विदर्भातले 'बेडे' नव्हे 'केळ'कर (फोटो सहित)

Submitted by मंजूताई on 20 March, 2013 - 10:42

एखादा पदार्थ कसा खावा त्याचे काही संकेत, नियम पद्धती असतात. चुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र आवाजा करीत इतरांच्या टेबलापाशी येणारा सिझलर्स हा पदार्थ खूप खायची इच्छा असूनसुद्धा कैक दिवस खायचं धाडस केलं नव्हतं केवळ ते कसं खायचं माहीत नसल्यामुळे. समोरच्या टेबलावरचे कसे खातात हे बघणं शिष्टाचारसंमत नसूनसुद्धा एकदा चोरून कोणी बघत तर नाहीन हे बघून समोर बघण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. अखेर आपण जसे इतरांकडे बघत नाही तसे इतरही आपल्याकडे कशाला बघायला बसलेत विचार करून खाऊनच पाहिला चूर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र आवाजातला सिझलर्स! हॉटेलात मोठा 'आ' वासून बर्गर खाण्याचं धाडस अद्याप केलं नाही. हे झाले हॉटेलातले पदार्थ. भाजलेले दाणे डब्यातून मूठभर घेऊन, कच्चा चिवडा कागदावर घेऊनच खायची मजा येते ती वाटी चमच्याने खाण्यात नाही. 'बोरकुट' बोरकुट कसे खावे? बोरकुट खायची मजा ते तळहातावर घेऊन जिभेने मांजरासारखे चाटून खाण्यातच; आणि ते तसं खाताना बघून समोरच्याच्या तोंडातून लाळ टपकलीच समजा, पण ती टपकणं शक्यच नाही कारण बोरकुट ही एकट्याने खायची चीजच नाही. तसेच हे बोरकुट काही दुकानातून विकत आणून खायची गोष्ट नाही आणि ते दुकानात मिळते की नाही हेही माहीत नाही पण बोरकुट हे विकत घ्यायचे ते शाळेच्या समोर बसणार्‍या गाडीवाल्या/टोपलीवालींकडूनच ...मधल्या सुट्टीत. पण आज शाळेच्या समोर उभ्या असणार्‍या गाड्या पूर्णपणे कालबाह्य झाल्या असं म्हणता येणार नाही सरकारी, नगरपालिकांच्या शाळांसमोर दिसतात. काळाप्रमाणे बोरकुटानेही आपले रूप बदलले अन चांगल्या रंगबेरंगी आकर्षक वेष्टनात दुकानात दिमाखाने विराजमान झाले एवढेच नाहीतर ते सातासमुद्रापार मॉलमध्येही जाऊन पोचले. ह्या बोरकुटाचा ,कायापालट, हातगाडी ते मॉल हा प्रवास व प्रतिष्ठा मिळवून देणारे उद्योजक आहेत श्री अरुण केळकर. नागपुरात आल्यापासून गेली पंचवीस वर्षे 'केळकर' राजमलाई, बोरकुट व वर्‍हाडी ठेचा खातोय. भाची होमियोपॅथीचे औषध घेत असताना चॉकलेट व्यर्ज होते, तिच्यासाठी मग चॉकलेट ऐवजी राजमलाई आणली जायची. मुलांच्या सहलीसाठी वेफर्स, चिवड्याबरोबर बोरकुट हवेच असायचे. अश्या ह्या रोजच्या खाण्यातले पदार्थाचे जनक 'केळकर' पण स्थानिक वृत्तपत्रात मात्र त्यांच्याविषयी काही वाचण्यात आले नव्हते कारण त्यांची प्रसिद्धी परामुखता. रेल्वेने नागपूरहून पुण्या-मुंबईला जाताना वर्ध्याच्या पुढे दहेगाव स्थानकाजवळ हा छोटा कारखाना दिसतो. दहेगाव छोटंसं हजार वस्तीचं खेडं. अश्या ह्या खेड्यात ८० साली आपला व्यवसाय सुरू करणार्‍या अरुण काकांशी अचानक भेटीचा योग आला अन मनमोकळ्या गप्पा झाल्या.

प्रश्न: मला कुतूहल आहे ते एखादा माणूस बोरकुटाचा व्यवसाय करावा असा विचार कसा काय करू शकतो आणि आज तो एक ब्रँड बनतो?

