अधिवेशनामागचे चेहरे: श्री. अविनाश पाध्ये

Submitted by समीर on 2 April, 2013 - 10:54

बृह्न्महाराष्ट्र मंडळाच्या २०१३च्या अधिवेशनाच्या संयोजनात सक्रीय असणार्‍या, श्री. अविनाश पाध्ये यांच्याशी नुकताच संवाद साधायची संधी मिळाली.
AP.jpgनमस्कार अविनाश, अधिवेशनाच्या संयोजनात तुमची नेमकी भूमिका काय आहे?

श्री. पाध्ये : या अधिवेशनाच्या संयोजनात माझी भूमिका को-कन्व्हेनर ही असली असली तरी सर्वांनी एकाच पातळीवर येउन काम करणं, हे सगळ्यांत महत्त्वाचं असतं. मुख्यत्वेकरून फॅसिलिटी, एक्स्पो, रजिस्ट्रेशन आणि फायनॅन्स या समित्यांचा समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे.

हे जे तुमचे तीन विभाग आहेत त्यात ताज्या घडामोडी काय आहेत? म्हणजे सध्या वाचकांना काय सांगू शकाल?

श्री. पाध्ये: आता ताजी घडामोड म्हणायची तर सर्वात महत्त्वाचे असते, ते रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे आणि उत्साह भरपूर दिसून येतोय, त्यामुळे प्रतिसाद चांगला मिळतोय. ५०% रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे आणि अधिवेशनातील सर्व कार्यक्रमसुद्धा निश्चित झाले आहेत. भारतातून येणार्‍या कार्यक्रमांच्या 'व्हिसा पेटीशन्सना' अप्रुवल्ससुद्धा मिळाली आहेत, त्यामुळे साहजिकच हुरुप वाढला आहे. अर्थातच 'मायबोली'नेदेखील यात खूप मोठा हातभार लावला आहेच. आता रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही मुख्यत्वेकरून ऑनलाइन असल्याने, कितीही नाही म्हटले तरी बारीकसारीक अडथळे येउ शकतात. सामान्यत: जे प्रश्न विचारले जातात त्यांची सूची करुन लावली असली तरीसुद्धा सर्व शंकांचे निरसन 'FAQ'मधून होऊ शकत नाही. त्यामुळे अनेकांशी फोनवरून संपर्क साधून आमची रजिस्ट्रेशन टीम त्यांना योग्य ती मदत देत आहे.

फॅसिलिटीबद्दल बोलायचे तर, अधिवेशनाच्या सर्व प्रमुख कार्यक्रमांची सोय ही 'डंकीन डोनट सेंटर'मध्ये केली आहे. डंकीन सेंटर हे एक आइस हॉकी आणि बास्केटबॉलचा अरीना आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या मेनस्टेजला जी व्यवस्था लागू शकते त्यापेक्षा निश्चितच वेगळी. त्यामुळेच वेगळ्या प्रकाराने स्टेजची उभारणी / मांडणी करून, प्रेक्षकांना जवळून कार्यक्रम बघण्याचा अनुभव द्यायचा आमचा प्रयत्न आहे. या डंकीन सेंटरचे खास वैशिष्ठ्य म्हणजे, मध्यावरती असलेला जंबोट्रॉनचा भव्य स्क्रीन. त्यावर कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण आम्ही अर्थातच करणार आहोत की जेणेकरून सगळ्यांनाच कार्यक्रमांचा आस्वाद अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल.
आता तंत्रज्ञान बदलत चालले आहे, त्यामुळे कार्यक्रमांच्या गरजासुद्धा बदलताहेत, त्यामुळे उपलब्ध असलेल्या तंत्रांचा वापर करून कार्यक्रम अधिक उठावदार कसे करता येतील, याची फॅसिलिटी टीम सातत्याने विचार करून त्या दिशेने योग्य ती पावले उचलत आहे. प्रॉजेक्शन या तंत्राचा वापर करून 'सारेगम'च्या अंतिम फेरीचा सोहळा सादर करण्याचा आमचा विचार असून त्या दृष्टीने पावले उचलली जाताहेत. तसेच 'संगीत मानापमान' या शंभर वर्षांपूर्वीच्या नाटकातसुद्धा प्रॉजेक्शन तंत्राचा वापर केला जाणार आहे. हे नाटक खासकरून प्रेक्षकांना एक पर्वणीच ठरणार आहे. हे नाटक म्हणजे, सर्व तरूण मंडळींनी सादर केलेला असा एक उत्कृष्ट अविष्कार आहे. आज अनेक लोकांच्या मनात संगीत नाटक म्हणजे १९७०-८० सालांत बघितलेलं संगीत नाटक असे समीकरण असेल; मीसुद्धा त्यातलाच. पण गेल्या नोव्हेंबरमध्ये हे नाटक मी भारतात गेलो असताना बघितले आणि मनापासून सांगतो की I was pleasantly surprised! संगीत नाटकाबद्दलची माझी समजूत किती चुकीची आहे, हेच त्या प्रयोगाने दाखवून दिले. त्यामुळेच हा असा दर्जेदार कार्यक्रम आपल्या प्रक्षकांपर्यंत अधिक चांगल्या तर्‍हेने कसा पोहोचवता येईल, याची आम्ही काळजी घेत आहोत.

