अधीरता सोय-यांतली, त्या कलेवराला दिसून आली!

Submitted by कर्दनकाळ on 10 April, 2013 - 15:16

अधीरता सोय-यांतली, त्या कलेवराला दिसून आली!
कळायच्या आत पार त्याची चिता पहा बेचिराख झाली!!

अता कुठे रंग जीवनाचे जरा जरा लागलेत बदलू.....
अशात ही भैरवी सुचवते.....अरे तुझी सांगताच झाली!

टवाळखोरांस भोवतीच्या बघून होऊ कशास दु:खी?
कमळ कधी का करेल कुरबुर? किती चिखल हा सभोवताली!

मला स्मशानात पोचवाया किती दिशांतून लोक आले....
गढून गप्पांत सर्व गेले! कुणी न पुसली मला खुशाली!

करायला जे हवेच होते, करून ते मी कृतार्थ झालो!
तुझीच मर्जी, तुझीच दु:खे, तुझी मला बक्षिसी मिळाली!!

जरी न तू बोललीस काही, जरी चुकवलीस तू नजरही;
तुझ्या मनातील गूज सांगे तुझ्याच गालावरील लाली!

सबंध आयुष्य हे प्रसिद्धीविनाच चुपचाप काटले मी!
अशी कशी भव्य प्रेतयात्रा घरातुनी माझिया निघाली?

******कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा !
(गझलप्रेमी मध्ये प्रेम होतं. कर्दनकाळ मधे धसका !. रच्याकने आधीचा आयडी का गेला हे कळालं नाही)

गझल चांगली आहे

मला स्मशानात पोचवाया किती दिशांतून लोक आले....
गढून गप्पांत सर्व गेले! कुणी न पुसली मला खुशाली!

यातील "किती दिशांतून" चा नक्की अर्थ काय आहे शेरात?

या चर्चा होतात हे छान आहे. गझलुमियां यांचा प्रश्न आवडला. मत व्यक्त करण्याआधी कवीचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचं खरंच कौतुक. कवीचं मत पटलं न पटल्यावर आपलं मत व्यक्त करण्याची ही प्रथा आवडली.

"किती दिशांतून" चा नक्की अर्थ काय आहे शेरात?<<<<<<
असंख्य दिशांतून!
टीप: दिशा संख्येने अनंत असतात!

एखाद्याला पोचवायला म्हणून स्मशानात आलेली माणसे आपण येथे कोणासाठी आलो आहोत याचे भान न ठेवता एकमेकांशी गप्पा मारत बसले आहेत असा काहीसा चांगला अर्थ शेरातून मिळतोय,

मला किती दिशातून याचा शब्दार्थ नको होता. त्या शेरात किती दिशातून/असंख्य दिशातून/अनंत दिशातून असे का म्हटले गेले आहे/ त्याची काय आवश्यकता होती याचे कुतुहल होते. असो...

मला किती दिशातून याचा शब्दार्थ नको होता. त्या शेरात किती दिशातून/असंख्य दिशातून/अनंत दिशातून असे का म्हटले गेले आहे/ त्याची काय आवश्यकता होती याचे कुतुहल होते. असो...<<<<<<<<<<

मला स्मशानात पोचवाया किती दिशांतून लोक आले....
गढून गप्पांत सर्व गेले! कुणी न पुसली मला खुशाली!<<<<<<<<<<

जिवंतपणी आमचा जनसंपर्क खूपच होता, ज्या लोकांना मी आपले मानायचो. किती दिशांतून यात असंख्य दिशांतून , असंख्य क्षेत्रांतून असे सुचवायचे आहे जेणे करून आमचा वावर अनेक दिशांनी, अनेक क्षेत्रांतून होता हे सूचीत करायचे आहे! पण मेल्यावर आम्ही स्मशानात पाहिले की, ज्यांना आम्ही आपली माणसे मानायचो, ज्यांच्यात उठलो, बसलो, त्या लोकांना विशेष सोयरसुतक नाही! केवळ एक उपचार/शिष्टाचार म्हणून ते हजर राहिले होते! ते एकमेकांशी गप्पा मारण्यात इतके मशगूल दिसले, की जणू त्यांना निवर्तलेल्या माझ्याशी काहीही देणेघेणे नव्हते!

टीप: आम्ही स्मशानात जमलेल्या लोकांना थट्टामस्करी करताना पाहिले होते, म्हणून हा शेर असा लिहिला गेला! असो. आमच्या गुरूंची एक ओळ आठवली.....कोणीच विचारत नाही माणूस कोणता गेला....असे काही तरी असावे.

"कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला" अशी ती ओळ आहे, या शेरातील पहिली ओळ आहे " पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना"........... यात जे सांगायच ते अगदी स्पष्टपणे आणि अर्थातच नेमक्या शब्दात सांगितलेले आहे.