अरुणकाका: आज तो एक ब्रँड झालाय त्याला प्रतिष्ठा मिळाली म्हणून आज मला हा प्रश्न विचारताहेत. पण खरं सांगू का इतरांच सोडूनच द्या, माझ्या पत्नीलाही मी काय कचर्‍याचा धंदा करतोय असं वाटतं होतं पण त्याचबरोबर तिचा माझ्यावर विश्वासही होता म्हणून विरोध केला नाही, मला बरोबरीने साथ दिली. इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते एक कायमस्वरूपी सरकारी नोकरी सोडून धंदात उतरणं निश्चितच धाडसी निर्णय होता. माझ्या वडिलांचा तूप - लोण्याचा व्यवसाय होता. आजूबाजूच्या खेड्यांमधून शेतकरी लोणी घेऊन यायचे त्याबरोबर बोरकुट आणायचे. आणि मला बोरकुट अतिशय आवडायचे. बोरांचा मोसम फक्त संक्रांतीच्या सुमारास असतो बाकी बोरं फारशी खाल्ल्या जात नाही. वाळवून उकडूनही खाल्ल्या जातात पण ती खूप दिवस टिकत नाही. मुलांना त्यांच्या आवडीची बोरं वर्षभर खाता यावीत ह्या उद्द्येशाने हा व्यवसाय सुरू केला. .

प्रश्न नोकरी सोडून धंदा करण्यापाठीमागे काय विचार होता? सुरुवातीला प्रतिसाद कसा होता?

अरुणकाका: मी आधी म्हटल्याप्रमाणे आमच्या घरी लोणी - तुपाचा व्यवसाय होता. आमची अकोला, अमरावती, नागपूर व जबलपुरामध्ये आठ दुकानं होती. आमच्याकडे अडीचशे गायी होत्या. कणीदार रवाळ ही आमच्या तुपाची खासियत! धंदा जोरात सुरू होता. माझ्या वडिलांना वाटायचे की चॉकलेटला भारतीय पर्याय असावा.दुधाचे पदार्थ जास्त काळ टिकत नाही. त्यांनी अनेक प्रयोग केले. आमच्याकडे येणार्‍या लोकांच्या हातावर रोज नवीन प्रयोगातून तयार झालेला पदार्थ ठेवला जायचा. अंतिमः १९३७मध्ये 'राजमलाई' बाजारात आली. मधल्या काही महायुद्धाच्या काळात लिक्विड ग्लूकोज आयातीवर बंधनं होतं त्यामुळे उत्पादन करू शकलो नाही पण नंतर १९७३ पुन्हा माझ्या भावाने राजमलाई बनवणे सुरू केले. आमच्या उत्पादनांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्यात टिकाऊपणासाठी कुठल्याही प्रकारचे रासायनिक घटक नाहीत.पण आमची राजमलाई वर्षभर टिकते. तर असा घरचा व्यवसाय होताच व थोडीफार शेती होती. मॅट्रिक झाल्यावर मी नागपूरला शिकायला आलो. शिक्षणात मन रमलं नाही. त्या काळी मॅट्रिकच्या भरवशावर टेलिकम्युनिकेशनमध्ये नोकरी मिळाली अन इंदोरला रुजू झालो. पण नोकरीत मन रमेना. माझी वृत्ती संशोधकाची होती. काहीतरी वेगळे करावेसे वाटत होते. मन अस्वस्थ होते. १९७६ मध्ये सहा महिने रजा घेऊन दहेगावला आलो. वडील आम्ही त्यांना काका म्हणायचो 'मिसा' अंतर्गत अटकेत होते. माझी आई व भाऊ प्रकाश सत्याग्रहात सक्रिय होते. माझं नावही काळ्या यादीत होतं. तेव्हा आणीबाणी असताना कशी काय जाणो मला सुट्टी मिळाली होती. मला आजही त्याचे आश्चर्य वाटते. नशिबाची साथ होती म्हणायचे! आर्थिक परिस्थिती बेताची पण थोडीफार शेती व जागा त्यामुळे इथे (दहेगाव) काहीतरी आपल्या नक्कीच करता येईल अशी खात्री पटली. वर्षभर धंदा करून बघायचा नाही जमलं तर परत इंदोरला जायचं. भावाचा राजमलाई करण्याचा व्यवसाय होता. पण मला वेगळं काहीतरी करायचं होतं. मसाले व बोरकुट तयार करायचं ठरवलं. त्या वेळेला नफा - तोट्याचा, मागणी - पुरवठा असा कुठलाही हिशोब मांडला नव्हता, खूप पैसा कमावायचा हा उद्द्येश नव्हता वेगळं काहीतरी करायचं, स्वतःचा व्यवसाय करायचा एवढाच एक विचार मनात होता. ऊर्मी, तीव्र आंतरिक इच्छा असेल तर संकटांना व अडचणींना तोंड देता येतं किंबहुना असं म्हणेन की आत्मविश्वास येतो 'लाथ मारेन तिथे पाणी काढीन' ! सुरुवात मसाल्यापासून झाली. त्याला नाव दिलं 'तेज मसाला' आम्ही घरीच मसाला कुटायचो. माझ्या पत्नीने वर्धेत घरोघरी जाऊन मसाला विकला. त्यावेळी वर्धा मोठं खेडंच. घरोघरी मसाले व्हायचे. मसाल्याची प्रत्येकाच्या घरची अशी एक विशिष्ट चव अन पद्धत असते बनवायची. कोणी विकत घेईना. त्या काळी आजच्या सारखं 'फ्री' काही मिळत नसे पण आम्ही लोकांना चव कळावी म्हणून 'फ्री' मसाला द्यायला सुरुवात केली पण विक्रीत फारसा फरक पडला नाही. नावात काय आहे? म्हणतात नावातच सगळं काही आहे म्हणूनच आज ब्रँडचा जमाना झालाय. 'तेज मसाला' चे नामकरण ' मटण मसाला' केलं अन चित्रच पालटलं! त्यानंतर बोरकुटाचं उत्पादन घरीच सुरू केलं. मी सुरुवातीला शाळेच्या समोर पुड्या विकत असे अन उरलेल्या दुकानात ठेवून देत असे, विकल्या गेल्यावर मग पैसे मिळत. वर्‍हाडी ठेचा, लोणची अशी एकेक उत्पादन वाढवत गेलो. ठेचा साधारणपणे हिरव्या मिरच्यांचा बनतो पण आम्ही लाल भिवापुरी मिरच्यांचाच बनवतो. आमच्या उत्पादनांची विशेषता म्हणजे टिकाऊपणासाठी ह्यात शक्यतो हानिकारक रासायनिक घटक टाकत नाही. क्वचित प्रसंगी आवश्यक वाटल्यास 'ए' ग्रेड प्रिझर्र्वेटीव्हज वापरले जातात. बोरकुट व वर्‍हाडी ठेच्यात मात्र अजिबात वापरले जात नाही.