पूर्वीच्या काहीकाही अधिवेशनांना हा प्रश्न आला होता की नाटकांचे, कार्यक्रमांचे आवाज नीटपणे पोहोचत नव्हते सगळ्यांपर्यंत. त्यासंदर्भात काही केलंय का?

श्री. पाध्ये : प्रयत्न तर जोरदार चालू आहेत. प्रेक्षकांना तसेच कलाकारांना कमीत कमी त्रास व्हावा या हेतूनेच शिकागो फॅसिलिटी टीमचा वेळोवेळी सल्ला घेतला. शिकागोचे श्रीधर जोशी याची खूप मदत आम्हांला झाली आहे. त्यांच्या टीमने दिलेल्या सर्व सूचना लक्षात घेउनच आम्ही योग्य ती पावले उचलतोय. आमच्या न्यू इंग्लंड विभागातदेखील या क्षेत्रातील नावाजलेली लोकं आहेतच; तशातच 'संगीत मानापमान'सारख्या कार्यक्रमांसाठी आम्ही ३ जुलैला रंगीत तालमीचीसुद्धा व्यवस्था केली आहे, त्यामुळे साउंड क्वालिटीच्या बाबतीत काही तक्रार येऊ नये, असा आत्मविश्वास वाटतोय.

तिसरा विभाग एक्स्पो तुम्ही म्हणालात, त्याला प्रतिसाद कसा आहे?

श्री. पाध्ये : एक्स्पोलासुद्धा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. एक्स्पो टीमने खूप छान काम केले आहे. सगळ्यांत आधी महत्त्वाची गोष्ट आम्ही ही केली की, पूर्वीच्या अधिवेशनात जे कोणी व्हेंडर्स येउन गेले होते, त्यांच्याशी संपर्क साधून एक सर्व्हे घेतला. पूर्वीच्या अधिवेशनातील त्यांचे अनुभव तसेच कोणत्या सोयी केल्या तर त्यांना आवडेल, अशा प्रश्नांच्या त्यांच्या उत्तरांचा आढावा घेउन त्या अनुशंगाने पावले उचलली. बृहन्महाराष्ट्र मंडळ ही एक नॉन-प्रॉफीट संस्था असल्याने, कमीत कमी किमतीत एक्स्पो बूथ कसा देता येईल की जेणेकरून चांगले व्हेंडर्स येउ शकतील, की जे वाजवी दरात सामान उपलब्ध करून देऊ शकतील. या सर्व गोष्टींचा विचार केला गेला आणि अभिमानाने सांगावेसे वाटते की आम्ही जवळपास ३० ते ४०% कमी किमतीत बूथ उपलब्ध करून दिले आहेत.

किंमत हा एक भाग झाला. पण त्याव्यतिरिक्त व्हेंडर्ससाठी अजून काही सोयी आहेत का या वेळेला?

