हंबरून वासराले चाटते जवा गाय

Submitted by अभय आर्वीकर on 11 March, 2013 - 02:35

हंबरून वासराले

हंबरून वासराले चाटते जवा गाय
तवा मले तिच्यामधी दिसते माही माय

आया-बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा
आनं दुष्काळात मायचा माह्या आटला होता पान्हा
पिठामधी पाणी टाकून मले पाजत जाये
तवा मले पिठामधी दिसते माही माय

बाप माह्या मायच्यामांगं रोज लावी टुमनं
बास झालं शिक्षण आता हाती घेऊ दे रुम्नं
शिकून शान आता कोणता मास्तर होणार हायं?
तवा मले मास्तरमधी दिसते माही माय

काट्याकुट्या येचायाले जाये माय रानी
पायात नसे वाह्यना तिच्या फ़िरे अनवाणी
काट्याकुट्यालाही तिचे मानतं नसे पायं
तवा मले काट्यामधी दिसते माही माय

माय म्हणूनी आनंदानं भरावी तुझी ओटी
पुन्हा लाखदा जन्म घ्यावा याच मायच्या पोटी
तुझ्या चरणी ठेऊन माथा धरावे तुझे पाय
तवा मले पायामधी दिसते माही माय

                           कवी - स्व. प्रा.स.ग.पाचपोळ
                            काव्यवाचन - विजय विल्हेकर
-------------------------------------------------
काव्यवाचन ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

chan

ही कविता जितेंद्र जोशीच्या आवाजात ऐकलीये मोबाईल वर... छानच आहे. खरे कवी कोण ते तुमच्यामुळे कळाले... धन्यवाद Happy

१५-१६ फेब २०१३ या काळात कोंकणातल्या कुडाळ येथे मतिमंद आणि भिन्नमति मुलांचा एक अखिल भारतीय मेळावा झाला होता. त्यातल्या एका गायनस्पर्धेत एका मतिमंद मुलाने हे गीत अतिशय सुंदररीत्या सादर केले होते. तो मुलगा मतिमंद होताच, शिवाय आईवेगळा होता. त्याची ती अवस्था, भावनोत्कटतेमुळे आवाजात आलेला किंचित कंप आणि योग्य ठिकाणी योग्य तेवढा पॉझ घेण्याची हातोटी यामुळे त्याचे सादरीकरण लोकांच्या काळजाला भिडले. तेव्हापासून ही कविता मनात अगदी रुतून बसलीय. आज आपल्यामुळे ती पूर्ण स्वरूपात मिळाली. आता साठवून ठेवीन.
अनेक धन्यवाद.

Harshalc | 11 March, 2013 - 18:48 नवीन
ही कविता जितेंद्र जोशीच्या आवाजात ऐकलीये मोबाईल वर... छानच आहे. खरे कवी कोण ते तुमच्यामुळे कळाले... धन्यवाद
>>> +१

तेव्हापासुनच हवी होती ही कविता
धन्यवाद मुटेकाका Happy

काट्याकुट्या येचायाले जाये माही राणी

हे असे नही

काट्याकुट्या येचायाले जाये माळराणी

हे असे आहे असे मला वाटते.

हंबरून वासराले चाटती जवा गायं : नारायण सुर्वे

हंबरून वासराले चाटती जवा गायं
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले………..

आया बाया सांगत व्हत्या,व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माझे आटला व्हता पान्हा
पीठामंदी…..पीठामंदी
पीठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय..
तवा मले पीठामंदी दिसती माझी मायं….दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले………..

कण्या काट्या वेचायला मायं जाई रानी
पायात नसे वाहन तिझ्या,फिरे अनवाणी
काट्याकुट्या…रं काट्याकुट्या
काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पायं
तवा मले काट्यामंदी दिसती माझी मायं… दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले………..

बाप माझा रोज लावी,मायेच्या मागं टूमनं
बास झालं शिक्षाण आता,होऊदे हाती कामं
आगं शिकूनं शानं…गं शिकूनं शानं
शिकूनं शानं कुठं मोठा मास्तर व्हणार हायं
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी मायं….दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले………..

दारू पिऊन मायेला मारी जवा माझा बापं
थरथर कापे अन् लागे तिले धापं
कसा ह्याच्या…रं कसा ह्याच्या
कसा ह्याच्या दावणीला बांधली जशी गायं
तवा मले गायीमंदी दिसती माझी मायं….दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले………..

नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी
सांग म्हणे राजा तुझी कवा दिसलं राणी
नं भरल्या डोळ्यान…नं भरल्या डोळ्यान
भरल्या डोळ्यान कवा पाहील दुधावरची सायं
तवा मले सायीमंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले……

गो म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जनम घ्यावा गं माये तुझ्या पोटी
तुझ्या चरणी…गं तुझ्या चरणी
तुझ्या चरणी ठेऊन माथा धरावं तुझं पायं
तवा मले पायामंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं
रे हंबरून वासरले चाटती जवा गायं
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी मायं…दिसती माझी मायं..

संकलक: प्रवीण कुलकर्णी
http://pkquiettime.blogspot.in/2010/08/blog-post_1553.html

आत्ता बोला Happy

शामजी,
जितेंद्र जोशीनेही या कवितेचे कवी म्हणून नारायण सुर्वेंचंच नाव घेतलेलं

पन मग नक्की कुणाची आहे ही कविता Uhoh

जितेंद्र जोशीने ही कविता महाराष्ट्रभर पोहचवली मात्र स्व. प्रा.स.ग.पाचपोळ यांच्यावर अन्याय केला , अरे माहित
नव्हते तर तसे सांगायचे उगाच सुर्व्यांच्या नावावर खपवली...

आज ९०% साईट्सवर ही कविता सुर्व्यांच्या नावाने आहे Sad

जितेंद्र जोशीने ही कविता महाराष्ट्रभर पोहचवली मात्र स्व. प्रा.स.ग.पाचपोळ यांच्यावर अन्याय केला >>>>>> Sad

सुर्व्यांचे बालपण आणि हयात मुंबईत गेल्याकारणाने त्यांना ही भाषा(बोली) इतकी अवगत असेल असे वाटत नाही.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर्वांचे. Happy

कवितेचा मूळ कवी कोण यावर मागील काही दिवसात बर्‍याच घडामोडी झाल्यात. त्याविषयी थोडे सविस्तर लिहावे लागेल, म्हणून ते यथावकाश लिहितो.

याविषयीची अधिक माहीती कुणाकडे असेल तर अवश्य लिहावी.

जितेंद्र जोशीने ही कविता महाराष्ट्रभर पोहचवली मात्र सुर्व्यांच्या नावावर खपवली...
असे मला वाटते कार् ण जितेंद्र जोशीने कवितेचा कवी कोन ते महित नाही असे म्हतल्र आहे पन तिचे मरथीत भाशातर सुर्वे नी केले आहे असे सान्गतो जरा निट आइक ती च्लिप.

ही कविता नारायण सुर्व्यांची नाही तर प्रा. पाचपोळ यांची आहे. कविता ऐकताना मला प्रा. फ.मु. शिंदे यांची "आई" च वर्णन करणारी कविता आठवली, ते म्हणतात "आई खरंच काय असते ? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते." अश्या 'आई' वरील भावपूर्ण कविता ऐकल्या कि, पुन्हा लेकुरवाळा तान्हा होऊन जीवनाच्या धकाधकीतून आईच्या कुशीत जावे असे वाटते. वात्सल्याचा, मायेचा अनुभव दिल्याबद्दल मुटे साहेब तुमचे आभार !

कवी स्व. प्रा.स.ग.पाचपोळ हे बुलढाना जिल्ह्यातील. त्यांच्या कवितेवर वर्‍हाडी भाषेचा प्रभाव पडणे स्वाभाविकच होते. त्यांची ही कविता लाक्षणीक दृष्ट्या खूप गाजली नसली तरी त्या तुलनेने मात्र जनमानसात खूप रुजलेली आहे. लोकांनी स्विकारल्यामुळे ह्या कवितेला "लोकमान्यता" प्राप्त होऊन जनमाणसाच्या ओठी रुळलेली आहे.

मुंबई येथील एका पोलीस खात्याच्या कार्यक्रमात जेव्हा ही कविता जितेंद्र जोशींनी सादर केली तेव्हा या कवितेचा कवी म्हणून नारायण सुर्वेंचा उल्लेख केला. हा कार्यक्रम टीव्हीवर पाहणार्‍यांना ही बाब पचनी पडण्यासारखी नव्हतीच. ही कविता जर नारायण सुर्वेंची असेल तर प्रा.स.ग.पाचपोळ हे साहित्यचोर ठरण्याची शक्यता निर्माण झाली. ही बाब अनेकांच्या जिव्हाग्री लागली. शिवाय प्रा.स.ग.पाचपोळ यांना डावलून चक्क नारायण सुर्वेंचे नाव घेणे हेही अनाकलणीय होतेच.

अमर हबिब, विजय विल्हेकर यांनी यासंदर्भात खोलवर चौकशी करून पुरावे गोळा करणे सुरू केले.
बुलढाण्याचेच कवी श्री लांजेवार यांनीही पुरेशी माहिती/पुरावे गोळा करून या संदर्भात लोकमतच्या आवृत्तीत एक लेख लिहून ही कविता स्व. प्रा.स.ग.पाचपोळ यांचीच आहे, हे ठासून मांडले.

जितेंद्र जोशी काहीही म्हणत असले तरी खुद्द श्री नारायण सुर्वेंनी या कवितेवर आपला दावा कधीही सांगीतला नाही, अशी माझी माहीती आहे.

<<<रुम्नं म्हणजे काय ?>>>

भारती बिर्जे डि, जमीन कसण्यासाठी वापरतात त्या बहूतेक औताच्या-औजारांना, कुळव, वखर, तिफण वगैरेंना हाती पकडण्यासाठी एक विशीष्ट आकाराचा दांडा असतो, त्याला रुम्नं असे म्हणतात.

रुम्न हाती घेणे म्हणजे शेती कसायला लागणे, असा अर्थ.
कधी-कधी रुम्न हाती घेणे म्हणजे शस्त्र हाती घेऊन लढायला सज्ज होणे, असाही अर्थ काढला जातो. Happy

माझीही आवडती कविता आणि गीत.

कसा ह्याच्या दावणीला बांधली जशी गायं>>>
इथे
कसायाच्या (कसाई) दावणीला
असं हवं.

माझीही आवडती कविता आणि गीत.

कसा ह्याच्या दावणीला बांधली जशी गायं>>>
इथे
कसायाच्या (कसाई) दावणीला
असं हवं.

Pages