प्रश्न व्यवसाय काय नोकरी काय अडचणी ह्या असणारच त्याचबरोबर स्पर्धाही आलीच त्यावर कशी मात केली? ती मात करण्याची ताकद कोणती?

अरुणकाका: हो, अडचणी ह्या असणारच! पण तुम्ही त्यावर विचार केलेला असतो, त्यावर उपाययोजनेचाही विचार केलेला असतो, तर फार कठीण जात नाही. काही वेळेला काल्पनिक भीती असते. मी आधी म्हटल्याप्रमाणे मला आणीबाणीच्या काळात सुट्टी मिळाली, ती मिळणार नाही ही माझी काल्पनिक भीती होती. मी खरं सांगू, व्यवसाय करायचा ठरवल्यावर माझी पत्रिका अगदी जाणकार ज्योतिष्यांना दाखवली होती. काही जण म्हणाले यशस्वी होणार नाही तर काही म्हणाले तुझ्या भविष्यात तू व्यवसाय करशील हे लिहिलेलंच नाहीये. माझा निर्धार पक्का होता. आज माझं वय ७१ वर्ष आहे, मी सतत काम करत आलोय. जे काही काम करतोय ते मला उत्कृष्ट कसं करता येईल हाच माझा ध्यास होता. ह्या कामाने मला जेवढं शिकवलंय तेवढं कोणताही गुरु ,आई-वडील शिकवणार नाही. 'कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन' नाव, प्रतिष्ठा मान, सन्मान, पैशाचा कधी विचारच केला नाही, नाही करतोय त्यामुळे मला कुठल्या स्पर्धेत उतरायचं नव्हतं. आमच्या उत्पादनाची आम्ही फारशी जाहिरात करत नाही. विक्री होते ती मॉऊथ पब्लिसिटीनेच! मला मुख्य हवे होते जॉब सॅटीसफॅक्शन, मी जे काही सचोटीने करतो आहे, ते करण्यात समाधान, आनंद मिळावा. आणि हे नक्की मिळतं जेव्हा तुम्ही करत असलेल्या कामाशी एकरूप होता, तेव्हा! ते ओझं न राहता जगणं बनतं! मला ह्या धंद्यात किती नफा झाला ते सांगता येणार नाही पण मी आज शंभर टक्के समाधानी आहे, हे आवर्जून सांगू इच्छितो. काही अडचणी आहेत त्याला सरकार जबाबदार आहे. सरकारची उदासीनता! गावामध्ये उद्योगधंदे यायला पाहिजे ज्यामुळे शहराकडे लोकं जाणार नाही हे खरंय पण वीज कोण देईल? चोवीस तासांपैकी फक्त आठ तास वीज असते सोळा तास गायब. इथल्या तापमानाचा फायदा असा आहे की बोरकुट उन्हात वाळवू शकतो त्यासाठी यंत्रे वापरायची गरज नाही तसाच तोटाही आहे अती उष्ण हवामानामुळे कैर्‍या, मिरच्या खराब होतात, हे असे काही पदार्थ टिकवण्यासाठी वातानुकूलित व्यवस्था आवश्यक आहे.

