'फॅमिली ड्रामा' - गप्पा लेखक-अभिनेता अद्वैत दादरकर यांच्याशी

Submitted by माध्यम_प्रायोजक on 30 April, 2013 - 11:46

मानवी नातेसंबंधांचा थांग लागणं कठीण. ही नाती कायमच नाटककारांना भुरळ घालत आली आहेत.

वेगवेगळे विषय हाताळणार्‍या मराठी रंगभूमीवर दाखल झालेलं नवंकोरं नाटक 'फॅमिली ड्रामा' मानवी नात्यांना केंद्रस्थानी ठेवूनच काहीतरी सांगू पाहतं. आजच्या काळातल्या करमरकर कुटुंबाची ही कथा. जरासं विस्कटलेलं असं हे कुटुंब. 'खेळ नात्यांचा' ही दूरचित्रवाणी मालिका या घरातल्या गृहिणीचं सर्वस्व, तर कुटुंबप्रमुखाचा आपल्या मुलाशी फारसा संवाद नाही. मग एक दिवस हे चित्र पालटेल, असं वाटायला लावणारी एक घटना घडते.

अद्वैत दादरकर या तरुण नाटककारानं लिहिलेलं आशयघन पण हलकंफुलकं, मस्त मनोरंजन करणारं नवं नाटक म्हणजे 'फॅमिली ड्रामा'. या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे विजय केंकरे यांनी, तर निर्माते आहेत चंद्रकांत लोकरे. अजित भुरे, भक्ती देसाई, अद्वैत दादरकर, निखिल राऊत आणि सुकन्या कुलकर्णी यांच्या या नाटकात मुख्य भूमिका आहेत.

जुलै महिन्यात बोस्टन इथे होणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात हे नाटक सादर केलं जाणार आहे. या निमित्तानं पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात या नाटकाच्या प्रयोगादरम्यान हर्पेनharshalc या मायबोलीकरांनी अद्वैत दादरकर यांच्याशी गप्पा मारल्या.

Slide2.jpg

अद्वैत दादरकर या तरुण रंगकर्मीनं लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रांत अतिशय आश्वासक कामगिरी बजावून अल्पावधीतच नाव कमावलं आहे. कलेचा वारसा सांगणार्‍या कुटुंबातल्या अद्वैत यांनी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांपासून कारकिर्दीला सुरुवात केली. 'सवाई एकांकिका स्पर्धेत' सलग तीन वर्षं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं आहे. 'मिथक' या त्यांच्या संस्थेद्वारे ते नाटक सादर करतात. दि. बा. मोकाशी लिखित 'पालखी', विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं 'एक हट्टी मुलगी', रत्नाकर मतकरी लिखित 'जावई माझा भला' या नाटकांचं दिग्दर्शन अद्वैत यांनी केलं आहे. 'मायक्रोवेव्ह चकणा', 'तीच ती दिवाळी', 'चाफा' ही त्यांनी लिहिलेली व दिग्दर्शन केलेली महत्त्वाची नाटकं. अभिनेता म्हणूनही त्यांनी 'बॅरिस्टर', 'फॅमिली ड्रामा' या नाटकांमधून आपला ठसा उमटवला आहे.

P4181492.JPG

’बीएमएम’च्या अधिवेशनात सादर होणार्‍या प्रयोगासाठी तुम्ही काही खास तयारी केली आहे का? अमेरिकेतले प्रेक्षक आणि इथले प्रेक्षक यांच्या अभिरुचीत तुम्हांला नोंदवण्यासारखे काही खास फरक जाणवतात का?

अद्वैत - मी दिलीप प्रभावळकरांबरोबर 'वा! गुरू ' हे नाटक करत होतो. या नाटकाचे नऊ प्रयोग मी अमेरिकेत केले आहेत. पण त्यावेळी नेमकं बोस्टन हे एकच ठिकाण आमचं चुकलं, कारण तिथला आमचा प्रयोग तारीख पुढे गेल्यानं रद्द झाला होता. आता ’बीएमएम’च्या अधिवेशनाच्या निमित्ताने आम्हांला बोस्टनला जायला मिळेल. बाकी सगळ्या ठिकाणी खूप छान प्रयोग झाले, आणि मला खास फरक असा जाणवला की, अमेरिकेत लोक जास्त वाट बघतात मराठी नाटकाची. तिकडे 'वा! गुरू'चे जे काही प्रयोग झाले, त्यावेळी इतका सणसणीत प्रतिसाद आम्हांला मिळाला. मुंबई, पुणे, नाशिक इथेही आम्हांला असा प्रतिसाद कधी मिळाला नाही. संख्येनं नाही म्हणत आहे मी, 'दाद' या अर्थानं बोलतो आहे. तिकडचे प्रेक्षक दाद इतकी सुंदर देतात! त्यामुळे वेगळी तयारी अशी काही केलेली नाही.

