बटाटेवडे - "तू तळ, मी खाणार आहे.."

Submitted by लोला on 9 December, 2011 - 12:48
batate wada
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

४ मोठे बटाटे (उकडल्यावर चिकट न होणारे. Russett किंवा बेकिंग पोटॅटोज चालतील. जुने असावेत.)

५-६ मोठ्या लसूण पाकळ्या.
१ इंच आले
५-६ हिरव्या मिरच्या (आवडीनुसार मिरच्यांचे प्रमाण कमी-जास्त करु शकता.)
८-१० कोंथिबीरीच्या काड्या (देठासह. जून असतील तर खालचे थोडे काढा.)
५-६ कडिपत्त्याची पाने
मीठ
हळद

दीड वाटी साधे बेसन
अर्धी वाटी लाडू बेसन (हे रवाळ असते, याने कव्हर चांगले होते. घालायचे नसल्यास साधे बेसन दीड ऐवजी २ वाटी घ्यावे)
१ मोठा चमचा मैदा (ऐच्छिक. कव्हर जाडसर होण्यासाठी.)
१ छोटा चमचा ओवा (ऐच्छिक)

पाणी (पीठ भिजवण्यासाठी. साधारण १ वाटी.)
तेल

क्रमवार पाककृती: 

- बटाटे उकडून गार झाल्यावर मॅश करावे. अगदी गुळगुळीत करु नयेत. थोडे तुकडे राहू द्यावे.
- आले, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर पाणी न घालता वाटायचे, फार बारीक करायचे नाही.
- हे वाटण, मीठ, हळद बटाट्यात घालून नीट मिसळून घ्यावे. १ मोठा चमचाभर तेल तापवून त्यात हळद घालून ते तेल बटाट्यावर ओतले तरी चालेल.
- कडिपत्त्याची पाने हाताने तुकडे करुन मिश्रणात घालावी.
- मीठाच्या अंदाजासाठी मिश्रणाची चव घेऊन पहावी.
- मिश्रण तयार झाल्यावर त्याचे हव्या त्या आकाराचे गोळे तयार करुन ठेवावे. तळव्यात दाबून थोडा चपटा आकार दिला तरी चालेल. आकारावर अवलंबून आहे पण दिलेल्या प्रमाणात साधारण १० गोळे होतील.

- साधे बेसन, लाडू बेसन आणि मैदा एकत्र करुन घ्यावा.
- त्यात मीठ आणि ओवा घालावा. (हळद ऐच्छिक)
- चमचाभर तेल तापवून पीठात ओतावे मग १ वाटी पाणी आणि नंतर लागेल तसे हळूहळू पाणी घालून हाताने मिसळत पीठ तयार करावे. गुठळ्या मोडाव्यात.
- फार पातळ होता कामा नये. (२ वाट्या पीठ असेल आणि २ वाट्या पाणी घातले तर पातळ होईल.)

- कढईत तेल चांगले तापवून घ्यावे.
- पिठाचा थेंब टाकून तापल्याची खात्री करुन घ्यावी. पीठ लगेच वर आले पाहिजे.
- बटाट्याच्या मिश्रणाचा एकेक गोळा पिठात नीट बुडवून तेलात सोडावा. पिठातून बाहेर काढल्यावर लगेच तेलात टाकावा. टाकण्यापूर्वी पीठ फार निथळून काढू नये. गोळ्याला चिकटलेलेच रहावे.
- वडे सोनेरी रंगावर तळावे, फार लाल करु नयेत.
- एकावेळी खूप वडे तळू नयेत, प्रत्येकाला कढईत नीट जागा मिळेल असे पहावे.
- दुसरा घाणा टाकण्यापूर्वी तेल पुन्हा नीट तापले आहे याची खात्री करावी कारण एक तळण झाले की तापमान कमी झालेले असते.
- तळून झालेले वडे पेपर टॉवेल, कागदावर काढावे.
- पिठाच्या दिलेल्या प्रमाणात सगळे तळून व्हावेत, नाहीतर अर्ध्या प्रमाणात पुन्हा पीठ बनवता येईल.

vada2.jpg

वाढणी/प्रमाण: 
१० वडे ३ लोकांना पुरतील बहुतेक.
अधिक टिपा: 

- वडे शक्यतो ताजे/गरम खावेत.
- वड्याबरोबर पाव तळलेल्या मिरच्या, चिंच-खजूर आंबटगोड चटणी, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, कच्चा कांदा इ. घेता येईल.
- उपाहार असेल तर बरोबर चहा द्यावा.
- जेवण म्हणून असेल तर नंतर काहीच नाही किंवा दही-भात, सोलकढी- भात चालतो.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी , तुमची कविता महान आहे....मझी हसुन हसुन पुरेवाट!!!

इथले फोटो बघुन वडे करणे अनिवार्य आहे!!

खिडकी वडा व त्याकरता लागणारा त्याचा मसाला(पेस्टच्या रूपात)पुण्यात दिनानाथ हॉस्पिटलजवळ मिनल गार्डन समोर खिडकी वडा असेच नाव असलेल्या दुकानात मिळतो!मस्त अन् खमंग आहे,मसाला पेस्टही झणझणीत आहे!

‘खिडकी वडा’ कल्याणच्या ‘वझे बंधू’ ह्यांचा आहे. माहेरगावचा असल्यामुळे फार प्रेमाचा विषय! त्यांची मसाला पेस्ट खूप वेळा वापरली आहे. मस्त चव येते.

सायो, सदाशिव पेठ (कल्याण)
वडा मिळतो, पेस्ट्पण मिळत असेल.
अनया, माहितीबद्द्ल धन्यवाद. मला "वझे बंधू" लक्षात नव्हते.

नीशी, सकाळी सकाळी वडे का? वा, वा!

पुण्यात पण मिळते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जवळ त्यांचे दुकान आहे. ब\वडे पण मिळतात & पेस्ट्पण मिळते

माहीत नाही. Happy करुन बघ आणि लिही.
(टेक्स्चर बदलेल. फार रवाळ असल्यास कुरकुरीत/कडक होण्याची शक्यता आहे)

व्बिल्वा, लाडू बेसन भिजवलेस की त्यातले थोडे बाजुला काढुन ठेव आणि बाकीचे ब्लेंड करुन गुळगुळीत करुन घे आणि मग दोन्ही एकत्र कर Happy

मस्त झालेत बव. थँक यू!
मी सारणात थोडे धणे आणि पुदिन्याची पाने तोडून घातली. पुढच्या वेळेस लिंबू पिळून पाहीन. तसेच कव्हरसाठी एक च. तांदळाचे पीठ घातले.

Pages