प्रश्न बालपण, शिक्षण, घरचं वातावरण संस्कार ह्याबद्दल काय सांगाल?

अरुणकाका: माझं बालपण इथे दहेगावातच मजेत गेले. आमच्या घरचं वातावरण धार्मिक, श्रद्धाळू. माझे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी सहावेळा तुरुंगवास भोगलाय. त्यामुळे अर्थात संस्कार संघाचेच. शिस्तबद्धता, नियमितपण, नीतिमत्ता, स्वावलंबन अंगात भिनलेली. माणुसकीवर नितांत श्रद्धा! जातपात, स्पृश्य - अस्पृश्य, धर्मभेद नव्हता. आमच्याकडे विहीर होती म्हणजे अजूनही आहे. गावातल्या लोकांना माझे वडील सकाळी उठून पाणी काढून द्यायचे. एक दिवस ते आपल्या आईला म्हणाले की ही विहीर मी सगळ्यांसाठी खुली केली आणि जर तू त्या विहीरतले पाणी प्यायलीस तर गावातले इतर लोक विरोध करणार नाहीत. आणि खरोखरचं माझी आजी ते पाणी प्यायली आणि सगळ्या जाती धर्मासाठी ती विहीर खुली झाली. दहेगावला फक्त पॅसेंजर गाड्या थांबतात. रात्री अकरा वाजता येणार्‍या भुसावळ पॅसेंजरने येणारी लोकं रात्री आमच्याकडे मुक्काम करायची व सकाळी चहा पिऊन आपआपल्या गावी जात. आम्ही व्यवसाय सुरू केल्यावर घर केलं ते वर्धेत कारण इथे आमच्या दोन मुलींबरोबर भाच्या पुतण्याच्या शिक्षणाची सोय होईल म्हणून. माझं हायस्कुलंच शिक्षण वर्धेत झालं. तीन विषयात डिस्टिंक्शन मिळवून दहावी पास झालो. पुढच्या शिक्षणासाठी नागपूरला आलो पण ते काय झालं देव जाणे जमलं नाही. आजही मनात ती एक खंत आहे, आपल्याजवळ डिग्री नाही. त्यामुळे काही अडलं नाही, त्या डिग्रीचा आणि व्यवसायाचा संबंध वा उपयोग असतोच असेही नाही पण ती हवी होती हे नक्की. भिंतीवर टांगायला ते सर्टिफिकेट हवे होते मला!

प्रश्न इतर कामा व्यतिरिक्त इतर काही छंद?

उत्तर मला ऐतिहासिक पुस्तक वाचायला आवडतात. इतरही वाचतो. आवडता लेखक 'पुल'. मरगळ दूर करायची असेल तर पुलंच कुठलंही पुस्तक काढावं अन वाचावं. मन प्रफुल्लित होते.मी किसान सभा, भाजपांच्या कामात सक्रिय भाग घेत असतो. सामाजिक कार्यक्रमात भाग घ्यायला आवडतो.

प्रश्न तुम्हाला किंवा उद्योगाला काही बक्षीस पुरस्कार?

