एक भिंत येथे होती

Submitted by सांजसंध्या on 6 March, 2013 - 00:12

आज माझ्या गावचा | रस्ता उदास वाटला | वेशीतल्या कमानीचा | खांब का हा वाकला ||१||
एक कामधेनू होती | इवल्याशा आठवांत | दावे भकास आज | भिजले गं आसवात ||२ ||
काळ्या आईस नाही | काळ्या ढगाची भेट | थरथरणा-या मनात | रणरणते ऊन थेट ||३||
एक भिंत येथे होती | उन्हामध्येही ओली | मातीत शुष्क भेग | पडवीत रुंद झाली ||४||
ओठांत आज नाही | हक्काचे एक हासू | आई महागले गं | डोळ्यांतलेही आसू ||५||

- संध्या
०६ मार्च २०१३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली ,
एक भिंत येथे होती | उन्हामध्येही ओली | मातीत शुष्क भेग | पडवीत रुंद झाली
ओठांत आज नाही | हक्काचे एक हासू | आई महागले गं | डोळ्यांतलेही आसू
या ओळी मनात घुसतात .

फार छान रचना

एक भिंत येथे होती | उन्हामध्येही ओली |
मातीत शुष्क भेग | पडवीत रुंद झाली ||४|| >>> या साठी __/\__/\__/\__

सर्वांचे आभार.
दुष्काळ हा कवितेचा विषय होऊ शकतो का हे माहीत नाही. पण शहरात सुखात राहणा-या एका मुलीची माहेरी दुष्काळाने झालेल्या परवडीबाबतची मनःस्थिती डोळ्यासमोर उभी राहिली आणि मग राहवलं नाही.