ठेवला.
"आज थंडी जास्त हाय का रे अंतरकर ? " मेहतांनी ग्लासातले तुकडे मोजले.
"असू देत. आपल्याकडे जालिम उपाय आहे त्यावर." मी ग्लास भरायला घेतला. त्यांनी हसून हुंकार भरला.
"अंतरकर, तू स्वत: ही लाईन घेतला की तुझा बापपण या लायनीत होता ?" मेहतांचा चौकस स्वभाव.
"वडील नोकरी एके नोकरी वाले. टिपिकल मिडलक्लास कारकुनी. मला मात्र काहीतरी वेगळं करायचं होतं. म्हणून पोलिसात भरती झालो." माझं गेली कित्येक वर्षे कैकांना चिटकवलेलं वाक्य.
"सध्या कुठे असतो तू ? "
"सध्या मुक्काम पोस्ट मुंबई. चेंबुरला."
"ये, तू कश्यपला ओळखतो काय ? ऍंटोप हिलच्या क्राईम ब्रांच ऑफिसला असतो तो. मागे माझा कारचा मॅटर झाला तेव्हा भेटला होता." मेहतांचा चौकशीवजा प्रश्न.
"तुम्ही विचारताय की माझी उलटतपासणी करताय."
"अरे, नाय रे, आठवला म्हणून बोलला." मेहतांनी ग्लास तोंडाला लावला.
"जास्ती मजा कशात येतो ? " मेहतांचा घरंगळलेला प्रश्न.
"म्हणजे ? " मी ग्लासात बर्फ टाकला.
"ते रे. गुंडाबरोबर मारामारी करण्यात की ते एनकाऊंटर करण्यात ?". काय पण गुज्जु प्रश्न.
"यात मजा कसली मेहताजी ? मजा असते मी मर्डर मिस्ट्री सोल्व करण्यात. कधी कधी तर यात डोक्याचा भुगा होतो पार."
"तुजा झाला काय कधी ? "
"बर्‍याच वेळा. भुंग्यासारख्या पोखरतात या मेंदुला."
"एक काम कर. एक असाच मिस्ट्री सांग. मस्त टाईमपास होयेल बघ." मेहतांनी आग्रह केला.
"मिस्ट्री ... ? एक लेटेस्ट आहे. जबरदस्त आणि इंटरेस्टिंग. ती सोल्व झाली पण आणि नाही पण. मर्डररपर्यंत पोहोचलोच नाही अजून. तो कोण आहे हे ही माहीत नाही." माझ्या स्वरातला खेद जाणवला त्यांना.
"इंटरेस्टिंग." मेहता मिस्ट्रीत रस घेऊ लागले.

"४ वर्षापुर्वीची घटना आहे ही. माझी पोस्टींग तेव्हा नाशिकला होती. नेहमीच्या छोट्यामोठ्या कुरबुरींनी वैतागलेलो. काहीतरी नवीन आणि वेगळं हाताळायची इच्छा होती. ती तिथे पुर्ण झाली." मी पेग संपवला. "नेहमीप्रमाणे चौकीवर बसून क्राईम चार्ट तपासत होतो. इतक्यात एक फ़ोन आला. फोनकर्त्याने घाटावर एक माणूस पडल्याचे सांगितले. मी दोन हवालदार घेऊन ताबडतोब तिथे पोहोचलो. ती व्यक्ती तिथेच घाटाच्या पायर्‍यावर पडली होती. मी जवळ जाऊन तपासणी केली. तो केव्हाच संपला होता. साधारण ५०च्या वरचा गृहस्थ होता तो. अंगापिडाने चांगला मजबुत होता. शरीरावर कुठेही जखमेची खुण नव्हती. मी त्याचे ओठ तपासले. विषप्रयोगाच्याही काहीच खुणा नव्हत्या. पण एक मात्र होतं, त्याच्या चेहर्‍यावर वेदनेच्या खुणा त्यावेळेसही होत्या. मरताना त्याला नक्कीच बराच त्रास झाला असणार हे जाणवलं मला. हार्ट अटॅक असावा असं माझं प्राथमिक निदानावरून मत झालं. मग रितसर पंचनामा व इतर सोपस्कार झाले. साक्षीदारांच्या तपासण्या झाल्या. यातच एका साक्षीदाराकडून कळलं की त्या माणसाच्या समोर तेव्हा एक म्हातारा भिखारी होता. मी ताबडतोब सगळ्यांना त्याला धुंडाळायला लावला. शेवटी गोदावरी गंगेच्या मंदिराजवळ तो सापडला. साक्षीदाराने त्याची पडताळणी केली. मी म्हातार्‍याकडे चौकशी केली. तो तिथलाच भिकारी होता. त्याच्याकडून एवढच कळलं की तो त्याच्याकडे तेव्हा भीक मागत होता. अचानक त्याचा चेहरा वेदनेने कळवळला, शरीर आकसलं आणि त्याने दोन्ही हातांनी आपलं डोकं धरलं. साधारण दोन-तीन मिनिटातच तो कोसळला. हे पाहून घाबरून तो पळाला. पंचनाम्यानंतर त्याच्या कडचा मोबाईल व इतर कागदपत्रे चेक केली. त्या माणसाचं नाव रमणीकलाल शाह होतं.
"कोण ? " चमकले मेहता.
"रमणीकलाल शाह. कापडाचे नामवंत व्यापारी. अधुनमधुन घाटावर फिरायला यायची सवय होती त्यांना. त्यावेळेस जेवढी शक्य होईल तेव्हढी चौकशी केली पण बहुतेकांची स्टेटमेंटस सेम." मी ग्लास भरायला घेतला. मेहता शांतपणे माझ्याकडे पहात होते. मी ग्लासात बर्फ टाकला व एक सीप घेतला. बोलून-बोलून घशाला कोरड पडल्यासारखं वाटल मला. सीप आत उतरला तसं बर वाटलं.