उत्तरः आमच्या उद्योगाला दीनदयाल शोध संस्थेचा पुरस्कार मिळाला जिल्हा स्तरीय उत्कृष्ट उद्योगाचा पुरस्कार मिळालाय. अनेक थोर व्यक्तींनी ह्या उपक्रमाला भेट दिली. अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी, नानाजी देशमुख ही त्यापैकी ठळक व्यक्तिमत्त्वे. नानाजींच्या कल्पनेतला/विचारातला उद्योग मी करतो आहे हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. आमच्या इथले काही लोक चित्रकुटला गेले अन तिथे त्यांनी ह्याच धर्तीवरचा कुटीर उद्योग उभारून दिला.

प्रश्न भविष्यातला योजना?

उत्तर: एक डायनिंग टेबला सूट होईल असं एक स्प्रेड बनवायचं. खूप दिवसांपासून प्रयोग सुरू आहेत. आम्ही खूप वर्षांपासून इथे प्रत्येक वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या रविवारी हुरडा पार्टी करतो. ह्या पार्टीकरिता आम्ही मुद्दाम दादर ज्वारी व स्वीटकॉर्नची लागवड करतो. आजूबाजूच्या गावातले, नागपूरमधले मित्रमंडळी, नातेवाईक ह्या पार्टीची अगदी मनापासून वाट बघत असतात. ह्या पार्टीतच हे स्प्रेड सगळ्यांना चवीदाखल दिलं. त्याचं बारसं झालंय आता ते जन्माला घालायचं आहे.

आम्ही तुमच्या नवीन अपत्याची आतुरतेने वाट बघतोय, पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी लहानपणची आठवण आली. शाळेतून येताना मैत्रीण सोबत बोरकुट खात यायची मजाच वेगळी. उन्हाळ्यात आतेबहिण आली की घराजवळ्या कोप-यावरच्या दुकानातुन आणून खाणे हा आवडता उपक्रम होता. Happy
मुलाखत आवडली.

मुलाखत न आवडण्याचा प्रश्नच नाही पण मथळ्यावरून तसेच ललीत लेखनात टाकल्याने मजकूर-विषयाचा नीट बोध होत नाही, कृपया दखल घ्यावी.

छान मुलाखत!
शिर्षकाबद्दल वरच्या सगळ्यांना +१.

सॅम, बोरकुट म्हणजे बोरांच्या सिझनमध्ये बोरं वाळवुन त्यांची केलेली पावडर. छान लागतो तो प्रकार. आमच्या शेजारच्या काकु वर्धा/रसुलाबाद भागातल्या असल्याने प्रत्येक सुटीत गावी जाऊन आल्या की आमच्यासाठी बोरकुट आणायच्या.

छान मुलाखत.
`राजमलाई' खूप पूर्वी (आप्पा बळवंत चौकातल्या दुकानात) खाल्ली होती. पुण्यात कुठे मिळेल आता?

रिअली ग्रेट! Happy
मुख्य पानावर गुलमोहर्-ललितलेखनात धागा दिसल्याने पहिल्यान्दा मला वाटले की कैतरी विनोदी अन्गाचे असेल, प्रत्यक्षात भन्नाट ओळख.
लेख/मुलाखत पुन्हा एकदा सावकाशिने वाचून काढावा लागेल.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

वा...खूप सुरेख मुलाखत घेतली आहेस Happy
तसंही बोरकुटवाले केळकर म्हणजे आम्हा नागपुरकरांचे अतिशय जिव्हाळ्याचे आहेत. बोरकुट आणि राजमलाईची चव वर्णन करता येणंच शक्य नाही. हे चाखूनच बघायला हवं आणि एकदा चाखल्यावर.... ये दिल मोअर मागणारच Happy
अहा....... बोरकुट....... तोंडाच्या दोन्ही बाजूंनी पाणी गळायला लागलं !!
सॅम.... बोरकुट म्हणजे काय...... हे केळकरांचं बोरकुट खाल्ल्यावर तुला नक्की कळेल आणि तुला त्याचं नक्की व्यसन लागणार इतकं चविष्ट असतं ते Happy
राजमलाई प्रचंड आवडती होती. "होती" अशासाठी की आजकाल राजमलाई ची चव बदललीये आणि ती अजिबातच आवडली नाही. ती चव बदलायचं काय कारण असावं ??

