रावण विरचित शिवतांडव स्तोत्राचा संगीतबद्ध मराठी अनुवाद

Submitted by संयोजक on 27 February, 2013 - 02:01
Mabhadi LogoPNG.png

मराठी काव्य अनुवादः श्री. नरेंद्र गोळे
श्राव्य-संचिकानिर्मिती, संगीत, संगीतसंयोजन व गायनः योग (श्री. योगेश जोशी)



अनुवादक श्री. नरेंद्र गोळे यांचे मनोगतः

हे स्तोत्र पिढ्यानपिढ्या तोंडपाठ असणारे अनेक लोक आहेत. आमच्या घरातील वडीलधारेही हे तोंडपाठ म्हणत असत. पण सदैव ऐकत असूनही त्याचे माहात्म्य काही माझ्या डोक्यात शिरले नव्हते. अलीकडेच त्याचे नक्की शब्द काय आहेत त्याचा शोध घेत असता, त्याचे असंख्य श्राव्य आणि दृक्श्राव्य आविष्कार महाजालावर आढळून आले. दरम्यान ते इतक्यांदा ऐकले गेले की त्यातील नादमाधुर्य डोक्यात चढत गेले. अनेक ठिकाणी ते केवळ पंधरा श्लोकांचेच आढळून येते तर काही ठिकाणी ते सतरा श्लोकांचेही आढळून आले. हे मूळ संस्कृत स्तोत्र पंचचामर वृत्तात बांधलेले आहे. फलश्रुती मात्र वसंततिलका वृत्तात रचलेली आहे.
मुळातील पंचचामर छंदात, र्‍हस्व-दीर्घ- र्‍हस्व-दीर्घ अशा लयीने चालणार्‍या अनुनादिक रचनेत, प्रासादिक शिवस्तुती रचणार्‍या रावणाचे आणि पिढ्या-दर-पिढ्या मौखिक परंपरेने ते जतन करणार्‍या आपल्या पूर्वजांचे आपण सगळेच शतशः ऋणी आहोत. आसेतुहिमालय सर्व प्रांतांतील लोक सारख्याच निष्ठेने हे स्तोत्र पाठ करतांना आणि कलात्मक सांगितिक कौशल्याने पेश करतांना मला आढळून आलेले आहेत. ह्या स्तोत्राचे एकमेकांत अत्यंत कलात्मकतेने गुंफलेले यमकयुक्त शब्द आणि लय यांमुळे ते म्हणतांना वाणी शुद्ध होते. एकाग्रता पण वाढते.

ते सारखे सारखे ऐकत असतांना मला मराठीतही शब्द सुचत गेले. म्हणून मग संपूर्ण अनुवाद लिहावा असे वाटले. कदाचित, संस्कृतातील अर्थ लगेच उमगत नसल्याने मराठी अनुवाद अनेकांना आवडू शकेल असेही वाटले. भारतभरातील कित्येकांनी ह्या विख्यात स्तोत्रास नवनवीन पद्धतींनी सजवून चाली देऊन चिरंजीव करून ठेवलेले आहे. त्यातले रामायणातील रावणाने गायलेले तर सुप्रसिद्धच आहे. चित्र, स्वर, लयबद्धता आणि अदाकारी ह्यांचा सर्वाधिक सन्मान मिळालेले हे स्तोत्र आहे. एवढे की, मला माझीच अभिव्यक्ती अपुरी पडते की काय अशी सार्थ भीती वाटत आहे. पण मूळ स्तोत्रातल्या उपजत लयबद्धतेचे गारूडच मला ह्या रचनेप्रत घेऊन गेले ही वस्तुस्थिती आहे. ती रचना अतिशय अनुनादिक आणि लयबद्ध शिवस्तुती असल्याने, मराठीत रचतांनाही मला आनंदच झाला. शिवाय मायबोली डॉट कॉम आणि मिसळपाव डॉट कॉम ह्यांवरील प्रतिसादांत अनेकांनी ह्या प्रक्रियेत सक्रिय सहभागही घेतला.