"यथावकाश पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला. मेंदुतल्या रक्तवाहीनी फुटल्यामुळे मृत्यू. मी डॉक्टरांना फोन केला. पण आजारपणाचा कोणाताही बॅकरिपोर्ट नव्हता. अचानक एक माणूस एका सार्वजनिक ठिकाणी मेंदुतल्या रक्तवाहीन्या फुटल्याने अकस्मात मरतो हे जरा विचित्रच होत."
"ते भानामती.... करणी म्हणतात तसला काय ?" मेहतांच्या दारुनी तर्र झालेल्या मेंदुतून उगमलेली एक शंका.
"मेहताजी, माझा अशा गोष्टींवर विश्वास नाही. पण जे घडलं ते विचित्र होत, हे मात्र नक्की. पुढील तपासाला सुरुवात झाली खरी. पण ती कशी आणि कुठुन करावी तेच कळेना. तरी त्यांच्या घरी, नातेवाईकात चौकशी केली पण हाती मात्र काहीच लागलं नाही. मात्र हे प्रकरण एवढ्यावरचं थांबल नाही. साधारण आठ दिवसानंतर एका पार्टीला जाण्याचा योग आला. मुंबईला होती पार्टी. माझे एक खास मित्र आहेत अभिषेक नाडकर्णी म्हणून. चित्रकार आहेत. त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांच्यासोबत तिथे गेलो होतो. पार्टी कुणा मिरचंदानी.."
"मिरचंदानी ? " मेहताच्या प्रश्नात आश्चर्य डोकावलं.
"का ? काय झालं ? " मी पेग संपवत विचारलं.
"काही नाही. नाव जरा ओळखीचा वाटला. आख्खं नाव काय ?" मेहताचा हात थरथरल्यासारखा वाटला मला. त्यांना जास्त झाली हे लक्षात आलं माझ्या.
"दिपकभाय मिरचंदानी." मेहतांचा चेहरा पुर्ण विचारात. चेहर्‍यावरच्या भावना सेकंदासेकंदाला बदलत होत्या. मी त्यांना वाचायचा प्रयत्न करतोय हे लक्षात आलं त्यांच्या.
"अरे, ग्लास बघ नै. संपत आला." त्यांनी माझं लक्ष ग्लासाकडे वेधलं. ग्लास अर्ध्यापेक्षा जास्त भरलेला होता.
"मग काय ?" त्यांनी विषय पुढे रेटला.
"मी अभिषेक व त्याच्या मित्रांबरोबर पार्टीचा आनंद लुटत होतो. अचानक एक अस्पष्ट किंचाळीने मी दचकलो. वळून पाहील तर मिरचंदानी दोन्ही हातांनी डोके धरून खाली कोसळत होते. प्रचंड वेदना त्याच्या चेहर्‍या,वर जाणवत होत्या. त्यांच्या जवळचे धावले पटकन. शेजारच्या नर्सिंगहोममध्ये नेलं त्याना. पण तोपर्यंत कारभार आटपला. मी तिथल्या पोलिसस्टेशनशी संपर्क साधून ठाणे इंचार्जला बोलावून घेतलं. माझी ओळख दिली. नाशिकहून सगळे रिपोर्टस मागवले. दोन्ही प्रकरणात साम्य होतं हे मात्र नक्की. पण हे खुन होते की अपघाती मृत्यु की आणखी काही... याबद्दल मात्र मी साशंक होतो. तरीही मला ती केस सोडवायचीच होती. मी त्या ठाणे इंचार्जला सगळी कल्पना देऊन मला पुढील सगळी माहीती देण्याची विनंती केली. दोन वेगवेगळे व्यवसायिक, वेगवेगळ्या ठिकाणी... पण एकाच पद्धतीने मृत्यु. विचार करून डोकं आऊट झालेले पार. काहीच सुचेना की कळेना. महिनाभर गेला असाच. फाईल माझ्या टेबलवर निवांत मला चिडवत असलेली." मी थांबलो. मेहतांचे संपुर्ण शरीर थरथरत असल्यासारखे वाटले मला. घाम ही आलेला त्यांना.
"मग काय झाला ? " त्याच्या स्वरातला कंप जाणवला मला. हातातल्या ग्लासातला सीप घ्यायचीही आठवण नव्हती त्यांना.
"मग महिन्याभरानंतर मला पुण्याहून फोन आला. इन्स्पेक्टर बाजेकर यांचा. सेम केस आणि मयत होता कोणी ठक्कर. जेठाभाई ठक्कर..."
"जेठापण...." मेहतांच्या हातातला ग्लास हिंदकळला.
