हातही देशील तू पण, तेवढाही धीर नाही!

Submitted by कर्दनकाळ on 9 May, 2013 - 15:12

गझल
वृत्त: व्योमगंगा
लगावली: गालगागा/गालगागा/गालगागा/गालगागा

हातही देशील तू पण, तेवढाही धीर नाही!
दु:ख बेतानेच दे, मी एवढा खंबीर नाही!!

बोध नित्यानेच घ्यावा, मी कुठे इतका शहाणा?
त्याच त्या करतो चुका, मी जीवना, गंभीर नाही!

शक्यतोवर पाठमोरा मी कुठेही होत नाही;
विंधण्या निधड्या उराला, एकही खंजीर नाही!

दिलखुशीने सोसले विश्वासघाताचेच धक्के!
हेच आहे दु:ख की, कोणीच का दिलगीर नाही!!

तू नको पाहूस दुनिये, अंत माझ्या सोसण्याचा....
मी न साधू, संत कोणी वा कुणीही पीर नाही!

वाचतो, अभ्यासतो, जगतो जरी गीता, तरीही.....
मी धनुर्धारी असा, भात्यात ज्याच्या तीर नाही!

मी दिले हातात लाटांच्या सुकाणू शेवटाला....
पोचणे तर दूर....अजुनी पाहिलाही तीर नाही!

एक भट पचवीत आहे, अन् गझल शिकतोच आहे!
वाचला गालीब नाही, वाचला मी मीर नाही!!

पाहिजे होतेच तोंडी लावण्यासाठीच काही!
चोंचले मजला तरी झालीच कोशिंबीर नाही!!

ही गझल माझी मराठीच्या दुधावर पोसलेली!
पर्शियन, उर्दू अशा, ती शेवयांची खीर नाही!!

ही पशूवत दांडगाई, दांडक्याने संपते का?
द्यायला तोंडी पशूंच्या, मी कुणी अंजीर नाही!

कैक हौशी शायरांची काय ही खोगीरभरती!
मी मला लादू कशाला? मी कुणी खोगीर नाही!!

माणसे वाचू कशी मी? चेहरे हे झाकलेले!
ही धडे दिसतात नुसती, मात्र त्यांना शीर नाही!!

*****************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचला गालीब नाही, वाचला मी मीर नाही!!
<<<<<<

एक ओळ आठवली...... बेफीजींचीच आहे ती ....पण त्यांनी मज्जाव केल्याचे समजल्यामुळे देता येत नाही आहे Sad

बाकी ; सर्व शेर व त्याचे अर्थ पोचले फक्त १ सोडून ........

ही पशूवत दांडगाई, दांडक्याने संपते का?
द्यायला तोंडी पशूंच्या, मी कुणी अंजीर नाही!

टीप :नाही सांगीतलात तरी चालेल Happy माझ्यासाठी तुम्हाला कशाला उगाच तसदी नै का

>>बाकी ; सर्व शेर व त्याचे अर्थ पोचले फक्त १ सोडून ........

ही पशूवत दांडगाई, दांडक्याने संपते का?
द्यायला तोंडी पशूंच्या, मी कुणी अंजीर नाही!<<

वैवकु : मी आपल्या मताशी सहमत आहे. पण फक्य १ सोडून?????????

.पाहिजे होतेच तोंडी लावण्यासाठीच काही!
चोंचले मजला तरी झालीच कोशिंबीर नाही!!

ही गझल माझी मराठीच्या दुधावर पोसलेली!
पर्शियन, उर्दू अशा, ती शेवयांची खीर नाही!!

या दोन द्विपदींमध्ये आपणास काय समजले हे वदाल का?
( बाकी कुणी मधे बोलू नका, फक्त वैवकुंना सांगू दे )

शक्यतोवर पाठमोरा मी कुठेही होत नाही;
विंधण्या निधड्या उराला, एकही खंजीर नाही!
.
दिलखुशीने सोसले विश्वासघाताचेच धक्के!
हेच आहे दु:ख की, कोणीच का दिलगीर नाही!!
.
तू नको पाहूस दुनिये, अंत माझ्या सोसण्याचा....
मी न साधू, संत कोणी वा कुणीही पीर नाही!
.
ही गझल माझी मराठीच्या दुधावर पोसलेली!
पर्शियन, उर्दू अशा, ती शेवयांची खीर नाही!!
.
ही पशूवत दांडगाई, दांडक्याने संपते का?
द्यायला तोंडी पशूंच्या, मी कुणी अंजीर नाही!