मायबोली डॉट कॉम वर २८-११-२०१२ रोजी मी हे अनुवादीत स्त्रोत्र दाखल केले आणि मायबोलीकरांनी त्याचे प्रेमपूर्वक कौतुक केले. त्याच बरोबर बहुमूल्य सुधारणादेखील सुचवल्या. अनुवादाची अद्यतन आवृत्ती माझ्या "अनुवाद-रंजन" ब्लॉगवर उपलब्ध आहे.

०६-१२-२०१२ रोजी मी हे मिसळपाव डॉट कॉमवरही टाकले होते. तेथील सूचनांच्या आधारेही अनेक सुधारणा केलेल्या आहेत. विशेषतः फलश्रुती मूळच्या वसंततिलका वृत्तात बसवण्याची सूचना करणार्या, मिसळपाववरील व्यक्तीरेखा बॅटमन ह्यांचा उल्लेख आवश्यक आहे. त्यांचा अभिप्राय “मूळ स्तोत्र आणि तुमचा अनुवाद म्हणजे मणिकाञ्चन योग म्हणावा लागेल. समवृत्त अनुवाद, तोही यथार्थ आशयगर्भ करणे हे येरागबाळ्याचे काम अजिबात नोहे. भर्तृहरीच्या शतकत्रयीच्या भाषांतरात ते अनुभवाला येतं, प्रत्यक्ष वामनपंडित देखील काही ठिकाणी चकलेत वृत्त आणि आशयाची बंधने पाळताना. सी.डी.देशमुखांचा मेघदूताचा समश्लोकी अनुवाद मात्र तुलनेने खूप सरस उतरला आहे. मराठीत यमकाचे अतिरिक्त बंधन येते, ते तर आहेच. पण हे सगळे असून तुम्ही समवृत्त अनुवादाचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेललेत, त्याबद्दल कौतुक करावे तितके थोडेच आहे.”

नंतर एकनाथ जनार्दन मराठे ह्यांनी दिलेला एक अभिप्राय असा आहे की, “बाबांचे आज ८० वर्षे वय आहे व संस्कृतचा अभ्यास चांगला आहे. बाबांना हा अनुवाद प्रासादिक वाटला. विनोबांनी गीताईचा समश्लोकी अनुवाद केला आहे तसाच हा आहे असे म्हणाले. आत एकही चूक नाही असेही म्हणाले. अगदी खूष झाले वाचून! जटा-कटाह स्तोत्र मी अनेकदा म्हणतो, मुलांकडून एका स्पर्धेसाठी पाठ करून घेतले होते पण त्याचा अर्थ मला सुद्धा माहित नव्हता. तुमच्या कामामुळे तो समजला व कान व मन तृप्त झाले. तुमचे लाख लाख धन्यवाद!”

पञ्चचामर हे १६ अक्षरे प्रत्येक ओळीत असलेले अक्षरगणवृत्त आहे. दर आठ अक्षरांनंतर यती (अल्पविराम) असते. त्यात अनुक्रमे ज र ज र ज ग हे गण येतात.
लक्षणगीतः जरौ जरौ ततो जगौ च पञ्चचामरं वदेत् ।
उदाहरणः श्रीमत् शंकराचार्यांचे श्रीकृष्णाष्टकम् हे काव्यही पञ्चचामर वृत्तात बांधलेले आहे.
भजे व्रजैकमंडनं समस्तपापखंडनं । स्वभक्तचित्तरंजनं सदैवनंदनंदनम् ॥
सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं । अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् ॥

वसंत ऋतू म्हणजे कुसुमाकर. त्याचा तिलक म्हणजे वसंततिलक, अर्थात पुष्पगंध. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. ह्याच्या प्रत्येक ओळीत १४ अक्षरे आणि त भ ज ज ग ग हे गण येतात. त्यामुळे वृत्ताची चाल ठरलेली असते.
लक्षणगीतः जाणा वसंततिलका व्हय तेचि वृत्त । येती जिथे त भ ज जा ग ग हे सुवृत्त ॥
उदाहरणः कविताः माझे मृत्युपत्र, कवीः स्वातंत्र्यवीर सावरकर
की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने ॥
जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे । बुद्ध्याच वाण धरिले करी हे सतीचे ॥

काव्यरचनेची वृत्ते:

मराठीत मात्रा वृत्ते आणि अक्षरगणवृत्ते असे दोन प्रकार असतात. र्‍हस्व अक्षराची एक मात्रा आणि दीर्घ अक्षराच्या दोन. काव्याच्या एका ओळीतील सर्व मात्रांची मिळून संख्या एकच राखली जाते ती मात्रा वृत्ते असतात. तर प्रत्येकी तीन तीन अक्षरांचे आठ गण तयार करून त्यांच्या लयबद्ध आविष्करणांना अक्षरगणवृत्ते म्हणतात.

अक्षर-गण-वृत्ते म्हणजे लघु-गुरु अक्षरांचे साचेबद्ध आणि व्याकरणनिष्ठ आविष्कार असतात. अक्षरगणवृत्तात लघु म्हणजे र्‍हस्व उच्चार होणारी अक्षरे आणि गुरू म्हणजे दीर्घ उच्चार होणारी अक्षरे असतात. त्यांचा क्रम, रचनेतल्या प्रत्येक ओळीत पाळण्याचा नियम आहे. यामध्ये एकूण ४ ओळींच्या कडव्यामधील, ४ ही ओळींची गण रचना एकसारखी असते त्यास समवृत्त, २ ओळींची एकसारखी असते त्यास अर्धसमवृत्त अथवा सर्वच ओळींची वेगळी असू शकते त्यास विषमवृत्त म्हणतात. गण म्हणजे तीन अक्षरांचा एक गट असतो. असे एकूण आठ गण आहेत. त्यातील गणांची नावे आणि गणांतील लघुगुरूक्रम खालील सारणीत दिलेले आहेत.

अक्र

गण

लघुगुरूक्रम

द्विमान

चिन्हांकित

यमाचा

०११

- ऽ ऽ

राधिका

१०१

ऽ - ऽ

ताराप

११०

ऽ ऽ -

नमन

०००

- - -

जनास

०१०

- ऽ -

भास्कर

१००

ऽ - -

समरा

००१

- - ऽ

मानावा

१११

ऽ ऽ ऽ


अक्षरगणवृत्तबद्ध कवितेच्या एका कडव्यात चार ओळी असतात. एका ओळीतील सर्व अक्षरांचे तीन तीनांचे गट पाडायचे. प्रत्येक गटाचा एक गण असतो. मात्र, अक्षरगणवृत्तात बांधलेल्या कवितांच्या ओळींत तीनच्या पाढ्यात न बसणारी अक्षरेही कधी कधी असतात. अशा वेळी शेवटी अधिकतम दोन अक्षरे उरतील. लघु अक्षर उरल्यास त्याचा गण ल आणि गुरू अक्षर उरल्यास त्याचा गण ग धरावा.

थोडक्यात काय तर द्विमान गणितातील ००० ते १११ असे हे आठ संयोग आहेत. ० = लघु, १ = गुरू. अक्षरगणांची मांडणी, पारंपारिक यरतनभजसम अशी न करता (०००, ००१, ०१०, ०११, १००, १०१, ११०, १११) अशा प्रकारे नव्या वैज्ञानिक पद्धतीने केल्यास हीच किल्ली "न सजय भरतम" अशी मांडता येईल. (००० ते १११) याचा अर्थ 'भारत (कधीही) विजयी होणार नाही' असा निघतो. म्हणूनच कदाचित, पारंपारिक मांडणी यरतनभजसम अशी करत असावेत.


॥ रावण विरचित शिवतांडव स्तोत्राचा मराठी अनुवाद ॥

मूळ संस्कृत श्लोक

मराठी अनुवाद

जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले

गलेऽवलम्ब्य लम्बितां भुजंगतुंगमालिकाम्‌

डमड्डमड्डमड्डम न्निनादवड्डमर्वयं

चकारचंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम्‌

जटांमधून वाहत्या जलांनि धूत-कंठ जो

धरीत सर्पमालिका, गळ्यात हार शोभतो

डुमूड्डुमू करीत या, निनाद गाजवा शिवा

करीत तांडव प्रचंड, शंकरा शुभं करा

जटा कटाहसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी

विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि

धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके

किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम

जटांतुनी गतीस्थ, गुंतल्या झर्‍यांपरी अहा

तरंग ज्याचिया शिरी विराजती, शिवा पहा

ललाट ज्योतदाह ज्या शिवाचिया शिरी वसे

किशोर चंद्रशेखरा-प्रती रुचीहि वाढु दे

धराधरेंद्रनंदिनी विलास बंधुबंधुर-

स्फुरद्दिगंतसंतति प्रमोदमानमानसे

कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि

क्वचिद्दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि

नगाधिराज-कन्यका-कटाक्ष मोदिता शिवे

दिगंत संतती स्फुरून, मोदतीहि भक्त हे

कृपाकटाक्ष टाकिता जया, विपत्ति दूर हो

कधी दिगंबरामुळे कळे न रंजना मिळे

जटाभुजंगपिंगल स्फुरत्फणामणिप्रभा-

कदंबकुंकुमद्रवप्रलिप्त दिग्वधूमुखे

मदांधसिंधुरस्फुर त्वगुत्तरीयमेदुरे

मनोविनोदद्भुतं बिभर्तुभूतभर्तरि

जटाभुजंग तद्मणी-प्रदीप्त कांति ह्या दिशा

कदंब-पुष्प-पीत-दीप्त, शोभती झळाळत्या

गजासुरोत्तरीय ज्या विभूषवी दिगंबरा

प्रती जडो मती, घडो मनोविनोद, तारका

सहस्रलोचनप्रभृत्य शेषलेखशेखर-

प्रसूनधूलिधोरणी विधूसरांघ्रिपीठभूः

भुजंगराजमालया निबद्धजाटजूटकः

श्रियैचिरायजायतां चकोरबंधुशेखरः

सहस्रलोचनादि देव, पादस्पर्शता सदा

तयांस भूषवित त्या, फुलांनि भूषती पदे

भुजंगराज हार हो, नि बांधतो जटाहि तो

प्रसन्न भालचंद्र तो, चिरायु संपदा करो

ललाटचत्वरज्वल द्धनंजयस्फुलिंगभा-

निपीतपंचसायकं नमन्निलिंपनायकम्‌

सुधामयुखलेखया विराजमानशेखरं

महाकपालिसंपदे शिरोजटालमस्तुनः

कपाल-नेत्र-पावका क्षणात मोकलूनिया

वधी अनंग हारवी सुरेंद्र आदि देवता

सुधांशुचंद्र ज्याचिया शिरास भूषवीतसे

कपालिना, जटाधरा, दिगंत संपदा करा

करालभालपट्टिका धगद्धगद्धगज्ज्वल-

द्धनंजयाहुतीकृत प्रचंडपंचसायके

धराधरेंद्रनंदिनी कुचाग्रचित्रपत्रक-

प्रकल्पनैकशिल्पिनि त्रिलोचनेरतिर्मम

अनंग ध्वंसिला जिने, त्रिनेत्रज्योत तीच ती

नगाधिराज-नंदिनी-स्तनाग्र भाग वेधती

सुचित्र रेखते तिथे जयाचि दृष्टि योजुनी

त्रिलोचनाप्रती मना, जिवास वाढु दे रती

नवीनमेघमंडली निरुद्धदुर्धरस्फुर-

त्कुहुनिशीथिनीतमः प्रबंधबद्धकंधरः

निलिम्पनिर्झरिधरस्तनोतु कृत्ति सिंधुरः

कलानिधानबंधुरः श्रियं जगद्धुरंधरः

नव्या घनांनि दाटली, निशावसेपरी जशी

जटानिबद्धजान्हवीधरा प्रभा विभूषवी

गजेंद्र-चीर-शोभिता शशीकला प्रकाशवी

जगास धारका प्रसन्न व्हा नि संपदा करा

प्रफुल्लनीलपंकज प्रपंचकालिमप्रभा-

वलंबिकंठकंधरारुचि प्रबंधकंधरम्‌

स्मरच्छिदं पुरच्छिंद भवच्छिदं मखच्छिदं

गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे

प्रफुल्ल नील पंकजापरी प्रदीप्त कंठ ज्या

जये त्रिपूर ध्वंसिला, तसाच कामदेव वा

भवास तारणार आणि याग ध्वंसत्या हरा

भजेन मी शिवास त्या, गजांतका यमांतका

१०

अखर्वसर्वमंगला कलाकदम्बमंजरी-

रसप्रवाहमाधुरी विजृंभणामधुव्रतम्‌

स्मरांतकं पुरातकं भवांतकं मखांतकं

गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे

कलाबहारमाधुरीस भृंग जो शिवा असे

अनंगहंत आणि जो त्रिपूर, याग ध्वंसतो

भवास तारका हरा, सदा शुभंकरा हरा

भजेन मी शिवास त्या, गजांतका यमांतका

११

जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमश्वस-

द्विनिर्गमत्क्रमस्फुर त्करालभालहव्यवाट्-

धिमिद्धिमिद्धिमि द्ध्वनन्मृदंगतुंगमंगल-

ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्डताण्डवःशिवः

गतीस्थ सर्पहार जे, विषाग्नि सोडती असे

फणा उभा करून ते, कपालि ओतती विषे

मृदंगनाद गाजतो, ध्वनी मनास मोहतो

पवित्र तांडवी शिवा, विराजतो नि शोभतो

१२

दृषद्विचित्रतल्पयोर्भुजंग मौक्तिकस्रजो-

र्गरिष्ठरत्नलोष्टयोः सुहृद्विपक्षपक्षयोः

तृणारविंदचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः

समप्रवृत्तीकः कदा सदाशिवं भजाम्यम्‌

शिळा नि शेज, मोतियांचि माळ, साप वा असो

जवाहिरे नि मृत्तिका, विपक्ष, मित्र वा असो

तृणे नि कोमलाक्षि, नागरिक वा नरेंद्र वा

करून भेद नाहिसे, कधी भजेन मी शिवा

१३

कदा निलिंपनिर्झरी निकुंजकोटरे वसन्‌

विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन्‌

विलोललोललोचनो ललामभाललग्नकः

शिवेति मंत्रमुच्चरन्‌ कदा सुखी भवाम्यहम्‌

कधी शिरी धरून हात, शंकरा स्तवेन मी

वसेन जान्हवीतिरी विमुक्त होउनी मती

सुनेत्रचंचलेचिया कपालिचा ’शिवाय’ तो

चिरायु सौख्य पावण्या, कधी सदा स्मरेन मी

१४

निलिम्प नाथनागरी कदम्ब मौलमल्लिका-

निगुम्फनिर्भक्षरन्मधूष्णिकामनोहरः

तनोतु नो मनोमुदं विनोदिनींमहर्निशम्‌

परिश्रय परं पदं तदंगजत्विषांचयः

पदी विनम्र देवतांशिरी कळ्या, कदंब जे

तये चितारली, मनोज्ञ रूप रेखली, पदे

विभूषति, सुशोभति, मनोहराकृतींमुळे

प्रसन्न ती करो अम्हा, सदाच सौरभामुळे

१५

प्रचण्ड वाडवानल प्रभाशुभप्रचारणी

महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना

विमुक्त वामलोचनो विवाहकालिकध्वनिः

शिवेति मन्त्रभूषगो जगज्जयाय जायताम्‌

विशाल सागरातल्या शुभेच्छु पावकापरी

महाष्टसिद्धिकामना करीत सर्व सुंदरी

विवाहकालि शंकरा व पार्वतीस चिंतिती

जगास जिंकता ठरो, ’शिवाय’ मंत्रता ध्वनी

१६

इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तमं स्तवं

पठन्स्मरन्‌ब्रुवन्नरो विशुद्धिमेति संततम्‌

हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं

विमोहनं हि देहिनां सुशंकरस्य चिंतनम्‌

सदा करून मोकळ्या स्वरात श्लोक पाठ हे

स्मरून वा श्रवून हे, विशुद्धता सदा मिळे

हरीप्रती, गुरूप्रती, रती, न वेगळी गती

अशा जिवास मोहत्या, शिवाप्रती सदा रुची

१७

पूजाऽवसानसमये दशवक्त्रगीतं

यः शम्भुपूजनपरं पठति प्रदोषे

तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां

लक्ष्मीं सदैव सुमुखिं प्रददाति शम्भुः

पूजासमाप्तिस संध्येस म्हणेल जो हे

लंकेशगीत शिवस्तोत्र अनन्य-भावे

शंभू तया, रथ-गजेंद्र-तुरंग-स्थायी

लक्ष्मी प्रसन्न-वदना, वर-दान देई

॥ इति श्री. रावणकृतं

शिव-तांडव स्तोत्रं संपूर्णम्‌ ॥

अशाप्रकारे, श्री. रावण विरचित

शिव-तांडव स्तोत्र संपूर्ण होत आहे.


संदर्भः

१. शिवतांडवस्तोत्राचा हिंदीत अर्थ
http://hindi.webdunia.com/religion/occasion/vijayadashami/0710/19/107101... २. मूळ पंचचामर छंदातील, स्व. बजरंग लाल जोशी द्वारा रचित हिंदी अनुवाद
http://joshikavi.blogspot.in/2011/03/blog-post_1945.html
. http://anuvad-ranjan.blogspot.in/2012/11/blog-post.html#links अनुवाद रंजन
. http://www.maayboli.com/node/39386 ॥ रावण विरचित शिव तांडव स्तोत्र ॥ - मराठी अनुवाद– मायबोली डॉट कॉम
. http://www.misalpav.com/node/23341 शिव तांडव स्तोत्र - मराठी अनुवाद मिसळपाव डॉट कॉम

***************************************************************************************************

संगीतकार योग (श्री. योगेश जोशी) यांचे मनोगतः

खरे सांगायचे तर रामरक्षा, हनुमान स्तोत्र यांसारखे शिवतांडव स्तोत्र कधी नेमाने म्हटल्याचे आठवत नाही. नेमके कारण काय तेही सांगता येणार नाही. म्हणायला अवघड, न 'कळणारे', न शिकवलेले, इत्यादी कारणे असूही शकतील. पण श्री. गोळे यांचे मायबोलीवरील मराठी अनुवादीत स्तोत्र मात्र वाचता क्षणीच आवडले.

मूळ संस्कृत मधील स्तोत्र इतके अवघड वाटलेले असताना या मराठी अनुवादाला संगीतबद्ध करण्याची प्रेरणा मिळण्याचे सर्व श्रेय श्री. गोळे यांच्या अनुवादीत स्तोत्रालाच द्यायला हवे कारण त्यातील गेयता, अर्थ, नाद हे सर्वच मनाला भिडले.

तरीही, हे स्तोत्र केवळ मौखिक असण्यापेक्षा, एखाद्या वैयक्तीक / सामुहीक नृत्य कार्यक्रमातून, विशेषतः ध्वनी-प्रकाश-नृत्य यांच्या एकत्रीत योजनेतून, या संगीतबध्द रचनेचा प्रभाव व परिणाम अधिक स्पष्टपणे जाणवेल याच विचाराने एकंदर संगीत, वाद्यमेळ इत्यादी सर्व रचना केली आहे. त्यातही शिवतांडव स्तोत्राच्या प्रकटीकरणात त्याची लय, सूर (पट्टी) हे चढत्या क्रमाने असावेत व शेवट अतिशय प्रखर व 'तांडवपूर्ण' असावा, अशा यातील जाणकारांनी केलेल्या सूचना ध्यानात घेऊन त्यात यथायोग्य सुधारणा केली आहे. शिवाय तबला, पखवाज, मृदंग, घटम, घटशिंघरी, रावणहत्ता, एकतारा, इत्यादी खास भारतीय वाद्यमेळ वापरून यातील 'भारतीय संगीत व सांस्कृतिक मूल्य' अधोरेखित करायचा प्रयत्न आहे.

एकंदर १६ कडवी (शेवटचे १७ वे कडवे संगीत रचनेतून वगळले आहे) म्हणजे ६४ ओळी असल्याने संगीतबद्ध करताना संपूर्ण रचनेचा भाव, नाद, व प्रकटीकरण यात एकसंधता ठेवताना मात्र शक्यतो रचनेत वा सुरावटीत तोचतोचपणा येऊ नये वा रटाळ वाटू नये, त्यात उत्स्फूर्तता व नाविन्य असावे आणि शब्द व अर्थानुसार एकंदर स्वरयोजना व्हावी, असा प्रयत्न केला आहे. अधिक, उणे झाले असेल तर त्याबद्दल क्षमा असावी.

