बीट सूप : आमच्या घरातील खाद्यक्रांतीचा साक्षीदार

Submitted by अमेय२८०८०७ on 9 March, 2013 - 10:51

बालपणीचा काळ खाण्यापिण्याच्या बाबतीत खरेच सुखात गेला. मिसळ, वडे, भजी यांसारख्या जिभेचे चोचले पुरवणार्‍या 'जहाल' पदार्थांवर बालवयातच श्रद्धा बसल्याने बाकी वरण-भात, कच्च्या भाज्या, सलाड्स वगैरे 'मवाळ' गोष्टी एकदम 'ह्या' वाटायच्या. त्यातून डाएट बिएटचे फॅड घरात शिरलेले नव्हते. मायाजालाची क्रान्तीही दूर होती त्यामुळे कॅलरीज, मेटाबॉलिझम, लीन मीट, लो फॅट असे शब्द घराघरात अजून मुरलेले नव्हते. दुधातून साय काढून टाकणारा 'येडा' वाटावा असे दिवस होते. बासुंदीला लावण्यासाठी पेढ्यांचे पाकीट फोडताना 'कॅलरीच्या' भीतीने गृहिणीचा हात थरथरत नसे. लोणी काढून झाल्यावर रवी आणि भांडे, तुपाच्या भांड्यातील खरड (बेरी), साय फेटल्यावर रिकामे झालेले भांडे अशा गोष्टी हल्लीसारख्या गनिमीकाव्याने परस्पर 'सिंक' मध्ये न ढकलता मुला-माणसांना प्रेमाने ऑफर केल्या जायच्या.

पण आता काय बोलावे ! कडधान्ये काय, घट्ट वरण काय, फुलके काय नि काय काय. एखाद्या वीराचे ठेवणीतले शस्त्र लपवून ठेवून त्याला युद्धाला बोलवावे तशा खवैयांना आवडत्या गोष्टी 'विषासमान' आहेत असा प्रपोगंडा करून खाद्यआघाडीवर लढणार्‍या वीरांची 'रसद' तोडण्यात आहारतज्ज्ञांना काय हशील वाटते ते तेच जाणोत.
आमच्या घरीही अशी रक्तरंजित खाद्यक्रांती घडली तो काळ आजही आठवतो. मला वाटते 'डॉ. मी काय खाऊ?" हे पुस्तक आईच्या हाताला लागले. त्या इवल्याश्या दिसणार्‍या पुस्तकातील जहराची कल्पना असती तर बाबांनी ते वेळीच निकालात काढले असते पण तसे व्हायचे नव्हते. दुसर्‍या दिवसापासून घरातील स्वयंपाकाच्या तंत्र आणि मंत्रात लक्षणीय फरकाला सुरूवात झाली. बाबांचे पोट कसे अंमळ वर यायला सुरूवात झाली आहे, परवा चार पिशव्या घेऊन येताना त्यांना हलकी धाप कशी लागली, आणि एकंदरीत त्यांची दिनचर्या आमूलाग्र बदलण्याची गरज कशी आहे यावर बिनदिक्कत चर्चा सुरू झाली. खरेतर चर्चा नव्हेच कारण दुसर्‍या पक्षाला बोलायला वावच नव्हता. रात्रीचे जेवण झाल्यावर आपण खाल्ले ते नक्की जेवणच होते का काय असा विचार करत, पोटावर हात फिरवत, अंगणात जड मनाने (आणि हलक्या पोटाने) फिरणार्‍या बाबांना पहाणे हा एक क्लेशदायक अनुभव होता.

अर्थात आई ही आई असल्याने तिचे मन काही द्रवले ब्रिवले नाही. तिच्या 'सुधारणांचा' इष्ट तो असर होऊन पस्तिशीपासून बाबांनी जी कात टाकली, ती आज साठीच्या उंबरठ्यावरही त्यांची तब्ब्येत खुटखुटीत आहे वगैरे ठीकच आहे पण (खाजगीत) बोलताना आजही शरीराचे ते भरदार जुने कानेकोपरे आता पुन्हा 'हाताला' लागणार नाहीत याची खंत ते बोलून दाखवतात यावरून घाव किती खोलवरचा आहे याची कल्पना यावी.
आज हा पाल्हाळ लावायचे कारण म्हणजे 'बीट' नावाची भाजी. हे मूळ आहे की खोड याबद्दल अजून गोंधळ आहे. लहानपणी जीवशास्त्रात बटाटा हे खोड आहे असे वाचले तेव्हा चीटींग वाटले होते. मी बटाट्याचे रोप पाहिले होते. जो भाग छान जमिनीत गाडलेला असतो तो खोड कसे असेल? असो.

