ये क्या जगह हैं दोस्तो...

Submitted by भारती.. on 28 May, 2013 - 02:03

ये क्या जगह हैं दोस्तो...

हा प्रांत कोणता सखे असले ठिकाण कोणते
पोचे दिठी जिथेजिथे वार्‍यात धूळ वाहते

या स्थानकात कोणत्या आयुष्य थांबवी मला
जेथे न हर्ष हातचा,ना हक्क दु:ख सांगते

अवघाच जन्म मागतो मजशी हिशेब रोकडा
हे हृदय शरमते स्वतः मग फक्त स्तब्ध राहते

कुणी साद घालुनी मला पडद्यापल्याड बोलवे
मजसाठी का कुणीतरी तळमळून वाट पाहते..

भारती बिर्जे डिग्गीकर

ये क्या जगह हैं दोस्तो...

ये क्या जगह हैं दोस्तो, ये कौन सा दयार हैं
हद-ए-निगाह तक जहाँ, गुबार ही गुबार है

ये किस मकाम पर हयात मुझको लेके आ गयी
ना बस खुशी पे हैं जहाँ, ना गम पे इख्तयार है

तमाम उम्र का हिसाब मांगती हैं जिन्दगी
ये मेरा दिल कहे तो क्या, ये खुद से शर्मसार है

बुला रहा हैं कौन मुझको, चिलमनों के उस तरफ
मेरे लिए भी क्या कोई, उदास बेकरार है

गीतकार शहरयार
संगीतकार खय्याम
चित्रपट उमराव जान- १९८९
गायिका आशा भोसले

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजिब्बातच मान्य नाही मला हे !!!!

ही गझल आहेना भारतीताई मग अनुवादातही गझलच करा अशी विनंती

तुम्ही लिहिलय ते छान आहेच असतच नेहमी वादच नाही पण लय जशी च्या तशी पाळता यायला हवी गझलेच्या अनुवादकास

बरं ....नाही शक्य वाटत आहे तर वृत्त वेगळे निवडले तरी चालेल जसे मूळ गझलेचे आहे तस्सेच्या तसे मराठीत नाहीं मांडता येत आहे समजा आपल्याला असे म्हणूया ..तरी चालेल बदलता येईल ते .......

पण मूळ काव्याची खरी मजा गझल असण्यात आहे जी निवडलेल्या वृताची एखाद दुसरी मात्रा अनुवादाच्या एखाद्या ओळीतून कमी अधिक झाली तरी ती मात्रा मजा जराशीच का होईना पण कमी करते हो !!!...म्हणून म्हणतोय मी

बाकी हा भावानुवाद असणे इतकेच म्हणत असाल तर उत्तमच आहेच यात काहीच शंका नाही
आणि हो ...मला आवडला आहे यातही Happy

असो !!
बर आता मुद्दा असा की असे उत्तमोत्तम अनुवाद तुम्ही आम्हाला देताय या करिता मनःपूर्वक आभार पण भारतीताई आता एखादी अस्सल "भारती"य कविता येवूद्यात की ! किती दिवस झाले वाचायला मिळाली नाहीये आम्हाला Happy

तुमचा नम्र
~वैभव
Happy

नाही आवडले. मूळ गाणे टेरिफिक आहे. त्यात असे रोकडा वगैरे, आणि स्थानक? मुलगी तिची चुकी नसताना नाचणारी झाली आणि आता माहेरी आली आहे पर्फॉरम करते आहे. तर तिच्या मनात आई, भाऊ यांच्याबद्दल प्रेम आहे पण ते तर तिला सामावुन घेऊ इच्छित नाहीत. इज्जतीचा प्रश्न आला आहे व ममते पेक्षा इज्जत महत्त्वाची वाटते आहे. ही साधारण सिच्युएशन.

उर्दूचा लहेजा मराठीत येऊ शकला नाहिये. बोली मराठीत कदाचित येऊ शकेल.

भारती,
मलाही थोडेसे खटकतेय. वैभव प्रमाणे छंदबंध गझलच व्हावी असा माझा आग्रह नाही. पण तो भाव टिपताना
कदाचित एकास एक ओळ घेतली नसती तरी चालले असते. लावणीचा बाजही चालला असता.

अश्विनीमामी एक सांगू का ?

आता बघा की तुम्ही या कवितेला /गझलेला फक्त त्या पिच्च्चर्मधे ज्या प्रसंगासाठी वापरलय तितक्याच स्टोरीशी निगडीत करून पाहताय ...........
तसे करू नका !!
प्रसंगाशिवाय इतरत्र ही जीवनात अक्षरशः खूप काही देतील असे असतात हे शब्द त्यांच्या अर्थाची व्याप्ती खूप मोठी असते

ते काही मिळतय का हे पाहत जा नेहमी

अधिक मजा अनुभवाल बघा !!!

~वैवकु Happy

अश्विनीमामींशी बर्‍यापैकी सहमत.

अनुवाद असल्याकारणाने तुलना होणे क्रमप्राप्त आहे. माझ्या मते भाव तोच ठेवून शब्दनिवड स्वतःची केल्यास अधिक परीणामकारकरीत्या पोहोचावे!

चुभूद्याघ्या.

