-- त्या तुझ्या स्पर्शाविना फुलणे नकोसे वाटते

Submitted by ganeshsonawane on 15 March, 2013 - 06:31

-- त्या तुझ्या स्पर्शाविना फुलणे नकोसे वाटते

दररोजचे हे तेच ते जगणे नकोसे वाटते
जगण्यास या जगवायचे दुखणे नकोसे वाटते

हा रोजचा येतोच वारा खुलविण्या माझ्या कळ्या
पण त्या तुझ्या स्पर्शाविना फुलणे नकोसे वाटते

जे पाहिजे ते चेहरे हे लोक आणू लागले
माझा जुना हा चेहरा असणे नकोसे वाटते

एकेक गुंता सुटविण्या आयुष्य गेले हातचे
गुंत्यात पुन्न्हा गुंतुनी सुटणे नकोसे वाटते

जेंव्हा बिचारी रातराणी एकटी गंधाळते
बाहोत तेंव्हा असुन तू नसणे नकोसे वाटते

माझे स्वतःशी सारखे हे धुमसणे असते सुरू
मारुन मनाला रोजचे मरणे नकोसे वाटते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

chan