मंजू, अरुण केळकर माझ्या आईचे मामा आहेत. माझ्या आजोबांची मुलाखत वाचुन खुप आनंद झाला. ही मुलाखत आईला नक्की वाचायला सांगेन. तिलाही खुप आवडेल. केळकर ठेचा, बोरकुट, राजमलाई बरोबरचं त्यांची लोणचीही खुप चविष्ट असतात. धन्यवाद Happy

मुलाखत छानच, आवडली. बोरकुट, राजमलाई खायला नक्कीच आवडेल, पुण्यात कुठं मिळेल?

केळकर उत्पादनं भारताबाहेर मिळतात का? वेबसाइट आहे का?

उत्तम मुलाखत, आवडली.
बोरकूटाची जाहिरात बर्‍याचदा वाचली आहे, आता आठवणीने खाणार!

त्या राज्मलाईचे डुप्लीकेट आले होते मधे.. अजीबात चांगले नव्हते..
पण राज्मलाई वरीजनल अन बेश्ट खायलाच मिळाली नाहिये बरेच दिवसात! Sad

comyubaba bighaDalaa.

Thanks Manju. Kelakarancha varhadi Thecha aamachya khup aavadicha. RajamalaI tar mala khup avadayachi. Aata Punyat kuthe milel dev Jane.

मंजू | 21 March, 2013 - 13:12नवीन
धन्यवाद! @ हर्पेन - विषय कसा निवडायचा?
>>> याला ललीतातून काढून दुसरीकडे न्यायचे झाल्यास, आपल्या प्रोफाईल वरील लेखन या टॅबवर टिचकी मारून मग संपादनावर टिचकी मारली असता विषय निवडीचे / बदलाचे स्वातंत्र्य परत मिळवता येईलसे वाटते.

या इथे माझा रोख विषय निवडीवर नसून त्या लेखाच्या वर्गीकरण व मथळ्याच्या अनुषंगाने आहे. शीर्षकावरून त्याखालील लेखामधे एका यशस्वी उद्योजकाची मुलाखत असेल असे वाटत नाही. लेखाचे आपण दिलेले टॅग्स उद्योजक व व्यक्तीमत्व हे अगदी समर्पक आहेत.

रच्यकने - आपण 'बोर'कर नाही केळकर असे म्हटले असते तरी अधिक समर्पक वाटले असते. Happy

चांगल्या व्यक्तीमत्वाशी ओळख घडवून आणल्याबद्दल धन्यवाद!

हर्पेन, अहो पण ...
"बेडे"कर लोणची वाले ते इकडे पुण्यातले, तिकडे नागपुरातही तस्सेच "केळ"कर आहेत, (हो, पुणेरी बेडेकर नस्ले म्हणून काय झाले? Proud ) केळकर आहेतना आमच्याकडे" अशा बर्‍याचश्या गर्भितार्थाचा वरील मथळा आहे. तो कळतोय.
फक्त मागे पुढे कुठे तरी उद्योजक असा शब्द चालेल.
विदर्भातले उद्योजक - लोणची/मसाले/बोरकुट - 'बेडे'कर नव्हे तर 'केळ'कर (फोटो सहित) असे काहीसे चालु शकेल.

>>>> तेव्हा आणीबाणी असताना कशी काय जाणो मला सुट्टी मिळाली होती. मला आजही त्याचे आश्चर्य वाटते. <<<<
अहो सरकारी "टेलिकम्युनिकेशन खात्यात" होतात, त्यातुन आणीबाणी, तुम्ही रजा नस्ती घेतलीत तर त्यान्नीच तुम्हाला घरी (नैतर आत) बसवले अस्ते Proud
बाकी तुमची कुन्डली अभ्यासायला जरुर आवडेल.

केळकर म्हणले की मला थोडेफार गहिवरुन येते! आमचे कित्येक शे वर्षापुर्वीचे आडनाव "केळकर्"च होते असे कुलवृत्तान्तात वाचले आहे. म्हणून गहिवरुन येते हो! आमच्या सध्याच्या एकारान्ती आडनावात मी धरून आता काय कुणी प्रसिद्ध/कर्तुत्ववान वगैरे कोणी होईल असे वाटत नाही. पण मग आमच्या पूर्वाश्रमीच्या आडनावाचे बन्धू असे पराक्रमी आढळले की का नाही सुखावले जाणार? लिम्व्याची कॉलर ताठ आहे आज.

Pages