ऋतुराज – वसंत

Submitted by vaiju.jd on 3 May, 2013 - 12:45

॥ श्री ॥

‘हा वसंत रंग भरीत जगती येतसे पहा

बहरल्या दिशा दहा!

कोकीळा ही उपवनात ! अमृतमधुर गीत गात!

रम्य दिवस चांदरात , फिरत फिरत भृंग हा ॥ ‘

ऋतुराज! म्हणजे वसंतऋतु ! दहा दिशांना बहरून टाकत येतो हा ऋतुंचा राजा ! याच्या आगमनाच्या आधीच सुगंधाच्या रूपाने ढोल नगारे वाजायला लागतात.आणि मोहोर-पानांची फळाफुलांची तोरणे सगळीकडे स्वागत करायला लागतात.

गीतेत विभूतीयोगाच्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘ पृथ्वीवरचा ‘कुसुमाकर’म्हणजेच वसंतऋतु तो म्हणजे मीच !’

कोकिळा पंचमस्वर लावते, माधव जुलियन सारखा कवी म्हणतो, ‘ नकोत मजला विविध सुरांचे कृत्रिम हे हिंडोळ, कोकिळे ऐकव तव मधुर बोल!’ आणि कोकिळा काय म्हणते?

‘ऋतु वसंतातील कोकिल ‘कुहूकुहू’ बोले,पांडुरंग आले आले!’

अहो प्रत्यक्ष ‘हरी’ आलेला आहे.

होळीपासून वाढत चाललेल्या उष्म्यात, रखरखाटात झाडे,वेली, पशू, पक्षी त्रस्त होऊन गारव्यासाठी आसावलेले असतात. जमिनीवरची ओल सुकून गेलेली असते. दिवसभराच्या तापमानात चांगलाच बदल जाणवायला लागतो. पहाटे उबदार पांघरूण घ्यावेसे वाटायला लावणारी थंडी दुपारी ‘हायहाय’ करायला लावते. तपमापकाचे आकडे धडाधड बदलायला लागतात.

अश्या या वाढत्या तळपणाऱ्या उन्हात शिशिरात निष्पर्ण झालेल्या वृक्षांवर कोवळी कोवळी, तांबूस पोपटी पालवी नजाकत आणते. नुसती पालवीच नाही फुलेही बहरायला लागतात. रखरखित दुपारी पडदे ओढून थंडगार केशरी पन्ह्याचे किंवा वेलची सरबताचे किंवा गोडश्या जिराळ्या ताकाचे घुटके घेत असताना पडदा बाजूला करून जरा लांबवर नजर टाकून पहा. दूर कुठेतरी सांगाड्या सारखे उभे असलेले पळस,पांगारा , सावरी आपल्या अंगावर लाल, गुलाबी,केशरी रंगाच्या फुलांच्या असंख्य ज्योती पेटवून असतील.

आपल्या कोपऱ्यावरचा गुलमोहोर हिरवी पोपटी पालवी आणि अधेमधे उमलून आलेले केशरी तुरे घेऊन दिमाखात उभा असेल. किरमिजी तांबड्या फुलांचा गुच्छच जणू वाटणारी पलीकडची ‘शाल्मलीही’डोळ्यांना सुखावेल. गल्लीच्या टोकाला छोट्याश्या मंदिरावर सावली धरून असलेला बहावा,त्याचे सुवर्णरंगी पिवळे घोस घेऊन डोलत असेल. त्यातले चारदोन केसात माळून वनराणी व्हावेसे वाटते मला. शेजारच्या कुंपणाशी असलेला जॅकरांडा आपल्या फुलण्याचा स्वतःच उत्सव करत उभा असेल. आपल्या फाटकातला ‘सोनमोहोर’ही सजलेला पिवळ्या फुलांनी, यांचा रंग वेगळाच!शेवगा, करंजा,तामण, चाफा सारेच फुललेले, मोहरलेले!

