आंब्याचा जॅम

Submitted by मंजूडी on 3 June, 2013 - 06:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आंबा, साखर, लिंबू.

क्रमवार पाककृती: 

१. आंब्याचा रस काढून मिक्सरमधून फिरवून छान गुळगुळीत करून घ्या. आणि तो रस वाटीने मोजून घ्या.

२. तीन वाट्या आमरस असेल तर अर्धी वाटी साखर लागेल.

३. एका पसरट आणि खोलगट अश्या पॅनमधे आमरस आणि साखर नीट एकत्र करून मंद गॅसवर ठेवा.

४. मिश्रणाला एक उकळी आली की त्यात लिंबाचा रस घाला. तीन वाट्या आमरस आणि अर्धी वाटी साखर या प्रमाणासाठी दोन लिंबांचा रस पुरेसा होतो.

५. मिश्रण सतत ढवळत रहा. हे मिश्रण शिजताना त्याचे शिंतोडे उडतात, म्हणून खोलगट पॅन घ्यायचा आहे, आणि ढवळण्याचा चमचा/ डाव/ कालथा इत्यादीपैकी जे साधन वापराल ते लांब दांड्याचं घ्या.

६. उकळी आल्यानंतर साधारण दहा मिनिटांनी मिश्रणाचे शिंतोडे उडण्याचे बंद होईल, आणि मिश्रण खदखदायला लागेल. त्यानंतर लगेचच ते चकचकीत दिसायला लागेल की मग गॅस बंद करा. जॅम तयार आहे.

७. ते मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर नीट ढवळून (खरंतर कालवून) एकत्र करा, आणि कोरड्या बाटलीत भरून ठेवा.

अधिक टिपा: 

१. जॅमसाठी कुठला आंबा घेताय, त्याची चव कशी आहे यावर साखरेचं प्रमाण कमी जास्त होते. अगदी गोड आंबा असेल जसे की हापूस, केशर वगैरे तर तीन वाट्या रसाला अर्धी वाटी साखर हे प्रमाण योग्य आहे. इतर जातीच्या आंब्यांसाठी (तोतापुरी, लंगडा इत्यादी) साखर थोडी जास्त लागेल, रसाची चव बघून साखरेचं प्रमाण वाढवा.

२. रसाळ आंबे वापरले (पायरी, दशहरीसारखे) तर आधी नुसता रस उकळू द्या, रसाला उकळी आली की मग त्यात साखर मिसळा आणि मग क्रमांक ४ पासून पुढे कृती करा.

आंब्याच्या जातीवर जॅमची चव अवलंबून आहे. पण कुठल्याही आंब्याचा जॅम छानच लागतो. गरम फुलका, त्यावर तूप आणि आंब्याचा असा घरगुती जॅम पसरून रोल करून खाणे हा माझा कम्फर्ट नाश्ता आहे.

हा मोबाईलातून काढलेला फोटो:

mango jam.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजुडी खूपच रसाळ पाककृतीबद्दल धन्यवाद्.:स्मित:

एक वेडा प्रश्न. लिंबामुळे थोडा आंबटसर लागेल का? आणी हा फ्रिझमध्ये नाही ठेवला तर चालेल का? कारण माझी काकु नुसताच आटवुन( थोडी साखर घालुन) फ्रिझमध्ये ठेवायची, पण तो २ दिवसाच्या वर टिकत नव्हता. तो बाहेर टिकावा म्हणूनच लिंबुरस घातलाय का? खूप प्रश्नांबद्दल सॉरी.

छान कृती. गोव्याला एक खास रस आटवायचे आंबे मिळत. माझी आत्या मोठ्या प्रमाणावर तो करताना, दोन्ही हाताना दंडापर्यंत कपडा गुंडाळते, म्हणजे उडणार्‍या रसाने हात भाजत नाहीत.
साखरेचे परत कण होऊ नयेत म्हणून लिंबूरस घालतात.

हा जॅम किती टिकतो ? आम्ही गोळीबंद(२ तारी ही चालतो) पाकात पिकलेल्या आंब्याच्या फोडी व रस घालून परत चांगला उकळतो(बुड्बुडे बंद होईपर्यंत , लवंगा ही घालतो) . हा जॅम फ्रीजमध्ये ५,६ महिने टिकतो. फायदा एवढाच की लहान मुलांना पोळीबरोबर लावायला केशरी पाक मिळतो. व सीझन संपला की पुढे आंब्याच्या फोडी खायला अतिशय मजा येते. आलेल्या पाहुण्यांच्या पानात बाजूला वाढता येतो ( व आपणही कसे बेगमीचे पदार्थ करतो हे दाखवता येते.)

