तू वेल सुकल्यासारखी

Submitted by निशिकांत on 24 May, 2013 - 03:52

वेल सुकल्या सारखी

तू अशी दिसतेस का अपुल्यात नसल्या सारखी?
काय सलते अंतरी, तू वेल सुकल्या सारखी

भो॑वती तुझियाच मैफिल रंगते मी जाणतो
तेवणारी तू शमा का आज विरल्या सारखी?

का उगा जोहार करसी मारला जाता पती?
तू लढावे कडकडावे वीज असल्या सारखी

सोसणे अन्याय आहे ही जुनी ओळख तुझी
आज तुझिया आतली का नार हरल्या सारखी?

तूच चंडी, तूच झाशी चाँदबीबी तू तरी
वागसी का सांग वेडे धीर खचल्या सारखी?

आज गर्भाशय स्त्रियांचे का रणांगण जाहले?
माय वागे स्त्री-भ्रुणाशी वैर धरल्या सारखी

"मातृदेवोभव" बनवला सोनियाचा पिंजरा
सोड तू अन् घे भरारी श्वास भरल्या सारखी

का तुझा उध्दार करण्या राम लागे सांग ना !
आखलेल्या वर्तुळी जगतेस फसल्या सारखी

अंध धृतराष्ट्रास देण्या साथ गांधारी उगा
पत्करावी जिंदगी का नेत्र नसल्या सारखी?

का पिसे "निशिकांत" आहे लागले वेड्या तिचे?
भासते नसली तरी ती साथ असल्या सारखी

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादासाठी अभार सर्वांचे. शिर्षकाबद्दल म्हणाल तर ते कसे झले हे मलाही कळले नाही. प्रयत्न करूनही संपादित करता आले नाही. आपणा सर्वांचे शाल जोडीतील वाचून पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि जमले. दुरुस्ती केली आहे. कदाचित शिव्या खाणे प्राक्तनात असावे. क्षमस्व.

खूप सुरेख काका
एकेक शेर अप्सूक भिडतो तुमचा नेहमीच

ही गझल भन्नाटच मुसल्सल झाली मला खूप आवडली

कदाचित शिव्या खाणे प्राक्तनात असावे.<<< नका मनाला लावून घेवूत काका अहो एका पुतण्याने काकांची गम्मत केली असे समजा (आगावू सल्ला :))

खूप छान आहे गझल!
"आज गर्भाशय स्त्रियांचे का रणांगण जाहले?
माय वागे स्त्री-भ्रुणाशी वैर धरल्या सारखी "
हे मात्र अगदी खरे आहे!