आता मला जगणं जरा जमेलंसं वाटतंय...

Submitted by मुग्धमानसी on 3 June, 2013 - 01:34

भुलथापांना माझ्या
मन फसेलंसं वाटतंय
आता मला जगणं
जरा जमेलंसं वाटतंय...

थेंबभर पाऊस, मुठभर वारा
चोचभर थोडा चिमणचारा
आभाळभर माझी तहान
आता भागेलंसं वाटतंय...

एक रस्ता अनवाणी
पाऊलभर हिरवळ गार
सोबत माझी मलाच
आता लाभेलंसं वाटतंय...

उन उन भातासारखं
उन्ह दाटल्या वरणासारखं
लिंबू पिळून आयुष्य
मला चघळेलंसं वाटतंय...

जाता जाता एक कर
पेटते दिवे हातात धर
तुझ्यामागे रेंगाळत रस्ता
वाट चुकेलंसं वाटतंय...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट !!

चारोळ्या एकापेक्षा एक आहेत कोण्ती एक जास्त आवड्ली हे खरोखर सांगता येत नाही
तरी वरणभात ...आहाहा तों.पा.सु. अगदी !!!

शिपै, कोण आहे रे तिकडे? पाच गावं इनाम द्या ह्या बाईंना...
अबे भेट तु एकदा. पहिल्याच चार ओळीत घेतलंस.. Happy

सुंदर आहे कविता .. शेवटचे कड़वे ग्रेट..आधीची चार कड़वी म्हणजे शेवटच्या कडव्यातून निघणाऱ्या निष्कर्षाची अंमलबजावणी असावी..

लेखन-वाचनाकडे दुर्लक्ष झाल्याची जाणीव झाल्याने मायबोलीची कास धरली आहे.. हेतू साध्य होतोय असं वाटत आहे...
फार छान कविता..!