बेअरफूट इन द पार्क : एक भन्नाट आवडलेला चित्रपट

Submitted by अमेय२८०८०७ on 13 March, 2013 - 09:15

bft.jpg

लग्न.. बहुतांशी लोकांच्या आयुष्यात एकदाच येणारा (आणि काहीकाहींना आयुष्यात पुनःपुन्हा 'लागणारा' )एक मैलाचा दगड! लग्नाचा संस्कार म्हणजे दोन अपरिचित रस्ते एकत्र येऊन पुढील प्रवासाची सुरूवात, दोन जिवांचे सहचर्य, शारीरिक, मानसिक आणि भावनिक तादात्म्य. लग्नानंतरची नवलाई, अ‍ॅडजस्ट्मेंट्स, फुलणार्‍या नव्या प्रेमाची अनुभूती... सगळेच नवे आणि हवेहवेसे अनुभव. प्रेमविवाहात पूर्वपरिचयाचा विश्वास तरी असतो पण पारंपारिक विवाहात नाते रुजण्याचा खरा काळ म्हणजे मधुचंद्र आणि पहिले काही कोवळे दिवस. पती-पत्नींनी एकमेकांची वैशिष्ट्ये, गुणावगुण, स्वभाववैचित्र्ये समजून घेण्याचा हा काळ. नाते नवीन असल्याने सावरत, बुजत टाकलेली पावले आणि कधी धडपडत, कधी एकमेकांचाच आधार घेत उभारलेल्या घरकुलाची मुळे हळूवार रुजताना, त्याचा वृक्ष झालेला पाहताना होणारे समाधान. अवास्तव अपेक्षा आणि समजुतीच्या अभावामुळे कधीकधी हा प्रवास अनपेक्षितपणे खडतरही होऊ शकतो.
माणसाच्या भावनांना रुपेरी झालर लावून पडद्यावर पेश करणार्‍या चित्रपटकर्मींना या नाजूक विषयाची मोहिनी न पडती तर नवल. जगभरातील प्रत्येक भाषेत/ देशात या विषयावर गंभीर, विनोदी, हळूवार असे अनेक भावोत्कट चित्रपट निर्माण झालेले आहेत. 'बेअरफूट इन द पार्क' हा पती-पत्नीच्या नात्यातील स्थित्यंतराच्या दिवसांचे नर्मविनोदी शैलीत चित्रण केलेला असाच एक अप्रतिम चित्रपट. पॉल आणि कोरी ब्रॅटर (रॉबर्ट रेडफर्ड आणि जेन फोंडा) हे न्यूयॉर्कमधील नवपरिणित दांपत्य. पाच-सहा दिवसांचा मधुचन्द्र संपतो आणि बजेटमधे बसणारा एक छोटासा फ्लॅट भाड्याने घेऊन संसारास सुरूवात होते. पॉल काहीसा धीरगंभीर तर कोरी जीवनाला दोन्ही हात पसरून सामोरी जाणारी. तारुण्याचे दिवस पुरेपूर उपभोगण्याचा प्रयत्न करणारी. पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमधील किरकोळ गैरसोयी, जुनाट रंग, छताच्या फुटक्या काचेतून आत येणारी थंडी आणि लिफ्टशिवाय पाच मजले चढाय-उतरायचा त्रास सहन करूनही जीवन सुंदरच आहे असे मानणारी. पॉलचे प्रेम भिंतीआड फुलणारे तर कोरी म्हणजे आपण प्रेमात आहोत हे सगळ्या जगाला ओरडून सांगणारी.
चित्रविचित्र भाडेकरू असलेल्या त्या इमारतीतले सगळ्यात रंगेल व्यक्तिमत्व म्हणजे 'व्हिक्टर व्हेलॅस्को' (चार्ल्स बॉये). पॉल-कोरीच्या फ्लॅटवरील माळ्यावर भाड्याने राहणारा व्हिक्टर सहजतेने त्यांच्या आयुष्यात येतो. छंदी-फंदी वाटणार्‍या साठीच्या उंबरठ्यावरील व्हिक्टरशी दिवसभर घरात एकटीच राहण्यार्‍या कोरीची छान मैत्री होते. त्याचा रंगेल आणि मिस्कील स्वभाव पाहून त्याचे आपल्या एकाकी आई एथेलशी (मिल्ड्रेड नॅटविक) जमवून देण्याचे विचार कोरीच्या मनात येऊ लागतात. त्या दोघांना भेटवून आणण्यासाठी व्हिक्टर, एथेल आणि पॉल - कोरी अशी एक पार्टी करायचे ठरवले जाते. युरोपिअन व्हिक्टर सगळ्यांना एका अल्बेनिअन रेस्टोरंटमधे घेऊन जातो पण अपरिचित खाण्या-पिण्यामुळे पॉल आणि एथेल पार्टीच्या मजेत मनापासून सहभागी होऊच शकत नाहीत. व्हिक्टर आणि कोरी मात्र जल्लोषी स्वभावामुळे नाच गाण्याची पूर्ण मजा लुटतात.
पार्टीनंतर एथेलला अस्वस्थ वाटू लागते आणि व्हिक्टर तिला घरी सोडायला जातो. फ्लॅटवर परत आल्यावर पॉल आणि कोरीचे पहिले पण जबरद्स्त भांडण होते. कोरी पॉलला नेहेमी गंभीर राहण्याबद्दल, तिच्या संसारात रोमान्स, थरार निर्माण करण्याच्या प्रयत्नांना साथ न दिल्याबद्दल दोष देते तर पॉल कोरीच्या थिल्लरपणाबद्दल, अतिउत्साहीपणाबद्दल उपरोधाने बोलतो. कोरीच्या मते पॉल स्वतःला कधीच सैल सोडू न शकणारा, जीवनातल्या साध्या रोमांचांना घाबरणारा (साधे बागेत अनवाणी चालतानादेखील दहादा विचार करणारा -म्हणूनच चित्रपटाचे शीर्षक!) अकाली प्रौढ झालेला माणूस असतो. शब्दाने शब्द वाढतो आणि मामला चिघळतो.