माझ्या संगीत व गायनाच्या मर्यादा ओळखून, यथाशक्ती हे गायचा प्रयत्न केला आहे. एक गोष्ट मुद्दामून नमूद करावीशी वाटते की, ज्या लयीत व पट्टीत हे रचले आहे ते सरावा दरम्यान म्हणतांना वा ध्वनिमुद्रीत करतानाही अक्षरशः श्वासाचे व्यायाम केल्याचा अनुभव येत असे. हे मराठीतील स्तोत्र देखील रोज म्हटले (संगीतबध्द केलेल्या लयीत व पट्टीत म्हटले तर अजून उत्तमच!) तरी श्वास विकार, सर्दी, खोकला, इत्यादी, बरे होऊ शकेल असे मला अनुभवावरून सुचवावेसे वाटते आहे. अर्थात याचेही श्रेय मूळ अनुवाद-रचनेलाच देणे उचित ठरेल.

श्री. शंकराच्या कृपेनेच संपूर्ण झालेले हे संगीतबध्द स्तोत्र '२०१३-मराठी भाषादिन' निमित्त प्रकाशीत करावे या माझ्या सूचनेचा व विनंतीचा आदर केल्याबद्दल मायबोलीचे व संयोजकांचे अनेक आभार. खेरीज, काही ठिकाणी एकंदर संगीत सुलभता व सुश्राव्यता ध्यानात घेऊन काही शब्द बदलण्यास परवानगी दिल्याबद्दल या अनुवादीत स्तोत्राचे कवी श्री. गोळे यांचेही धन्यवाद.

हे स्तोत्र संगीतबध्द करणे व गाणे हा एकूणातच लहान तोंडी मोठा घास घेतला आहे, तरी तुम्ही सांभाळून घ्यालच अशी आशा आहे.

या अनुवादीत स्तोत्राचा प्रसार होण्यात एक खारीचा वाटा म्हणून ही संगीतबद्ध रचना सर्वांसाठी मोफत उतरवून घ्यायची सोय मायबोली प्रशासनाने करावी अशी नम्र विनंती.

[गंमत म्हणजे याचे 'रॉक-फ्युजन' व्हर्शन देखील केले आहे आणि त्याचा रंग व अपिल मला स्वतःला थोडा अधिक वेगळा वाटतो. ते संपूर्ण झालेच तर संधी मिळाल्यास भविष्यात इथे दाखल करेन.]
***************************
हे स्तोत्र ह्या दुव्यावरून उतरवून घेता येईल.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम... सगळंच सुरेख जमलयं.
लेख्,अनुवाद, संगीत, गायन... पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतयं ... Happy

उत्तम प्रयोग योगेश आणि गोळे काका, निवान्त ऐकायच ठरवल्यामुळे आज ऐकते आहे .
अनुवाद तर चांगलाच झाला आहे, पण ऐकायलाही छानच वाटल.

वा! छान!
पहिल्यांदा ऐकले तेव्हा खास नव्हतं आवडलं..पण आता दोन तीन वेळा ऐकल्यावर आवडायला लागलंय.
सुलभ आणि वृत्तबद्ध भाषांतरासाठी गोळेसाहेबांचे आणि संगीत,गायन आणि वाद्यमेळ ह्या सर्वांबद्दल योगेशचे मन:पूर्वक अभिनंदन!

सुन्दर

नमस्कार !

मायबोलीवर शिव तांडव स्तोत्राचा इतका सुंदर मराठी अनुवाद आणि श्राव्य स्वरूपातील त्याचे स्तवन उपलब्ध आहे हे माहित नव्हते. श्री गोळे सर आणि सहकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद. हा धागा वर काढल्याबद्दल खूप आभार. ह्याचे श्राव्य version मिळू शकेल का? एक प्रतिसादात दिलेली लिंक ओपन होत नाही.
Priya

Pages