आवडलेत. Happy

खास गझलूमिया यांच्या आग्रहास मान देवून उपरोक्त २ शेरांचे चवग्रहण देत आहे
(चवग्रहण का म्हणत आहे ते शेवटी कळेलच................. )
_____________________________________________
पाहिजे होतेच तोंडी लावण्यासाठीच काही!
चोंचले मजला तरी झालीच कोशिंबीर नाही!!
<<<<<<<

१)यात चोंचले (choNchale) हा शब्द की वर्ड आहे
२)चोंचणे म्हणजे चोचून चोचून बारीक करणे हा प्रकार बारीक चॉप करणे व कीस पाडणे यातला मधला आहे
३)कवीने येथे तोंडी लावायला म्हणून काही हवे होते म्हणून स्वतःलाच चोंचले तरी कोशींबीर झाली नाही असे तो म्हणतोय
४) बहुधा त्याच्याकडे दही ,शेंगादाण्याचे कूट, साखर, मीठ ,जिरे हिंगाची फोडणी व थोडे तेल हे जिन्नस कमी पडले असावेत
५)यातून कवीला आपल्या गझलेबद्दलच बोलायचे आहे की मी कित्ती प्रयत्न करतो पण माझी गझल काही केल्या गझलेसारखी होत नाही ( येथे कवीने आपल्या गझलेला कोशींबीर म्हटले आहे )
.......अशा शेराना प्रामाणिक शेर असे म्हणतात

_______________________________________________

ही गझल माझी मराठीच्या दुधावर पोसलेली!
पर्शियन, उर्दू अशा, ती शेवयांची खीर नाही!!
<<<<<

१)हा शेर साधा आहे हा शेर कवीने स्वता: भट साहेबांचे आपण कसे चेले आहोत हे सिद्ध करायला केला असावा
२)भटांपूर्वीचे मराठी शायर छांदोरचनाकार पटवर्धन साहेबांवर या शेरात निशाणा साधलाय
३)ते मुळात फारसीचे अभ्यासक होते (एका पार्शियन पोरीवर प्रेमही करीत असेही ऐकले आहे म्हणूनच स्वताला माधव ज्यूलियन असे म्हणवत म्हणे )
४)त्यांनी उर्दू व पार्शी ढंगाची शायरी मराठीत करायचा प्रयत्न केला. असे ऐकीवात आले....तर म्हणे भट साहेब म्हणत की मराठी गझलला अस्सल मराठी मातीतले संदर्भ हवेत वगैरे ...असे काहीसे

५)प्रस्तुत कवितेचा कवी भट्भक्त असल्याने त्याच्या मेंदूत असा शेर तयार झाला असावा
६) शेवयांची खीर हा शब्द शीर् कुर्मा (गावठी अपभ्रंश शिर्कुंबा) याचा अस्सल मराठी मातीतला "पर्याय" आहे
अशी खीर सहसा मुस्लिम धर्मीय बांधव रमजान ईद च्या दिवशी करतात
६अ) माधवरावांनी एकदा इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध असे कवितेत म्हटले होते वगैरेव त्यावर वाद वगेइरे झाला होता वगैरे असेही ऐकून आहे म्हणून प्रस्तुत शायराने माराठीच्या दुधाचा उल्लेख आवर्जून केलाय ( तेच दूध त्याने खिरीसाठी वापरले असल्याची शक्यताही नाकारता येत नाही )
७)या शेरात मी अस्सल मराठी शायर आहे असे म्हणायचे आहे पण आजवरचा वाचकानुभव पाहता हा कवी उर्दू शेर पळवून त्यास मराठी करतो असे निदर्शनास आले आहे शिवाय याच्या शैलीत उर्दू गझलेची नजाकत हळूवारपणा जपायच्या नादात हा कवी तद्दन सप्पक आळणी शेर करतो जे मराठी भाषेचा बाणेदारपणा राकटपणा पाहाडी गोडवा यास सूट कधीच होत नाहीत
....अशा शेराना अप्रामाणिक शेर असे म्हणतात

