आमचा लॅपटॉप, संकेतस्थळ आणि खळबळजनक घटना

Submitted by सन्नाटा on 20 April, 2013 - 09:37

प्रस्तावना :

झोपल्यानंतर डोळे उघडतील कि नाही असं कधी वाटलं नाही. डोळे कुठे उघडतील असंही कधी वाटलं नाही. माझे
डोळे उघडावेत असं नातेवाईकांनी आधी आईला आणि आता बायकोला सांगूनही उपयोग न झाल्यावर सर्वांनी सोडून दिलं. काहींनी आपल्या मुलांना माझ्यापासून लांब्ब ठेवायला सुरूवात केली. ते सगळं वेगळ्या वृ देऊच.

आम्हाला झोप कधी लागते हे कधीच कळलं नाही. झोपण्याच्या आधीचंही कळत नाही. हे असं का होतं याचा ठपका आमच्या काही सबयींशी लावण्याची पत्नीची सवयही न कळणारी. एकदा वेगळं घडलं आणि डोळे खाडकन उघडले. त्याचा हा वृत्तांत

सारांश :

कधीतरी झोपलो आणि उठलो तेव्हां डोळे उघडले. किंवा डोळे उघडले तेव्हां उठलो.

वृत्तांत :

झोप लागली तेव्हां लॅपटॉप चालू होता असं नंतर निष्पन्न झालं.

कदाचित मी कुठल्या तरी संकेतस्थळावर होतो. मॉनिटर चालू ठेवून झोपू नये हे माहीत नव्हतं. पुढे ज्या घटना घडल्या त्यांची नोंद पोलीस स्टेशनच्या डायरीला तपशीलवार आहे.

पो. स्टे डायरी:

१. पत्नीच्या हस्ताक्षरातली तक्रार. वेळ रात्रौ २ वाजून ४ मिनिटे. या वेळेला पहाटे असंही म्हणतात ही नवीन माहिती कळाली.

२. पत्नीचा पती म्हणजे अस्मादिक, झोपेत गायब झाले. घराचं दार आतून बंद. आत यायला जायला एकमेव मार्ग. खिडक्याच्या बाजूने उतरल्यास कपाळमोक्ष. कुणाला पोएटिक लिबर्टी घेऊन उतरायचे झाल्यास जबाबदार नाही.

३. पत्नीचा पती अर्थात अस्मादिक यांची प्रतिभा झोपण्यापूर्वी तरल झाली असली तरी काही गोष्टी नंतर जबाबात नोंदवल्या आहेत. त्यांची तारीख दुस-या दिवशी सकाळची पडलेली दिसते.

पोलीस ठाणे अंमलदाराचा शेरा

बाईंचा गायब झालेला नवरा सापडला आहे. घराला कडी असताना तो बाहेर कसा गेला हे समजत नाही. जबाब असंबद्ध आहे. वैद्यकिय तपासणीसाठी पुढील कार्यवाहीकरिता
( टीप : उपकरण न लावताही भपकारा आला. ओळखीचा आणि सवयीचा असूनही सहन झाला नाही)

इथे वास्तविक प्रकरण मिटायला हवं होतं.
पण पत्नीचा संशय फिटला नव्हता. आमच्यावर अनेक जणांना अनेक कारणांसाठी संशय आहे याची जाणिव आहे. त्या तालमीचा थोडाफार फायदा झाला. चेहरा शक्यतो स्थितप्रज्ञ ठेवत न्यायालयीन चौकशीला सामोरा गेलो.

पत्नी महिला या वर्गात मोडत असल्याने तिने एका डॉक्टरास पाचारण केले होते. हे साहेब त्याच संकेतस्थळावर असतात हे मागाहून कळाले. अशी काही यंत्रणा माझ्या पाठीमागे विकसित झाल्याचे कळाले नाही. ( हे डॉक्टर प्रॅक्टीस करत नसावेत असा संशय आहे).

डॉक्टरांच्या दोन सहाय्यकांनी ( हे पुरूष असतील याची खबरदारी बहुतेक पत्नीने घेतली असावी) मला धरून खुर्चीत बसवले. त्यातला एक जण सारखा फिदी आणि हहगलो अशा स्मायल्या टाकत होता. मग एका बल्लवाचार्यांनी मला बांधले. यावर डॉक्टरांनी इजेक्शन देण्याची तत्परता दाखवल्याने पुढचा भाग इतरत्र मिळवून वाचावा लागला.

