चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेचा अभ्यास कसा करवून घ्यावा?

Submitted by विनार्च on 1 August, 2012 - 05:46

माझी लेक यंदा चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेला बसली आहे.कोणताही क्लास न लावता तिला मी घरातच शिकवायचं ठरवल आहे. साधारण कसा अभ्यास घ्यावा? याची माहिती कोणी सांगाल का?
(लेक अभ्यासात बरीच हुशार व एकपाठी आहे त्यामुळे माझ्याकडुन कुठे कमी पडायला नको याची भीती वाटते)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुस्तके/ सराव संच सोडवायला तिच्यासोबत बसावे. जमल्यास तिच्याकडुन शिकावे. आपल्यापेक्षा त्यांचा वेग जास्त असतो.
साधारण तिला कुठे मदत लागते आहे?
इंग्रजी, गणित, IT?
या अनुषंगाने काही गमती बरोबर सोडवता येतील का ते पहा...
नुसती घोकंपट्टी तर करत नाही ना? मुळापासून तिला समजते आहे ना ते चेक करा.

शाळेत एक बेसिक स्कॉलरशिप तयारी वर्ग आहे का?
स्कॉलरशिप तयारीसाठी तिच्यासोबतची इतर मुलं काय करत आहेत?
त्यांचे पालक आणि तुम्ही विषय सुद्धा वाटुन घेऊ शकाल. तिनचार मुलांचा अभ्यासगट तयार करु शकाल.

प्रश्नसंच हे फक्त निमीत्त. वडिल माझ्याकडुन शब्दकोशातून शब्द पहायला लावायचे. आम्ही अनेक वाक्प्रचार, म्हणी, शब्दार्थांच्या जंगलात घुसायचो.
गणितासाठी - गणित लवकर सोडवायला अनेक तंत्र शोधायचो वगैरे.

स्कॉलरशिप मिळणे (माझ्यासाठी ) तेवढे महत्त्वाचे नाही. तो फक्त पेपर सोडवायचा स्पीड आणि सरावाचा भाग झाला. पण अभ्यासातील गमती, शब्दसंपत्ती वाढवणे, analytical skills, एकंदरित सकारात्मक वृत्तीचा पाया यासाठी जास्त मदत होऊ शकते.

भाच्च्याला दोन्ही शिष्यवृत्ती मिळाल्या. चौथी आणि सातवी दोन्ही. त्याच्या वडलांनी exactly हेच केले.
वर्षभर त्या निमित्ताने मुलासोबत विचारांचे आणि अभ्यासाच्या तंत्राचे पूल बांधले.
पाठोपाठ त्याच्या बहिणीलाही चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तम गूण मिळाले. वडलांनाही एव्हाना सराव झाला होता.

पोरांचे सोडा एकवेळ. आपल्या मेंदूला चालना देण्याचा प्रकार आहे.
तुमच्या उत्साहाची आणि प्रामाणिक प्रयत्नांची तिला नक्की लागण होईल. आता नाही कळणार तिला कदाचित. पुढे मोठेपणी जाणवेल.
फक्त आरडाओरड, मारामारी नका करु. त्याचा मात्र विपरीत परिणाम होतो. उदाहरणे पाहिली आहेत.
(हे कदाचित तुम्हाला अजिबात लागू नाही. पण सांगीतल्याशिवाय रहावत नाही. गैरसमज नसावा.)

आणि SSC अभ्यासक्रमासाठी तरी असे मानले जायचे की चवथी आणि सातवीच्या शिष्यवृत्तीचा अभ्यास केला की पुढे २-३ वर्ष पहायला नको. तो अभ्यास योग्य प्रकारे केला तर खरे आहे ते.
चवथीतून पाचवी आणि सातवीतून आठवी या transition phases ची अडचण या मुलांना फारशी येत नाही, कारण नीट विचार करायची सवय लागते. असे पूर्वी मानत असत.

माझ्या एका बहिणीच्या दोन्ही मुलांना (दोन्ही) शिष्यवृत्ती मिळाली. लोकं खूप मागे लागले तिच्या की शिकवण्या घ्या. त्या फार हिट झाल्या. अजाणतेपणी तिला एक नवीन करियर गवसले.
फार समरसून केले ते काम तिने.

