मायबाप

Submitted by राजीव मासरूळकर on 10 March, 2013 - 05:46

मायबाप
******

संसारसर्पाच्या विळख्यात
दारिद्र्याचे गरळ गिळून
प्रत्येक दिवशी स्वतःला
मजुरीच्या मोलात विकून
थकूनभागून
सांजावतांना
माझे मायबाप
कवेत घेऊन येतात-
एक धगधगते अंधारसत्य . . . .
त्यांच्या पिचलेल्या हाडांतून
उसळते आग
तिलाही देतात ते
रक्ताचे डाग
मी मात्र बसलेलो
थंडचा थंड
शिक्षणातल्या शौर्याने
बनलेलो षंढ . . . . . . !

-राजीव मासरूळकर
"मनातल्या पाखरांनो"
२००६, लेखन २००४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कणखरजींशी सहमत

अतीशय वास्तवदर्शी कविता वाटली
शिक्षणातल्या शौर्यामुळे मेहनतीत कमीपणा मानण्याची जी समाजात फॅशन आलीये त्याबद्दल आहे ना ही मासरूळकर

अमेयजी ,
जाईताई ,
वैवकु ,
हार्दिक आभार !

वैवकु,
>>शिक्षणातल्या शौर्यामुळे मेहनतीत कमीपणा मानण्याची जी समाजात फॅशन आलीये त्याबद्दल आहे ना ही मासरूळकर>>

होय. ते तर आहेच , पण त्यापेक्षाही आपल्या मायबापाची इतकी होरपळ बघून उच्चविद्याविभूषित असूनही बेकार असलेल्या तरूणाचा आक्रोश, संताप त्यातून व्यक्त होत आहे, असं मला वाटतं.
जन्मदात्यांच्या मरणप्राय कष्टाची जाणीव ठेऊन त्यांना सुखाचे दिवस दाखवण्याचं स्वप्न धुळीला मिळताना बघून कवितेतील 'मी' स्वतःला षंढ म्हणवून घेण्यासही मागेपुढे पाहत नाही, यावरून ते स्पष्ट व्हावं.

शशांकजी,
कविता वाचतांना अंगावर काटा येणं हे माझ्या या कवितेचं यश आहे असं मी मानतो. त्याहीपेक्षा हा अनुभव मी स्वतः जगलो आहे, ते कवितेत मांडण्याचं चीज झालं, असं मला वाटलं आपला प्रतिसाद वाचून.
त्यासाठी मी आपला हार्दिक ऋणी आहे !

बेफिकीरजी,
आपलेही हार्दिक आभार !

<<<<हा अनुभव मी स्वतः जगलो आहे, >>>> जगण्यातून आलेली कविता खरोखर प्रभावी आहे,असते .आवडली .