"संध्यानिधान"

Submitted by अमेय२८०८०७ on 25 February, 2013 - 11:31

अंधारून येता विझती
दिवसाचे पंचःप्राण
त्या अस्ताच्या साक्षीने
ताऱ्यांना स्फुरते गान

कुंचले रक्तरंगांचे
त्वेषाने फिरती खाली
निर्मिती-वेदना झाली
साकळले देहभान

क्षितिजाच्या आडोशाने
दाराशी स्मरणे यावी
जणू ग्रीष्मामध्ये व्हावी
वर्षेची पूर्ण तहान

ह्या समयी दिसते काही
सूर्यासही गमे न ऐसे
हृदयास लावते पिसे
मारव्यात भिजली तान

श्वासांची उकलून येवो
निरगाठ अशाच वेळी
कातरल्या लाभो काळी
जन्माचे लुप्त निधान

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दांची आणि मांडणीचीच भुरळ पडतेय. अर्थाकडे लक्षच जात नाहिये जास्त Happy एखाद्या कवितेचा अर्थ जास्त खुणावतो तर एखाद्या कवितेचे रुपडे खुणावते.

वर्णन छान झालंय.

"कातरल्या लाभो काळी" या ओळीत शब्द उलट-पालट का केले आहेत ते समजलं नाही.
"लाभो कातरल्या काळी" हे सहज वाटलं असतं.
वैम. कृगैन.

धन्यवाद 'एक' आणि बाकी सार्‍या प्रतिसादकांना.

'कातरल्या' वर जोर येण्यासाठी तो शब्द पहिल्यांदा ठेवावा असे वाटले, बाकी श्री. भिडे यांची सूचना योग्यच आहे.