अगतिक

Submitted by अमेय२८०८०७ on 28 February, 2013 - 00:20

कानात रात्रीचा गोंधळ ओटीवर हाले काही
पालीची चुकचुक सांगे, ही वेळ खऱ्याची नाही
प्राशून वेदना ओली गावातून घुमतो वारा
झाडांना टोचून भाले संताप शमवतो सारा

फांद्यांची तडफड वाढे, पानांच्या उल्का होती
अश्राप झाड ते पाही मदतीचा हात सभोती
मिणमिणत्या वातीवरली जळणारी ज्योत चुकार
झाडाला वाटे बहुधा, आता मी उघडीन दार

भिंतीच्या आडून मजला दुःखाचा कळतो नाद
जागेवर ऐकू येते मरणाची अंतिम साद
खिडकीतून अंधुक दिसते हरलेले जीवन भोळे
कुबडीच्या आधाराने मी टिपतो विझले डोळे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कानात रात्रीचा गोंधळ ओटीवर हाले काही
पालीची चुकचुक सांगे, ही वेळ खऱ्याची नाही
प्राशून वेदना ओली गावातून घुमतो वारा
झाडांना टोचून भाले संताप शमवतो सारा

वातावरणनिर्मीती आवडली.

वै.व.कु.
आपण कुठल्या मनाने हे लिहिलेत हे कळलेले नाही पण चांगुलपणानेच असेल असे म्हणून आणि आपल्या थोर व्यासंगाला प्रणाम करून नम्रपणे विचारतो,
या विषयावर ग्रेसजींची काही कविता असेल तर जरूर लक्षात आणून द्या, मी ही काढून टाकेन. कारण 'नक्कल' या शब्दाला जो वास आहे तो मला आवडला नाहीये. अर्थात मला ही कविता लिहिण्यामागची पार्श्वभूमी, ती सुचायचा 'ट्रिगर' हे ही तुम्हाला माहीत असायचे कारण नाही पण तशा काही घटना आहेत, एवढेच सांगतो.
बाकी ग्रेस किंवा आणि कोणाचेही अंधानुकरण करून आपण काही टाकले तर ते अशा व्यापक, व्यासंगी आणि विचक्षण वाचकवर्ग असलेल्या संकेतस्थळावर खपून जाईल असे मानून काहीही लिखाण डकवण्याची घोडचूक मी तरी करणार नाही याची खात्री बाळगावी.
एखाद्या लेखकाचे लिखाण हे प्रेरणास्रोत असणे, आणि नक्कल यातील फरक लिखाणातील आशय आणि अभिव्यक्ती जाणून घेऊन समजण्याएवढी 'उमज' आपल्यात नक्की असेल अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो आणि अशा हलक्या प्रतिसादामुळे भविष्यात इतर कोणी दुखावला न जाईल याची काळजी आपण घ्याल ही 'एका सहचारी कवी/लेखकाची' अपेक्षा आपल्यापर्यंत पोचली असेल अशी आशा बाळगतो.

वर्णन, वातावरणनिर्मिती छान जमलेय.
शेवटी काहीतरी कलाटणीसारखं असणार हा अंदाज बांधूनसुद्धा शेवट प्रभावी वाटला.

अमेय माझ्या दोन ओळीच्या प्रतिसादाचे किती वाईट वाटून घेतलेत ....!!
आपला प्रतिसाद पाल्हाळाचा आहे कविता त्यामानाने बरी आहे ती मला आवडल्याचेही मी म्हणालेलोच आहे

मी एकूण ग्रेस यांची स्टाईल विचारात घेवून त्याबद्दल "नक्कल" असे उद्गार बोललो कोणत्याही एका विशिष्ट कवितेबद्दल नाही

आपण कुठल्या मनाने हे लिहिलेत हे कळलेले नाही >>>>> जितूच्या कवितेवर आपणही काही लिहिले होते ते वाचले त्यावरून मी असे म्हणालो.... मुद्दाम म्हणालो

आपण प्रतिसाद देता ते काही मी वाचले आहेत आपले प्रतिसाद निव्वळ शेखी मिळवणारे असतात "मला कवितेतले कळते"....या तोर्‍यातले ( हे एक वैयक्तिक मत आहे माझे (गैरसमज म्हणा हवे तर)....पण ठाम आहे )