श्री. पाध्ये : व्हेंडर्सना सर्वांत मोठी सोय म्हणायची झाली तर असे सांगता येइल की, बहुतेक अधिवेशनांत, एक्स्पो हे पारंपरिकपणे मुख्य सभागृहापासून दूर असलेल्या एक्स्पो हॉलमध्ये भरवले जाते; पण त्यामुळे बूथकडे जाणार्‍या प्रेक्षकांची संख्या कमी-अधिक प्रमाणात असते आणि त्या बाबतीत अनेक व्हेंडर्सचा तक्रारीचा सूर होता. म्हणूनच या अधिवेशनात आम्ही डंकीन सेंटरमधील मुख्य सभागृहाभोवतीच्या वॉक-वेमध्ये बूथची सोय केली आहे, की जणेकरून सभागृहात शिरताना किंवा बाहेर पडताना, आवडीच्या बूथवर विनासायास जाता येईल आणि साहजिकच व्हेंडर्सच्या मालाला न्याय मिळू शकेल.

हे आता अधिवेशनाबद्दल झालं, पण या व्यतिरिक्त तुमचं नेहमीचं कार्यक्षेत्र किंवा व्यवसाय काय?

श्री. पाध्ये : मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे. पण अनेक वर्षं प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये काम केलंय. मुंबईला स्वतःचा प्रेस आहे. मुंबईला असताना जवळपास १५ ते २० वर्षं काम केल्यानंतर, इथे आल्यावरही मी प्रिंटिंग इंस्ट्रीमध्येच कामाला लागलोय. मी बॉस्टनमध्ये आता जवळपास २० वर्षं आहे. मी ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीचं नाव आहे 'जॉर्ज डीन कंपनी'. माझी पोझीशन आहे कॉस्ट अनॅलिसिस आणि प्रोक्युअरमेंटमध्ये. आमचं स्पेशलायझेशन 'फायनॅन्शिअल प्रिंटिंग', खासकरून म्युच्युअल फंड, सिक्युरिटी एक्सचेंज, त्या संदर्भातलं क्षेत्र आहे. माझा स्वतःचा व्यवसाय मुंबईत आहे. अजूनही चालू आहे. त्यामुळे दरवर्षी मला कमीत कमी एक-दोनदा मुंबईला जाऊन यावं लागतं.

अधिवेशनात अजून एक महत्त्वाचा भाग असतो, ते म्हणजे शाळा-कॉलेजाबरोबर ऋणानुबंध असतातच. या अधिवेशानिमित्तानं बर्‍याच शाळा-कॉलेजांचे ग्रूप्स एकत्र येऊन भेट होते. तर तुमच्या काही आठवणी सांगू शकाल का शाळा-कॉलेजच्या?

श्री. पाध्ये : अगदी. मी मूळचा पार्ल्याचा. त्यामुळे पार्ले टिळक विद्यालय, पार्ले कॉलेज हा प्रवास ओघाओघानेच झाला आणि अर्थातच त्याचा जाज्ज्वल्य अभिमान आहे. या पूर्वी ३-४ अधिवेशनांस गेलो असताना त्या प्रसंगी ओळखीच्या पार्लेकरांना भेटायची जी संधी मिळाली ती खरोखरीच अनोखी ठरली. गमतीची गोष्ट म्हणजे २० वर्षांपूर्वी जेव्हा बॉस्टनला आलो तेव्हा एकांशी झालेल्या प्रथम भेटीत जेव्हा सांगितले की मी मूळचा विलेपार्ले, मुंबई इथला, तेव्हा त्यांनी म्हटले "अरे पार्ल्याचा का तू? मग तुला कदाचीत ही लोकं माहीत असतील". त्यांनी जी ३-४ नावे सांगितली ती सर्व आमच्या पार्ले टिळकचीच, त्यामुळे शाळा-कॉलेजचे जे कनेक्शन असते ते अतूट असते यावर पूर्ण विश्वास आहे.