सहज एक मीरचा शेर माझ्या खट्याळपणासोबत(अनुवादाच्या) देत आहे,

पासे-नामूसे-इश्क़ था वरना
कितने आंसू पलक तक आये थे - मीर

बदनाम होइल प्रेम यास्तव भ्यायलो मी अन्यथा
कित्येक अश्रू पापण्यांपर्यंत होते पोचले - अस्मादिक - कैच्याकै

त्यानंतर मात्र असे धाडस केले नाही Wink

वा कणखरजी वा

याला म्हणतात अनुवाद
मला माझा खट्याळपणा आठवला ...................

यार तू कणखर किती पण शेर हळवा केवढा
वाचला नाही तरी मन सावरावे लागते ....................... Happy

___________________________________________________

भारतीताई मी वर लिहिलेला मुद्दा (प्र.क्र १ मधला ) तुम्हाला कणखरजींच्या(वि.दि.पा.) अनुवादावरून जरासा उलगडला असावा बहुधा व हेही की तो हट्ट नव्हता ती एक भूमिका होती गझलेच्या अनुवादकाची

ही रचना समवृत्त होती,'दिल ढूंढता हैं'' च्या तुलनेत त्याच चालीत म्हणता येईल अशी.मनस्मिंच्या एका सूचनेवरून हे टाकायचा मोह झाला.
वैभव, याला गझल मानायला हरकत नसावी असं भीतभीत म्हणतेय,'पाहते, राहते वाहते' वगैरे क्रियापदांच्या शेवटी 'ते'च तर येतंय Happy असो.
अश्विनीमामी, 'स्थानक' तर मला खूप आवडलं होतं.'रोकडा' बद्दल मतभेद होऊ शकतात . पिक्चरचा मी खूप कमी विचार करते, मला कविताच दिसत रहाते..
दिनेशदा..
मला वाटतं माझ्या पद्यानुवादांचा जरा माराच झालाय लोकांवर Happy
माझा आवडता खेळ हा, म्हणजे असं की अगदी शाळेतही संस्कृतच्या पेपरातही दिलेल्या श्लोकांचा मराठी पद्यानुवाद करणारी मी.पण अनुवादात गुंतू नये हे बरोबरच.इतिश्री.

गझल मानायला हरकत नसली असती जर............
शेवट्च्या अनुवादाच्या शेरात लयीने मार खाल्ला नसता तर Happy
एखाद दुसर्‍या ओळीत शब्दात लय जरा बिथरली की गझल ची मजा जराशी का होईना कमी होते हे नमूद करायचे होते

हा माझा मुक्तछंदातला कैच्याकै झब्बू. भारती, हलकेच घे गं Happy

हा गाव कोणता, हा आसमंत कोणता?
नजर जाईल तेथे धुळीचा लोट धुमसता

ना ठाऊके जगण्यातले कोणते वळण हे?
ना सुखावले ना दुखावले ना कल्लोळ कोणता

कुठून देऊ ताळेबंद आयुष्याचा हे जीवना?
मन विणून घेते लाजेने कोष आपुल्यापुरता

कुणाची साद येते अंतरातुनी अंतरावरी?
हे कोण व्याकूळ मजसाठी, की भास नुसता?

ही रचना समवृत्त होती,'दिल ढूंढता हैं'' च्या तुलनेत त्याच चालीत म्हणता येईल अशी.मनस्मिंच्या एका सूचनेवरून हे टाकायचा मोह झाला.>>>>> धन्यवाद! Happy

चालीवर चांगली जमली आहे.

अशा जुन्या गाजलेल्या सुंदर गीतांची त्याच चालींवर्/ संपुर्ण नवीन चालींवर मराठीत पुनर्निर्मीती..असा एखादा अल्बम का नाही होउ शकणार?
(भारती, कृपया यावर विचार करा. मायबोलीवरील नवीन संगीतकार आणि आपली गीते असेही काँबिनेशन होउ शकेल).

धन्यवाद सर्वांचे,
मनस्मि, छान सूचना , माझ्याकडून अनुमोदन.
केश्वी, मस्त प्रयत्न.
विदिपा, तुमचा शेर कैच्याकै नाहीच वाटला.आवडला.
वैभव, लय मला गडबडलेली नाही वाटत शेवटच्या कडव्यात हे सांगितलेच मी.

भारतीताई, तुमची कविता अगदी त्याच चालीत म्हणून बघितली. कुठेही अडायला झाले नाही. आधी चांगली कविता (ती पण अनुवादीत) जमणे हेच सोपे नाही त्यात समवृत्त म्हणजे महाकर्मकठीण. कसे कायजमते बुवा ?

अश्विनी, तुझा अनुवाद पण झकास झालाय. मूळ रचनेचे सर्व मर्म उतरलय त्यात.

मन विणून घेते लाजेने कोष आपुल्यापुरता >> अप्रतिम. रेखाचे डोळे पण हेच सांगत असतात तेंव्हा. Happy

भारती, ही गाणी एवढी सुंदर होती, कि ते शब्द, सूर, प्रसंग आणि अभिनय असे वेगवेगळे करताच येत नाही.
म्हणून तूलना टाळणे अशक्य झाले. पण तरी मारा वगैरे काही नाही.. अशी सुंदर गाणी परत समोर येताहेत,
हेच खुप समाधान देणारे आहे.
अश्विनीचा अनुवाद छानच उतरलाय.

आभार माधव, दिनेशदा.
कविता कुणाला कशी वाटते ही पुढची गोष्ट.. हा अनुवाद करताना आनंद झाला होता, शब्द झरझरत आले, जन्मदात्रीला त्याचंच अप्रूप Happy