संध्याकाळी दिवस उतरणीला आल्यावर वाऱ्याची झुळूक झुळझुळते.अशावेळी सुती साडी नेसून फिरायला बाहेर पडावे, व्यायामासाठी नाही हं!छान रमतगमत ,निसर्गातली रंगांची उधळण डोळे भरून पहात, आस्वाद घेत चालावे. प्रत्येक झाडाखाली वेगवेगळ्या रंगाच्या फुलांच्या पायघड्या घातलेल्या दिसतील. दयाळ, कोकीळ , भारद्वाज असे कोणी वसंत ऋतुत कंठ फुटलेले, गोड आवाजात तुमचे स्वागत करतील. एखाद्या बकुळवृक्षाखाली जरा टेकावे.वाऱ्याबरोबर जमिनीवर उतरणाऱ्या त्या ‘गंधचांदण्या’ ओंजळीत अलगद जमा कराव्यात. मन भरून सुगंध घ्यावा आणि नाजुकपणेच रुमालात जपुन ठेवाव्या. कारण बकुळींची फुले ही जपण्याची गोष्ट म्हणून तर कवी म्हणतो , ‘शब्द शब्द जपुन ठेव,बकुळीच्या फुलापरी!’ म्हणून जपावी.

कडुलिंबाखाली जरा रेंगाळावे. त्याच्यावरून आलेली हवा छातीत भरून घ्यावी. आला ना कडुलिंबाचा ‘मधुर’ वास! तो त्याच्या फुलमोहोराचा बरे कां !

वाटेत आम्रवृक्षावर वाऱ्याबरोबर झोके घेणारी हिरवीगार कैरी दिसेल. पहा बरे तिला पाहून कशाची आठवण होते? हिरवीगार साडी नेसून टपोर पोट संभाळत झोपाळ्यावर बसलेली पहीलटकर डोहाळकरीण आठवली नां ?

वाटेत सख्या भेटतील. बघा बघा. निळ्या, आकाशी, हिरव्या, पोपटी, मातकट पिवळ्या रंगाची त्यांची वस्त्रे डोळ्यांना कशी सुखावतात नां? कारण हे शांतरंग या ऋतूत मनालाही शांती देतात. त्यातल्या सखीनी केसात माळलेल्या मोगऱ्याचा सुगंध एकदम मन मोहून टाकतोय नां?अन हवेतला उष्मासुद्धा जरा कमी झाल्यासारखा वाटतोय.

या काळात दिवसाचा,उन्हाचा, तप्ततेचा काळ मोठा आणि शांततेची थंडाव्याची रात्र लहान! घामाने शरीराला थकवा, सूर्याची प्रखर किरणे भाजून टाकत असलेली, या काळात शरीरशक्ती क्षीण होते म्हणून सृष्टी आपला जीवनरस आंबे, फणस, काजू,कलिंगड, खरबूज करवंदे, जांभूळ,जाम अश्या सगळ्यातून भरभरून देत असते.

‘वसंतऋतु’म्हणजे समस्त सृष्टीला कवळणारा, हसवणारा, नटवणारा,रिझवणारा, तापवणारा, कोळपवणारा,सुकविणारा आणि तृप्त करणारा सृष्टीचा प्रियकर! ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

‘जैसे ऋतुपतीचे द्वार ,वनश्री निरंतर,

वोळगे फळभार,लावण्येसी!

कवी कालीदासानी वसंताला ‘योद्धा’ म्हटले आहे. मदनाची सर्व आयुधे घेऊन फुलविण्यासाठी आलेला योद्धा!

पण ,मंडळी खरे सांगू का , वसंत म्हणजे जीवनाचे प्रतिक! भगवंतांनी आपल्याला दिलेला धडा! जगत असताना दुःखाचा रखरखाट असणारच, त्याचे घाव बसणारच,आपले बळ, शक्ती कमी होणारच! पण त्यातही सुखाची फुले,आनंदाची पालवी, यशाची मधुर फळे असतातच, त्याकडे पहा. आनंददायक हिरव्या, निळ्या शांत रंगाकडे पहा.

रखरखाटाचा काळ हा परीक्षेचा असतो , जीवनातल्या आणि अध्ययनातल्याही! त्यात गोवर, कांजीण्या, अन्नवासना मरणे हे सगळे होणारच. पण शरीराला काही होऊ नये म्हणून जपता तसे मनाला अहंकाराचा गोवर,क्रोधाच्या कांजिण्या, दयाबुद्धीची वासना मरणे या विकारापासून वाचवा असे वसंत सांगतो.

