कशिदाकाम

Submitted by भारती.. on 29 May, 2013 - 05:05

कशिदाकाम

मनासकट माणसे पचवणे : फूटपाथचे अजगरी धोरण.
तिच्या कशिद्यांना साक्ष ठेवून.
खिडकीच्या माथ्यावर ती टांगते सर्वसर्वज्ञ गुलबक्षी तोरण.

सारे पदपथिक. एकच शून्याभास. सार्‍या संवेदनात निमंत्रण आत्मसात
अंतिम सत्याचे. हे नाव मृत्यूचे.
ती विणते शालीवर फुले. ठेवते डांबरगोळ्या कोमल गंधकोशात.

संमिश्र अनाहत गलबलाटात अपघाताची एक किंकाळी विखुरलेली.
पडद्यावर सळसळतात नृत्यमग्न मोर
बोटांच्या मेणबत्त्या मालवून एव्हाना ती उठून आत गेलेली.

भारती बिर्जे डिग्गीकर
( 'मध्यान्ह', मौज प्रकाशन,२००६ मधून)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा. कविता फार आवडली.

बोटांच्या मेणबत्त्या मालवून एव्हाना ती उठून आत गेलेली

माफ करा... फार वेळा वाचली.. पन नेमका अर्थ बोध नाहि झाला..
शब्द सुंदर मांडलेत.. पन अर्थ समझला नाही तर मजा घेता येत नाहि यार..
अजुनहि पारयने करतोच आहे...

आवडली, भरतकाम (कशिदाकाम ) --मग्न होऊन करावयाचे आणि त्याच बरोबर त्यास अनुसरून ही कविता!!!
व्वा..

माझ्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी ही एक. इथे घाबरतच टाकली.बर्‍याच जणांना ही कळणार नाही याची खात्री होती..पण माझी मूळ ओळख अशा कवितांपैकी ही एक.ती ओळख टाळूनही चालणार नाही.

अभिव्यक्त होण्याचे, आशयाचे अन जीवनानंद घेण्याचेही सूक्ष्म सूक्ष्म स्तर असतात..त्यापर्यंत पोचण्याची एक साधना असते. जसं शास्त्रीय संगीताचं, तसंच विशुद्ध कवितेचंही.सगळ्याच ऑडियन्सला हे लेखन आवडेल अशी अपेक्षा नाही. त्याचं समर्थन नाही. हे ''आहे'' फक्त. त्याचं असणं हा माझा ऐहिक मोक्ष.

कोकण्या,विक्रांत्,उल्हासजी,
या कवितेत वाहत्या रस्त्यावरची एक खिडकी आहे. त्यात कशिदाकाम करणारी एक मुलगी बसलीय. रोजच बसते.खाली 'जनांचा प्रवाहो' वाहतोय.रोजच वहात असतो. हे दृष्य शहरी असल्याने फूटपाथ हा शब्द आलाय्.तो अजगरासारखा मनासकट माणसं गिळंकृत करतोय. त्यांचा एकत्रित चिखल पचवून रिचवून टाकतोय. सारे पदपथिक हा हे दृष्य बघणार्‍यासाठी एकच शून्याभास आहे. त्यांना अस्तित्व असून नसल्यागत आहे. त्यांच्या जगण्याच्या संवेदनांमध्ये मृत्यूचं निमंत्रण मिसळून एकजीव झालंय.एक अपघाताची रक्तरंजित किंकाळीही या कोलाहलात मिसळलीय. विराट जीवनव्यवहार निरर्थकता अन क्रौर्य पचवून वहातोय.