__________________________________________________

वरील दोनही शेरांमधून असे दिसते की आजवर वेगवेगळ्या म्हणी शेरांमधून वापरायचा कंटाळा आल्याने की काय आता या शायराने आपला मोरचा वेगवेगळ्या पाककृतीना गझलेत आणण्याकडे वळविलेला दिसतो(म्हणून चवग्रहण म्हटलेले..... आता कळ्लं ना?)
असो
हाही तसा सुखद बदलच म्हणायला हवा Happy

~वैवकु Happy

(आमची विद्वत्ता सर्वांपुढे आणण्याची संधी दिल्याबद्दल गझलूमिया यांचे आभार)

Rofl

बाप रे, वैवकु... मी थक्क झालो. ( इंग्रजीला वाघिणीचे दूध माधवराव म्हणाले होते की विष्णुशास्त्री चिपळूणकर?)

(वैवकुंच्या या प्रतिसादानंतर मुटेसरांना अंजीरामध्ये काय आवडले/ समजले विचारायचा धीरच होत नाहीये)

इंग्रजीला वाघिणीचे दूध माधवराव म्हणाले होते की विष्णुशास्त्री चिपळूणकर?<<<

वाघिणीच्या दुधाला इंग्रजी म्हणायला लागलो तर वाघाचे बछडे कॉन्व्हेंटमध्ये शिकतात असे म्हणता येईल.

अवांतर प्रतिसादाबद्दल दिलगीर आहे.

इंग्रजीला वाघिणीचे दूध माधवराव म्हणाले होते की विष्णुशास्त्री चिपळूणकर?<<<<
कोण म्हणाले ते नक्की ठावूक नाहीमी एका कवितेबद्दल म्हणत होतो जिच्यात वाघिणीचे दूध असे होते व माझ्या ऐकीव माहीतीप्रमाणे ती बहुधा माधवरावांची होती .विश्णूशास्त्री कविता करीत किंवा कसे हेही ठावूक नाही

एक सांगायचे राहिलेच : वरील या आधीचा माझा प्रतिसाद टवाळखोर वाट्ल्यास मी जबाबदार नाही
कोणासही काही रोष व्यक्त करायचा असल्यास गझलूमियांशी संपर्क साधावा लागेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी
Happy

<<< वैवकुंच्या या प्रतिसादानंतर मुटेना अंजीरामध्ये काय आवडले/ समजले विचारायचा धीरच होत नाहीये >>>

अंजीर मला खूप्खूप आवडतात. म्हणून अंजीराचा शेरही आवडला. Happy

या शेरात मी अस्सल मराठी शायर आहे असे म्हणायचे आहे पण आजवरचा वाचकानुभव पाहता हा कवी उर्दू शेर पळवून त्यास मराठी करतो असे निदर्शनास आले आहे शिवाय याच्या शैलीत उर्दू गझलेची नजाकत हळूवारपणा जपायच्या नादात हा कवी तद्दन सप्पक आळणी शेर करतो जे मराठी भाषेचा बाणेदारपणा राकटपणा पाहाडी गोडवा यास सूट कधीच होत नाहीत

आपले वर्णन दुस-याला डकवण्याची केविलवाणी धडपड!

वरील दोनही शेरांमधून असे दिसते की आजवर वेगवेगळ्या म्हणी शेरांमधून वापरायचा कंटाळा आल्याने की काय आता या शायराने आपला मोरचा वेगवेगळ्या पाककृतीना गझलेत आणण्याकडे वळविलेला दिसतो

गझलेला कोणत्याही विषयाचे वावडे नसते! कुठल्याही प्रतिमेचे वावडे नसते!
पण हे तुझ्या डोक्यावरचे आहे! तेव्हा नाद सोडलेला बरा!

आमच्या अंजीराच्या शेराचा अर्थ(शाब्दिक/लाक्षणिक/ध्वन्यार्थ) जो कोणी उलगडून दाखवेल त्याला आमच्यातर्फे खास बक्षिस देण्यात येईल!

दुस-याने सांगितलेला अर्थ जर परत कुणी पुटपुटला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही!

अर्थ फक्त एकाच प्रतिसादात सांगावा!

टीप: बक्षिस काय आहे हे एक रहस्य आहे, जे विजयी प्रतिसादकाला दिल्यावरच इतरांना कळेल!

************इति कर्दनकाळ