माशाचे काहीही येत नाही हो सिंडरेला. त्यामुळे नाईलाज को क्या ईलाज. शाकाहारी लोकांना असल्या बेगमीचा अडीनडीला उपयोग होतो. रच्याकने कोटी छान होती.

टुनटुन आणि हिम्या, जॅमची थोडी 'टँगी' चव हवी असते म्हणून लिंबाचा रस घालायचा. नाहीतर कोकणात जो आटवलेला खमंग रस मिळतो, ज्याला आंब्याचा मावा किंवा गोळा म्हणतात, जवळपास तशी चव लागेल.
अर्थात, त्या आंब्याच्या गोळ्यात टिकाऊपणासाठी अतोनात साखर घातलेली असते आणि तो तासन् तास आटवत ठेवलेला असतो, त्यामुळे त्याची चव अवर्णनीयच असते.

सायो, कॅन्ड आमरस वापरायच्या आधी कॅनवरच्या सूचना वाचून पहाव्यात असं माझं मत. काही प्रीझर्वेटिववर पुन्हा काही प्रक्रिया केलेली चालत नाही असं मला वाटतं. शिवाय, तो रस वापरला तर कदाचित लिंबाचा रस कमी लागेल.

मंजूडी, पाकृ फारच आवडली. माझाही सायोंप्रमाणेच विचारायचे होते त्याचे तुम्ही उत्तर दिले आहेच.
मंजूडी, मला नेहेमी शॉर्टफॉर्ममध्ये लिहीलेला एक शब्द मुळीच कळत नाही तो म्हणजे 'रच्याकने' हा शब्द!
कृपया मला 'रच्याकने'चा लॉन्ग फॉर्म हवा आहे. प्लिज सांगाल का? आभारी होईन.

मस्त वाटत्येय रेसिपी... '

नोव्हेंबर पर्यंत वाट पहावी लागेल ताज्या आंब्याचा करायचा झाल्यास.... कॅन्ड नाही चालणार तर... तसाही हापुस, पायरी इ इ नाहिच मिळत इथे Sad

सायो, कॅन्ड आमरस वापरायच्या आधी कॅनवरच्या सूचना वाचून पहाव्यात असं माझं मत. काही प्रीझर्वेटिववर पुन्हा काही प्रक्रिया केलेली चालत नाही असं मला वाटतं. >>>
कॅन्ड पल्प्स मधे प्रिझर्वेटिव्हज नसतात. त्यामुळे या जॅमसाठी कॅनमधला पल्प वापरायला काहिच हरकत नाहीये. फक्त कॅन घ्यायच्या आधी त्याचे लीड थोडेसुद्धा फुगीर नाहीये तेवढे फक्त पहायचे. जर लीड सपाट किंवा आतल्या बाजुस ओढले गेलेले असले तर त्याचा अर्थ असतो की कॅनच्या आतमधे वॅक्युम टिकुन आहे, थोडक्यात आतला पल्प खराब नाहीये.

शिवाय, तो रस वापरला तर कदाचित लिंबाचा रस कमी लागेल. >>> हे बरोबर आहे. कारण बर्‍याच प्रोसेस्ड फुड्स, पल्प्स ई. मधे सायट्रिक अ‍ॅसिड वापरलेले असते (अ‍ॅसिडीटी रेग्युलेटर म्हणुन) त्यामुळे कदाचित तुम्ही म्हणता तसे लिंबाचा रस कमी लागु शकतो.

वॉव ! मस्तच ग. मातोश्रींना कळवेन. पापड, लोणचे, जॅम, मुरांबे म्हटले की अन्नपूर्णासंचारते तिच्या अंगात.

रोचीन, साखर किती घातली होतीस? आणि कुठल्या आंब्याचा केलास?
आटवलेल्या आंब्याइतका घट्ट आणि चिकट झाला आहे का? तसं असेल जास्त वेळ गॅसवर राहिला.

हा प्रकार करताना रस उडतो म्हणुन अजुन एक पद्धत सुचवते.
आधी साखरेचा पाक तयार करायचा (साखर + पाणी समप्रमाणात , १० मिनिटे उकळणे आणि बुडबुडे कमी झाले की पाक थोडा घट्ट होतो) आणि मग आंब्याच्या फोडी किंवा रस थोडे मीठ घालुन मग गरम पाकात घालावा आणि ५ मिनिटे उकळावे. सोबत वेलदोड्याची पुड घातली तरी चालेल.

साखर ३/४ वाटी घातली कारण आंबे जरा कमी गोड होते. हापूस आंबा होता. पण तुम्ही म्हणताय तसे झाले असेल. आता परत वरील प्रमाणात करुन बघते.

Pages