तुला पाठमोरे पाहून वाटले रे...

Submitted by मुग्धमानसी on 15 March, 2013 - 03:35

तुला पाठमोरे पाहून वाटले रे
मी एकटी सभोती धुके दाटले रे

तु दे ना मला रुंद छाती तुझी
किती हुंदके या उरी साठले रे

रुसूनी तुझा गारवा दूर गेला
नी घरकुल उन्हाने इथे थाटले रे

माया नसू दे असू दे निखारे
कळू दे मला जे तुला वाटले रे

किती शब्द अडकून बसले गळ्याशी
किती दाट आभाळ हे दाटले रे

दिसेना मला भाबडा चंद्र माझा
कसे चांदणे कोवळे फाटले रे?

कसे कोरडे जाहले सप्त सागर
कशी मी तुझ्या आतुनी आटले रे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती शब्द अडकून बसले गळ्याशी
किती दाट आभाळ हे दाटले रे

कसे कोरडे जाहले सप्त सागर
कशी मी तुझ्या आतुनी आटले रे?<<< उत्तम शेर

किती हुंदके या उरी साठले रे

कळू दे मला जे तुला वाटले रे<<< या दोन ओळीही सुंदर!

गझलतंत्रात बसवल्यास चांगली गझल होईल. (अर्थात, 'साठले' हा काफिया चालण्यासाठी मतला सैल करावा लागेल). काही ठिकाणी र्‍हस्व दीर्घ बदलावे लागतील. शुभेच्छा! अर्थात कविता म्हणून चांगली आहेच, पण तरी गझलेच्या अंगाने जात असल्यामुळे तसे सुचवले.

-'बेफिकीर'!

धन्यवाद सर्वांना...

धन्यवाद बेफीजी. गज़ल हा प्रकार हाताळावा असे वाटते खरे. पण त्यातले तांत्रिक काही कळत नाही. आणि मायबोलीवर 'गज़ल' विभागात काही प्रतिक्रीया वाचल्या की त्या क्षेत्रात प्रवेश करण्याचे धाडस होत नाही. Sad कदाचित हे वाचून तुम्हाला हसू येईल.

र्‍हस्व दीर्घाचा अभ्यास खरोखर करायला हवा असे दिसते...

सुरेख !!

व्वा...नितांत सुंदर कविता... अप्रतीम !!! तुमच्या लिखाणात एक सुंदर फेमिनीन टच आहे... त्याबद्दल अभिनंदन !!! तुम्ही लिहीत रहा... गज़ल - कविता ते दुय्यम !

माया नसू दे असू दे निखारे
कळू दे मला जे तुला वाटले रे

किती शब्द अडकून बसले गळ्याशी
किती दाट आभाळ हे दाटले रे

ही दोन कडवी आवडली.

धन्यवाद गिरिश! तुम्ही मनापासून केलेल्या कौतुकाने फार बरे वाटले.

धन्यवाद आनंदयात्री, समीर...

तु दे ना मला रुंद छाती तुझी
किती हुंदके या उरी साठले रे

रुसूनी तुझा गारवा दूर गेला
नी घरकुल उन्हाने इथे थाटले रे
<< व्वा ! खूपच सुंदर!

छान .....
"किती शब्द अडकून बसले गळ्याशी
किती दाट आभाळ हे दाटले रे"
या ओळी सर्वात आवडल्या.