चित्रकलेची रंगोत्री : फ्रांस सफर

Submitted by अमेय२८०८०७ on 21 February, 2013 - 11:31

स्वतः चित्रकार नसलो अथवा चित्रकलेच्या तंत्राशी फारसं सख्य नसलं तरी मला चित्रं पाहायला आवडतात. एक कलाविष्कार म्हणून तैलरंग - जलरंग या माध्यमांचा वेगळेपणा मनाला भावतो. एखादा कवी जसा तुम्ही आम्ही वापरत असलेल्या शब्दांमधूनच भावनांचा कल्लोळ मांडू शकतो तसेच एखादा समर्थ चित्रकारही आपल्याला रोज दिसत असणाऱ्या निसर्गाच्या प्रतिमांना स्वतःच्या कुंचल्याने भावविश्वाचे एक वेगळे रंग - रूप देतो, ते मला पाहायला, उमजून घ्यायला आवडते.
'व्हॅन गॉग' या चित्रकाराचे नाव चित्रकलेशी दुरान्वयाने संबंध नसणाऱ्यानाही माहित असते. विसाव्या शतकातील कलेवर जबरदस्त परिणाम करणाऱ्या या कलाकाराचे जीवन अत्यंत वादळी होते. स्वतःच्या आयुष्यात चित्र विकून नाव आणि पैसा कमवायचे फक्त स्वप्नच पाहू शकलेल्या या चित्रकाराची दखल त्याच्या मृत्युनंतर अनेक वर्षानी घेतली गेली आणि आज तर त्याची चित्रे पाच पाचशे कोटी रुपयाच्या आसपास किमतीला विकली जातात. एका प्रतिभाशाली आणि संवेदनशील कलावंताला त्याच्या उमेदीच्या काळात जगाने अनुल्लेखाने मारून टाकले आणि तीच व्हॅन गॉगच्या आयुष्याची शोकांतिका ठरली.स्टारी नाईट, पोटॅटो ईटर्स सारखी अस्वस्थ करणारी अनेक चित्रे सोडून गेलेल्या व्हॅन गॉगचे जीवन सदैव कष्टाचे, मनःस्तापाचे आणि शारीरिक श्रमांचे जावे यात देवाची काय योजना होती ते देवच जाणे.
अशा या कलाकाराच्या ३८-३९ वर्षाच्या उण्यापुऱ्या परंतु वादळी आयुष्यातील दोन वर्षांचा महत्वाचा काळ दक्षिण फ्रांस मधील 'आर्ल' (Arles) या निसर्गसुंदर गावी गेला. मनःशांतीसाठी पॅरीसच्या गजबजाटापासून दूर आलेल्या व्हॅन गॉगने आर्लमध्ये अनेक संस्मरणीय चित्रे काढली. अर्थात मनःशांती वगैरे क्षणिकच ठरली आणि त्याला वेडाचे झटके आल्यामुळे शेवटी हॉस्पीटलमध्ये भरती करावे लागले. त्या हॉस्पिटलसमोरचे अंगण आजही 'एस्पास व्हॅन गॉग' (Espace Van Gogh) या नावाने स्मारक म्हणून जतन केले गेले आहे. चित्रकलेच्या अनेक उपासकांसाठी या जागेला 'पंढरीचे महात्म्य' आले आहे. जगभरातून आलेल्या व्हॅन गॉगच्या चाहत्यांची तिथे वर्षभर वर्दळ सुरु असते.
नुकत्याच झालेल्या फ्रान्सच्या वारीत मला दक्षिण फ्रान्सला भेट द्यायची संधी मिळाली. या भागाला 'फ्रेंच रिव्हिएरा' असे म्हटले जाते. भूमध्य समुद्राचे निळेशार पाणी, समशीतोष्ण तापमान, स्वच्छ किनारे, द्राक्ष- ओलिव्हचे बगीचे यांमुळे या भागाला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे.
मार्से (Marseilles) हे फ्रांसचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. कामानिमित्त तिथे जाणे झाले होते. खलाशांचे शहर असे म्हणवून घेणारे हे शहरही खूप सुंदर आहे. समुद्रात जाणाऱ्या खलाशांवर जणू काही मायेची नजर ठेवण्यासाठी बांधले असावे असे उंचावरचे 'नोत्र दम दे ला गार्ड' नावाचे चर्च मनोहारी आहे. तेथून संपूर्ण शहराचा विहंगम व्ह्यु दिसतो.

a2.JPGa3.JPG(चर्च आणि उंचावरून दिसणारे मार्से बन्दर)

एके दिवशी काम लवकर आटोपले आणि आम्ही आर्लला जायचे ठरवले. ७०-८० कि.मी.चे अंतर होते. काही वेळ एक्स्प्रेस हायवेने गेल्यावर आर्ल कडे जाणारा रस्ता आला. दुतर्फा उंच उंच झाडांच्या वनराजीतून त्या छोट्या पण सुबक अशा रस्त्यावरून गाडी मस्त पळत होती.

a1.JPG(आर्लच्या वाटेवर)

आर्लमध्ये पोचलो. कोल्हापुरात जसा अंबाबाईचा पत्ता विचारावा लागत नाही त्याप्रमाणेच कोणालाही अजिबात न विचारता केवळ गर्दीच्या बरोबर राहून आम्ही बिनचूकपणे एस्पास व्हॅन गॉगकडे आलो. एक इमारत म्हणून ही जागा काही स्थापत्यशास्त्रातील चमत्कार वगैरे अजिबात नाही. तिचे वेगळेपण आहे ते गेल्या १५० वर्षापासून टिकवलेल्या तिच्या उजळ पिवळ्या रंगात. आज हॉस्पिटल नामशेष झाले आहे पण अंगणाच्या सभोती असणाऱ्या पिवळ्या भिंती आणि मुख्य म्हणजे व्हॅन गॉगला अतिशय आवडती असलेली बाग जशीच्या तशी टिकवण्यात आली आहे.

a4.JPGa6.JPG(एस्पेस व्हॅन गॉग : हॉस्पीटलचे अंगण)

त्यानेच काढलेल्या या बागेच्या चित्राची प्रतिमा तिथे लावली आहे. त्यावरूनही आपल्याला बागेचे त्याकाळचे सौंदर्य कसे टिकवले आहे याची कल्पना येते.

a10.jpeg(व्हॅन गॉगने १८८९ मधे काढलेले बागेचे चित्र)

चारही बाजूंनी त्या बागेचे दर्शन घेतले. भिंतीना हात लावले. एका युगप्रवर्तक चित्रकाराने देखील या भिंतीना कधी हात लावला असेल, तोही या अंगणात कधी वावरला असेल या विचारांनी क्षणभर शिरशिरी आली. या जागेद्वारे- भिंतिंद्वारे काळ मला जणू त्या चित्रकाराचा स्पर्श करवतो आहे असे काहीसे वाटले.
बरोबरच्या गर्दीत काही जपानचे लोक होते बहुधा चित्रकार असावेत . त्यातल्या एक दोघाच्या डोळ्यांत तर अश्रू चमकत होते. ते पुन्हा पुन्हा त्या झाडांना, भिंतींना हात लावून बघत होते. आषाढी कार्तिकीला तुकाराम- नामदेव कुठल्या ओढीने पंढरीला गेले असतील याची काहीशी जाणीव मला त्या जापनीज माणसांना बघून आली. कुणा कुणाचे परब्रह्म कशा रुपात साकळून असते काही सांगता येत नाही.
संध्याकाळ होत आली. आर्लचा निरोप घ्यायची वेळ आली होती. एस्पेस व्हॅन गॉगच्या जवळच रंगसाहित्य विकणारे एक प्रसिद्ध दुकान आहे. मला झालेला व्हॅन गॉगचा परिसस्पर्श चित्रकला आवडणाऱ्या माझ्या मुलापर्यंत पोचवावा या काहीशा भाबड्या भावनेने त्या दुकानातून थोडे जलरंग आणि ब्रश खरेदी केले आणि आम्ही परत फिरलो.
आर्ल रोमन काळातील अ‍ॅम्फिथिएटर पध्दतीच्या इमारतींसाठीसुध्दा प्रसिध्द आहे. (ग्लॅडिएटर सिनेमात आपण ती पहिली असेल - जिथे पूर्वी रक्तरंजित कुस्त्या व्हायच्या). येता येता अशाच एका अ‍ॅम्फिथिएटरला भेट दिली आणि गाडीकडे परत आलो.

a8.JPGa9.JPG(जिथे ग्लॅडिएटर म्हणजेच योध्दे आपल्या सामर्थ्याच्या प्रदर्शनासाठी रक्तरंजित मल्ल युध्द खेळायचे अशी अ‍ॅम्फिथिएटर अथवा अरीना (Arena)

व्हॅन गॉगची शोकांतिका आणि त्याच्या कर्तृत्वाला ओळखण्यात झालेल्या अन्यायाविषयी वाचलेल्या क्लेशदायी आठवणी तर होत्याच पण कलाइतिहासातील महत्वाच्या टप्प्यावरील एक साधक म्हणून ज्याला काळ ओळखतो आणि पुढेही ओळखत राहील अशा कलाकाराच्या अलौकिक स्मृतीला भेट देऊन आल्याचे समाधानही मला परतीच्या प्रवासात सुखावत होते. व्हॅन गॉगच्या रंगप्रभेचा स्पर्श झालेले एक भावपूर्ण स्मारक त्या भेटीत बघायला मिळाले याचा आनंद आयुष्यभर पुरणारा ठरला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

त्यातल्या एक दोघाच्या डोळ्यांत तर अश्रू चमकत होते. ते पुन्हा पुन्हा त्या झाडांना, भिंतींना हात लावून बघत होते. आषाढी कार्तिकीला तुकाराम- नामदेव कुठल्या ओढीने पंढरीला गेले असतील याची काहीशी जाणीव मला त्या जापनीज माणसांना बघून आली. कुणा कुणाचे परब्रह्म कशा रुपात साकळून असते काही सांगता येत नाही. >>>>>> मस्तच....... अफाट सुंदर लिहितोस यार तू - अप्रतिम लेखनशैली.....

अमेय,
वर्णन खूपच आवडले, स्वतः भेट दिल्याचा अनुभव आला....
मि पण एक कला प्रेमि आहे, पण महित नाहि या कला नगरि चि सफर करण्याचा योग कधि येतो ते..
छान महिती दिल्या बद्द्ल धन्यवाद...

मस्त लिहिलंयत.

मार्से (Marseilles) हे फ्रांसचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. >>> आपल्याला या शहराची दुसरी आणि खूप जवळची ओळखही आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ती सुप्रसिध्द उडी याच बंदराजवळ घडली.

वा! छान सफर घडवलीस! आणि तुझी लिहिण्याची शैली फार छान आहे. फोटोही मस्तच!
वॅन गॉग म्हटलं की त्याची सूर्यफुलं आणि प्रॉमिनन्टली दिसणारा पिवळा रंग!
या हॉस्पिटलच्या चित्रातही मला पिवळा रंग दिसतोय!