॥ खळीकंस ॥

Submitted by विनायक उजळंबे on 4 May, 2013 - 08:56

तुझ्या प्राक्तनाच्या व्यथा मम ललाटी, जखम लाल त्याची तुझ्या गौर भाळी
व्यथांचेच सारे महाभारताहे! कवी का फुकाचा कुणी व्यास होतो ?

जरी वेदनेच्या पखाली वहातो ..तुझ्या आठवांच्या महाली रहातो ,
कशाला कुणाचा मला लोभ व्हावा ,मनातून जेव्हा तुझा वास होतो .॥

तुझ्या स्पर्शमात्रे गुलाबास काटा , खुळी रातराणी तुझा गंध मागे ,
खळीकंस होण्या तुझे केस येता ,अचानक जणू चंद्र खग्रास होतो ॥

फुलोनी पहाटेस प्राजक्त येता ,मला जास्त होते धरेचेच देणे ,
पसरता सडा केशरी जाणिवांचा ,व्यथांना धरेचा सहवास होतो . .

सुगंधी कळ्यांना तुझे वेड लागे ,जुन्या काष्ठवृक्षा नवी पालवी ये ..
मला सावराया तुझे हात येता ,उगा फार बेचैन मग श्वास होतो..!

किती शेर लिहितो , किती दाद घेतो , उला छान होतो ,कडेलोट सानी,
मनातून माझ्याच आवाज येतो ,तुझ्या नावचा मिसरा खास होतो ॥

विनायक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<व्यथांचेच सारे महाभारताहे! कवी का फुकाचा कुणी व्यास होतो ?>>
क्या बात है, विनायक - ह्या कवितेनंतर काहीही वाचता येणं शक्यं नाही!

फारच सुरेख कविता.
आवडली. Happy

---------------------------------------------
अवांतर :
किती शेर लिहितो , किती दाद घेतो , उला छान होतो ,कडेलोट सानी,
मनातून माझ्याच आवाज येतो ,तुझ्या नावचा मिसरा खास होतो ॥

आश्चर्य आहे. माझ्या येऊ घातलेल्या नव्या गझलेतील एक शेर देखील असाच आहे की, त्यात हे तिन्ही शब्द वापरले गेले आहे.

गागागा गागागागा उला गालगा गागा
सानीगा लगालगागा ललगा मिसरे गागा

काय योगायोग आहे? बरे झाले ही कविता मी आधी वाचली नाही, नाही तर ही कल्पना म्हणून मला सुचली नसती आणि शेर राहून गेला असता. Happy

छान कविता.
"फुलोनी पहाटेस प्राजक्त येता ,मला जास्त होते धरेचेच देणे ,
पसरता सडा केशरी जाणिवांचा ,व्यथांना धरेचा सहवास होतो . ." >>> या ओळी विशेष वाटल्या.

fb वर वाचलीच आहे
इथेही वाचतानाही भन्नाटच मजा आली आहे

अशा शब्दकळेच्या कविता हल्लीचे कवी करत नाहीत फारश्या म्हणून मला तुमची ही कविता खूप विशेष वाटते