>>आम्ही स्मशानात जमलेल्या लोकांना थट्टामस्करी करताना पाहिले होते, म्हणून हा शेर असा लिहिला गेला<<
>>ज्यांना आम्ही आपली माणसे मानायचो, ज्यांच्यात उठलो, बसलो, त्या लोकांना विशेष सोयरसुतक नाही! केवळ एक उपचार/शिष्टाचार म्हणून ते हजर राहिले होते! ते एकमेकांशी गप्पा मारण्यात इतके मशगूल दिसले, की जणू त्यांना निवर्तलेल्या माझ्याशी काहीही देणेघेणे नव्हते!<<

हे आणि एवढंच सांगायचे आहे त्यासाठी `आमचा जनसंपर्क किती होता आणि किती दिशांमध्ये होता" हे अनावश्यक नाही का वाटत?

अवांतर : सुरूवातच या शब्दाने करतोय. गझलेचा बाफ म्हटल्यावर मुद्दाम अवांतर लिहीणे हे पण रिटर्न परत येण्यासारखंच झालं. तर स्मशानातल्या गप्पांवरून आठवलं. एका अंत्ययात्रेला गेलो होतो. अक्षरशः पोट धरून हसण्यासारखे प्रसंग घडले. महामुश्किलीने कंट्रोल केले. बाबूराव त्यावर एक कथा लिहीत होते, पण मी कधीच कुणाला तुझ्या बापाने कधी गझल लिहीली होती का असा बेसिक प्रतिसाद न दिल्याने माझा आयडी गेला आणि इथे कथा पूर्ण करायची नाही हे बाबूरावांना मी निक्षून सांगितलं. हे तर अगदी अवांतर झालं. पण चालायचंच. बाफ गझलेचा आहे. त्यातून प्रोफेसरांचा. मग काय, बघायलाच नको !

तर स्मशानातही थट्टा मस्करी हल्ली सर्रास दिसते. लोक केवळ उपचार म्हणून पोचवायला येतात. जवळचे रडत असतात. व्यक्ती तरूण असेल तर दु:खं जरा अधिक असतं. मोठी असेल तर वातावरण गंभीर असतं, इतकंच. एरव्ही स्मशानात माणसांचे थवे वेगवेगळे बसलेले असतात. तरुणांच्या गटात हलक्या आवाजातले विनोद, गुटखा, तंबाखू चालू असतं ( घाबरू नका, हे सुशिक्षितांबद्दल नाहीये). म्हातारे चेह-यावर कुठलेही भाव नसल्यासारखे असतात. एखादा उगाचच इतरांना घाई करत असतो. कुणीतरी अती रडणा-या बाईला रागावून गप्प करत असतो. हल्ली गावातही पूर्वीसारखे हळहळणारे लोक कमीच दिसतात. एकदा तर स्मशानातून थेट हॉटेलात आम्ही वीस पंचवीस जण गेलो होतो. स्नान वगैरेही आता बाद झालंय. फार ताठवलं राव या अमक्याने ही मयताच्या नातेवाईकाची प्रतिक्रिया होती.

अवांतर : अवांतर संपलं. बाबूरावांची कथा ब्लॉगवर येईल ही रिक्षा समजली तरी हरकत नाही. शेवटी धागा गझलेचा आहे.

आलेल्या लोकांची विपुलता पण भावनांची/नात्यांची कमतरता हे अधोरेखित करायचे असल्याने वरील शब्दयोजना!
अवांतर.....आमचा एक मतला आठवला.......

झाडे चहूकडे पण, छाया कुठेच नाही!
गर्दीत माणसांच्या माया कुठेच नाही!!

जिवंतपणी आमचा जनसंपर्क खूपच होता >>>
पण मेल्यावर आम्ही स्मशानात पाहिले की >>>>
त्यांना निवर्तलेल्या माझ्याशी काहीही देणेघेणे नव्हते! >>>

Uhoh

अहो
कका काका, कुणालातरी काहीतरी कळवायचं. कसं कळणार काव्यरसिकांना ?

मला स्मशानात पोचवाया किती दिशांतून लोक आले....
गढून गप्पांत सर्व गेले! कुणी न पुसली मला खुशाली!

लोकांनी एकमेकांशी गप्पा न मारता स्मशानात आणलेल्या प्रेताला त्याची ख्यालीखुशाली विचारायला हवी होती ही मागणी अशास्त्रीय, तर्कविसंगत व त्यामुळे इब्राहिम फैज यांच्या शिकवणूकीचा उपमर्द करणारी वाटत आहे.

कळावे

गं स

मुंगी उडाली आकाशी,

माती व्याली घार झाली

चाफा बोलेना, चाफा चालेना
चाफा खंत करी काही केल्या बोलेना

आपुले मरण पाहीले म्यां डोळा

अगागागा...