एकाच कारणाचा करते तपास दुनिया

Submitted by बेफ़िकीर on 15 March, 2013 - 01:44

एकाच कारणाचा करते तपास दुनिया
समजेचना कुणाला असते कशास दुनिया

कष्टांवरी दिनांच्या ती राहते उभी .. पण
पैशात लोळण्याला म्हणते विकास दुनिया

आपापल्या परीने जो तो जगून जातो
दुनियेस कोण कळतो कळते कुणास दुनिया

राहून अर्धपोटी तृप्तीत पाठ टेके
माझ्या लहानपणची ती दिलखुलास दुनिया

जितके तिला स्वतःला ठरतात फायद्याचे
देते तुला जगाया तितकेच श्वास दुनिया

गाठा भ्रमात तुमची उंची इमारतींनो
एका क्षणात सारी जाते लयास दुनिया

येथेच थांब तू हे नाही म्हणत तुला मी
नुसती बघून जा की माझी भकास दुनिया

धुंदीमधे स्वतःच्या घे तू जगून मित्रा
करशील त्रास तितका देईल त्रास दुनिया

मदिरा खराब आहे हे सांगते मला अन्
घेते भरून पुढचा हातात ग्लास दुनिया

येथे जिवंत असणे इतकेच फार झाले
ही 'बेफिकीर' आहे मुडदेफरास दुनिया

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धुंदीमधे स्वतःच्या घे तू जगून मित्रा
करशील त्रास तितका देईल त्रास दुनिया

मदिरा खराब आहे हे सांगते मला अन्
घेते भरून पुढचा हातात ग्लास दुनिया

येथे जिवंत असणे इतकेच फार झाले
ही 'बेफिकीर' आहे मुडदेफरास दुनिया<<<

अनावश्यक शेर आहेत.

बाकी गझल ठीक!

तिलकधारी काफियानुसारी शेरांवर चिडतो.

मस्त !

माझ्यात दोष की, हा दुनियेत दोष आहे?
केव्हा भकास केव्हा वाटे झकास दुनिया! ................इति गझलप्रेमी

Pages