अर्थात मला त्यामुळे काहीच फरक पडत नाही
मला काही खटकले म्हणूनच बोलतो मी
जरा मनापासून बोलतो इतकेच !!...त्यामुळे मनाला लागतही असेल एखाद्याच्या ; पण काय करू मला जे जमते तसेच मी ते करतो

आणि हो ..... ज्याच्याशी घडघडून बोलावे वाटते त्याच्याशीच बोलतो .....
असो
वाईट मानून घेवू नये आपण कविता खूप छान लिहिता मला त्या नेहमीच आवडतात Happy

आपला नम्र
सख्याभिलाषी
~वैवकु

वैवकु ,
वै. म. म्हणायचे आणि त्याच्या आड सर्वकाही सार्वजनिक करून जायचे ही पळपुटी वृत्ती सध्या बोकाळतच आहे (हे माझे वै. म. हे कृपया समजून घ्यालच).
दुसरे माझ्या - तुमच्या मते शेखी मिरवणार्‍या वगैरे - प्रतिसादाबद्दल. मला आपण इतके 'फॉलो' करता याची कल्पना नव्हती. मी वेळोवेळी लिखाण वाचून जे काही सुचले तेच प्रतिसादत होतो.माझ्या संवेदना-भावना व्यक्त करण्यासाठी स्वतःच्या कविता, लिखाण याचा मी आसरा घेतो, प्रतिसादांचा नाही. कोणालाही काही उणे-दुणे वा वावगे लिहिल्याचे मला स्मरत नाही. काही जणांशी त्यायोगे सुरू झालेले संवाद हेही माझ्यासाठी आश्वासक ठरले आहेत.
पण यात मजा म्हणजे आपला अर्था अर्थी काही संबंध नसताना आपण विनाकारण ठाम गैरसमज करूनही मोकळे झालेले आहात. असा आततायीपणा नका हो करू. फुकट मनःस्ताप होईल अशाने ना.

बाकी तुमचा <<ज्याच्याशी..... सख्याभिलाषी>> शेवट आवडला. या काही जीवन मरणाच्या लढाया नव्हेतच. ही पेल्यातील (तो सुद्धा व्हर्चुअल) वादळे!

लोभ आहेच
Happy

अशी सभ्य साहित्यिक भांडणं नेमाडेंनी वाचायला हवीत............. असा एक ऊटपटांग विचार उगाचच मनात 'पॉप अप' विन्डोसारखा वर आला !!

असो.

वैभू, .........मित्रा तुला काकांची फार आठवण येतेय का रे ? कंटाळा आला का तुला, कुणीच भिडायला नाही म्हणून..? फोन कर की त्यांना... माझ्या तर्फे शुभेच्छा दे !! Wink

-----> हे वरचं सगळं हलकेच घ्यावे, बरं का ?

सिरिअसली एव्हढंच - "भांडा, पण नांदा !!"

अमेयजी,
कविता खूपच आवडली.

जागेवर ऐकू येते
मरणाची अंतिम साद
या ओळीच्या संदर्भाने मला ही कविता समजली आहे असं वाटतं.

लय , नाद , प्रतिमाप्रतिकं आणि व्यंगार्थ यांचा छान मेळ जमला आहे .

पहिल्या दोन कडव्यांतलं झाड तिसऱ्‍या कडव्यात मीमय होऊन संपलं आहे असं जाणवलं.
अंतिम क्षण 'जिवंत' करण्याचा हा प्रयत्न फार आवडला.

सुरेख! Happy

छान.....

कविता आवडली. ह्या कवितेत जी गेयता आहे ती ग्रेस ह्यांच्या 'पाऊस कधीचा पडतो' ह्या कवितेशी जुळणारी वाटते. अर्थात दोन्ही कविता भिन्न प्रवृत्तीच्या आहेत हे. सां . न. ल. .

सर्वांना अनेक धन्यवाद.

अश्विनीजी, तुमचे विचार वाचायला आवडतील.

सुंदर चित्रमय शब्दकळा पण कोंडलेला अर्थ जाणवत न गेल्याने कविता अस्वस्थ करणारी वाटली.
ही दुर्बोधता व्यक्तिगत पातळीवरील एका अनुभवाचे सार्वत्रिकीकरण करून न करणे यातून आली असावी.
अश्विनी, येऊ देतच रसग्रहण.