यापुढील चित्रपट म्हणजे पॉल-कोरीचे भांडण कसे मिटते, संसारातील खटके सहन करता करता त्यांना एकमेकांच्या स्वभाव विशेषांची ओळख कशी होते आणि व्हिक्टर - एथेलची प्रौढ प्रेमकहाणी काय रंग आणते याची मनोहारी वेगवान मालिका आहे. शेवटी सगळे गोड होणार हे माहीत असूनही लुटुपुटुचे ताण-तणाव आणि प्रेमी युगुलाची (ओढवून घेतलेली) तगमग बघण्यात एक और मजा येते.
चारही मुख्य कलाकारांचा अभिनय केवळ अप्रतिम म्हणावा असा वठला आहे. रॉबर्ट रेडफर्डच्या तरूणपणातील हा चित्रपट. 'इन्डिसेंट प्रपोजल अणि द हॉर्स व्हिस्परर' हे त्याचे उतारवयातील चित्रपट पाहून फॅन झालो अणि मग आधीचे बरेच चित्रपट पाहणे झाले. त्याने धीरगंभीर पॉल सुंदर वठवलाय. एथेल झालेली मिल्ड्रेड नॅटविकसुद्धा हॉलिवूडमधील प्रसिद्ध चरित्र अभिनेती. पोरीच्या मॅचमेकिंगने हैराण झालेली प्रेमळ आई तिने झकास रंगवलीय.
पण चित्रपटात भाव खाऊन जातात कोरी- जेन फोंडा आणि व्हिक्टर- चार्ल्स बॉयर. दोघांनी नुसता धुडगूस घातलाय. पॉलवर झपाटून प्रेम करणारी, त्याला हसवण्यासाठी उल्ट्या सुल्ट्या क्लृप्त्या वापरणारी आणि जीवनावर प्रचंड प्रेम करणारी कोरी इतकी सुंदर साकारलीये! मला जेन फोंडाबद्दल प्रभाकर तामणेंच्या एका कादंबरीतील उल्लेखामुळे (आपल्या शिल्पा शेट्टीसारखी) 'फिटनेस व्ही डी ओ करणारी एरोबिक्स गुरु' एवढेच माहीत होते. पण हा चित्रपट पाहून तिच्या अभिनयाविषयी कळले आणि नंतर तिला ऑस्कर मिळालेले 'क्लूट' आणि 'कमिंग होम' पाहून तर आदरच उत्पन्न झाला. तिनेच ही साधी कथा पूर्ण तोलून धरली आहे. जेन या चित्रपटात कहर सुंदर दिसली आहे.
आणि लास्ट बट नॉट द लीस्ट : चार्ल्स बॉये ! हॉलिवूडमधील एक मोठे नाव. इनग्रिड बर्गमन, बेटी डेविस यासारख्या हॉलिवूड सम्राज्ञींच्या नायकाची भूमिका साकारलेला हा मूळ फ्रेंच अभिनेता नंतर चरित्रभूमिकांतही तशीच छाप सोडून गेलाय. त्याचे आधी 'अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज' आणि 'हाऊ टू स्टील अ मिलियन' पाहिले होते, पण व्हिक्टर जास्त स्मरणीय. रंगी ढंगी, स्वच्छंदी व्हिक्टर आपल्या मुद्राभिनयाने, संवाद फेकीने वाक्यावाक्याला हसवतो. खटकेबाज संवाद हेही चित्रपटाचे महत्त्वाचे शक्तिस्थान आहे.
लग्नानंतर आपापले स्वभावविशेष आणि इगो सांभाळण्याच्या नादात विजोड व्हायचे की स्वभावांचा सामाईक विभाजक काढून परस्परांना पूरक ठरायचे यातच संसारसुख अवलंबून असते आणि कितीही परिपूर्ण संसार असला तरी जोडीदारासाठी किंSSचित का होईना वाकावे लागतेच हे सुस्नात नर्मविनोदी शैलीत सांगणार्‍या या चित्रपटातील अभिनय आणि संवाद आठवून पुढे कित्येक दिवस मुखावर मंदस्मित झळकत राहते. चांगल्या चित्रपटाकडून आणखी काय हवे?

bft1.jpgbft2.jpg

(प्र.चि. इंटरनेटवरून साभार)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा.. बघितला पाहिजे..
रेडफर्डचा आउट ऑफ आफ्रिका बघ नक्की (अर्थात तो आहे मेरिल स्ट्रीपचा). तसा मला स्पाय गेम पण आवडतो रेडफर्डचा Happy

आउट ऑफ आफ्रिका मेरील साठीच पाहिला गेला. स्पाय गेम मधे रेडफर्ड - पिट दोघे आवडले.
रेडफर्ड जास्त आवडला 'द हॉर्स व्हिस्परर' मधे.

वा वा! आता 'हॉर्स व्हिस्परर'बद्दलही लिहा. ऑल टाइम फेव्हरिट. Happy

रेडफर्डचा 'स्नीकर्स'पण (अतर्क्य आणि अचाट असूनही) आवडला होता मला.

पाहिला पाहिजे.

कधीही परत परत बघु शकते असा आहे हॉर्स विस्परर. प्रचंड आवडलेला चित्रपट... त्यात बराच म्हतारा आहे की रॉबर्ट.