ती, या सर्वांची साक्षी आहे. पण फक्त साक्षी नाही. तिची बोटं हे दृष्य बघत रोज कशिदाकाम करताहेत. ती कलाकार आहे. आपल्या अल्प माध्यमातून जीवन सुंदर करतेय. आपल्या खिडकीच्या माथ्यावर तिने 'सर्वसर्वज्ञ' सारे काही जाणणारे 'गुलबक्षी तोरण' टांगलेय. ही तिची सुंदर , आकर्षक रंगातली निर्मिती आहे. ती हे निरर्थक वाटणारे जीवन तिच्यापरीने सुंदर करू पाहतेय, आपल्या मर्यादा जाणूनही.
ती शालीवर कोमल फुलं विणतेय, त्यांना खरा सुगंध कसा असेल? त्यांच्या गंधकोशांना तिने त्या शालीत व्यवस्थित घालून ठेवलेल्या डांबरगोळ्यांचा मरणगंध आहे.तिच्याही संवेदनांनी मृत्यूचं निमंत्रण आत्मसात केलंय जणू. अपघाताची ती विखुरलेली किंकाळी , त्यातले भीषणतेचे अनुभव एकूण गलबलाटातून तिच्यापर्यंत पोचताहेत.तिने बचावासाठी खिडकीला लावलेल्या पडद्यावर मात्र तिने विणलेले नृत्यमग्न मोर सळसळत आहेत. हे मोर. सुंदरतेची अजून एक प्रतिमा, कोमलतेची अन असमर्थतेचीही. कलाकुसरमग्न बोटांच्या आत्मप्रकाशित मेणबत्त्या विझवून ती उठून आत जातेय शेवटी, तिच्या अंतःकरणाच्या अंतःपुरात हरवतेय तिच्या प्रश्नांसकट.

कलानिर्मिती अन जीवनव्यवहार यातला परस्परसंबंध शोधणार्‍या या कवितेचा असा काहीसा आलेख.

ओह्ह, सुंदर वर्णन, मला पहिलि दोन कडवी, समजली होती पन तीसर रिलेट करता येत नव्हत पहील्या दोंघाशी. पन आता उलघडा झाला..

छान मांडनी झालिय..

अप्रतीम....

मी भारतीताईंच्या प्रतिसादासाठी थांबलो होतो प्रतिसाद द्यायला

बाकी ही कविता भारतीताईंसाठी खूप खास आहे हे आताच समजले

ही काहीतरी खास कविता आहे हे आधीच माहीत होते
________________________________________________________________
या कवितेचा आकृतीबंध मला जगावेगळा वाटला

एक पूर्ण लांबीची ओळ...मग एक अर्धी म्हणावी इतकी ...मग पुन्हा एक पूर्ण लांबीची ओळ !! पहिल्या व तिसर्‍र्या ओळीत उत्तम यमक साधलेलं . या तीन ओळी मिळून एखादा शेर असावा तश्या !! असे तीन शेर मिळून एक परिपूर्ण कविता बनवताय्त
________________________________________________________________

ही कविता अतीशय सुंदर व अर्थःघन कथा सांगते ....पथिक व खिडकीतली मुलगी ही २ पात्रे

मी तो त्या अजगरी फुटपाथाचा पदपथिक झालोय ! मी त्या मुलीला जाणू इच्छित असेन तर ते कशिदाकाम केलेले तोरण व ती इवलीशी खिडकी इतकेच साधन
ती सर्वसर्वज्ञ , त्या गुलबक्षी तोरणाची निर्माती
मी ते तोरण पाहून होणारा शून्याभास झेलत त्या संवेदनांचे (मृत्यू ???) आमंत्रण स्वीकारून तिथेच उभा
मला दिसतेय ती एका शालीवर फुले विणताना (माझे कफन???) डांबरगोळ्यांचा कोमल गंधकोश मला इथवर येवून स्पर्श करतोय
या अनाहत गलबलाटात अपघाताची एक विखुरलेली किंकाळी मला ऐकू येतेय त्या खिडकीतून दिसणार्‍या त्या पडद्यावरचे सळसळते नृत्यमग्न मोर माझ्याभिवती फेर धरू लागलेत आताशा
........ आणि हे काय !! बोटांच्या मेणबत्त्या मालवून एव्हाना ती उठून आत गेलीही .