------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉक्टर क्यू- ब्लीच यांचा वैद्यकीय अहवाल :

अनेक दिवसांनी प्रत्यक्ष जिवंत माणूस तपासला. खरं बोलण्याचा एक डोस दिला. पण मात्रा चालेना. मग पो स्टे अं चा वैद्यकीय अहवाल फोनवरून विचारला. त्यात जे रासायनिक द्रव्य सापडल्याचं नमूद केलं त्यासाठी एका रासायनिक प्रयोगशाळेत फोन केला. त्यांनी हे द्रव्य कुठं मिळतं हे माहीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. एका वारुणीकेंद्रावर ते मिळाल्याने काम झालं बल्लवाचार्यांची या कामी मदत झाली. अंमलाखाली खालीलप्रमाणे कबुलीजबाब मिळाला.

------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्न विचारताना डॉक्टरांचा आवाज अलका धुपकर सारखा का यावा हे कळालं नाही.
प्रश्न : - हॅलो, त्या दिवशी काय झालं होतं आठवतं का ?
उत्तर - कधी :
प्रश्न :- ज्या दिवशी तुम्ही लॅपटॉप चालू ठेवून टेबलावर डोकं ठेवून झोपला होतात ?
उत्तर :- ते रोजच होतं
प्रश्न :- पण रोज घरातून गायब नाही होत ना ?
प्रश्न :- हॅलो, हॅलो, हॅलो, कुठे गेलात ? परत या
उत्तर :- त्या दिवशी अं. हो. जरा जास्त झाली होती.
प्रश्न :- बोला
उत्तर :- एक संकेतस्थळ चालू होतं
प्रश्न : - बोला
उत्तरः- खूप उजेड झाला. मी आत गेलो.
प्रश्न : - कुठे गेला ?
उत्तर :- मी संकेतस्थळात गेलो
प्रश्न :- बोला
उत्तर :- मी एका बंद खोलीत होतो जिथे भल्या मोठ्या फळ्यावर एक गझल लिहीली होती. अनेक लोक त्या फळ्याखाली उभे राहून ती वाचून मारामारी करत होते. तिथल्या छोट्या छोट्या फळ्यांवर काही लिहीत होते.
प्रश्न : बोला
उत्तर: - मग एका व्यक्तीने खूपच मोठ्या अक्षरात लिहायला सुरूवात केली. त्यात अनेक अनाकलनीय शब्द येऊन गेले. सौंदर्यबोध, काव्यबंध, काव्यानंद, मिर्झा गालिब यांचे आलेले पत्र.
प्रश्न : - बोला
उत्तर :- माझ्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या आणि मी अंगावर धावून जाणार तोच त्याने एक काळं कुत्रं अंगावर सोडलं. छू म्हणायचा अवकाश, कुत्र्याने खूप ठिकाणी चावे घेतले. ते बिनशेपटीचं असल्याने हातातही आलं नाही.
प्रश्न : -कुत्र्याचा उल्लेख नको. माझा सहाय्यक अस्वस्थ होतोय. आता बोला.
उत्तर :- मी कसा बसा पळालो. दुस-या खोलीत गेलो. इथे वातावरण सभ्य दिसत होतं सगळे हसत होते. या खोलीची रचना अशी होती कि कुठे काय चाललं आहे हे त्यांना दिसत होतं, पण खोलीतले इसम कुणालाच दिसत नव्हते.
प्रश्न : - बोला
उत्तर : - मी तिथे गेल्यावर सिंहासनावर बसलेल्या बाईंनी एक भिवई वर करून इतरांकडे कटाक्ष टाकला (इथे महिलाराज्य होतं असं वाटत होतं ). त्यांनी जाजम खराब होतोय, पाय धुवून या असं सांगितलं. मी बाथरून कुठे आहे असं विचारताच त्यांनी एका खोलीकडे बोट दाखवलं
प्रश्न : - बोला
उत्तर : - त्या बाथरूम च्या दारावर गप्पा मारण्याची जागा असं का लिहीलं होतं हे कळालं नाही. आत गेलो तर एका गो-यापान युवकाचा हार घातलेला फोटो पाहून दचकलो. हे काय याची चौकशी करताच जिया नावाची कन्या उत्साहाने माहिती देऊ लागली. या देखण्या युवकाने इथे मालकी हक्क सांगितल्याने या संपूर्ण संकुलाच्या व्यवस्थापकाने त्याचा खून केला असं म्हणतात.
प्रश्न : पुढे बोला
उत्तर : पुढे काय डोंबलं. तेच बोलत होते ४०३८९ बघ. काय एकेक नमुने असतात. परमेश्वराने कॉमनसेन्स वाटला तेव्हां काही लोक कुठे गेलेले असतात कोण जाणे ?
यावर दुसरी म्हणाली सेमीकॉलन हाहा सेमीकॉलन
मग एक म्हणाली, आपल्यापैकी कुणीतरी लिहीलं पाहीजे तिथं.
यावर अनुमोदन असा सामूहिक हुंकार झाला
एक लाडीक आवाजात बोलणारी महिला सिंहासनावरच्या बाईंना कुणीतरी सेन्सीबल पोस्ट टाकून या प्लीज म्हणाली.
सिंहासनाधीश महिला स्थितप्रज्ञासारखी ढिम्म होती. तिची एक भिवई के एन सिंगसारखी वारंवार वर जात होती. माझ्या अस्तित्वाचा त्यांच्यावर यत्किंचितही परिणाम झाला नव्हता. रामगोपाल वर्माच्या पडीक सिनेमातलं भूत कुणालाच दिसत नाही तशी माझी अवस्था झाली होती.
अचानक बायकी बावळटपणा सोडा आणि तलवार उपसा असा आदेश सिंहासनावरून आला. त्याबरोबर मी लपायला काय सापडतय हे पाहील<
प्रश्न : -बोला
उत्तर -एक मोठी चह्ची किटली दिसली. त्यात जाऊन बसलो.
प्रश्न : - बोला
उत्तर - एका स्वप्नाळू महिलेने झोपेत असल्यासारखं ती किटली खिडकीतून बाहेर ओतून दिली. शिळा चहा नको बाई असं पुटपुटल्यासारखं ऐकू आलं.
प्रश्न :- बोला
उत्तर : - आताची खोली अरुंद आणि कोंदट होती. कॉफी मिळेल असा बोर्ड आणि त्याचखाली कुणी आहे का ? असं कुणीतरी लिहीलेलं. तारीख वर्षापूर्वीची होती. दार उघडून बाहेर आलो.
प्रश्न : बोला
उत्तर : पुढचं अं अं डोकं दुखतंय
प्रश्न : ठीक आहे. तुम्ही पुन्हा कसे आलात ते सांगा.
उत्तर : बाहेर आलो तेव्हां तेच काळं कुत्रं वाट पाहत होतं. त्याला पाहून मी जोरात पळू लागलो. त्याबरोबर ते ही जीभ बाहेर काढत मागे लागलं.
प्रश्न : - बोला
उत्तर :- पळता पळता मी एका जेलीमय तलावात पडल्याचा भास झाला. त्यात दिवेच दिवे होते
प्रश्न :- बोला
उत्तर : काय बोला ? नंतर मी पोलीस स्टेशनला असल्याची आठवण आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉक्टरांच्या अहवालाने संशय निवळला असावा असं वाटत असलं तरी खाजगी गुप्तहेराची मदत घेतली जाणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजलेले आहे.