साधारण दोन महिने मुलीसोबत अभ्यास केल्यावर तिला आणि तुम्हाला आनंद वाटतोय ना ते नक्की पहा. तीच माझ्यामते लिटमस टेस्ट. त्याचा बोजा वाटला, तर मात्र अभ्यासपद्धतीत बदल करा.

आणखी एक,
वडिल या अभ्यासात सहभागी नसतील तर करुन घ्या या निमित्ताने. योग्य अभ्यासपद्धतीची पायाभरणी आणि अभ्यासातील गमती यात, त्यांचाही unique flavour असेल नक्की.

Super competitive अट्टाहास नसुन exploration असले तर it can be a fun journey. Happy

माझी मुलगी अत्ता ६ वीत आहे. तिला ४थी ची स्कॉ.शी. मिळाली होती. अभ्यास कसा केला -----

१. मुख्य म्हणजे हल्ली जे विषय आहेत जे शाळेत असतात तेच स्कॉ.शी. ला असतात. पैकी इतिहास, भुगोल, विड्न्यान ( नीट लिहिता येत नाहिये)... हे नंतर शिकवा. साधारण शाळेत शिकवले की घरी उजळणी घ्या. पण त्यां वर चे प्रश्ण सध्या नकोत. सध्या भर गणित, इंग्रजी, आणि आय.टी. ला . त्या साठी आम्ही नवनित ची पुस्तके वापरली.

२. पुण्याला अनमोल प्रकाशना ची सराव पुस्तके मिळतात. ती पण सोडवली.

३. साधारण डीसेंबर मध्ये म.टा. मध्ये स्कॉ.शी. सराव प्रश्ण यायला लागतिल. ते भाषांतर करुन सोडवुन घेतले.

४. खुप पेपर सोडवले.

५. दर रविवारी मी माझा पेपर तिला द्यायचे. मह्णजे ऑप्शन रहित. दर रविवारी तिची २० मार्कांची परिक्षा घ्यायचे.

६. जिथे जिथे स्कॉ.शी. चं गणित व इंग्रजीचं मटेरीअल मिळालं ते ते आम्ही सोडवलं.

७. मुलुंडला एका शाळेत माजी मुख्याध्यापिका एक सराव परिक्षा अगदी मोठ्थ्या प्रमाणावर घेतात. साधारण
जानेवारी ला. त्यात मार्कांचा विचार न करता बसवलं. त्याचा खुप फायदा झाला.

७. डिसेंबर नंतर मग इतिहास, भुगोल, सायन्स चा सराव सुरु केला. त्याला ही तिच पध्धत.

अशा पध्धतिने आम्ही अभ्यास घेतला. माझी मुलगी खुप हुशार आहे पण महा आळशी आहे. त्या मुळे ह्या सगळ्या गोष्टी मागे लागुन, कौतुकाने कराव्या लागल्या. फक्त इंग्लीश आणि आय.टी आणि गणिता साठी तिने कधीच नाही म्हंटले नाही. तिला शेवटी परिक्षेत इंग्रजी आणि आय.टी नेच हात दिला.

बाकी इतिहास आणि भुगोल म्हण्जे समुद्र आहेत.... काय काय डोक्यात साठवणार???? भुगोलाच्या तर पुस्तकातल्या प्रत्येक वाक्याला एक प्रश्ण विचारला जाऊ शकतो..... एक आहे ...शाळेत इतिहास व सायन्स झाले असल्याने आणि स्कॉ.शी. च्या पेपरात ऑप्शन असल्याने पेपर त्या मानाने सोप्पा जातो.

गणिता साठी अनेक क्लुप्त्या वापरल्या... पाढे पाठ होण्या साठी पण वेग वेगळी कोष्टके केली.... मला स्वतःलाच आय.टी. फार आवडायचं. त्या मुळे त्याचा सराव खुपच केला गेला....

मी शाळेत असताना कोणत्याच परिक्षेला कधीच बसले न्हव्हते.... मला अभ्यासात रुची न्हवतीच..... मला माझा सुर कॉलेजला गेल्यावर सापडला.

पण लेक पहिल्या पासुन प्रत्येक गोष्टीत भाग घ्यायला उतसुक होती आणि अजुनही आहे. स्कॉ.शी. चा अभ्यास असतानाही तिने खेळ आणि पोहोणे सोडले न्हवते..... तसेच सुट्टीत ती बालनाट्य करीत असे. ( प्रोफेशनल) ... ती ही चालु होती आणि बाकी वक्त्रुत्व, नाट्यछटा... सगळं सुरळीत चालु होते.....

हल्ली सगळे विषय असल्याने फार ताण जाणवतो. पुर्वी ३ विषय असल्याने बरे होते.....

६ वीत होमी भाभा बाल वैज्ञानिक ला बसली आहे. त्या ला मात्र क्लास लावला. कारण मी आणि बाबा दोघेही कॉमर्स वाले....

मोकिमी ती गणिताची कोष्टके ( पाढ्यांसाठी ) कशी केलीत ती इथे जमल्यास शेअर कराल का प्लीज?

तुमचे सल्ले आणी अनूभव खूपच फायदेशीर असतात म्हणून विचारतेय्.:स्मितः

अर्चना मुलीला अनेक शुभेच्छा. ती जे पाठ करते ना, ते तिला एका रफ वहीवर परत लिहायला सांगत जा, म्हणजे तिचा लिखाणाचा वेग तर वाढेलच आणी एकपाठी असल्याने ते जास्तीत जास्त लक्षात राहील.

रैना,
<<<<<स्कॉलरशिप मिळणे (माझ्यासाठी ) तेवढे महत्त्वाचे नाही. तो फक्त पेपर सोडवायचा स्पीड आणि सरावाचा भाग झाला. पण अभ्यासातील गमती, शब्दसंपत्ती वाढवणे, analytical skills, एकंदरित सकारात्मक वृत्तीचा पाया यासाठी जास्त मदत होऊ शकते.>>>>>>
अगदी , अगदी.
अर्चना, ईतिहास ,भूगोल, सायन्ससाठी पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन करायची सवय लाव लेकीला,आपसूकच फक्त स्कॉलरसीप्च नाही तर एरवी पण प्रश्नांची उत्तर देताना ह्याचा खूपच उपयोग होतो.
बाकी मोकिमी म्हणते तस सरावाला पर्याय नाहि.

४थी अन ७वी दोन्ही स्कॉलरशिपा मिळवल्या होत्या.
अभ्यास करवून घ्यायला आमचे दगा काळू पाटील गुरूजी समर्थ होते. Wink
वट्ट ६ रुपये महिना स्कॉलरशिप मिळत असे, ती संचयनी (जी मुलांनी चालवलेली पोस्टाची स्कीम आमच्या शाळेत होती) नामक अल्पबचत खात्यात, जमा करीत असे. वर्षाचे ७२ रुपये. त्या काळी अबब श्रीमंती होती ती...

(नॉस्टॅल्जिक स्कॉलर) इब्लिस..

टुन.....

मी तिच्या कडुन १५ पर्यंतचे पाढे अगदी छान पाठ करुन घेतले होते. त्या पुढच्यांसाठी २०, २५ चे पाढे परत रटवुन घेतले. बाकी खालील मेथड वापरली. फळ्यावर, रोज २ किंवा ३ पाढे काढुन घेतले. मग हळु हळु लक्षात रहायला लागले. असा तक्ता बनवला होता

15 16
30 30+2=32
45 45+3=48
60 60+4=64
75 75+5=80
90 90+6=96
105 105+7=112
120 120+8=128
135 135+9=144
150 150+10=160

हे आर्थातच सुरुवातीला केलं की अनुभवाने सांगते २/३ महिन्यात २५ पर्यंत तरी नक्कीच होतात. आणि शाळेत एकदोनदा अपमान झाला की २६ ते ३० पण होतात. (हसणारी बाहुली)

jn = ज्ञ @ मोहनकीमीरा>>>>>

(लाजलेली बाहुली) .... इब्लीस काका .... तेवढं काही नाही हो.....

तिला शिकवताना सुचत गेलं ते करत गेले. प्री प्लान काहीच नाही. मी स्वतः अभ्यासातल्या फिनिक्स पक्षाचं उदाहरण आहे. मी शाळेत अजिबात हुशार न्हवते, कॉलेजातही नाही. पण कॉलेजात कुठे तरी ठीणगी पडली. प्रोफेशनल शिक्षणाचं महत्व पटलं. तेंव्हा मला गाईड माझ्या वडिलांनी केलं होतं. मी अजिबात महत्वाकांक्षी न्हव्हते. माझ्यात महत्वाकांक्षा जागवली ती माझ्या वडिलांनी. तेंव्हा आपल्याला गुरु लागतो. मग आपल्या मुलाचा गुरु आपणच व्हावं. माझा नवराही त्याच मताचा आहे. त्याने आज पर्यंत एकही क्लास कधीच लावला नाही. सगळा अभ्यास स्वतः केला. ( तो सी.ए, आय सी.डब्लु.ए, आणि सी.एस आहे. सी.ए. ला भारतात ७ वा आला आहे)

आपलं मुल कुठे कमी आहे हे फक्त आपल्यालाच माहित असतं. त्या मुळे स्वतःला न फसवता, जर त्या पिल्लाची मदत केली, तर ते नक्कीच त्याच्या आवडीच्या क्षेत्रात भरारी घेऊ शकतं. त्याचे इंटरेस्ट काय, ते आपणच जाणतो ना.... ( सध्या माझ्या लेकीला "शेफ" व्हायचं आहे !!!! नेहेमी काय काय करत असते. )

अगदि योग्य वेळि हा धागा निघालाय.
रैना तुझी बहिण अजुनहि स्कॉलरशीपचे क्लासेस घेते का ? घरी येऊन कोणी शिकवणी करणारे मिळेल का ?
मोहन कि मीरा, माझीहि मुलगी हुशार आहे पण प्रचंड खेळकर आहे, तीने स्वतःच्या ईच्छेने फॉर्म भरण्यास भाग पाडले. पण आता अभ्यासाला बसण्याआधी बरीच टाळाटाळ. बाहेरच्यांकडे थोडावेळ तरी शांत असते, तुझ्या ओळखीत कोणी आहे का घरी येऊन शिकवणारे?

मोहन कि मीरा व रैना खूपच छान व डिटेल मार्गदर्शन केलय तुम्ही, त्याबद्द्ल धन्यवाद!
उजु व टुनटुन तुमचे हि आभार.
स्कॉलरशिप मिळणे (माझ्यासाठी ) तेवढे महत्त्वाचे नाही. तो फक्त पेपर सोडवायचा स्पीड आणि सरावाचा भाग झाला. पण अभ्यासातील गमती, शब्दसंपत्ती वाढवणे, analytical skills, एकंदरित सकारात्मक वृत्तीचा पाया यासाठी जास्त मदत होऊ शकते.>>>>>> मलाही अगदी हेच वाटते फक्त जर ती ह्यापरिक्षेला स्वतःच्या इच्छेने बसली आहे तर मन लावुन अभ्यास करावा इतकेच वाटते. रैना तिचे बाबा, आजी सगळे याप्रक्रियेत सामिल आहेत. म्हणी व वाक्-प्रचारांचा खेळ केंव्हाच सुरु झाला आहे. आजी व ती स्कुलबसची वाट बघताना पाढे म्हणत बसतात. हा त्यांचा शाळा चालू झाल्यापासूनचा गेम आहे. त्या तिला मधेच १६ पंचे किती? वै. प्रश्न विचारतात. त्यामुळे पाढे होतील पाठ. बुद्धीमत्ताचा पुस्तक तिला पझल-बुक वाटत त्यामुळे मजा येते तिला सोडवायला. आता फक्त वेगावर लक्ष ठेवाव लागेल.

आपलं मुल कुठे कमी आहे हे फक्त आपल्यालाच माहित असतं. त्या मुळे स्वतःला न फसवता, जर त्या पिल्लाची मदत केली, तर ते नक्कीच त्याच्या आवडीच्या क्षेत्रात भरारी घेऊ शकतं.>>>> मोकिमी, सोला आणे सच बात. माझी लेक अभ्यासाच्या बाबतीत कोणत्याच क्लासला तयार नसते. तिच कायम "आई, मला नाही आलं तर तु आहेस ना?" हेच पालूपद असतं.

पाठांतर करुन उत्तर लिहिणे अजुन तरी तिने सुरु केले नाही आहे. सगळ्या गोष्टी समजुन घेउन स्वतःच्या शब्दात उत्तर लिहिते. तिच्या साठी होमरिवाइजच्या सिडी घेतल्या आहेत त्यांचा खूप उपयोग होतोय.
ह्याच बरोबर तिचे त्वायकँडो व बॅडमिंटनचे क्लास पण चालूच आहे. ह्यावर्षी गॅप घेवूया म्हटलं तर त्याला ती तयार नाही.

Super competitive अट्टाहास नसुन exploration असले तर it can be a fun journey.>>>> +१

वर्ग व घन किती पर्यंत करुन घ्यावेत?
आता पासून हळुहळु सुरु केलं की शेवटी एकदम बोजा नाही येणार असा विचार आहे, बघुया कितपत जमतय ते Happy

मोकिमी अनेक आभार. गणित हा विषय माझ्यासाठी नेहेमी कठिणच राहिला. मुलगी लहान असली तरी शार्प असल्याने तिच्या प्रगतीकडे आता लक्ष देता येईल.

माझा चौथी आणि सातवी अशा दोन्ही शिष्यवृत्ती मध्ये जिल्ह्यात पहिल्या ३ मध्ये क्रमांक आला आहे, अर्थात त्याला आता बरीच वर्षे झाली, अभ्यासक्रमही बराच बदलला असेल. सांगायचा उद्देश हा की एक विद्यार्थी म्हणून माझ्याकडून माझ्या शाळेने जी तयारी करून घेतली तीच मला उपयोगी पडली. बेसिक पक्के असेल तर बर्याच गोष्टी सहज शक्य होतात. तुमची लेक हुशार आणि एकपाठी आहे ते चांगलेच आहे. तिच्याकडून अवघड विषयांचा अभ्यास आधी करून घ्या. बर्याचदा आपल्याला जे आवडते तेच आपण आवडीने नेहमी नेहमी करतो आणि जे येत नाही त्याकडे बिनधास्त दुर्लक्ष करतो, त्यामुळे तुमच्या मुलीबाबतीत असे नको व्हायला. आलटून पालटून प्रत्येक विषयाला एक दिवस दिला(म्हणजे तुम्ही जे ठरवले असेल दिवसाचा १-२ तास) तर सगळे विषय सारखेच अभ्यासले जातात. जो विषय अवघड आहे किवा एखादा टॉपिक अवघड असेल त्याचा त्या-त्या दिवशी जास्त अभ्यास करायचा. पाढे, spellings , व्याकरण, सनावळ्या इ इ बेसिक गोष्टींची व्यवस्थित तयारी करून घ्या. परीक्षेआधी शेवटचा १ महिना फक्त प्रश्न-संच सोडवण्यावर भर द्या, आणि जिथे चुका होतात तेवढाच अभ्यास करून घ्या. तुम्हाला तिचा अभ्यास घ्यायला सुरुवात केल्यावर १ महिन्यातच ती कुठे कमी पडते ते लक्षात येईल. त्यानुसार सुधारणा करता येईल.
शुभेच्छा.

रैना, मीरा खुप छान पोस्ट्स.
विनार्च, शक्य असेल तर वैदिक गणिताचा अभ्यास तू कर त्यातल्या अनेक गोष्टी जलद कॅल्क्युलेशनला उपयोगी पडतात. तू आधी शिकलीस की मुलीला शिकवता येतील. जमलं तर मी काही लिहिण्याचा प्रयत्न करते येता काही दिवसात.
सर्वात महत्वाचे म्हणजे बोजा न वाटता आनंदादायक अभ्यास वाटला पाहिजे. अन मूळ गाभा लक्षात आला पाहिजे.

चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला कोणाते विषय असतात? मी सातवीची परीक्षा दिली होती, तेव्हा भाषा (मराठी), गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे तीन विषय होते. (शाळेच्या ऑफिसात जाऊन दर महिन्याला दहा रुपये घेऊन सही करताना मजा वाटायची.)
वर सनावळ्यांचा उल्लेख आला म्हणून प्रश्न पडला.
गणितात प्रत्येक वेळी प्रश्न सोडविण्यापेक्षा दिलेल्या पर्यायांतली चुकीची उत्तरे बाद करणे कमी वेळात होते. बुद्धिमत्ता चाचणीसाठी लॉजिकल रिझनिंगची सवय हवी. तसेच इथे प्रश्न दृश्य स्वरूपात असल्याने 'बघण्याची' शक्ती वाढवायला हवी.
स्पेलिंग्ज , शुद्धलेखन यासाठीही नजर तयार केली पाहिजे म्हणजे कंटाळवाणी (आणि बिनडोक?) घोकंपट्टी टाळता येईल.
पाढे पाठ असायला हवेत असे बरेच लोक म्हणतात. मला त्यावेळी २९, २३, १९ चे पाढे पाठ नव्हते. या आकड्यांशी संबंधित गुणाकार, भागाकार (२९ X ७)= (३०-१) X ७= २१०- ७= २०३ हे आणि असे मधल्या पायर्‍या मनातच करून पटकन काढता यायचे. गणिताचा पेपर बहुतेक ६० टक्के वेळातच संपायचा. पाढे पाठ असतील तर २९
X ७ ? हे संपूर्ण पाढा न म्हणता डायरेक्ट उत्तर देता आले पाहिजे. यासाठी पाढे दृश्यरूपात उभे-आडवे, वरून-खालून पुन्हा पुन्हा वाचले आणि त्यातही ही फोड लक्षात राहिली तर सोपे पडावे.