वसंताच्या येण्याआधीच अनिष्ट रूढी, दुर्वासना,दुष्टबुद्धी या सगळ्याची ‘होळी’ केलीच आहे. आता सद्बुद्धी, सुवासना, नवीन संकल्पना याची ‘गुढी’उभारूया. तीजेला गौरीला झोपाळ्यावर बसवूयाच पण वर्षभर गौरीचेच रूप असलेल्या कुणाही स्त्रीबद्दल गैर बोलणार नाही, वागणार नाही तिचा आदर करू, असा वसा घेऊया.

संस्कृतीचा आदर्श राम, त्याचा जन्म साजरा करताना संस्कृतीची मूल्ये जपून तिचा ठेवा वारसदारांना पोहचवूया. आणि त्याच रात्री जन्म घेतलेल्या समर्थ रामदासस्वामीनी दिलेल्या नेटक्या प्रपंचाची शिकवण स्वतः आचरणात आणूया. हनुमानजयन्तीला पुढच्या पिढीला बलोपासनेचे महत्व पटवून देण्याचा संकल्प करूया. वसंतातला प्रत्येक दिवस सणाचा आणि विशेषत्वाने स्मरणाचाच असतो.

जशी आपले जीवन फुलवण्यासाठी वसंतात सृष्टी बहरते, निसर्ग फुलतो तसेच वसंताने आपले जीवन समृध्द करण्यासाठीही वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज आपल्याला दिले आहेत.’क्षत्रियकुलावतंस , गोब्राम्हण प्रतिपालक’छत्रपती शिवाजीमहाराज वसंतातालेच ! गुरुदेव म्हटल्याशिवाय ज्यांच्या नावाचा उच्चार करता येत नाही ते ऋषीतुल्य रवींद्रनाथ टागोर , जन्मांध कवी सूरदास ,संघशक्ती जागवणारे सरसंघ संचालक डॉ. हेडगेवार, फुलाची कोमलता आणि शस्त्राची कठोरता याचा अनोखा संगम ज्यांच्या जीवनात पहायला मिळतो ते देशभक्त क्रांतीकारक वि.दा. सावरकर, मराठी भाषेचे शिवाजी विष्णु शास्त्री चिपळूणकर, थोर किर्तनकार ह.भ.प. सोनोपंत दांडेकर, आद्यकवी वामन पंडीत, यातले प्रत्येक व्यक्तिमत्व एकापेक्षा दुसरे अगदी भिन्न असले तरी या सगळ्यांना बांधणारा दुवा म्हणजे ‘वसंत’!वसंतातल्या जन्मानेच यांची प्रतिभा आणि कर्तुत्व बहरले असावे.

‘वसंत’या शब्दातच काही जादू असावी असे वाटते कारण वसंत नांव असलेल्यांनीही वसंतऋतुप्रमाणेच आपली आयुष्ये समृध्दकेली आहेत. आपल्या जीवनात केवढा आनंद निर्माण केला आहे.साहित्यातले वसंत वसंत कानेटकर, वसंत काळे (व.पु. काळे), वसंत सबनीस ,वसंत बापट यांनी वसंत फुलविला. रंगभूमीवर आपल्या अभिनयाने वसंत नटवला वसंतराव देशपांडे, वसंत शिंदे , वसंत ठेंगडी यांनी,आपल्या जादुई सुरवटींनी मनामनातले वसंत फुलवले वसंत देसाई,वसंत प्रभू ,वसंत पवार यांनी.

असा हा वसंत ऋतु तुमच्या आमच्या जीवनात येतो, आनंद देतो,तेव्हा म्हणावेसे वाटते,

चोहीकडून तो वसंत येतो,हासत नाचत गाणे गातो

चराचरावर जादू करतो मनामनाला फुलवित येतो

पक्षीकूजन मधुर ऐकू येते , आसमंत हा गुंगुन जावा

फुलाफुलातून साद उमलते , वसंत घ्यावा वसंत घ्यावा……।

Group content visibility: 
Public - accessible to all site users