प्रत्येकाला जवळचं वाटेल असं हे नाटक मी मुद्दाम लिहिलं आहे. त्यामुळे अमेरिका, मुंबई, पुणे इथल्या सामान्य प्रेक्षकाला हे नाटक आवडणारच. ते कनेक्ट होऊ शकतील असाच विषय आहे आणि तशाच पद्धतीनं तो मांडण्यात आलंय. त्यासाठी वेगळी तयारी करण्याची गरज नाहीये. या नाटकातला खरेपणा, ताजेपणा आम्ही प्रयोगामध्ये टिकवून ठेवणार आहोत.

दिग्दर्शक, लेखक, अभिनेता अशा विविध भूमिकांमधून तुम्ही प्रेक्षकांना भेटला आहात. यांपैकी कुठली भूमिका तुम्हांला सर्वांत जास्त भावते?

अद्वैत - खरं सांगायचं तर दिग्दर्शक, नट आणि लेखक या तीनही भूमिका मी सारख्याच एंजॉय करतो. मूळात मला नाटक हा प्रकारच विलक्षण आवडतो. त्यामुळे रंगभूमीशी संबंधित प्रत्येक काम मी मनापासून करतो. मी लाईट्सही केलेत. प्रकाशयोजना करणंही मी तेवढंच एंजॉय करतो.

तुम्ही सुरुवात प्रायोगिक नाटकांपासून आणि स्पर्धांमधल्या एकांकिकांपासून केली. आता व्यावसायिक रंगभूमीवर वावरताना फरक जाणवतो का?

अद्वैत - मी केलेल्या एकांकिका, किंवा प्रायोगिक नाटकं ही कधीच एका विशिष्ट बुद्धिवादी वर्गाला डोळ्यासमोर ठेवून केली नव्हती. अगदी क्वचित एखादं नाटक सामान्य प्रेक्षकाला रुचलं नसेलही, पण
मला नेहमीच माझं नाटक बुद्धिवादी प्रेक्षकांना आणि सामान्य रसिकांनाही आवडेल असं असावं, असं वाटतं. शेवटी नाटक प्रेक्षकांसाठीच करतो आपण. नाटकाला प्रेक्षक हवेतच आणि तीच तर मजा आहे. प्रेक्षकाची दाद आल्याशिवाय किंवा आपलं नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय कुठल्याही लेखकाला, नटाला, दिग्दर्शकाला ती मजाच येणार नाही. त्यामुळे तो बॅलन्स साधायला मला नेहमीच आवडलं आहे. मुळात मी स्वतः व्यावसायिक रंगभूमी, समांतर रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी, एकांकिका असा कुठलाही भेद करत नाही. माझ्यासाठी नाटक हे एक नाटक असतं आणि ती पूर्ण प्रक्रिया मी एंजॉय करतो.

'फॅमिली ड्रामा' हे नाटकही व्यावसायिक रंगभूमीवर सादर होतं आहे, म्हणून अंगविक्षेपांमुळे विनोदी, किंवा भावनांना हात घालणारं वगैरे नाही. यात मानवी नातेसंबंध आहेत. आजच्या बदलत्या वास्तवात बदलणार्‍या नात्यांबद्दल भाष्य आहे. प्रत्येक संवादाला काहीएक अर्थ आहे. पण विषयाची हाताळणी मात्र गंभीर नाही. आपल्या आजूबाजूच्या, घरातल्या व्यक्तीच रंगमंचावर वावरत आहेत, असं प्रत्येकाला वाटावं, अशाप्रकारे हे नाटक लिहिलं गेलं आहे.

तुम्ही दूरचित्रवाणीसाठी मालिकांचं लेखनही केलं आहे..