"काय झाल मेहताजी ? बरं वाटत नाही का तुम्हाला ? " मी मनातून घाबरलो त्यांची अवस्था पाहून.
"मग तो सापडला का नाय ? " मेहतांनी स्वत:ला संयत करण्याचा प्रयत्न केला.
"कोण ? " मी गोंधळलो.
"ज्याने हे सगळा केला तो... ? " मेहतांनी जरा चिडूनच विचारलं मला.
"रिलॅक्स मेहताजी. कोणी सापडण्याचा प्रश्नच येत नाही. कारण हे खुन नव्हतेच मुळी." मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
"तीन जण .... तीन जण मेले. ते पण एकाच स्टाईलने आणि हे खुन नाय ? " मेहता चिडले आता.
"मेहताजी ते सगळे चार माणसांच्या समोर मेले. कोणी त्यांना तेव्हा साधा हात लावला नव्हता. मग कुणावर संशय घेण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नव्हता." मी अजुनही समजवण्याच्या प्रयत्नात.
"नव्हता कसा ? असणारचं. तीन जण मरतात. एकसारखे आणि त्याच्यात संबंध नाय असा होईल काय ? " मेहता स्वत:शीच बोलताहेत असं वाटल मला क्षणभर.
"एक्झाक्टली. मीही तोच विचार केला आणि त्या दृष्टीकोनातून शोधाशोध सुरू केली. शेवटी एक धागा सापडला. मिरचंदानीच्या वडीलांनी ठक्करचा फोटो ओळखला. ते दोघे मित्र होते एकेकाळी. त्यात नंतर शाहचा फोटो सापडला दोघांबरोबर. एक कडी पुर्ण झाली तिकडे. मग पुढचा शोध सुरू." माझ्या हातातला ग्लास मी केव्हाच खाली ठेवलेला. मेहतांना चढली हे जाणवत होतं पण ते तरीही शुद्धीत होते. पुर्ण शुद्धीत.
"काय सापडला काय त्यात ? "
"भुतकाळाचा मागोवा घेणं एवढं सोपं नसते मेहताजी. पण घेतला त्यांचा. ते सगळे इंदोरचे. त्यांनी, पाचही जणांनी मिळून एक व्यवसाय सुरू केला. पार्टनरशीपमध्ये. जमिनीच्या खरेदी विक्रीचा. व्यवसायाचा जम बसला तसा त्यांनी सुरू केला जुनाट पडक्या वाड्यांच्या खरेदी विक्रीचा कारभार. अशाच एका जुनाट वाड्याच्या खोदकामात त्यांना प्राचिन मुर्त्या सापडल्या. त्यांच्यापैकी एकाने, मखिजाने, ठरवलं, ते सगळं सरकारला द्याव म्हणून. पण पटलं नाही बाकीच्यांना. त्यांनी त्याची मागणी फेटाळली. सगळी संपत्ती आणि त्या मुर्त्या घेऊन त्यांनी रातोरात पोबारा केला. मखिजा एकटाच उरला देणेकर्‍याच्या समोर. जगणं मुश्किल झालं त्याला आणि त्याने आत्महत्या केली. मखिजाची बायको आणि मुलगा यांना हाकलण्यात आलं त्यांच्याच घरातून. त्यांनी महाराष्ट्राचा रस्ता धरला. बहुतेक पुण्याला किंवा नगरला. कोणी होतं म्हणे त्यांच तिकडे. पण पुढे काय झालं ते मात्र कळलं नाही. तुम्हाला काही माहीती मेहताजी ?"
"मला ? मला काय माहीत ? " मेहतांना दरदरून घाम फुटलेला.
"मेहताजी, तुम्ही एकटेच उरलात त्यांच्यापैकी. बराच त्रास झाला तुम्हाला शोधण्यात. तुमच्या तीन मित्रांना नेमकं काय झालं ते फक्त तुम्हालाच माहीत असणार, नाही का ? " मी मेहतांच्या जवळ सरकलो.
"मला खरच काय माहीत नाय. मला आताच कळला ते लोक मेला ते. आमी ठरवलेला. आपापला हिस्सा घ्यायचा नी कुठेबी जाऊन राहायचा. एकमेकाला भेटायचा बी नाय. आमी कधीच कोणी भेटला नाय." मेहता थरथरत बोलले.
"मग तुम्ही सोडून बाकी सगळे कसे मेले ? "