हा लेख वाचण्याजोगा आहे.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=236...

चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला कोणाते विषय असतात? मी सातवीची परीक्षा दिली होती, तेव्हा भाषा (मराठी), गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे तीन विषय होते. (शाळेच्या ऑफिसात जाऊन दर महिन्याला दहा रुपये घेऊन सही करताना मजा वाटायची.)
वर सनावळ्यांचा उल्लेख आला म्हणून प्रश्न पडला.>>>>>

भरत आता सगळे विषय असतात.... म्हणुन तर अभ्यास वाढला आहे. इंग्रजी/ मराठी, बु. चाचणी, गणित , विज्ञान, इतिहास, भुगोल हे सगळे विषय असतात. सीलॅबस मध्ये काहीच फरक नाही. म्हणजे आता ३०० मार्काला ६ विषय. पुर्वी तेच ३ विषयात भागत असे. म्हणुन तर वेगळी तयारी लागते. हल्ली बर्‍याच शाळा वेगळे वर्ग घेत नाहीत. आपली आपण तयारी करायची असते. माझ्या मुली च्या वेळेला फेब. २०११ ला जी परिक्षा होते, ती एकदम शेवटी मार्च मध्ये घेतली आणि लगेच ५ दिवसांनी शाळेची टर्मिनल सुरु झाली.

आता सातवीला ही सगळे विषय असतात. खुप मुले तीन विषय घेवुन भराभरा पास व्हायची. म्हणुन आता सगळे विषय घातले. ताबडतोब टक्केवारी खाली आली!!!!!!

आर्थात आपल्या वेळेला खुप स्पर्धा न्हवती. हल्लीची मुलं बेसुमार स्पर्धेला तोंड देत आहेत. कारण अमर्याद लोकसंख्या!!!!

माझ्या वेळी कॉमर्स ला हसत खेळत प्रवेष मिळाला होता. आज काल पोद्दार किंवा मुलुंड कॉलेजला अ‍ॅडमिशन ८९ % किंवा ९०% ला क्लोज होतात!!!!!!( माझ्या मित्रा च्या मुलाला ८७% ला मुलुंड कॉलेजला अत्ता अ‍ॅडमिशन नाही मिळाली)

हीच हालत आर्ट्स ला आहे. रुईया, झेवीयर्स, सोफीया... ह्या ठीकाणी ८९% ला अ‍ॅडमिशन क्लोज झाल्या. आर्ट्स ला जावुन मास मेडीया, टुरीझम, जर्नॅलीजम, आय.ए.एस करणार्‍यांची संख्या खुप आहे.

चितळे मास्तरांच्या भाषेत " टाइम्स हॅव चेंज्ड"..........

अर्र... सहा विषय म्हणजे फारच होतात की... आणि सगळे विषय असतील तर वेगळी परिक्षा कशाला पाहिजे.. ती अशीही शाळेत होतेच की... फक्त इथे उत्तरे लिहिताना पर्याय असतील एवढाच फरक राहिला की... स्कॉलरशिपचे पेपर त्या त्या इयत्तेप्रमाणे बर्‍यापैकी अवघड प्रश्नांचे असतात... जे कदाचित सगळ्यांना पटकन सोडवता येत नाहीत पण काही जणांना सोडवता येतात..