मला माझाच एक शेर आठवतोय .....( ती मला जाताजाता असं तर म्हणत नसावी ....?.)

हे तुझे आकाशही सामावते ...
त्या, मनाच्या सानुल्या खिडकीत मी !!!!

__________________________________________________________

भारतीताईंच्या कविता रम्य असतात गूढ नव्हे
अगम्य तर अजिबातच नाही

छोट्या छोट्या शब्दातून अतीशय दिव्य व्यापक आणि सखोल असे काहीतरी नेमेकेपणे सांगीतले गेलेले असते
शब्दांचे नेमके अर्थ व त्याची व्याप्ती यावर जरा वेळ द्यावा लागतो समजून घेताना.. त्याचा चपखलपणा मग लक्षात येत जातो तसा एका ओळीचा अर्थ लागतो मग तसाच दुसरीचा ...असे करत एक कडवे समजते

पण मग इथे जरा घोळ होतो ...माझातरी ...(मी ताईंना हे या आधीही सांगीतले आहे) की जेव्हा एक कडवे संपल्यावर कवितेला पुढचे वळण द्यायला आपण जातो तिथला जो वळणाचा भाग असतो (कर्व्ह) अनेकदा धूसर / अव्यक्त राहतो ज्यामुळे त्या २ कडव्यातले रिलेशन चटकन समजत नाही (कोकण्या यांचा प्रतिसाद क्र. २ हेच व्यक्त करतोय )

मग एकंदर कवितेने एक जे संपूर्ण वलय / कडे तयार करायला हवे ते मधे मधे तुटक असल्याचा भास होत राहतो

असो
या कवितेत हा अडथळा तितकासा मलातरी नाही जाणवला Happy
___________________________________________

भारतीताई : कविता अतीउत्तम आहे
तुमची कविता तुम्ही उलगडून दाखवलीतही फार छान !

धन्यवाद !!!!!

~वैभव Happy

धन्स चिखल्या,कोकण्या, वैभव Happy
वैभव, पदपथिकाच्या परिप्रेक्ष्यातून खूप आतवर तुम्ही आकळून घेतलीत ही कविता, तिची सुंदरता.
कविता हे जर हलते शब्दचित्र असेल तर वाचक हा तिचा (मनो) प्रेक्षकही असतोच, म्हणून त्याच्या डोळ्यातून चित्राचे नवे नवे अर्थ उलगडतात.
चिखल्या, या कवितेत लपलेले हे चित्रच तुम्हाला तिच्या गहन वाटणार्‍या ( पण खरे तर गहन नसणार्‍या- मी काय नवं लिहिलं गद्यात कवितेपेक्षा वेगळं ?) अर्थाजवळ नेतेय.
कोकण्या,वैभव, हे धुसर वाटणारे काही दुवे थोड्याशा सवयीने, आत्मीयतेने कवितेकडे पहाताना स्पष्ट होतात असे असले तरी, माझ्या दुसर्‍या लेखनपर्वातली कविता अधिक स्पष्ट असेल अशी मीच आशा करते..
एका फार अंतर्मुख व्यक्तीच्या कविता होत्या या, ती आता जराशी(च) बदलतेय..

भारतीताई तुमच्या कविता, लेख, रसग्रहण मी आवर्जून वाचतो, आज प्रथमच प्रतिक्रिया देतोय. खूपच छान जमलेय.
बोटांच्या मेणबत्त्या विझवून ---- काय अप्रतिम शब्द. तुमच गद्य स्पष्टीकरण वाचून जास्त छान समजली कविता, पण ती माझी कमतरता.
पुढच्या वेळेला, प्रतिसाद वाचायची घाई न करता कविता परत वाचली पाहिजे. Happy

फार सुरेख उपमा वाचनात आली -
>>>>>>>बोटांच्या मेणबत्त्या मालवून एव्हाना ती उठून आत गेलेली.>>>>>>>>
कैच्या कै सुंदर उपमा आहे.