"मला नाय माहीत. खरा बोलतोय मी... अंतरकर, मला नाय माहीत. असा कसा कोण मरेल ? हे भुताटकी असणार. मखिजाचा भुत असेल. त्यानेच मारला असेल." मेहतांच्या डोळ्यात भीती तरारली.
"मेहताजी, मखिजाला जर तसं काही करायचं असेल तर त्याने हे तेव्हाच केलं असतं. एवढी वर्षे थांबला नसता. आमच्या थिअरीप्रमाणे यात एक तर तुमचा हात तरी आहे किंवा तुम्हीही तसेच मारले जाल." मी आता पुर्णपणे पोलिसी भुमिकेत होतो. सर्वांग थरथरलं मेहतांचं. जणूकाही मृत्यु कोणत्याही क्षणी दरवाजा ठोकूना आत येईल.
"मी काय नाय केला." मेहता खरं बोलत होते. स्वत:शीच. त्यांची देहबोली जाणवत होती.
"मग मेहता तुम्हीच आम्हाला त्याच्यापर्यंत न्याल जो हे सगळं करतोय. निघतो मी. बी अलर्ट." मी दाराकडे वळलो.
"म्हणजे हे कोणीतरी करतोय ?" मेहतांनी आश्चर्याने विचारलं.
"हो मेहताजी, तो कोण आहे ते कळेलच आता."
"पण कसा काय ? "
"शिकार करायची म्हणजे अमिष दाखवायला हवचं. इथे ते अमिष तुम्ही आहात मेहताजी. त्याने ते तीन खुन केलेत व तो त्याच्या चवथ्या सावजाकडे येणारचं."
"हे अंतरकर, तू कन्फुज करू नको काय ? कधी बोल्तो खुन नाय, कधी बोल्तो खुन हाय. हात नाय लावला मग त्याने खुन कसा केला ? "
"हा सगळा योगविद्येचा प्रताप आहे मेहताजी. योगाचा वापर करून शरीरात विद्युत लहरी निर्माण करता येतात. या लहरी ठराविक सीमारेखेत हव्या तिथे पाठवता येतात. कोणत्याही व्यक्तीवर देखील. माणसांच्या शरीरात १०८ मर्मस्थाने असतात. मेंदुही त्यातलाच. बारा फुटाच्या अंतरावरून देखील या लहरी सहज कुणाच्याही मेंदुवर सोडता येतात. यामुळे मेंदुतील रक्तवाहीन्या फुटणं साहजिकच आहे."
"असा होतो ?"
"होत ना मेहताजी. लेसर किरणांनी चिरफाड न करता ऑपरेशन्स होतात ना. योगाचा महिमा तर अगाध आहे."
"पण तुला कसा कळला ? "
"मखिजाची बायको योगप्रविण होती मेहताजी. दक्षिणेत तिने याचं रितसर शिक्षण घेतलेलं. अनेक प्राचिन परंपरा दक्षिणेत आजही जपल्या जातात. तपासात हात धुऊन मागे लागलो की सगळं कळतं."
"म्हणजे मलापण त्ती तशीच मारणार."
"नक्कीच. हा सुडाचा प्रवास असला तर मग तुम्ही या प्रवासातील शेवटचा थांबा मेहताजी." मी दारातूनच त्यांच्याशी संवाद साधत होतो.
"हे होणार नाय. ये अंतरकर तू इतेच थांब आजची रात."
"जे व्हायचं ते होणार मेहताजी. टाळता येत नाही. २५ वर्षापुर्वी तुम्ही लोकांनी जे पाप केलं ही त्याचीच फळं." मला त्यांची किव वाटू लागली.
"मी सगळा बंद करून घेते. मग मला ती कशी मारेल ? " मेहता धडपडत उठले.
"करून घ्या मेहताजी." त्यांनी खिडकी बंद केली व माझ्याकडे वळले. मी शांत होतो.
"आता कशी मारेल ? "
"मेहताजी, त्यासाठी फक्त ही तर्जनी पुरते." मी त्यांच्या दिशेने तर्जनी रोखली आणि मेहतांचा चेहरा वेदनांनी कळवळू लागला.
"माझ्या आईवडीलांच्या सुखी संसाराच्या वाताहतीला तुम्ही चौघे जबाबदार होता मेहता. तुम्ही तुमचे पार्टनरशीपचे नियम पाळले नाहीत. प्रोफीट असो वा लॉस... पार्टनरशीपमध्ये प्रत्येक बाबीत भागीदारी असते. त्यांच्या वाटेला आलेले भोग मी थोडेफार तुम्हा चौघात वाटले. आज तुमच्या पार्टनरशीपचा खर्‍या अर्थाने शेवट झालाय.". खिशातला पाच मित्रांचा फोटो मी जमिनीवर कोसळलेल्या मेहतांकडे फेकला आणि दरवाजा बंद केला.