निष्कर्ष :

१. आभासी दुनियेत झोपू नये. ओढून घेतलं जातं
२. ओढून घेतल्यावर आपले डोळे उघडतात. आपली आपल्याला नव्याने ओळख होते ( जागा दाखवली जाते).
३. ई चावा हा प्रत्यक्ष घेतला जातो. जखमी माणूस बदनामीच्या भीतीने तक्रार देत नाही
४. सर्व प्रकारच्या चतुष्पाद प्राण्यांस मुक्तपणे बागडण्याची सूट असते. दोन पायांच्या प्राण्याकडून चूक झाल्यास सिंहासनाधीश महिला नाराज होतात.
५. वाटेत अनेक खाण्या पिण्याच्या जिन्नसा दिसल्या. पकडायला आलेले बल्लवाचार्य इथे पाकृ समजावून सांगताना इथल्या सर्व खोल्यात सर्व वाहीन्यांवर दिसत होते.
७. संकुलातला पुढचा वृत्तान्त पंधरा दिवसांच्या ब्रेकनंतर टाकण्याचे ठरले. अस्मादिकांना ठरवण्याचा अधिकार नसून पत्नी, क्यूब्लीच डॉक्टर यांचे म्हणणे तसे पडले.

अत्यंत महत्वपूर्ण बाबी :

(क्रमश:)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचले, लेखकाच्या भावना मला समजल्या असे वाटतेय, अन म्हणूनच प्रतिसाद म्हणून माबोवरच्या एका लेखाची लिंक देतो.
http://www.maayboli.com/node/42319
जरूर वाचा, अन तिथे प्रतिसाद देखील द्या.