मला फक्त २१९ गुण मिळून सुद्धा चवथीची स्कॉलरशिप मिळाली होती.. कारण मूळात पेपरच अवघड होते. तोच तर उद्देश होता स्कॉलरशिपचा.. मध्यंतरीच्या काळात स्कॉलरशिपला पण ३०० पैकी २९५ वगैरे गुण मिळायला लागले होते.. तिथे टक्केवारी कमी करण्यासाठी प्रश्नांची डिफिकल्टी वाढवण्यापेक्षा विषय वाढवून नक्की काय साध्य झाले ह्याचा मी विचार करतोय..

हिम्स....

अर्र... सहा विषय म्हणजे फारच होतात की... आणि सगळे विषय असतील तर वेगळी परिक्षा कशाला पाहिजे.. ती अशीही शाळेत होतेच की... फक्त इथे उत्तरे लिहिताना पर्याय असतील एवढाच फरक राहिला की... स्कॉलरशिपचे पेपर त्या त्या इयत्तेप्रमाणे बर्‍यापैकी अवघड प्रश्नांचे असतात... जे कदाचित सगळ्यांना पटकन सोडवता येत नाहीत पण काही जणांना सोडवता येतात..>>>>>>>

हेच तर आहे.... त्या त्या इयत्ते प्रमाणे बर्‍यापैकी अवघड प्रश्न असतात.

मला फक्त २१९ गुण मिळून सुद्धा चवथीची स्कॉलरशिप मिळाली होती.. कारण मूळात पेपरच अवघड होते. तोच तर उद्देश होता स्कॉलरशिपचा.. मध्यंतरीच्या काळात स्कॉलरशिपला पण ३०० पैकी २९५ वगैरे गुण मिळायला लागले होते.. तिथे टक्केवारी कमी करण्यासाठी प्रश्नांची डिफिकल्टी वाढवण्यापेक्षा विषय वाढवून नक्की काय साध्य झाले ह्याचा मी विचार करतोय..>>>>>>

आज कालची पिढी आपल्या पेक्षा खुप शार्प आहे. हुषार आहे.... तेवढी उत्क्रांती होणारच ना!!!! ही एक परीपुर्ण परिक्षा झाली. फक्त तीन विषय नाही, तर सगळे विषय घेवुन घेतलेली सामुहीक परीक्षा, असे हिचे स्वरुप झाले आहे. म्हणजे हाच उद्देश असावा. कारण पेपर बृया पैकी कठीणच होते. मी अभ्यास घेतल्या मुळे मला हे चांगलेच जाणवले.

धन्यवाद मोहन की मीरा. आपल्यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम त्या वर्षीच्या शालेय अभ्यासक्रमापेक्षा वेगळा(वरच्या वर्गांचा) होता असे आठवते. आता जर त्याच वर्गांचा अभ्यासक्रम असेल तर फक्त परीक्षेचे (प्रा)रूप वेगळे असे म्हणायला हवे. अतिरिक्त अभ्यासाचा भार विद्यार्थ्यांवर पडत नसावा.
(कसलं शासकीय मराठी लिहिलंय मी!)

मार्गदर्शना बद्द्ल सगळ्या माबोकरांचे आभार. इथल्या पोस्टवाचून समजले की हा अभ्यास अगदी हसत खेळत करता येतो. त्यामूळे मी अनन्याच्या कोणत्याही अ‍ॅक्टीव्हीटीज बंद नाही केल्या. वर्षभर ती बॅडमींटन व त्वायकांडोच्या रेग्यूलर प्रॅक्टीसला जात होती. (लोकं मला वेड्यात जमा करत होते ही वेगळी गोष्ट Wink )
तरीही तिला स्कॉलरशीप मिळाली Happy
हे सारं (पॅनीक न होता नी क्लास न लावता )मी इथले अनुभव वाचल्यामुळेच करू शकले म्हणूनच माझा अनुभवही इथे लिहीत आहे... जो कदाचीत माझ्यासारख्या संभ्रमात असलेल्या पालकांच्या उपयोगी पडेल Happy

परत एकदा खूप खूप धन्यवाद ___/\____ Happy

अरे वा! अर्चना अनन्याला खूप खूप शुभेच्छा. आणि तुला पण्.:स्मित:

मेहनत रंग लायी.:स्मित: अनन्याच्या पुढील वाटचालीकरता पण शुभेच्छा.

अभिनंदन अनन्या आणि विनार्च. Happy
अजुन एक माबोकरीण योगुली हिचा मुलगा जय ह्यालाही स्कॉलरशिप मिळाली आहे.
त्यांचेही अभिनंदन Happy

Pages