समाप्त.

गुलमोहर: 

चांगली आहे ही. पण टॅब्लेट प्रमाणेच नाव जरा वेगळे ठेवता येते का बघ, म्हणजे रहस्य आणखी ताणता येइल.

छानच आहे कथा.. Happy आता रहस्यकथेबरूबर दुसर पण काही लिहून दाखवा बर? (हे चॅलेंज नाही हा, इणंती हाय ) Happy

कौतुक,
मस्त कथा, कसं सुचतं रे तुम्हाला लिहायला?

मस्त आहे..एकदम सही..

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

सगळ्यांना धन्स...धन्स आणि धन्स.
दक्षिणा, ते गुपित आहे. सांगून कस चालेल ?
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

मस्त आहे रहस्यकथा, पण वरती फारेंड म्हणतोय तस की नावावरुन रहस्य काय असु शकेल याचा थोडा अंदाज येतो.

क्या बात है!!! एकदम खिळ्वुन टाकणारे ट्विस्ट्स..मस्तच !!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

रहस्यकथांचा खजिना!!! रहस्यकथाकार कौतुकरावांचा विजय असो...>> अगदी अगदी!

मस्त!!!


dreamz_unlimited.jpg

दक्षिणा.
मस्त कथा, कसं सुचतं रे तुम्हाला लिहायला?
===========================

एकाद्या हिन्दी चित्रपटाची पटकथा थोडे वेगळे मसाले टाकून मराठीतून लिहून काढायची आणि वर म्हणायचं मी तो चित्रपट पाहिलाच नाही... हा. का. ना. का?

कौतुक राव तुमचं ट्रेड शिक्रेट फोडलं काय हो (चुकून)?

पण खरंच खूप खूप प्रेडिक्टेबल झाली "रहस्य कथा".

========================
बस एवढंच!!

श्री, श्रीमुखात मारली माझ्या तुम्ही. आता ट्रेड शिक्रेट फोडलच आहे तर एक अजून छोटसं काम करा. माझ्या प्रत्येक कथेच्या मुळ चित्रपटाचे नावही द्या मला. तेव्हढीच माझ्या ज्ञानात भर.
कथा वाचायला त्रास घेतलात त्याबद्दल आपला आभारी आहे मी. असच लक्ष ठेवत रहा.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

Pages