अद्वैत - हो, एक ’लक्ष्मणरेषा’ नावाची सिरीयल लिहिली आहे. अगदी खरं सांगायचं तर टेलिव्हिजन ही गोष्ट कुठलाही कलाकार पैशासाठी करतो. आणि मीही ते पैशासाठी करतो. कारण टेलिव्हिजनमध्ये पैसा प्रचंड आहे.

तुमचे मोठे बंधू ओंकार गायक आहेत. नाटक, संगीत हे तुमच्या घरातच आहेत. तुम्हांलाही संगीतक्षेत्रात काही करावंसं वाटलं नाही का?

अद्वैत - हो, मुळात आमच्या घरातच गाणं आहे. संगीतनाटक आणि संगीताची जास्त परंपरा आहे नाटकापेक्षा. माणिक वर्मा माझी आत्या. आईचे आजोबा विद्याधर गोखले हे लेखक. त्यांनी संगीतनाटकं लिहिली. त्यामुळे वाढलोय मी संगीतनाटकाच्याच वातावरणात. मला संगीताचा सेन्स आहे, पण मला खरंच नाही बरं गाता येत. त्यामुळे नाटक हेच माझं क्षेत्र.

पण संगीतनाटकांचं दिग्दर्शन?

अद्वैत - हो, संगीतनाटकांचं दिग्दर्शन मला करायला आवडेल. 'संशयकल्लोळ' माझं आवडतं नाटक आहे. पण एखादं जुनं संगीतनाटक पुन्हा करायला आवडेल की नाही, हे मला अजून सांगता येणार नाही. पण एखादं नवं संगीतनाटक करायला नक्कीच आवडेल.

घरात कलेचं वातावरण असलं तरी आईवडिलांकडून पाठिंबा लगेच मिळाला का?

अद्वैत - या बाबतीत मी खरंच सुदैवी आहे. मला घरून सदैव पाठिंबा होता. उलट मलाच स्वत:ला कधीतरी खचायला झालं की नको बाबा, एक नोकरी करतो.. पण अशा वेळेला मला उलट सांगितलं आईबाबांनी, की अजिबात नोकरी नाही करायची.. .हेच करायचं. आणि मुळात या क्षेत्रात यायचं असेल तर उपाशी राहण्याचीसुद्धा तयारी असायला पाहिजे. ती तयारी असेल, तरच या क्षेत्रात यावं. ग्लॅमरला भुलून येणारेही खूप असतात. या क्षेत्रात यायला वेगळी ताकद लागते, पाय जमिनीवर असावे लागतात. मी सुदैवी आहे की मला आयुष्यात माणसंही खूप चांगली मिळाली. चेतन दातार, सत्यदेव दुबे, राजीव नाईक, वामन केंद्रे, विजय केंकरे. स्वतंत्र विद्यापीठं आहेत ही माणसं. ही माणसं तुमच्या डोक्यात हवा जाऊ देत नाहीत, देत नसत.

लोकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांचं ओझं वाटतं का कधी?

अद्वैत - ओझं असं नाही, पण मला कधीकधी फ्रस्ट्रेशन येतं. जेव्हा मी तरुणांच्या संवेदनांची, धीटपणाकडे झुकणारी नाटकं लिहीत होतो (उदा. मीटर डाऊन), तेव्हा माझ्यावर अशी टीका होत होती, याची नाटकं सहकुटुंब येऊन बघण्यासारखी नसतात आणि त्यामुळे ती चालत नाहीत. याच्या नाटकांमध्ये शिव्या असतात, मुली दारू पितात इत्यादी. आता अशी नाटकं मी केवळ सनसनाटी काही म्हणून लिहीत नव्हतो. आजचं वास्तव आहे ते. मग माझ्यावरचे हे आरोप खोडून काढायला मी ठरवून व्यावसायिक नाटकं लिहिली. सर्वांना एकत्र बघता येतील अशी. प्रत्येक प्रकारची नाटकं लिहिता यायला हवीत, प्रत्येक नाटक जमलं पाहिजे, असं ठरवून मी ही नाटकं लिहिली.

पण खरंतर हा दोष नाही. प्रत्येक लेखकाची जातकुळी वेगळी असते.

अद्वैत - हो, पण सर्वांना आवडेल असं लिहिणं अवघडही आहे. त्यामुळेच मी व्यावसायिक नाटकांकडे वळलो. पण म्हणून मी प्रायोगिक रंगभूमी सोडणार नाही. उलट आत्ता माझ्या डोक्यात जे विषय चालू असतात ते तरुणांचेच असतात. फ्रस्ट्रेशन याचं येतं, की माझ्या नाटकांवर टीका करणारे लोक ’अद्वैतकडून वेगळ्या अपेक्षा आहेत.. त्यानं व्यावसायिक नाटक का लिहिलं?' असं बोलतात. या अशा अपेक्षा कधीच पूर्ण करू शकत नाही आपण. त्यामुळे आपण आपलं काम करत राहावं.

तुमच्या आगामी योजना?

अद्वैत - मला 'मिथक' या आमच्या संस्थेकडून वेगवेगळी नाटकं करायची आहेत अजून खूप. खूप चांगली तरुण मंडळी आमच्या बरोबर आहेत, तीस पस्तीस जणांचा ग्रूप आहे आमचा. प्रायोगिक नाटक आम्ही करत असतो. दरवर्षी आम्ही एक नाटक आणायचा प्रयत्न करतोच. 'मायक्रोवेव चकणा', 'पालखी' अशी खूप वेगळ्या पद्धतीची नाटकं आम्ही सादर केली आहेत. दुसरं म्हणजे 'सुयोग' संस्थेसाठी मी एक नवीन नाटक बसवतोय. अशोक सराफ मुख्य भूमिका करणार आहेत. ते जून-जुलैमध्ये येईल.

यावेळी अधिवेशनाची थीम आहे ’ऋणानुबंध’. तुमचे कोणाबरोबर जुळून आलेत आयुष्यात आत्तापर्यंत?

अद्वैत - सगळ्यांत जास्त मला आठवण येते ती चेतन दातारची. अगदी सुरुवातीला दिग्दर्शनाची कार्यशाळा त्यानं 'आविष्कार'मध्ये घेतलेली मला आठवतंय. सुंदर वर्कशॉप होतं ते. त्यानं शिकवलेलं आजही मी चुकत नाही. त्याच्याबरोबर काम करताना त्यानं नाटकातला खरेपणा बाहेर काढणं, हे अप्रतिम शिकवलं. फार लवकर गेला तो. एकूण प्रायोगिक रंगभूमीचं मोठ्ठं नुकसान झालं त्यामुळे.

मी एकदा जेव्हा म्हटलं की, नको बाबा, मला अभिनय येतच नाही, मी दिग्दर्शक किंवा लेखकच होतो, तेव्हा अभिनेता म्हणून मला जर कोणी घडवलं असेल तर ते विक्रम गोखले यांनी. 'जावई माझा भला' या नाटकात मी त्यांना दिग्दर्शित केलं होतं, आणि नंतर 'बॅरिस्टर'मध्ये त्यांनी दिग्दर्शन केलं. अप्रतिम, समृद्ध करणारा अनुभव. जयवंत दळवींच्या प्रत्येक वाक्यात केवढा खोल अर्थ आहे! असं नाटक त्यांच्याकडून समजून घेऊन करणं, हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं. लेखनाच्या बाबतीत विजय तेंडुलकर आणि इरावती कर्णिक यांनी मला खूप दिलं. तेंडुलकरांनी थेट शिकवलं नाही, इरावतीनं वर्कशॉप घेतलं होतं आमचं.

***

टंकलेखनसाहाय्य - मंजूडी व आर्फी

***

छायाचित्रं - हर्पेन व harshalc

***

'फॅमिली ड्रामा' या नाटकाचे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठीचे प्रायोजक आहेत 'सुगी ग्रूप' (http://www.sugee.co.in/).

***
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*

अद्वैत दादरकरचं काम 'जावई माझा भला' मध्ये पाहिलं होतं. विक्रम गोखले, अमिता खोपकर सारख्या जेष्ठ कलाकारांसमोरही त्याचा अभिनय उठून दिसला होता. नाटक नक्कीच चांगलं असेल.

फॅमिली ड्रामा आवडले. वेगळा विषय छान हाताळला. सुकन्या कुलकर्णीचे काम सुरेख झाले. अद्वैत दादरकर आजोबांची (विद्याधर गोखले) गादी चालवत आहे.