तर बीट हे आईच्या नवखाद्यक्रांतीचे (नवकविता, नवनाट्य अशा चालीवर) महत्त्वाचे हत्यार होते. काप, कीस, उकडून, घोटून.... कशा ना कशा रूपात नेमेची पानात ही भाजी दिसताच दचकणारे बाबा पाहून संताजी धनाजी आणि त्यांना घाबरणारे घोडे या ऐतिहासिक कथेची आठवण व्हायची. बाबांच्या मनावर बसलेला बीटाचा लाल रंग इतका पक्का होता की एकदा त्यांना उन्हातून आल्यावर समोर आलेला कोकम सरबताचा ग्लास पाहून केवळ रंगसाधर्म्यामुळे ,' आँ, आता काय बीटाचे सरबतपण का?' असे म्हणत नव्याने फुटलेला घाम टिपताना पाहिल्याचेही आठवते.

बाबांना आमचा नैतिक पाठिंबा असला तरी काही काही पदार्थ आम्हाला मनातून आवडायचेच. त्यातला एक म्हणजे 'बीट सूप'. अफलातून दिसायचे आणि चवही मस्त. काही वर्षांपूर्वी विकी रत्नानीने ( माझ्या मुलाच्या भाषेत 'गुलमे गुलु' Gourmet Guru) ह्या सुपाची रेसिपी दाखवली तेव्हा आईच्या (बाबांवर केलेल्या) खाद्यप्रयोगांचे स्मरण झाले. अर्थात दोन रेसिपीत थोडा फरक होता, पण दोन्हीही भावलेल्या असल्याने त्यांची काहीशी सरमिसळ माझ्या रेसिपीत झालेली आहे. तर बघूया रेसिपी ?
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

साहित्य

बीट दोन मध्यम कंद -- साल काढून पाण्यात अर्धे कच्चे उकडून घ्यावे
एक मोठे गाजर मध्यम आकाराचे तुकडे करून
थोडे आले, लसूण सहा-सात पाकळ्या
एक मोठा कांदा उभा चिरून
एक हिरवी मिरची बिया काढून
ऑलिव्ह ऑइल दीड टे. स्पून
लिंबाची पाने - दोन (शिरेवर दुमडून अर्धे भाग करून शीर काढून टाकावी)
हिरव्या लिंबाचा 'झेस्ट' (किसलेली साल) - एक छोटा चमचा
दोन टे.स्पून व्हाईट व्हिनेगर
पांढर्‍या मिर्‍यांची पूड -- एक टी स्पून
वेजिटबल स्टॉक
नारळाचे दूध -आवडीनुसार
कोथिंबीर सजावटीसाठी

beetsp1.jpgकृती

ऑलिव्ह ऑइलवर आले लसूण परता, जळू न देता कांदा, बीट, गाजर, मिरची घालून परता. भाज्या मऊ झाल्या की व्हिनेगर, लिंबाची पाने आणि लेमन झेस्ट घाला. मिरपूड, मीठ घालून वेजिटेबल स्टॉक घाला. एकदा उकळी आली की आंच धीमी करून भाज्या पूर्ण शिजेपर्यंत झाकण लावून ठेवा.

beetsp2.jpg

भाज्या शिजल्यावर आंचेवरून बाजूला करून गार होऊद्या. भाज्या आणि स्टॉक गाळून घ्या. वेगळ्या झालेल्या आणि शिजलेल्या गार भाज्या डावभर स्टॉकबरोबर मिक्सरमधून अत्यंत बारीक होईपर्यंत चालवून घ्या.

beetsp3.jpgbeetsp4.jpg

गाळलेला स्टॉक आणि मिक्सरमधून काढलेल्या भाज्या पुन्हा एकत्र करा. पाहिजे त्या कन्सिस्टंसीनुसार वाटले तर थोडे पाणी घाला. पुन्हा एक उकळी येऊद्या. आंच बारीक करून पाहिजे तेवढे नारळाचे दूध घाला. कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करा.

beetsp5.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रांत,
बीट सूप...वगैरे नावातही कविता असेल असे वाटणार्‍या तुम्हाला सलाम. कवितेवर इतके प्रेम असणारी माणसे विरळा Happy

अमेय२८०८०७,

विक्रांतना बीट सूप म्हणजे झोडपी लापशी असं काहीसं वाटलं असावं! Proud म्हणून ती कविता!!