शाळा-कॉलेजात असताना अशा काही उपक्रमांत भाग घ्यायचात का?

श्री. पाध्ये : शाळा-कॉलेजमध्ये असताना भाग घ्यायचोच, पण सर्वांत विशेष म्हणजे मी जिथे, म्हणजे शिवानंद सोसायटीत राहायचो, तेथील सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा अगदी सोसायटीच्या स्थापनेपासूनची, की जी आज ५० वर्षांनंतरसुद्धा चालू आहे. नाटकाची आवड अगदी लहानपणापासूनची. शाळा-कॉलेजमध्ये नाटकात भाग घेतलाच, पण या माझ्या आवडीला खरं खतपाणी मिळालं ते आमच्या सोसायटीत. माधवराव वाटवे, बाळ कर्वे, विक्रम गोखलेंसारखे प्रथितयश कलाकार आमच्याच सोसायटीतले आणि त्यांचा सक्रीय सहभाग हा सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात असल्याने त्यांचे मार्गदर्शन हे अगदी लहानपणापासून मिळाले. बॉस्टनला येईपर्यंत जवळपास ७-८ वर्षं आमच्या सोसायटीच्या मंडळाचा सेक्रेटरी या नात्याने कार्यक्रमांच्या समयोजनात सक्रीय सहभाग, त्यामुळे ही संयोजनाची आवड तशी खूप जुनी आणि ती खोड म्हणा किंवा काहीही, पण सहजासहजी जात नाही यावर विश्वास.

हा लेख प्रसिद्ध होऊन मायबोलीकर जेव्हा वाचतील तेव्हा त्यांच्याकडून अधिवेशनासाठी काय काय मदत होऊ शकेल?

श्री. पाध्ये : मायबोलीकडून कायमच मदत होत आली आहे. २००८-०९ सालापसून मायबोलीवरील लेख, कविता, चर्चा वाचायला लागलो. २००९ सालची गोष्ट मला अजूनही लक्षात आहे; स्मार्टफोनचा जमाना जोरात सुरू होण्याच्या आधीचा काळ आहे. फिलाडेल्फीया अधिवेशनात मायबोलीकरांना एकत्र कसं भेटता येईल याकरता मायबोलीकरांची वैचारीक देवाण-घेवाण सतत चालू होती. "मी येतोय तेव्हा प्रत्यक्ष भेटायला खूप आवडेल" असे अत्यंत जिव्हाळ्याने कळवत होते. त्यात जी जवळीक दिसून आली ती खूपच अपीलींग वाटली. तसेच एक जाणवले की मायबोलीकर मनातली कोणतीही गोष्ट कोणताही आडपडदा न ठेवता सांगून मोकळे होतात. त्यामुळेच या अधिवेशनाच्या बाबतीतल्या मायबोलीकरांच्या सूचनांकडे 'पॉझिटीव्ह क्रिटीक' म्हणूनच बघण्याचा माझा दृष्टिकोन आहे. न्यू इंग्लंड विभागातसुद्धा भरपूर मायबोलीकर आहेतच, त्यामुळे या अधिवेशनातसुद्धा बर्‍या मायबोलीकरांची उपस्थिती अपेक्षित आहे.

तुम्ही तुमच्या कामातून वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद!

****

टंकलेखन सहाय्यः मृण्मयी
शुद्धलेखन तपासणी: चिनूक्स

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवर पडद्यामागच्या कलाकारांना (की उद्योजकांना?) सगळयांसमोर आणले जात आहे हे खूपच चांगले आहे.

अधिवेशन यशस्वी होण्यासाठी खूप शुभेच्छा श्री. पाध्ये व त्यांच्या टीममधील सहकार्‍यांना..>>>+१

> संगीत नाटकाबद्दलची माझी समजूत किती चुकीची आहे, हेच त्या प्रयोगाने दाखवून दिले.

आम्हीही सगळे संगीत मानापमानचा नवीन संचातला, नवीन तंत्राने होणारा प्रयोग बघायला उत्सुक आहोत.

किती छान ओळख. आणि कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा.