कटकी कैरी..

Submitted by सुलेखा on 28 May, 2013 - 02:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

गावी असलेल्या अंगणातील आंब्याच्या झाडाच्या कैर्‍या घरपोच मिळाल्या.आकाराने फार मोठ्या नसल्या तरी रेषारहीत्,लहान बाठ असलेल्या चवीला आंबट ,हिरव्यागार कैर्‍या होत्या.या कैरीचे लोणचे घातले.आता बाठीजवळच्या चिरता येतील तितक्या कैरीचे लहान लहान तुकडे चिरले.नेहमी बाठी उकडुन त्याचा गर काढुन पन्हे ,गोड जॅम,मेथांबा केला जातो .यावेळेस कटकी कैरी केली.
kaTakee kairee-1.JPG
हे असे बाठीजवळच्या कैरीचे सुरीने कापलेले लहान लहान तुकडे,
७ ते ८ लवंगा,
५ ते ६ काळे मिरे,
दालचीनी २ ईंच तुकडा,
जायपत्री १ नग,
१/२ टी स्पून तिखट,
१ सपाट टी स्पून मीठ,
एक वाटी साखर,
१ टीस्पून तेल,
१/२ टी स्पून जिरे,

क्रमवार पाककृती: 

पाव वाटी साखर +५ लवंगा+५ मिरे+१ ईंच दालचिनीचा तुकडा व जायपत्री मिक्सरमधे बारीक वाटुन घ्या.
कढईत फोडणीसाठी तेल गरम करुन त्यात जिरे घाला.गॅस बारीक ठेवा.
त्यावर उरलेल्या लवंगा[एका लवंगेचे २ तुकडे] व दालचिनी चे लहान्-लहान तुकडे करुन घाला .
लगेचच कैरीच्या फोडी घाला.परता,झाकण ठेवुन १ मिनिटाने उघडुन परता ,त्यावर बारीक केलेली पिठीसाखर घालुन परता.
आता वाटीतली उरलेली ३/४ वाटी साखर घाला.परता.पुन्हा १ मिनित झाकण ठेवा.
छान परता.गॅस बंद करा.
तिखट व मीठ घाला .पुन्हा एकदा सर्व मिश्रण छान ढवळा.
kaTakee kairee-22.JPG
थंड झाल्यावर बाटलीत भरा.
आंबट गोड,काहीशी तिखट, लवंग-दालचिनीच्या स्वादाची "कटकी कैरी" तयार आहे.

अधिक टिपा: 

१]कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचे प्रमाण घ्यावे.
२] साखरेऐवजी गूळ घेतला तरी चालेल्.किंवा अर्धा गूळ्-अर्धी साखर असेही चालेल.
३]लवंग-काळे मिरे यांचे प्रमाण तसेच लाल तिखट आवडानुसार घ्यावे.
४]उपवासाठी करायची असल्यास तेलाची फोडणी न करता इतर जिन्नस एकत्र कालवुन गॅसवर ठेवावे पण तिखट-मीठ मात्र तयार झाल्यावर्च घालावे.
सर्व जिन्नस एकत्र करुन रुंद तोंडाच्या बाटलीत भरुन उन्हात ठेवावे.८ दिवसात तयार होईल.
५] मेक्सिकन कैर्‍या अगदीच कमी आंबट असतात त्यांची वरील पद्धतीने कटकी कैरी तयार करुन त्यामधे चवीप्रमाणे थोडा लिंबाचा रस घालावा.आमचूर घातले तरी चालेल पण रंग काहीसा गडद येईल्.चव मात्र मस्त येईल.

माहितीचा स्रोत: 
मारु रंग रंगिलु गुजरात.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुलेखा, खूप दिवसांनी तुमच्याकडून नवी रेसिपी आणि ती पण इतकी भारी Happy फोटो तोंपासु आहे.

ही कटकी कैरी आपल्या मेथांबाची बहीण वाटते आहे. अशीच कृती पण लवंग-दालचिनी ऐवजी मेथ्या वापरायच्या आणि साखरेचे प्रमाण पण बरेच कमी आणि मेथ्या फोडणीत तळून घेऊन वापरायच्या.

धनश्री, मेथांब्यासारखीच कृति आहे.पण चवीत खूपच वेगळी आहे.साखरेचे प्रमाण दोन्हीत कैरीच्या आंबटपणानुसार घ्यायचे आहे.
कटकी कैरी उन्हात ठेवुन करायची असल्यास कैरीच्या फोडी व तिखट,मीठ,लवंग्+दालचिनी पुड ,साखर्/गूळ एकत्र कालवुन बाटलीत भरुन उन्हात ठेवायचें.दिवसभरात निदान एकदा तरी बाटली छान वर्-खाली करायची.८ दिवसात कटकी कैरी [टिकणारी]तयार होते.इतर वेळी,उपवासाला/तोंडाला अरुचि असेल तेव्हा खायला उत्तम.