असो.

लेख फक्कड जमलाय! तुमची लेखनशैली आवडली. एखादं पुस्तक काढाच म्हणतो. आपल्या प्रयत्नाने पुढेमागे कदाचित खाद्यसाहित्य असा प्रकार रुळेल. सुरुवातीला खमंग ललित वगैरे द्यायचं आणि नंतर त्याला साजेशी पाककृती सादर करायची.

पुढील खाद्यललितास शुभेच्छा! Happy

आ.न.,
-गा.पै.

कवीची पाककृती ती .
वाचणे अन चावणे एकत्रच होणार.मस्त फंडा कारण तुमचं मनापासूनचं प्रेम या विषयावरचं.

कस्लं खमंग लिहितोस यार तू - स्वयंपाकात मी ढ गोळा असल्याने तुझ्या केवळ चविष्ट, खुसखुशीत लेखनशैलीकरता वाचतो झालं ......

रेसिपी लिहायची स्टाईल मस्त आहे तुमची!

आमच्याकडे बीटाच्या सुपाचा मी समस्त गृहसदस्यांवर केलेला प्रयोग ''कसला डेंजर रंग आहे!'', ''रक्तच प्यायल्यासारखं वाटतंय!'', ''काय काय प्रयोग करतेस आमच्यावर!'' इत्यादी उद्गारांसहित चाखला गेला व सूप आवडल्याची पावतीही मिळाली. परंतु हे सूप मुद्दाम करायच्या भानगडीत घरातले बाकीचे लोक पडत नाहीत हेही खरेच! मला त्यांना हे सूप करण्याची आठवण करून द्यायला लागते.
माझी बीटच्या सुपाची कृती खूपच सोपी सरळ आहे.

लोण्यात थोडा कांदा परतायचा, त्यात शिजलेल्या बिटाचे तुकडे/ कीस व पाणी (किंवा व्हेज स्टॉक) घालायचे. थोडे किसलेले आले घालायचे. जिरेपूड, मीठ, मिरपूड चवीप्रमाणे घालायची. हिरव्या मिरच्या ऐच्छिक. (काहीजणांना हिरव्या मिरचीचा तिखटपणा सहन होणार नाही.) उकळले की गाळून घ्यायचे (ऐच्छिक) व वाढताना वरून कोथिंबीर व लिंबाचा रस घालून द्यायचे. लोण्याचा गोळा / क्रीम / नारळाचे दूध वरून घालणे ऐच्छिक.

हे सूप गरमागरम किंवा फ्रीजमध्ये थंडगार करून पिता येते. फक्त लिंबाचा रस आयत्या वेळी घालायचा.

सर्वांना धन्यवाद.
गा.पै. आपुलकीने हरखून गेलोय, पुढच्या भारतभेटीत अजेंड्यावर कोल्हापूर असेल तर असेन तिथून कोल्हापूरला येऊन मिसळ खिलवण्याची जबाबदारी माझी.
भारतीताई Happy Happy
खरेतर सर्वांनाच Happy Happy

आपल्या पाकृ वाचनीय, देखणीय असतात हे बीटाचे सूप 'सीपनीय' आहे की नाही करुन पाहिल्यावर सीप केल्यावर सांगण्यात येईल!

मस्त !

मस्त लिहिली आहे रेसिपी .. Happy

लिंबाची पानं म्हणजे अ‍ॅक्च्यल पानंच ना, लेमनग्रास वगैरे नाही ना? Happy

अनित, सूप ,सुपाची गोष्ट्..औप्पर्ब जमलीये..
तुझी रेसिपीही स्वादिष्ट आहे...
माझी आई ही सुपात तमालपत्र घाले...
चलो एक और रेस्पी आवडत्या दहात Happy

कालच केलं. 'ऑलिव्ह ऑइल दीड टे. स्पून' च्या नंतरचं सगळंच ऑप्शनला टाकलं तरी सूप एकदम यँव बनलं. नेक्स्ट टायमाला फुल्ल-फ्लेज्ड रेसिपीनं करून बघण्यात येईल. रेसिपीकरता धन्यवाद. Happy

Pages